Wednesday, December 30, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: कामगार युनियन हेच गरीबांचे मारकेरी

साम्यवाद गरिबांसाठी काम करण्याचं दिवास्वप्न दाखवून गरिबांनाच कसं संपवतो, त्याचं हे उदाहरण:

राजस्थानातल्या गंगानगरमध्ये पूर्वी असलेल्या थापर ग्रुपच्या जेसीटी कापड गिरणीची ही गोष्ट आहे.

एके काळी थापर ग्रुपने स्थापन केलेली ही उत्तर भारतातील सर्वात संपन्न अशी कापड गिरणी होती आणि त्यात जेसीटी नामक कापडाचा ब्रँड बनत असे. जेसीटीचे कॉटन कपडे संपूर्ण भारतात प्रसिद्धी पावले. गंगानगर जेसीटी अशी कापड गिरणी होती ज्यात पूर्ण कापड युनिट होतं, म्हणजे तिथे कापूस एकदा कारखान्यात गेला को तिथेच जिनिंग, प्रेसिंग नंतर तिथल्या युनिटमध्येच धागा बनत असे आणि त्यापासून तिथेच कापड तयार होत असे. थोडक्यात, कापूस अंदर डालो आणि कपडा बाहर निकालो असला परिपूर्ण प्रकार होता.

जेसीटी दणक्यात सुरू होती.

मग बिहार आणि बंगालमधून आलेल्या कामगारांनी तिथे कामगार युनियन स्थापन करायला सुरवात केली. रोजचा सूर्य उगवायचा तोच एखाद्या संप, आंदोलन, किंवा टाळेबंदीची परिस्थिती घेऊनच.

काॅमरेड नेता हन्नान मोल्ला सारख्या नेत्यांचा तिथे वावर, येणंजाणं सुरू झालं, आणि त्याच्या वरदहस्ताने काॅमरेड हेतराम सारख्या नेत्यांचा उदय झाला. कॉम्रेडांच्या भल्या आणि बऱ्याचशा बुऱ्या मागण्या पुरवता नाकी नऊ आलेल्या थापर ग्रूपने जेसीटीचा गाशा गुंडाळला. यात कुणाचं भलं झालंही असेल पण संप करणाऱ्या आणि 'अन्यायी' शेटजींच्या विरोधात घोषणा देणाऱ्या गरीब कामगारांची मात्र वाट लागली, ते देशोधडीला लागले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला ते वेगळंच.

जेसीटी मिल्स गंगानगर

साम्यवाद हेच करतो. नाहीतर एकेकाळी म्हणजे इंग्रजांच्या काळात भारताची प्रतिराजधानी म्हणून ओळखलले जाणारे कोलकाता शहर आज इतक्या दैन्यावस्थेत कसे?

आज शेजारचा टीचभर बांगलादेश कापडनिर्मितीत भारताच्या पुढे निघून गेला आहे. अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांत सुद्धा हेटाळणीच्या सुरांत हा होईना शेजारच्या बांगलादेशची प्रसिद्दी तिथे बनणाऱ्या कपड्यांसाठी आहे.

©️ मंदार दिलीप जोशी 
मार्गशीर्ष शु पौर्णिमा, शके १९४२

Friday, December 4, 2020

कोटीच्या कोटी उड्डाणे

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) काल जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.

ज्या स्टिफन फ्राय मार्फत हा पुरस्कार दिला गेला, तो अभिनेता असण्याबरोबरच इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचा (Labour Party) चा सक्रिय सदस्य आहे. 

थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

स्टिफन फ्रायच्या विकीवर अधिक "रोचक" माहिती वाचायला मिळेल.

वार्की फाउंडेशन ही सनी वार्की या नॉन रेसिडेंट दुबईस्थित भारतीयाने स्थापन केलेली संस्था आहे. हा केरळी ख्रिश्चन आहे. ही संस्था अंडरप्रिविलेज्ड मुलांना मिळणाऱ्या "शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरता" काम करते. जगभरातल्या विकसनशील देशातील शेकड्यानी शिक्षक या संस्थेत प्रशिक्षण घेतात. 

याच सनी वार्कीने काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिल क्लिंटन यांच्या क्लिंटन फाउंडेशनला सहा मिलियन डॉलर्सची देणगी जाहीर केली

सद्ध्या याच डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन आणि कमला हॅरीस राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष कुठलाही असो, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण फारसं बदलत नाही. पण डेमोक्रॅटिक पक्ष हा जरा जास्त पाकिस्तान धर्जिणा आहे आणि हॅरीस यांची काश्मीरबद्दलची मते गुगल करू शकता.

हा पक्ष थोडक्यात थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

आता पुरस्काराबद्दल जरासे. या पुरस्काराचे काही विजेते व्हॅटिकनला पोप महाशयांना भेटायला गेले. आता पोप महाशयांचा आणि शिक्षण क्षेत्राचा काय संबंध?


आता बिंदू जोडा. केरळी ख्रिश्चन > दुबई > प्रचंड रकमेचा पुरस्कार > जाहीर करणारा डाव्या विचारांचा अभिनेता > डाव्या विचारांच्या क्लिंटन फाउंडेशनशी लागेबांधे >  व्हॅटिकन-पोप.

सहज एक विचार आला. आधी अचानक भारतीय ललना जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरू लागल्या, आता अचानक गेली काही वर्षे बौद्धिक क्षेत्रांतील पुरस्कार मिळू लागलेत. गंमतच आहे एकूण. 

पुन्हा एकदा डिसले सरांचे अभिनंदन. हिंदू संस्कृती व भारतीय हितसबंधांना कुठेही धक्का न लावता ते या पुरस्काराच्या रकमेचा विनिमय करतील अशी भाबडी आशा बाळगायची का? 

©️ मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ ४, शके १९४२


Thursday, November 19, 2020

वरावारा राव: शहरी नक्षलवादाचा खुनशी चेहरा

जे या प्रोफेसर वरावारा राव नामक इसमाला ८१ वर्षांचा कवी म्हणून सहानुभूती गोळा करू पाहतात, तो किती निर्लज्जपणे आणि मुख्य म्हणजे थंडपणे नागरिक आणि सशस्त्र दलाच्या हत्यांचं समर्थन करतो आहे बघा. 

अशा लोकांना तत्काळ मृत्युदंड देण्यासाठी कायद्यात तातडीने सुधारणा केली जायला हवी.

©️ IDream Telugu News ला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग.


🖋️  मंदार दिलीप जोशी

Monday, November 2, 2020

शॉन कॉनरी - झाले बहु होतील बहु परी यासम हाच अर्थात नोबडी डझ इ़ट बेटर

कुठल्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वडिलांकडून काही गोष्टींचा वारसा मिळतोच. स्थावर जंगम मालमत्ता ही झाली संपत्तीची गोष्ट, पण इतरही अनेक गोष्टी असतात. आमच्या तीर्थरुपांकडून चार प्रमुख गोष्टींचा वारसा मिळाला तो म्हणजे शिस्त व वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, वाचनाची आवड, आणि जेम्स बाँड.

त्या काळात रंगीत टीव्ही घेऊन तसा काही काळ लोटला होता, आणि मग आमच्याकडे आला होता व्हीसीपी अर्थात व्हिडिओ कॅसेट प्लेअर. त्यावर अनेक दर्जेदार सिनेमे बघायला मिळाले पण नंतर बाबांनी रांग लावली ती जेम्स बाँडच्या सिनेमांची. व्हिडिओ कॅसेट भाड्याने देणार्‍या दुकानांतून कॅसेट आणून बघितलेला जेम्स बाँडचा बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे You Only Live Twice हा मात्र जेम्स बाँडचा पहिला नव्हता. मात्र त्यात खोटं मरुन पुन्हा जिवंत झालेल्या शॉन कॉनरीचं कमांडर बाँडचं नौसैनिकाच्या गणवेशातलं देखणं रुपडं मनात भरलं ते कायमचंच. यानंतर मनात ठसलेलं दृष्य म्हणजे १९६२ साली आलेला पहिल्या बाँडपटातलं डॉक्टर नो मधलं जेम्स बाँड त्याचा प्रसिद्ध "माय नेम इज बाँड, जेम्स बाँड" हा संवाद म्हणतो ते दृश्य.


इंग्लंडची लोकं बाकी काही करोत न करोत बोलबच्चन या प्रकारात वाकबगार आहेत. नाव आणि ००७ या कोड नंबर सकट काहीच सिक्रेट नसलेला हा सिक्रेट एजंट कदाचित एरवी हास्यास्पद ठरला असता, पण संबंधितांनी हे रसायन असं काही जुळवून आणलं की आज सहा दशके व्हायला आली तरी इंग्रजी सिनेरसिकांवरचे त्याचे गारूड अजूनही कायम आहे. या रसायनाने सिनेरसिकांवर खोल परिणाम केला त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अर्थातच शॉन कॉनरी. त्याने घातलेल्या पायावर इतर नटांनी कळस चढवला नाही पण इमारतीचा विस्तार मात्र नक्कीच केला. खरं तर हे वाक्य, 'जेम्स बाँड नामक इमारतीचा शॉन कॉनरीने सुरवातीलाच कळस निर्मिल्यामुळे इतरांना पायापर्यंत जाण्यापलिकडे आणि कळसाला शोभेलसं आपलं काम हवं याकडे लक्ष देण्यापलीकडे काही करण्यासारखं काम उरलं नाही' असं असायला हवं.

'जेम्स बॉण्ड'चा जनक इयान फ्लेमिंग हा कट्टर ब्रिटिश परंपरेचा पाईक होता तसेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश रॉयल नौदलात नोकरी करताना त्याने युद्धभूमीवरील साहसाचाही अनुभव घेतला होता. त्यामुळे जेम्स बाँड या व्यक्तीरेखेला त्याने 'ब्रिटिश'च रंगविणे साहजिकच होते. डॉक्टर नो या पहिल्या बाँडपटासाठी डेव्हिड निव्हेन या ब्रिटिश अभिनेत्याची त्यामुळेच निवड करण्यात आली होती. पण निव्हेन यानी 'मी या भूमिकेसाठी वयामुळे योग्य वाटत नाही...' (त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते) असे सांगून नकार दिल्यावर मग पुन्हा सुरु झालेल्या शोधात शॉन कॉनेरी ह्या स्कॉटिश अभिनेत्याची निवड झाली. आणि पुढे इतिहास घडला.

