हिंदू स्त्रिया आणि पुरुषांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तथाकथित स्त्रीवाद हा हिंदू महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी नसून हिंदू पुरुषांचे म्हणजेच त्यांच्या वडील, भाऊ, पती आणि पुत्र असलेल्या पुरुषांचे आणि त्या योगाने संपूर्ण हिंदू समाजाचे अशक्तीकरण करण्याचा डाव्यांचे षडयंत्र आहे.
आज एकच मूल असलेल्या कुटुंबांत (हिंदू हे वेगळं लिहायला नको) एक मुलगी ही वेळप्रसंगी आईचे रूप धारण करु शकणारी कुणाची बहीण उरलेली नाही. मुलांचीही हीच अवस्था आहे; बहिणींचे रक्षण करायला किंवा तिच्याकडे हट्ट करायला आज अनेक घरांत बहिणीच नाहीत. अशी नाती उरलेलीच नसल्यामुळे आजची तरुण पिढी ही या नात्यांसोबत येणारी मजा, अधिकार, आणि जबाबदार्यांच्या तसंच त्या नात्यांच्या असण्याने आपसूक मिळणार्या शिक्षणापासून आणि सकारात्मक परिणामांच्या कोणत्याही जाणीवांशिवाय मोठी होत आहे. आजच्या पत्नी आणि आई असलेल्या स्त्रियांचा विचार करायचा तर पुरुषांसाठी आज फक्त मातृत्व ही एकच भावना शुद्ध स्वरूपात उरलेली आहे, कारण हल्ली प्रेयसी आणि पत्नीच्या नात्यांबरोबरच प्रेमाचं स्वरूप आज भावनिकदृष्ट्या प्रचंड व्यवहारी आणि कोरडं झालेलं आहे, आणि म्हणूनच वडील नामक व्यक्ती मुलींच्या आयुष्यात त्या नावाच्या अर्थासह असेलच असं नाही. याचं कारण शोधायला गेलं तर आजच्या तरुणींना नवरा आणि वडील या नात्यांना त्यांच्या पूर्णार्थाने अनुभवणं आणि स्वीकारणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे हे निदर्शनास येतं.
इंग्रजीत एक म्हण आहे, 'Power corrupts, and absolute power corrupts absolutely' अर्थात सत्तेमुळे भ्रष्ट आचार निर्माण होतो आणि अमर्याद सत्तेमुळे अमर्याद भ्रष्ट आचार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे आजचा स्त्रीवाद हा स्त्री आणि पुरुषांना कुठल्याही नात्यात एकमेकांना पूरक असण्याऐवजी स्त्रीला कुटुंबात अमर्याद अधिकार दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे पुरुष स्त्रैण वाटावेत इतके बुळे बनलेले आहेत, किंबहुना बनवलेले गेले आहेत. त्यातही एकच मूल असल्याने त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं हे ओघाने आलंच. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आजच्या तरुणांना नर्ड बनवण्याच्या नादात मर्द बनवायचं बाजूला पडलेलं आहे.
आजच्या स्त्रीला मिळालेल्या अमर्याद अधिकार आणि सत्तेमुळे तिला एक प्रकारची मानसिक नशा अनुभवायला मिळत असली, तरी असा कुठलाही अनुभव तिला जीवशास्त्राशी, जनुकीय प्रेरणांशी, आणि पर्यायाने निसर्गाशी उभा दावा मांडण्याची शक्ती देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी स्त्रैण असलेला मुलगा जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा इतर बाबतीत अनुरूप असलेल्या मुलीला त्याला 'पसंत' करणं अवघड होऊन बसतं (लग्नाचा बाजार म्हणजे इथे जेव्हा प्रथम भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून प्रत्यक्ष विवाह होईपर्यंतचा काळ). कारण कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा स्त्रैण (emasculated) पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटणं शक्यच नसतं असा पुरुष आसपास असताना तिला (शारीरिक) सुरक्षितेची भावनाच निर्माण होत नाही. एक स्त्री म्हणून तिची अंतःप्रेरणा तिला काया, वाचा, मने अशाच पुरुषाकडे खेचूण नेते, अशा पुरुषाला शोधते जो तिचं संरक्षण करु शकेल. असा पुरुष तिला हल्ली कुठे मिळतो हे वेगळं सांगायला नको.
इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहीजे की स्त्रीमुक्तीचा भारतातला अर्थ हा हिंदू पुरुषांपासून स्त्रियांना मुक्त करुन इतरांसाठी त्यांना उपलब्ध करण्याची संधी निर्माण करणे हा आहे. स्त्रीमुक्ती या गोंडस नावाखाली ही एक निव्वळ वामपंथी चळवळ आहे जिने आपल्या देशात फक्त आणि फक्त हिंदूंचेच नुकसान केले आहे, आणि ह्या नुकसानाचा फायदा कोणाला होतो आहे ते ही दिसतच आहे, त्यामुळे डावे हे कोणाची ढाल बनले आहेत हे समजणे सोपे आहे. हे एकदा लक्षात आलं की या मागचं षडयंत्र लक्षात यायला वेळ लागणार नाही. पर्यायाने भारतातली डावी चळवळ ही हिंदूंच्या दृष्टीने विकत घेतलेले गारदी आणि पाळलेले पेंढारी ठरली आहे.
द फेमिनिस्ट लाय - इट वॉज नेव्हर अबाऊट इक्वॅलिटी (The Feminist Lie - It Was Never About Equality) या आपल्या पुस्तकात बॉब लुईस सप्रमाण सिद्ध करतो की स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम चळवळ ही समानतेबद्दल कधीच नसून उलट स्त्रीयांचा श्रेष्ठतावाद निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता. हा अमेरिकन संदर्भ झाला, पण एक भारतीय म्हणून आपल्याला समानता नवीन नाही. एक सनातन संस्कृती म्हणून आपण अनेक राण्या पाहिल्या आहेत आणि शक्तिरुपेण संस्थिता अशा देवींचा आपलं रक्षण करावं म्हणून नेहमीच धावा केलेला आहे. आपली समस्या समानतेच्या नावाखाली, महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली होणारे पुरुषांचे अशक्तीकरण, हतवीर्य होणं ही आहे. दुर्दैवाने हे अगदी राजरोस सुरु आहे आणि यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधावाच लागेल.
बॉब लुईसचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून नेटवर विनामूल्य उपलब्ध आहे.
आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा अनेकदा आपण देवींचा धावा केलेला आहे. महिषासुरमर्दिनी, नरकासुरमर्दिनी या देवीच होत्या. बाईचा सत्तांध बुवा आणि बुवाची अधिकारहीन बाई करणार्या स्त्रीवादी असुराचा वध करायलाही स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांना जी शस्त्रे लागतील त्याला पुरुषांना धार काढून द्यावी लागेल. फेमिनिझम हा राक्षसांची ढाल आहे, आणि राक्षसांना संपवायचं असेल तर त्यांची स्त्रीवाद ही ढाल आधी नष्ट करावी लागेल.
🖊 मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९४२
टीपः ही पोस्ट स्त्रीवाद या विषयाकडे फक्त स्त्री नव्हे तर सर्व बाजूंनी विचार करणार्या लोकांसाठी आहे. "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की...." छाप वक्तव्य करायची असतील तर कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे.
--------------------------------------------------------------------------
संदर्भः English Version
--------------------------------------------------------------------------