शॉन कॉनरी बाँड सर्वाधिक लोकप्रिय का करु शकला केला याला अनेक कारणे आहेत. शॉनचे व्यक्तिमत्व आणि ब्रिटिश मर्दपाणाची त्याने पडद्यावरची बदललेली व्याख्या ही त्यातली प्रमुख कारणे होती. शॉन कॉनरीच्या बाँडमध्ये ब्रिटिशांच्या ठायी असलेला एक प्रमुख गुण म्हणजे देशाबद्दल आणि राज्यकर्त्यांबद्दल असलेला आत्यंतिक प्रामाणिकपणा हा प्रकर्षाने दिसतो. त्याच बरोबर एमआय-५ आणि बॉसने नेमून दिलेली कामगिरी कसलाही विधीनिषेध न बागळगता आणि प्रसंगी घालून दिलेला प्रत्येक नियम मोडून पार पाडणे, स्त्रीसंग करतानाही आपण हे देशासाठी करतो आहोत याचं भान बाळगणे (थंडरबॉलमधला एक संवाद आठवा: All I did was for King and Country) आणि त्यामुळे त्याच्या रंगेलपणाला आलेली एक ग्लॅमरस झळाळी ही वैशिष्ट्येही शॉन कॉनरीच्या बाँडने प्रेक्षकांच्या मनावर ठसवली. एखादा नट म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ आहे असं म्हटलं जातं, त्याच धर्तीवर शॉन कॉनरी हा बाँडची भूमिका करणार्‍या प्रत्येक नटासाठी नक्कीच ती कशी करावी हे शिकवणारं अभिनयाचं विद्यापीठ ठरला हे नक्की.

नट पडद्यावर काय बोलतो हे संवाद लेखक ठरवत असेल, पण शॉन कॉनरी ज्या पद्धतीने अगदी मिष्किल संवाद अत्यंत गंभीरपणे म्हणायचा त्याला तोड नव्हती. याचं उदाहरण म्हणून डॉक्टर नो मधलं एकच दृश्य पुरेसं आहे. त्याला विमानतळावर घ्यायला पाठवलं आहे असं भासवणार्‍या ड्रायव्हर-कम-गुंडाला ठार करुन त्याची बॉडी त्याच गाडीत टाकून जेम्स बाँड ब्रिटिश दूतावासासमोर गाडी उभी करतो आणि दाराशी उभ्या असलेल्या गार्डला "गाडी लाव" असं निष्काळजीपणे सांगून तसंच पुढे ड्रायव्हरच्या मृतदेहाकडे अंगुलीनिर्देश करत "याच्यावर लक्ष ठेव, कुठे पळायला नको" असं सांगतो हा संवाद शॉन ज्या पद्ध्तीने म्हणतो ते बघा म्हणजे मी काय म्हणतो आहे त्याची खात्री पटेल.

अभिनयाचा फार विस्तीर्ण परीघ नसतानाही रसिकांच्या मनावर एका व्यक्तिरेखेमुळे इतकी खोल छाप पाडणारा शॉन कॉनरी हा एक विरळा अभिनेता होता हे मात्र खरेच. शॉन कॉनरीच्या जेम्स बाँडपलीकडे भूमिका गाजल्या तरी तो आज प्रामुख्याने ओळखला जातो तो जेम्स बाँडमुळेच. बाँडपलीकडे त्याने केलेल्या मला आवडलेल्या भूमिका म्हणजे:

(१) मध्ययुगीन ख्रिस्ती चर्चेसच्या काळात घडलेली खुनांची मालिका एक प्रवासी प्रिस्ट (मंक) कसा यशस्वीरीत्या उलगडतो त्याची चित्तथरारक गोष्ट. हू-डन-इट छापाचा चित्रपट. यातली मध्यवर्ती भूमिका अर्थातच शॉन कॉनरीने साकारलेली त्या प्रवासी मंकची.

(२) या लेखात दुसरा असला तरी बाँडपट वगळता शॉनची मला सर्वाधिक आवडलेली भूमिका म्हणजे 'मॅन हू वूड बी किंग' हा जबरदस्त चित्रपट. यात सहाय्यक अभिनेता म्हणून शॉन ज्याला जवळचा मित्र मानत असे असा आणखी एक ताकदीचा अभिनेता मायकल केन आणि शॉन यांनी जी धमाल उडवून दिली आहे त्याला तोड नाही.

(३) एकाच वेळी सुंदर, गोड, आणि मादक वाटणार्‍या कॅथरीन झेटा-जोन्स बरोबर प्रेक्षकांना पटावा असा या वयात देखील रोमान्स करणारा शॉन कॉनरीचा धाडसी चोर ज्यात आहे तो 'एन्ट्रॅपमेन्ट'.

(४) शामळू निकोलस केज हा ज्या सिनेमात शॉन कॉनरीच्या छत्रछायेत चक्क अ‍ॅक्शन हीरो वाटून जातो तो 'द रॉक' हा चित्रपट. गंमत म्हणजे यात त्याने तारुण्यात अमेरिकेने अटक केलेल्या ब्रिटिश गुप्तहेराची भूमिका केली आहे.

(५) 'द हंट फॉर रेड ऑक्टोबर' या चित्रपटातला शॉनने साकारलेला अमेरिकेकडे 'डिफेक्ट' होऊ इच्छिणारा रशियन आण्विक पाणबुडीचा कॅप्टन.

(६) 'द अन्टचेबल्स' मधला शॉनने रंगवलेला तडफदार धाडसी कॉन्स्टेबल. 

जाता जाता पुन्हा जेम्स बाँडकडे वळूया. 'ऑन हर मेजेस्टीज सिक्रेट सर्विस' मध्ये लेझन्बीने चित्रपटाचा असा काही चुथडा केला होता की त्या व इतर काही कारणांनी जॉर्ज पुढचे बाँडपट करणार नाही हे नक्की झाल्यावर, आणि जॉन गॅविन या ००७च्या भूमिकेसाठी निवड झालेल्या नटाबद्दल युनायटेड आर्टिस्ट्स या स्टुडियोतले बॉसेस साशंक असल्याने पुन्हा शॉन कॉनरीला 'जेम्स बाँडच्या भुमिकेसाठी 'डायमंड्स आर फॉरेव्हर'मध्ये पुन्हा पाचारण करण्यात आलं. या चित्रपटाने चक्क बाँडपटांच्या यादीतील सर्वाधिक गल्ला जमवणार्‍या यादीत चक्क तिसर्‍या क्रमांकावर उडी घेतली. इतकंच नव्हे तर नियमित बाँड फ्रॅन्चायझीचा भाग नसलेल्या पण कादंबरीतून चित्रपटनिर्मितीचेहक्क ज्याच्याकडे होते त्या केव्हीन मॅक्लॉरी (Kevin McClory) ने 'थंडरबॉलचा' रिमेक 'नेव्हर से नेव्हर अगेन' असं बारसं करुन केला तो त्यावेळी तब्बल ५३ वर्ष वयाच्या शॉनला घेऊनच.

सर्वोत्कृष्ठ बाँड कुठला यावर माझी काही मित्रांशी चर्चा झाली. त्यात जॉर्ज लेझन्बीला ताबडतोब निकालात काढण्यात आले. रॉजर मूरचा मिश्किल बाँड अनेकांना प्रिय असला तरी टीकाकार आणि खुद्द रॉजर मूर साहेबांनीच कबूल केल्याप्रमाणे कधी डावी भुवई उडवणे तर कधी उजवी भुवई उडवणे यापलीकडे त्यांचा अभिनय बाँडपटात तरी कधी दिसला नाही असं अनेकांचं मत पडलं. टिमथी डॅल्ट्न हा व्यक्तिश: मला खूप आवडत असला तरी बाँडला अतिगंभीर करण्याचा दोष त्याला लागू शकतो. पिअर्स ब्रसनन हा सर्वोत्कृष्ठ बाँड आहे असं एका मित्राचं मत आहे आणि ते पटण्यासारखं असलं तरी त्याच्यात बाँडला लागणारा जो निष्ठूरपणा असतो तो पुरेसा दिसत नाही हे माझं मत. आणि डॅनियल क्रेगबद्दल न बोललेलं बरं, त्याच्यावर तर चक्क craignotbond क्रेग नॉट बाँड अशी त्याला बाँडची भूमिका मिळू नये किंवा मिळालेली रद्ध व्हावी म्हणून मोहीम चालवायला स्वतंत्र संकेतस्थळच उघडलेलं होतं. आमच्या घरी तो 'चम्या दिसतो' यावर एकमत आहे.

यातलं चूक किंवा बरोबर हे बाजूला ठेवून या मतमतांरांमध्ये इतकं वैविध्य का आहे याचं कारण शोधाताना पुन्हा पुन्हा आपण शॉन कॉनरीपाशीच येऊन थांबतो. याचं गारूड इतकं आहे की माझ्या मुलालाही सिनेमातलं इंग्रजी अजिबात कळत नसताना हार्ड् डिस्कवर शॉन कॉनरी वगळून दुसर्‍या कुणाचाही बाँडपट लावला तरी "बाबा हा अ‍ॅक्टर नको तो आधीचा लावा" असं म्हणावंसं वाटतं यातच सारं आलं.

अशा या अपरिमित आनंद देणार्‍या, सिनेरसिकांच्या मनातील एकमेव जेम्स बाँड असलेल्या आणि शेवटपर्यंत स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या शॉन कॉनरीला श्रद्धांजली.

© मंदार दिलीप जोशी

टीपः यात मला काय वाटतं इतकंच लिहीलेलं आहे. कारण शॉन कॉनरीचा प्रवास हा कामगार, बॉडी बिल्डर, मॉडेल, ते अभिनेता हा कसा झाला हे अनेक ठिकाणी अनेक वेळा आधीच नोंदवलं गेलं असल्याने त्यात नवीन काहीच नाही.

Saturday, October 24, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: निरुपम सेनच्या कर्माची फळे

सैनबारी हे नाव ऐकलंय? सैनबारी हे कम्युनिस्टांनी केलेल्या एका घृणास्पद हत्याकांडाबाबत कुप्रसिद्ध आहे.

१७ मार्च १९७० रोजी झालेल्या या हत्याकांडात प्रणब आणि मलय या दोन भावांची कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी ― हो, कम्युनिस्टांचे असतात ते कायम कार्यकर्तेच, मग किती का मुडदे पाडेनात; आणि संघाचे सेवाभावी स्वयंसेवक असले तरी ते असतात कायमच गुंड ― तर, या दोन भावांचा CPI (M) च्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून खून केला. त्यानंतर घरातल्या भातात प्रणब आणि मलय यांचे रक्त मिसळले आणि अशा प्र्कारे रक्ताने माखलेला भात त्या दशतवाद्यांनी त्यांच्या आईच्या मुखात कोंबला. याच घटने दरम्यान त्यांनी रेखा रानी सेन या महिलेचे पती श्री नब कुमार सेन यांचे डोळे धारदार शस्त्रांनी खाचेतून बाहेर काढले. याच हल्ल्यात या मुलांच्या शिकवणी घ्यायला आलेल्या जितेन्द्रनाथ राय या शिक्षकाचीही त्याच धारदार शस्त्रांनी हत्या केली. कम्युमिस्ट दहशतवाद्यांनी श्री नब कुमार सेन यांचीही वर्षभराने हत्या केली.

आपल्या दोन तरुण मुलांची डोळ्यांदेखत झालेली हत्या आणि तद्नंतर भोगावा लागलेला हा प्रसंग यांचा त्या माऊलींवर काय मानसिक आघात झाला असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकणार नाही.

या भावांच्या हत्येच्या पवित्र लाल कार्याचे नेतृत्व करत होते CPI (M) चे 'कार्य'कर्ते निरुपम सेन.

असा हा निरुपम सेन तीन वेळा आमदार म्हणून पश्चिम बंगालच्या विधानसभेवर निवडून गेला आणि त्याने चक्क दोन वेळा वाणिज्य व उद्योग मंत्रीपदही भूषवले.

पण निरुपम सेन या दहशतवाद्याला त्याच्या कर्माची फळे ही अखेर भोगावी लागलीच. कायदेशीर नव्हे पण कम्युनिस्ट न मानत असलेल्या परमेश्वराचा त्यांच्यावर २०१३ साली आघात झाला. मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना आंशिक स्वरुपात त्यांचे अर्धांग लुळे पडले. दोन-तीन वर्षांनी त्याच्या परिस्थितीत आणखी बिघाड होऊन त्याला हर्निया झाला. आधीच पक्षाघातामुळे (paralysis) शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे परावलंबी आयुष्य जगत असलेल्या निरुपम सेन याची अवस्था आणखी बिकट झाली.

Nirupam Sen in his youth, and now in September 2018

या फोटोत निरुपम सेन यांचा तेव्हाचा अंगात रग असलेला आणि सप्टेंबर २०१८ मधला रोगग्रस्त अवतार तुम्हाला दिसेल. अशा रुग्णांची अगदी रोजची नित्यकर्मे करतानाही प्रचंड फरफट होते आणि असे जगणे जे इतके वेदनादायी असते की त्यापेक्षा मरण बरे अशी इच्छा जवळजवळ रोज होते पण मरण येत नाही. 

सप्टेंबर २०१८ साली सैनबारी हत्याकांडाबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हाच त्या हल्लेखोरांचा म्होरक्या निरुपम सेनला असेच आणि याच स्थितीत दीर्घायुष्य मिळावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती, पण पाच वर्ष मरणयातना भोगल्यावर मृत्यूला त्यांची दया आली असावी, कारण त्यानंतर तीनच महिन्यांनी या यातनांतून त्याची कायमची सुटका झाली. कोलकाता इथल्या सॉल्ट लेक मधल्या एका "खाजगी" रुग्णालयात "कम्युनिस्ट पार्टी" ऑफ इंडिया मार्कसिस्ट म्हणजे CPI (M) चे दहशतवादी/कार्यकर्ता२०१८ निरुपम सेन २४ डिसेंबर २०१८ रोजी मेला. 

म्हणजे आजारी असल्यावर साम्यवादी राज्यात असलेल्या खाजगी रुग्णालयात त्याने उपचार करुन घेतले. यात काही नवीन नाही, भंपकपणा ही  कम्युनिस्टांची उज्ज्वल परंपराच आहे. ताजे उदाहरण म्हणजे केरळचे साम्यवादी मुख्यमंत्री पिनारयी विजयन हे उपचारांसाठी भांडवलशाही असलेल्या अमेरिकेत जात असतातच. 

कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धिः कर्मानुसारिणी |
तथापि सुधिया भाव्यं सुविचार्यैव कुर्वता ||

अर्थात: माणसाची बुद्धी [प्रारब्ध] कर्माला अनुसरून चालते. [तसंच वागण्याची आपल्याला इच्छा होते.]; आपण पूर्वी जे केलेल असतं, त्याप्रमाणेच फळे भोगावी लागतात [असं असलं तरीही] माणसानी कुठलही काम करताना नीट विचार करूनच काय ते करावं. [प्रारब्धाप्रमाणे घडेल असं म्हणून निर्बुद्धपणे वागू नये.]

टीप: सेन कुटुंबीय काँग्रेस समर्थक होते, आणि त्याचीच शिक्षा कम्युनिस्ट 'कार्यकर्त्यांनी' त्यांना दिली. हा इतिहास जे एन यु मध्ये जाऊन कम्युनिस्टांचीच पिलावळ असलेल्या 'भारत तेरे तुकडे होंगे' गँगचे समर्थन करणाऱ्या आणि अटकेत असलेल्या/उजळ माथ्याने फिरणार्‍या शहरी नक्षलवाद्यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना माहित नसेलच असं नाही, पण निदान आपला नेता कसा आपल्याच जीवावर उठलेल्या लोकांचं समर्थन करतो आहे हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राष्ट्रवादी शक्तींना बळ द्यावे.

©️ मंदार दिलीप जोशी 
निज अश्विन शु ७, शके १९४२


Tuesday, October 20, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: खुनशी ज्योती बसू

भारताचे एक प्रसिद्ध जलतरणपटू होते मिहीर सेन. त्यांचा एक कपड्यांचा कारखाना होता. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी त्यांचा प्रचार करण्याचा आग्रह केला. मिहीर सेन यांनी आपण भांडवलशाहीचे समर्थक असल्याचं सांगत त्यांना नकार दिला. ज्योती बसू नाराज झाले.

या नंतर मिहीर सेन यांच्या कारखान्यात कामगारांच्या कटकटी सुरू झाल्या. बघता बघता ते दिवाळखोरीत निघाले. याची परिणिती म्हणून त्यांना स्मृतिभ्रंश झाला आणि ११ जून १९९७ वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. याचा जबर धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी पाच वर्षांनी मरण पावल्या.

त्यांच्या मुलीने काही सांगितलेल्या या आठवणी सोबत जोडलेल्या फोटोत.

🖌️ मंदार दिलीप जोशी

Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उचकावून सोबतीला घेऊन बंड केलं आणि अनेक विजयही मिळवले. वेगळं राज्य स्थापन केल्यावर ते टिकवायला जी दृष्टी लागते ती नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, पण तो सरते शेवटी रोमन साम्राज्याकडून पराभूत झाला आणि त्याला क्रॉसवर लटकवलं गेलं.

Spartacus

त्याकाळी गुलाम विकले जायचे आणि त्यांना पैसे देऊन स्वतंत्र सुद्धा केलं जाऊ शकायचं. शेवटच्या दृश्यात स्पार्टाकसच्या पत्नीला असंच स्वतंत्र केलं गेलं आहे आणि ती त्यांच्या बाळाला घेऊन क्रॉसवर लटकावलेल्या स्पार्टाकसचा निरोप घ्यायला आली आहे. मृत्यूच्या जवळ जात असलेल्या स्पार्टाकसला ती त्यांचं बाळ दाखवत म्हणते की बघ स्पार्टाकस, हा तुझा मुलगा आहे, आणि तो स्वतंत्र आहे. हे दृश्य इतक्या प्रभावीपणे चित्रित करण्यात आलं आहे की ती हे बोलत असताना त्या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळेच आनंदी भाव दिसल्याचा भास झाला, जणू त्याला कळत होतं काय चाललंय ते.

स्वतंत्र असणं म्हणजे काय, ते या दोन मिनिटांच्या दृश्यात समजतं. पूर्ण सिनेमा बघितला होता, त्यामुळे हे दृश्य जास्तच परिणाम करून गेलं. पहिल्यांदा बघितल्यावर जो आणि जसा परिणाम माझ्यावर तेव्हां झाला होता तसाच आजही होतो.

स्पार्टाकस सिनेमा याच नावाच्या कादंबरीवर बेतला होता. सिनेमाची पटकथा आणि कादंबरी या दोन्हीचे लेखक होते हॉवर्ड फास्ट. अत्यंत यशस्वी लेखक असलेल्या हॉवर्ड यांना साहित्य आणि सिनेमा क्षेत्रात खूप मागणी होती, आणि या मागणीची किंमत ते पुरेपूर वसूल करत असत. आपल्या आयुष्यात त्यांनी खूप वैभव कमावलं आणि ऐशआरामात जगले. आता कष्ट केले की त्याचे पैसे मिळायलाच हवेत, पण मग हे मुद्दाम सांगायचं प्रयोजन काय? तर, हॉवर्ड फास्ट साहेब घनघोर साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट होते. पण नंतर स्टालिनची कृष्णकृत्ये पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.

आपल्या The Naked God: The Writer and the Communist Party आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ― There was the evil in what we dreamed of as Communists: we took the noblest dreams and hopes of mankind as our credo; the evil we did was to accept the degradation of our own souls—and because we surrendered in ourselves, in our own party existence, all the best and most precious gains and liberties of mankind—because we did this, we betrayed mankind, and the Communist party became a thing of destruction.

स्पार्टाकस सिनेमा तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी ठरला, आणि त्याला चार ऑस्कर पुरस्कारही मिळाले. आलम दुनियेतल्या कम्युनिस्टांनी स्पार्टाकसला आपला हिरो, आपला आयकॉन बनवला नसता तरच नवल होतं. आजही स्पार्टाकस वामपंथी लोकांसाठी आयकॉन आहे. डाव्यांनी या कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद देखील करवला. भारतात 'अमृतराय' यांनी त्याचा 'आदिविद्रोही' नावाने हिंदीत अनुवाद केला आणि तो डाव्यांच्या 'हंस प्रकाशनाने प्रकाशित केला. नेटवर शोधल्यास पीडीएफ चकटफू उपलब्ध आहे, त्यात हॉवर्ड फास्ट साहेबांचे रसभरीत गुणवर्णन केलेलं आहे. त्यात त्यांच्या कलाकृतींचा उल्लेखही आहे, पण उल्लेख गायब आहे तो त्यांच्या ऐशआरामी आयुष्याचा. इतकंच काय, त्यांच्या - द नेकेड गॉड या आत्मचरित्राचाही उल्लेख केलेला नाही. आश्चर्य वाटलं? नाही, कदाचित उल्लेख केला असता तरच आश्चर्य वाटलं असतं. संपूर्ण सत्य सांगतील तर ते कम्युनिस्ट कसले?

या सगळ्याचं सार इतकंच की वामपंथ आणि प्रत्येक वामपंथी हा गुलामीचा कडवा विरोधक असतो, पण हे त्यांचे निव्वळ दाखवायचे दात असतात. नाहीतर त्यांनी 'प्रत्येक मनुष्य हा त्या दयाळू शांतीदेवाचा गुलाम आहे' हे सांगणाऱ्यांना पाठिंबा दिला नसता. जी विचारधारा स्वतःला त्यांच्या शांतीदेवाची आणि त्या शांतीदेवाचा प्रेषित मानणाऱ्या व्यक्तीची गुलाम मानते, आणि स्वतःसकट पूर्ण जगावर ती गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असते, त्याच विचारधारेची पाठराखण हे गुलामीचे स्वघोषित विरोधक डावे कसे काय करू शकतात?!

१९४७ साली आपण 'स्वतंत्र' झालो, आपल्याला 'आझादी' नाही मिळाली ― ती मिळाली पाकिस्तानला, जिथे त्याच विचारधारेची सत्ता आहे.

आपला वारसा स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेला देवी मानून लिहिलं ―
जयोsस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे।
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे।

हिंदुत्वाची अधिष्ठात्रीच मुळात स्वतंत्रता आहे. आपण स्वतंत्र आहोत, राहू, आणि आपला देशही स्वतंत्र राहील आणि ते राखणे हेच आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आपापल्या इष्टदेवतेचे आम्ही भक्त आहोत, आणि कुणाला देव मानायचा नसेल तर तसे न मानायलाही स्वातंत्र्य आहे.... पण गुलाम किंवा बंदे नाही म्हणजे नाहीच!

जाता जाता, स्पार्टाकसच्या त्या प्रसिद्ध शेवटच्या दृश्याची ही लिंक, अवश्य पाहून घ्या. ही लिंक काम करत नाहीशी झाली तर हे दृश्य युट्युबवर कुठेही या सिनेमाच्या व्हिडिओवर उपलब्ध असेलच. 

🖌️ मंदार दिलीप जोशी


Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती किंवा सद्गती देवो अशी प्रार्थना.

Marxist Communist Party of India leader Usha Datar

ही पोस्ट वाचण्याअगोदर (१) आणि (२) हे दोन लेख वाचा, पार्श्वभूमी समजायला सोपं जाईल; किंवा पोस्ट वाचल्यावर वाचा, तरीही चालेल. या दोन बहिणी आणि त्या दोन बहिणींच्यात साम्य दिसू शकेल. फरक इतकाच, की त्यातल्या एकीला उपरती झाली पण बाटगे जोरात बांग देतात या उक्तीनुसार आयात तत्वज्ञानाने आंधळे झालेल्या एत्तद्देशीय कम्युनिस्टांना आणि फेमिनाझी मंडळींना कधीच होणार नाही.

ही बातमी म्हणजे फक्त मृत्यूबद्दलची बातमी नाही तर मेंदूची कवाडे उघडी ठेवल्यास कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि स्त्रीवादी चळवळीचा भंपकपणा आणि धोका समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त अशी बातमी आहे. 

(१) कला क्षेत्रातील कम्युनिस्ट प्रभावः या बाईंच्या बहिणीचे लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या.

आता "नाटककार" व "विचारवंत" हा एकच माणूस कसा असू शकतो? हा एक भयंकर मोठा विनोद आहे. कारण हे म्हणजे बद्धकोष्ठ आणि जुलाब यांच्यावर घेतली जाणारी औषधे एकदम घेतल्यासारखे आहे. तर ते असो. 

(२) या सगळ्या कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या सगळ्यात आधी अत्यंत सुस्थितीतील किंवा श्रीमंत पुरुषांशी स्वतःचं लग्न वगैरे उरकून मोकळ्या होतात, मुलं वगैरे होऊ देतात आणि मग इतर भोळ्याभाबड्या (की बावळट) तरुण पिढीला, प्रामुख्याने तरुणींनाच, पुरुषी वर्चस्ववाद (patriarchy) वर दुगाण्या झाडणारी प्रवचने देऊन त्यांची आयुष्य नासवायची कामे करायला सुरुवात करतात. त्याला फोडणी म्हणून #SmashBrahminicalPatriarchy असेल तर आणखी उत्तम. 

म्हणजे:

  • पुरुष कसे वाईट!
  • लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करायची का? 
  • मुलगा आणि मुलगी समान आहेत तर इतक्या मुली का होऊ द्यायच्या?
  • बायका म्हणजे काय मुलं होण्याचा कारखाना आहेत का?
  • मुळात लग्नच कशाला करायचं?
  • तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे तिचा उपभोग कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं (ma life ma body) - यात आयरनीच्या देवाला वाहिलेली ठिणगी म्हणजे म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाला झुगारुन द्यायची भाषा करायची आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देऊन स्वतःचं शरीर कुणालाही वापरू द्यायला प्रोत्साहन द्यायचं हे यांचं धोरण.

पार्श्वभूमी समजली असेल तर आता मूळ बातमीकडे वळूया. या बाईंच्या बहिणीचं लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या. त्यांच्या प्रभावाने या दातार बाई सुद्धा "पुरोगामी" चळवळीत काम करु लागल्या. 

आता दैवदुर्विलास बघा. सर्वसाधारणपणे जुन्या काळी आपल्याला असं दिसतं की पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी आणखी दोन किंवा तीन 'चान्स' घेतले जायचे. त्यामुळे आपल्याकडे तीन बहिणीच असणे किंवा तीन किंवा चार बहिणींच्या पाठीवर एक भाऊ हे सर्रास होतं. जुन्या काळातली सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याने मी यावर चांगलं किंवा वाईट अशी कोणतीच टिप्पणी करणार नाही. पण याला प्रतिगामी, बुरसटलेले विचार, पुरुषी वर्चस्ववादाचं प्रतीक वगैरे हिणवणार्‍या आणि मुख्य म्हणजे उठल्या बसल्या जेन्डर इक्वालिटीच्या (gender equality) गप्पा ठोकणार्‍या 'पुरोगामी' लोकांनीही त्याच वाटेवर जावं हे डाव्या/कम्युनिस्ट लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. कारण त्या काळात दातार बाईंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते, म्हणजेच  त्या काही अगदीच अडाणी अशिक्षित नव्हत्या. तरीही 'स्त्री मुक्ती' चळवळीत सक्रीय असलेल्या या पुरोगामी बाईंना तीन मुली असणे म्हणजे आपण 'हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला' या म्हणीचे ठळक उदाहरण आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' ही म्हण वापरणार होतो पण कम्युनिस्ट लोकांचा ब्रह्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांना हे कितपत झेपेल याची शंकाच आहे.

तर, पैसेवाले नवरे गटवायचे, व्यवस्थित मुलं वगैरे होऊ द्यायची - थोडक्यात स्वतःची आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर वगैरे करुन घ्यायची आणि मग आपल्या सडलेल्या डाव्या, कम्युनिस्ट विचारांनी समाजाला नासवायला सुरवात करायची. लोकांना दाखवायला घरकामगार संघटना, बालहक्क हक्क लढा, दारुमुक्ती आंदोलन वगैरे जोडधंदे करायचे. 

आणि एके दिवशी मरायचं आणि "वैकुंठ" नामक स्मशानभूमीत "अंत्यसंस्कार" करुन घ्यायचे. 

अनेक बाबी वैय्यक्तिक म्हणून सोडून दिल्या तरी देहदान करायला हरकत नव्हती, जुन्या काळच्या ग्रॅज्युएट व्यक्तीला मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र या बाबतीत माहिती नसेलच असे नाही. म्हणजे हे लोक मरतानाही आपला भंपकपणा दाखवायला कमी करत नाहीत. शेवटी 'वैकुंठ' नामक ठिकाणी 'अंत्यसंस्कार' करुन घेतलेच ना?!

आहे की नाही गंमत?!

असो. good communist is a dead communist हे मात्र खरं.

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन कृ १२, शके १९४२

Monday, October 12, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग ३

Keep it Simple, Stupid!

तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. तुम्ही व्यवसाय करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करत असलात तर गोष्टी साध्या सोप्या ठेवा. संभाव्य गिर्‍हाईकांना तुम्ही तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या संकेतस्थळे किंवा अ‍ॅप वापरताना आरामात खरेदी करता आली पाहीजे. 

दोन अनुभव सांगतो. माझा एक परिचिताचा सेंद्रीय शेती व शेतमाल विक्रीचा व्यवसाय आहे. आता एका शहरात व्यवसाय करायचा म्हटल्यावर अमुक ठिकाणी विक्री होणार इथवर ठीक आहे, पण आता ही ठिकाणे ठरणार कशी, तर आजूबाजूच्या लोकांचा अंदाज घ्यायचा, पुरेशी लोकं सेंद्रीय शेतमाल घ्यायला तयार असली की त्यांनी मागणी नोंदवायची, मग ते ठिकाण ड्रॉप पॉइंट ठरणार. हे किती कटकटीचं आहे! एक तर हा सेंद्रीय शेतमालाची किंमत जास्त, लोकं याकडे आकर्षीत कशी होणार? त्यापेक्षा सरळ ट्र्क घेऊन सोसायटीच्या बाहेर यायचं, ज्याला घ्यायचं तो घेईल. शिवाय भाजी घेताना समोर ज्या भाज्या दिसतील त्यापैकी माणूस ठरवतो कुठल्या घ्यायच्या ते. काही दिवस आधी यादी तयार करुन मग भाज्या नाही घेता येत. 

पण नाही, आमच्या सोसायटीसाठी व्हॉट्सप ग्रूप बनवून झाला आणि एकही प्रतिसाद आला नाही. गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यावर कोण प्रतिसाद देणार? लोकांनी किंमतीची कारणे सांगून काढता पाय घेतला.

दुसरा अनुभव. तोच परिचित. कोकणी व इतर स्वदेशी उत्पादनांसाठी एक अ‍ॅप बनवण्यात आलं. म्हटलं बरं झालं आता अ‍ॅप हाताशी असेल तर उत्तम. पण हाय रे कर्मा. आधी अ‍ॅप डाऊनलोड करायचं, मग त्यात नाव, पत्ता, फोन ही माहिती भरायची. इथवर ठीक. पण मग तुम्ही राहता त्या भागातला 'प्रतिनिधी' तुमच्याशी संपर्क साधणार आणि तुम्हाला अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देणार. मग तुम्ही अ‍ॅप वापरू शकता. पण का ही गुंतागुंत पुन्हा? अ‍ॅमॅझॉन किंवा इतर अ‍ॅप्स सारखं सोपं का नाही बनवता येत? एक तर पत्ता नोंदवायचा असतोच, तिथे राज्य आणि शहरांचे ड्रॉप-डाऊन बॉक्स आहेतच (जिथे तुम्ही वस्तू पोहोचवू शकता त्याची मर्यादा तिथेच वापरकर्त्याला दिसते), त्यामुळे त्या त्या विभागातल्या प्रतिनिधीने अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देण्यात काहीही अर्थ नाही. फार फार तर अ‍ॅटोमेटीक पाठवता येणारा ओटीपी ठीक. पुढे काही समस्या आल्यास प्रतिनिधीशी संपर्क साधणे ठीक, पण अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करायला प्रतिनिधीने फोन करण्यात काय हंशील?

म्हणजे आधी अ‍ॅपशी मारामारी करा, मग फोन येणार तो सुद्धा वाट्टेल तेव्हा, मग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट होणार. मग वस्तू दिसणार. मग त्या मागवणार. कशाला हे सव्यापसव्य? सरळ अ‍ॅप डाऊनलोड करुन हव्या तितक्या डिव्हाईसेसवर इन्स्टॉल करुन एकच खातं तयार करुन हवं तेव्हा ऑर्डर करण्याची सोय देणं इतकं अवघड आहे का? 

हे इतकं पोटतिडकीने लिहीण्याचं कारण म्हणजे बाबांनो संभाव्य ग्राहकांकडे ऑनलाईन खरेदी करताना वेळ आणि संयम अजिबात नसतो. त्यात तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यात तर लोक वैतागून नाद सोडून देतात.

म्हणूनच तंत्रज्ञान वापरणार असाल तर गोष्टी साध्या, सोप्या, आणि खरेदीसाठी सुलभ ठेवा. तरच लोक तुमच्या उपक्रमाकडे आकर्षित होतील. 

थोडक्यात Keep it Simple, Stupid! 

🖋️  मंदार दिलीप जोशी

ता.क. इथे stupid हे व्यक्तीला नसून वृत्तीला म्हटले आहे. तेव्हा राग मानू नये. 

भाग १भाग २

Monday, October 5, 2020

मालिका आणि जाहिरातींतून केलं जाणारं ब्रेनवॉशिंग

कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा आणि मालिका बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्‍यांनी ही खरी गोष्ट वाचा. 

माझ्या परिचयाच्या एक काउन्सिलर आहेत. फेसबुक फ्रेंड आहेत व नंतर त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट झालेली आहे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे ही माझा नेहमीचा त्रागा किंवा बाजारगप नाही. अजूनही असे किस्से ऐकले आहेत, पण हा एका समुदेशकाकडून प्रत्यक्ष ऐकल्याने मांडतो. 

अग्गंबाई सासूबाई इफेक्ट -
सप्टेंबर २०२० मधली गोष्ट आहे. एका वयस्कर बाईंशी त्यांचं फोनवर बोलणं होत असे. आपण त्यांना मिसेस क्ष म्हणूया. तर मिसेस क्ष यांना दोन मुली, दोन्ही लग्न होऊन अमेरिकेत. २ वर्षांपूर्वी मिसेस क्ष यांच्या नवर्‍याला देवाज्ञा झाली. अमेरिकेत सुद्धा मराठी वाहिन्या दिसतात, त्या बघून मुलींचा यांना सल्ला की आई तू लग्न कर. आम्ही इथे लांब आहोत, आमचा काहीच प्रश्न नाही. घर, संपत्ती वगैरेंचं तू काहीही कर, आम्हाला काहीही नही दिलंस तरी चालेल. 

हे सतत ऐकून मिसेस क्ष हैराण आहेत. त्यांचं म्हणणं असं की त्यांचा संसार खूप चांगला झाला. मान्य आहे की या वयात सोबत हवीशी वाटते, एकटेपणा जाणवतो. त्यासाठी नोकरीकरणार्‍या मुली पेइंग गेस्ट म्हणून ठेवू शकते. पण सतत लग्न कर लग्न कर हा लकडा कशाला लावायचा. अरे मला नाही करायचं लग्न. म्हातारपणातला एकटेपणा घालवायला लग्न किंवा  त्याच अर्थाची सोबत हवी हे सतत ऐकून वैताग आला आहे! पुन्हा लग्न न करणं हा माझा वैयक्त्तिक निर्णय आहे, तुम्हाला माझी काळजी घ्यायचा कंटाळा आला असेल तर थकल्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहीन. 

खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईंनी सांगितलं की त्या खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईं म्हणाल्या ते ही पटण्यासारखं आहे, की आईच्या एकटेपणाची इतकी काळजी वाटते तर एका मुलीने यावं भारतात परत, घ्यावी आईची काळजी. मुलगी, नातेवंडे सोबत असली की एकटेपणा कुठल्याकुठे पळून जाईल.

अग्गंबाई सासूबाई मध्ये विषय काय, मांडतात काय! प्रेक्षकांत कुणी अशी एकटी माणसे असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही. उतारवयात लग्न करुच नये असं नाही, पण ते इतक्या जोरकसपणे ठसवलं जात आहे की उपरोक्त मिसेस क्ष यांच्या मुलींसारखे लोक मालिका  पाहून आईवडिलांना पिडत बसतात. 

आता कोलगेटच्या जाहिरातीकडे वळू. याबद्दल बोलावं असं वाटत होतं पण पुन्हा भावनेच्या भरात वाहून जाणारे लोक विषय आणि वस्तुस्थिती समजून न घेता, "उतारवयात सोबत असली तर गैर काय" अशी तलवार घेऊन येतील म्हणून बोललो नव्हतो. पण पुन्हा त्याच समुपदेशक बाईंची पोस्ट मदतीला धावून आली. म्हटलं आपलेच विचार एक अनुभवी समुपदेशक मांडत असेल तर त्याला अर्थातच वैधता प्राप्त होते. गेले कित्येक दिवस हॅमर केल्या जाणार्‍या त्या कोलगेट टूथपेस्टच्या जाहीरातीत एक वयस्कर बाई आपल्या मुला-बाळांसह एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. तिथे एक वयस्कर माणूस येतो आणि तिच्या खांद्याभोवती हात वेढून उभा राहतो. मुलं चमकतात. ती हातातली अंगठी दाखवून सूचित करते की लग्न/साखरपुडा उरकला आहे. त्यावर मुलांना आश्चर्य वाटण्याऐवजी ती एकदम खूष होतात. 

म्हणजे कुणी कोणत्या वयात लग्न करावं हा माझ्या चर्चेचा विषय नाहीच. पण वाढत्या वयात सोबत म्हणून लग्न हा एकमेव पर्याय असल्याचं वेगवेगळ्या माध्यमांतून ठसवलं जातंय आणि जनता त्यातल्या 'उदात्त' वगैरे भावनांनी उचंबळून येत आहे. 

ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे. 

पण हे असं फसवं उदात्तीकरण आणि प्रचार कशाला? इतकी आपल्या आई-वडिलांची किंवा इतर वयस्कर नातेवाईकांची काळजी असेल तर काढा थोडा वेळ त्यांच्यासाठी, न्या त्यांना आपल्याबरोबर बाहेर फिरायला, जेवायला, ललित कार्यक्रमांना. एखादा रविवार घरी घालवा त्यांच्या संगतीत, त्यांना आवडतात त्या गोष्टींत वेळ घालवा त्यांच्याबरोबर. लग्न-लग्न काय लावलंय? तरूण माणसांना सांगायचं 'लग्न हे आयुष्याचं अंतिम ध्येय नसतं' वगैरे आणि वयस्कर माणसांना सांगायचं 'हाच पर्याय आहे.'

पूर्वी कसं मुलगी उजवली की आपण सुटलो असं वाटायचं काही पालकांना, तसं आता 'जोडीदार मिळाला की आपली जबाबदारी संपली' असं सांगतायत का? एक संसार करताना भरपूर तडजोडी केलेल्या असतात दोघांनीही. आता वाढत्या वयात पुन्हा तेच - असं वाटू शकतं ना कुणाला?  जेष्ठ नागरिकांच्या समस्या कमी नाहीत. त्यात आता या मालिका पाहून प्रत्यक्ष आयुष्यातले सल्ले देत सुटणार्‍या आणि मनस्तापात भर घालणार्‍या लोकांची भर पडली आहे.

सामाजिक आशय वगैरे ठीक आहे, पण .....

बाकी, कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्‍यांच्या विचारांना माझी श्रद्धांजली.

© मंदार दिलीप जोशी

तळटीपः
(१) पूर्ण पोस्ट वाचून मग(च) मत व्यक्त करावे.
(२) पोस्टमधलं एक वाक्य नीट वाचा "ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे." आणि मग तलवार काढा.

Tuesday, September 29, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग ३: द शोशँक रिडेम्प्शन, समाजवाद, आणि आपण

तेवीस वर्षांचा चार्ल्स एच बेकर नामक अमेरिकन गब्रू जवान The Seattle, Lake Shore and Eastern Railway (SLS&E) वॉशिंगटन राज्यातल्या सिएटल परगण्यातील खाजगी रेल्वे कंपनीत एक सिव्हिल अभियंता होता. कामाच्या तपासणीला जायचा तेव्हा गाडी the Snoqualmie Falls या निसर्गरम्य धबधब्याच्या शेजारून जायची. त्या धबधब्याकडे पाहून चार्ल्स फक्त मोहरून गेला नाही, त्याच्या मनात एक व्यवसायाची कल्पना आली. 

आपल्या वडिलांकडून त्याने कर्ज घेतलं आणि एक कंपनी स्थापन केली. कंपनीने तो धबधबा आणि आसपासची जमीन सरकारकडून खरेदी केली. नशीबाने तेव्हा तिथे कुणी केजरीवाल किंवा राहुल गांधी जन्माला आला नव्हता मोदींनी विकला अशी बोंब ठोकायला म्हणुन चार्ल्सला हे सोपं गेलं असावं.

तर, चार्ल्सने तिथे जगातलं पहिलं जलविद्युत प्रकल्प उभारला, तो पण खाजगी. त्याने AC पद्धती स्वीकारली आणि सिएटल शहराला ती वीज विकू लागला. हा जलविद्युत प्रकल्प सुरु झाला जुलै ३१, १८९९ रोजी. हा प्रकल्प आजही सुरू असून वीज विकतो आहे, कालानुरुप काही बदल झाले असतील तेवढेच. 

आपण त्यानंतर अठ्ठेचाळीस वर्षांनी आपण स्वतंत्र झालो आणि न्हेरूंच्या सरकारने नियम केले की:

  • वीज फक्त सरकार तयार करुन विकू शकतं.
  • रेल्वे फक्त सरकारीच असावी.
  • टेलीफोन कंपन्या फक्त सरकारीच असाव्यात.
  • विमान कंपन्याही सरकारीच हव्यात.

याचा परिणाम काय झाला? जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. स्वातंत्र्योत्तर वीज ही एक चैन होती, रेल्वेत आपण गुराढोरांसारखा प्रवास केला, टेलिफोन मिळणं म्हणजे लॉटरी होती, आणि विमानप्रवास ही चैन ठरली. नोकर्‍यांचं म्हणाल तर त्यावरुन होणारी हाणामारी आणि गोळीबार आजही राजस्थानच्या हायवेवर सुरु आहे. आणि आज आपण अमेरिकेच्या तूलनेत १/३० एवढे गरीब आहोत. 

१९४७ साली आपण राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सत्ता गेली इंग्रजांच्या अनौरस वारसांकडेच. त्यांनी आणला समाजवाद आणि मग आपण आर्थिकदृष्ट्या त्याच्या पूर्ण आहारी गेलो. भारताला गरीब देश म्हणत असतील तर आपल्या गरीबीचं खरं कारण सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण हे आहे. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे. आजही अनेक व्यवसाय एक तर सरकारच्या ताब्यात आहेत किंवा सरकारच्या शक्य तितक्या खात्यांकडून शंभरावर ना हरकत प्रमाणपत्रे किंवा परवानग्या लागतात. आणि या सगळ्यातून आम्हाला मुक्ती द्या असं कुणीही म्हणत नाहीये.

१९९४ साली हॉलिवूडमध्ये The Shawshank Redemption नावाचा एक जबरदस्त चित्रपट येऊन गेला. प्रस्तुत लेखाच्या संदर्भात कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण त्यात एक उपकथाभाग असा येतो की पन्नास वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पॅरोल मिळालेला ब्रुक्स बाहेरच्या जगाशी स्वतःला जुळवून घेण्यास अपयशी ठरतो, आणि एक दिवस नैराश्याने गळफास लावून आत्महत्या करतो.

Shawshank Redemption

परवा मोदींनी कृषी क्षेत्राला मुक्त केलं तर वर्षानुवर्ष सरकारी कायदे आणि नियमांच्या पिंजर्‍यात काढलेले लोक एकदम रस्त्यावर आले, "ओ मोदी बाबा आम्हाला पिंजर्‍याशिवाय करमत नाही. आम्हाला पुन्हा आत टाका." मग एकच मोडका ट्रॅक्टर दोनदा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाळण्याची नाटकं झाली. कामगार कायद्यात सुधारणा केली तर पुन्हा मोदी हाय हाय सुरू.

समाजवाद नेहमीच दीनदुबळ्यांना मदत करण्याच्या नावाखाली सगळ्यांनाच दीन आणि दुबळा करुन टाकतो. आणि कहर म्हणजे आपल्या आजच्या वैचारिक चर्चेची (intellectual discourse) अवस्था ही आहे की तथाकथित उच्चवर्णीयांपैकी शंभर जणांना भारताला ग्रासणार्‍या दहा समस्यांबद्दल विचारलं तर शंभरापैकी शंभर जणांच्या यादीतली पहिली समस्या ही आरक्षण असेल आणि इतर शंभर जणांना विचारलं तर 'अमक्यांनी आमच्यावर ५००० वर्ष अन्याय केला' ही.  

कसे पुढे जाणार आपण?

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन शु. १३, शके १९४२

Friday, September 25, 2020

काही नाही, इ-शाळा चालली आहे!

प्रसंग एकः

"अरे, मल्हारचं नाव घेतल्यावर मल्हारनी बोलायचं, बाकीचे कशाला बोलताय?"

- हे बोलताना शिक्षिकेने प्रचंड संयम ठेवल्याचं आवाजात आणलेल्या सुलोचनाबाईं इतक्या आर्ततेवरुन स्पष्ट कळत होतं. पण मुलं आर्तता वगैरे समजण्याच्या पलिकडे गेलेली असतात. 

मी शिक्षक झालो नाही तेच बरं आहे. "अरे काय वर्ग आहे की मासळी बाजार?" असं खेकसलो असतो. 

प्रसंग दोनः मराठीचा तास.

"बाई मी भूप राग म्हणून दाखवू?" असं अनेकदा ऐकल्यावर... "हं आता समीर भूप राग म्हणून दाखवतोय हं, ऐका रे सगळ्यांनी समीरचं!" असं "आलीया भोगासी" च्या चालीवर ताई म्हणतात.

मग समीर भूप राग म्हणतो. सगळे टाळ्या वाजवतात. मग समीर म्हणतो, "बाई आमचे आठ राग शिकून झालेत." आता बाईंच्या आणि बाकी औरंगजेबांच्या पोटात गोळा येतो. तरी आणखी एक दोन जणं नरडं साफ करुन घेतातच. एक जण पियानो वाजवतो. कार्टं पियानो वाजवत असताना मला, "बाई मी 'चलो इक बार फिर से, अजनबी बन जायें हम दोनो' म्हणू का?" असं विचारण्याची सुरसुरी येते पण मी ती "असं मुलांच्या वर्गात घुसू नये" असं स्वतःला मनातल्या मनात बजावून आवरतो. 

त्यात आवाज ब्रेक होत असतो. तरी सगळं झाल्यावर एक जण मधेच, "बाई मी अमुक वाजवू?" असं विचारतो. नेमका तेव्हा आवाज ब्रेक होत नाही. त्यामुळे शिक्षिका, "वाजव बाबा!" म्हणतात. आता शिक्षिकेच्या आवाजात हताशपणा दिसू लागतो. पुन्हा आवाज ब्रेक व्हायला लागतो त्यामुळे तो नक्की काय वाजवतो आहे कळत नाही. एक जण, "चायला काय चाललंय" असं वैतागून म्हणतो. तेव्हा नेमका आवाज व्यवस्थित येत असल्याने ते सगळ्यांना नीट ऐकू जातं, आणि "कोरोना जाऊदे आणि हा शाळेत येऊदे मग बघतो" असं तो वाजवणारा मनातल्या मनात म्हणतो.  

तेवढ्यात एक जण, "ताई मला साप खूप आवडतात" असं म्हणतो. इ-शाळा असली, तरी बाई बसल्या जागी दचकतात. तरीही "हो का, वा वा, छान छान" असं म्हणतात. तेवढ्यात कुणीतरी, "ए घाणेरड्यांनो" असं म्हटलेलं स्पष्ट ऐकू येतं. 

सुमारे पावणेचार वाजता "बाई मला भूक लागली मी जेवायला जाते" असं गीता नामक एक कन्या विव्हळते. मागून गीताच्या आईचा पार बाहेरच्या खोलीतून आलेला "पय्चक्" असा आवाजही नीट ऐकू येतो. "अरे गीता असं काय ते करायचं" असं म्हणून बाई तिला जाऊ देतात. जाऊ न देऊन सांगतात कुणाला?!

"आता आपण थांबू" बाई म्हणतात.

"बाई मी एक कविता म्हणून दाखवू?" असं महेश नामक एक पिल्लू म्हणतं. आता मात्र ताईंचा संयम संपतो. "आता महेश कविता म्हणतोय मग आपण थांबणार आहोत आज", बाई ठणकावतात. महेश कविता म्हणत असताना मध्येच कुणीतरी "पॅयँsssssssss" अशी सायरन वाजवतो. महेशची कविता म्हणून संपते, आणि ताई पटकन सेशन संपण्याच्या बटणावर क्लिक करतात.

आणि अशा रीतीने "मराठीचा तास" संपतो आणि माझ्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

© मंदार दिलीप जोशी

टीप: शाळा आणि इतर संदर्भ दिलेले नसले तरी नावं बदलली आहेत.

तुम्हीही जेक गार्डनर

जेक Gardner ही व्यक्ती कोण होती? तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं का आवश्यक आहे? 

जेक गार्डनरचा अमेरिकेतील ओमाहामध्ये एक बार होता. मे महिन्यात एकदा त्याच्या बार मध्ये ब्लॅक लाईवज मॅटर (Black Lives Matter) वाले घुसले आणि नासधूस करायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली. 

तो मागच्या खोलीतून बाहेर आला आणि ओरडून सांगितलं की आत्ताच्या आत्ता थांबा आणि चालते व्हा. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातून पिस्तुल काढली आणि हवेत दोन बार उडवले. आता लोकांनी त्याला खाली पाडलं. तो ओरडू लागला की मला सोडा, मला सोडा. आता जीवावर बेतणार असं वाटल्याने त्याने त्याला खाली पाडून दाबणाऱ्या एकावर गोळी झाडली, त्यात तो माणूस मेला.

CCTV मध्ये पूर्ण घटना चलचित्रमुद्रित झाली होती. पब्लिक प्रोसिक्युटरने ते पाहून निर्णय घेतला की जेकने स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली असल्याने केस होऊ शकत नाही.



BLM वाल्यांनी बोंबाबोंब केली आणि एक नवाच प्रोसिक्युटर आणला गेला. त्याने एका न्यायाधीशाकडून जेकच्या अटक वॉरंटवर सही करून घेतली.

जेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.


जेकने कायदेशीर कारवाईत त्याला लोकांकडून पैशाची मदत व्हावी  म्हणून GoFundMe वर खातं  उघडलं होतं, जे BLM वाल्यांनी बंद करायला लावलं. 

तुम्ही तुमचा जीव देऊन सुद्धा डाव्यांचं समाधान करू शकत नाही.

एकदा स्वतःलाच पीडित घोषित करायचं म्हणजे सहानुभूती मिळते, आणि डावे म्हणतात की जे पीडित असतात त्यांना कायदा पाळायची गरज नसते. हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (उदा. गरीब बिचारा भाडेकरू, कुठे जाईल)

डावे म्हणतात तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करायचा अधिकार नाही, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (कारखाना जाळला कामगारांनी, पण शोषक आहे कारखाना मालक!).

आता डावे म्हणू लागलेले आहेत की त्यांच्यातल्या पीडितांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करायचाही अधिकार नाही. 

आणि त्यांच्या मते पीडित कोण आहेत? ज्यांना त्यांनी पीडित असल्याचं सर्टिफिकेट वाटलं आहे ते.

दंगलखोर, अतिरेकी यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी पैसे कुठून येणार? तर तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करांवर डल्ला मारून. पण तुम्हाला कायदेशीर मदत लागली त्यासाठी तुम्ही लोकांकडून दानमार्गाने पैसे गोळा करायचे ठरवलेत तर तुम्हाला ते ही करू दिलं जाणार नाही.

तुम्ही तुमची नैतिकता इतरांना ठरवू दिलीत, तर तर तुमची जीवनकथा एक दिवस तुमचा नरबळी घेऊनच संपेल हे नक्की. 

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे ही व्यवस्था तुम्ही मान्य केलीत, तर 'त्यांना' हवा म्हणून तुमच्याविरुद्ध काय कायदा निर्माण होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 

मागे घरकाम करणार्‍या एका बाईंचा व्हिडीओ फिरत होता, ज्यात तिला तीन पाचशेच्या नोटा म्हणजे पंधराशे हे कळत होतं, पण वर तीनशे म्हणजे एकूण अठराशे हे कळत नव्हतं म्हणे. त्या व्हिडिओत ती सरळ सरळ जास्त पैसे उकळायला बघत होती, आणखी पाचशे असं काहीतरी म्हणत. त्या बाईबद्दल अनेकांना सहानुभूतीचा पुळका आला  होता. तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या बाईंची कटकट बंद व्हावी म्हणून त्या तरुणांनी तिला अठराशे पेक्षा एक रुपयाही जास्त दिला असेल, तर त्यांनी उद्या आपल्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायला तयार रहावं.

कारण वामपंथ हा एक असा साप आहे की ज्याला कितीही दूध पाजलंत तरी तो एक दिवस तुम्हाला डसणारच आहे, गिळणारच आहे. 

If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

आता तुम्हाला जेक गार्डनरचं नाव ठावूक असणं का आवश्यक आहे?

कारण तुम्हीही जेक गार्डनर आहात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ९, शके १९४२


Monday, September 14, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग २: खाजगीकरणाला आक्षेप कुणाचा?

समजा एक प्रवासी व्हॅन ८ जण त्यात बसल्यावर निघणार आहे. या क्षणाला त्यात फक्त ३ जण आहेत. त्यातल्या एकाला खूप घाई आहे. तो बाकी दोघांना सांगतो की आपण तिघे एकूण ८ जणांचं प्रवासभाडं देऊया म्हणजे आपण लवकर पोहचू. आता बाकीचे दोघे विचार करतात की आपण का द्यायचे? त्याला घाई असेल तर त्याने त्याचं अधिक पाच जणांचं भाडं द्यावं. तिसऱ्या माणसाकडे इतर काहीच पर्याय नसल्याने तो झक मारत याला तयार होतो. बाकी दोघे खुश होतात की आपण आपल्या आधीच्याच भाड्यात लवकर पोहोचणार! 

आता प्रसंग तोच. तिसरा माणूस तोच उपाय सुचवतो. बाकीचे पुन्हा तेच सांगतात, की घाई असेल तर तू दे बाकीच्या लोकांचं भाडं, आम्ही का द्यायचं?! पण आता गंमत अशी आहे की आता पर्याय असल्याने तो सरळ ओला/उबर/वगैरे बुक करतो आणि लवकर पोहोचतो. 

आता व्हॅनमध्ये फक्त २ जणं आहेत. त्यामुळे आता ८ प्रवासी जमायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू लागतो. त्या तिसऱ्या प्रवाशाच्या घाईचा फायदा घेऊन त्याच्या पैशाने जे बाकीचे दोन जण जलद प्रवास करण्याची मजा घेत होते आता त्यांना त्रास होऊ लागतो. आता ८ प्रवासी जमायला आणखी वेळ लागत असल्याने व्हॅनचालक भाडं वाढवतो, कारण त्यालाही एक मर्यादेपलीकडे एका जागी व्हॅन उभी ठेवणं परवडणारे नसते.

३ जणांनी भाडं वाटून घेतलं असतं तर जितका जलद प्रवास झाला असता तो तर होतच नाही वर आहे ते भाडं सुद्दा वाढतं. यात तिसरा माणूस हा प्रवाशांचा प्रातनिधिक समजावा, कारण जसा तिसऱ्या माणसाने पर्याय वापरला तसं इतरही प्रवासी विचार करतात आणि ते पर्याय वापरून जलद प्रवास करू लागतात.

आता खाजगीकरणाला विरोध कोण करतं? ― ना व्हॅनवाला विरोध करतो ना ज्याला ओला/उबर परवडतं तो विरोध करतो ― ते बाकीचे दोन जण, जे तिसऱ्याच्या जीवावर आणि पैशावर जलद प्रवासाची मजा घेत होते आता ते खाजगीकरणाला विरोध करू लागतात.


ते विरोध करतात कारण त्यांना वाटतं हा माणूस जो आमच्याबरोबर व्हॅनमधून प्रवास करत असे आणि त्याच्यामुळे माझा वेळ वाचत असे त्याने आता मला ओला/उबर मधूनही व्हॅनच्याच भाड्यात प्रवास घडवावा.

आहे की नाही मज्जा?

©️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १२, शके १९४२

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग १

Tuesday, September 8, 2020

गतानुगतिको लोकः

१९९७ साली कॅलिफोर्नियात नेथन जॉनर नामक एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने एक पेटीशन तयार केलं: Ban Dihydrogen Monoxide.

त्याचं म्हणणं होतं की हे रसायन अतिशय खतरनाक असून अनेक कारखान्यांच्या औद्योगिक कचऱ्यात अर्थात वेस्ट प्रॉडक्ट मध्ये त्याचा समावेश होतो. याचा आण्विक ऊर्जा प्रकल्पात याचा उपयोग केला जातो. आग विझवायलाही हे रसायन वापरतात. पण हेच कर्करोगाने ग्रस्त पेशींतही आढळते. हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांत याचे आधिक्य आढळते. हेच धोकादायक रसायन प्रक्रिया केलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगात, औषधांत, आणि सौंदर्यप्रसाधनांत याचा सर्रास वापर होतो. म्हणून यावर बंदी घालायलाच हवी.

नेथनच्या या पेटीशनवर अक्षरशः हजारो लोकांनी सह्या केल्या. सह्या करणाऱ्यांत अनेक विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक, पीएचडी धारक, बुद्धिजीवी विचारवंत, आणि सिनेटर (लोकप्रतिनिधीही) सुद्धा सामील होते.

हा प्रयोग त्या मुलाने फक्त हे दाखवण्यासाठी केला होता की लोक कसे विचार न करता आणि विषयाची माहिती न घेता आलेल्या प्रत्येक प्रचाराच्या लोंढ्यात वाहून जातात.

नेथन जॉनर खोटं बोलत होता का? नाही. त्याने केलेला प्रत्येक दावा खरा होता. 

पण ते खतरनाक रसायन नेमकं काय होतं? डाईहायड्रोजन मोनोऑक्साइड अर्थात H2O अर्थात आपलं सरळ साधं पाणी!

म्हणून प्रत्येक बातमीच्या प्रत्येक शीर्षकामागे अर्थात हेडलाईनमागे धावण्याआधी हा विचार करा ― आपल्याला त्या विषयातलं किती कळतं? तुम्हाला असलेली माहिती किती खरी आहे? ― हा विचार केला नाहीत, तर तुमच्यावर डाईहायड्रोजन मोनोऑक्साइडवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहिलेलं आणि नंतर पोपट झालेला बघण्याची वेळ येईल.

©️ मंदार दिलीप जोशी

मूळ हिंदी: ©️ डॉ राजीव मिश्रा

Thursday, August 20, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग १

चीनी व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला जो फटका बसला, त्या अवस्थेच्या निवारणार्थ मोदींनी जेव्हा २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले, तेव्हा एका कॉपी पेस्ट छाप पोस्टवर पोस्टकर्त्याला मी प्रश्न विचारला  (त्याचं गणित गंडलं आहे ते सोडून द्या), की बाबा रे, तू म्हणतोस की पॅकेज घोषित करण्याऐवजी प्रत्येकाला १ कोटी द्यायचे, तर मग 

(१) प्रत्येकाला १ कोटी दिले तर सगळ्यांची सांपत्तिक स्थिती तीच नाही का राहणार, मग फायदा काय? आणि 

(२) प्रत्येकाला फुकटचे १ कोटी दिल्याने उद्योगांना चालना कशी मिळेल आणि रोजगार निर्मिती कशी होईल? 

उत्तरादाखल नेहमीप्रमाणेच संघोटा ही पदवी प्राप्त झाली.

या समाजवाद्यांना समजावणे अशक्य आहे, पण काठावर असणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण देतो. नव-समाजवाद्यांच्या तोंडावर मारायला उत्तम आहे.

समजा तुम्ही काही एक रक्कम खर्च केली, उदाहरणार्थ आपण ₹१०० घेऊ, तर तुम्ही कुणाच्यातरी कमाईची सोय करत आहात. सोयीसाठी त्या व्यक्तीला आपण 'अ' म्हणू.

पण जेव्हा सरकार तुमच्याकडून ते ₹१०० काढून घेते आणि दुसऱ्या एका व्यक्तीला देते, आपण त्याला सोयीसाठी 'ब' म्हणू, जो काहीच करत नाही - याचा अर्थ सरकारने 'अ' ची कमाई सुद्धा काढून घेतली आहे.

आता गरीब झालेला 'अ' फुकटेगिरीची सवय लागलेल्या 'ब' च्या मागे रांगेत जाऊन उभा राहतो.

आता त्या दोघांना पोसायला सरकारला तुमच्याकडून ₹२०० घेणं भाग पडतं.

पण या रकमेपैकी जे जास्तीचे ₹१०० असतात ते तुम्ही खर्च केल्यावर आणखी एका व्यक्तीची कमाई असणार होती. आपण सोयीसाठी त्या व्यक्तीला 'क' म्हणू. आता सरकारने ते तुमच्याकडून काढून घेतल्याने 'क' हा नाईलाजाने फुकटेगिरी करायला 'अ' आणि 'ब' च्या रांगेत जाऊन उभा राहतो.

आता सरकारला तुमच्याकडून पुढच्यावेळी ₹३०० घेणं भाग पडतं.

आणि अशा प्रकारे अधिकाधिक लोक गरीब होत जाऊन शेवटी सगळे रस्त्यावर येतात.

या मतिमंद, डाव्या लुटारूंना हे समजत नाही की अंबानी त्याने कमावलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उशा आणि गाद्या करून त्यावर लोळत नाही, तो तो पैसा खर्च करतो, गुंतवतो, नोकऱ्या निर्माण करतो - थोडक्यात वरील उदाहरणात दिलेले कित्येक ₹१०० लोकांत त्यांच्या कष्टांची कमाई म्हणून वाटतो.

डाव्यांनी हे पैसे फुकट्या लोकांत वाटायला घेतले, तर अंबानीच्या उद्यमशीलतेवर अवलंबून असलेल्या या सगळ्या लोकांची कमाई बंद होईल, आणि ते असेच फुकटेगिरीच्या समाजवादी रांगेत जाऊन उभे राहतील.

The problem with socialists is that they eventually run out of other people's money.
- Margaret Thatcher 

🖋️ मंदार दिलीप जोशी

संदर्भ आभार: डॉ राजीव मिश्रा

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग २

Tuesday, August 18, 2020

रात्रीस खेळ चाले, कोकण, आणि मी

ही मालिका २९ ऑगस्टला निरोप घेते आहे त्या निमित्ताने...

मुळात आधीपासून ग्रामीण भागात आणि विशेषतः कोकणात संध्याकाळ झाली की एकदम सामसूम होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही. आतासारखी सगळीकडे वीज नसल्याने पूर्वी दोन घरातलं अंतर कितीही असलं तरी रात्रीच्या भयाण शांततेत दार प्रत्यक्ष वाजवून माणूस बाहेर आल्याशिवाय शेजार आहे हे जाणवत देखील नसे; आताही फार फरक पडलेला नाही, पण अनेक घरात आलेल्या मठ्ठ खोक्यामुळेही लोक एकमेकांना भेटायला फार बाहेर पडत नसावीत. तर, संध्याकाळी दिवेलागणीनंतर करण्यासारखं काही नसल्याने मुलांचे अभ्यास, जेवणं, आणि झोप यांच्यात मध्ये भरपूर वेळ मिळे. दिवसा ज्याकडे लक्षही जात नसे असे एखादे झाड रात्री उगाचच भयानक वाटतं. 

मुबलक प्रमाणात असलेली झाडं झुडपं आणि पानाफांद्यातून रात्री डोकावणारा चंद्रप्रकाश आणि वीज आल्यानंतरच्या काळात रोजच चाललेला बल्बच्या प्रकाशाचा खेळ त्या वातावरणाच्या गूढतेत आणखीच भर टाकतो. कोकणातल्या गावांत अनेक गल्ल्या आणि आळ्यांत खांबांवरून जे दिवे सोडलेले असतात त्यांचे काम म्हणजे परिसर उजळून टाकणे हे नसून तो खांब तिथे आहे हे वाटसरूंना दाखवण्यापूरते मर्यादित असते. त्यामुळे दोन खांबांच्या मधला भाग लोक घाबरत घाबरतच पार करतात. 

त्यामुळे मग वेळ घालवायला म्हणा किंवा आलेले खरे खोटे अनुभव वाटून घ्यायला म्हणा असंख्य भूतकथांचा जन्म झाला यात नवल नाही. याला वर वर्णन केल्याप्रमाणे असलेल्या कोकणातल्या नीरव शांततेची आणि भरपूर आणि दाट वृक्षसंपदेची फोडणी मिळाली आणि खऱ्या खोट्या असंख्य भुतांनी गोष्टीरुपाने वावरायला सुरवात केली.

काही काळापूर्वी कोकणातल्या भुतांचे प्रकार वाचले होते ते जसे आठवतात तसे देतो आहे:

वेताळ, ब्रह्मग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, गिऱ्हा, चेटकीण, झोटिंग, वीर, बायंगी, जखीण, हडळ, म्हसोबा, लावसट, भानामती, चकवा, वगैरे. यांची वर्णने देत बसत नाही कारण फेसबुकवर किंवा नेटवर इतर ठिकाणी शोधल्यास सहज सापडेल.

लहानपणी आजी आजोबांनी भरपूर भुतांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे "रामाच्या देवळासमोर एक बाई राहते, तिचा दरवाजा वाजवल्यावर ती बसल्याजागेवरून लांबूनच हात लांब करून दार उघडते" ही होती. गंमतीशीर अशाकरता म्हणालो की तेव्हा जाम तंतरली असली तरी नंतर रामाच्या देवळसमोर भूत कसं राहील असं आजीने विचारल्यावर आजोबा आपली खेचत होते हे लक्षात आलेलं. तरीही त्या घरासमोरून जाताना काही दिवस घाबरायला व्हायचंच!

मी मूळचा कोकणचा असल्यामुळे कोकणावर भयंकर प्रेम आहे हे वेगळं सांगायला नकोच. पूर्वी पडघवली वगैरे मालिकांतून कोकण दर्शन झालं खरं, पण तरी कोकणाला टीव्हीवर पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने तो अनुशेष कोण भरून काढणार हा प्रश्न होताच. अशात #झी_मराठी वर #रात्रीस_खेळ_चाले सुरू झाली आणि आता मजा येणार असं वाटू लागलं. पण झीवरच्या इतर (म्हणजे जवळपास प्रत्येक) मालिकांसारखीच आरंभशूर झालेल्या या मालिकेने नंतर कंटाळवाणं केलं. एखादा विषय सुरू केल्यावर त्याचं पुढे काहीही होताना न दाखवता विसरून जाणं आणि शेवटी प्रत्येकावर का संशय आहे याची कारणे देऊन शाळेत आदा मादा कोण पादा केल्यागत त्यातल्या एकीला अटक करणं यामुळे मालिकेने खूपच अपेक्षाभंग केला. पात्रयोजना जरी चपखल असली तरी यामुळे शेवटी शेवटी वैताग आला होता. त्यात मालिकेतले क्वचितच दिसणारे आणि कपाटातून बाहेर येणारे अण्णा ही माझी विशेष आवडती व्यक्तिरेखा.

ही मालिका परत सुरू होणार म्हटल्यावर फार आशा नव्हतीच पण उत्तम अभिनय, मागल्या सीझनमधे गंडलेलं कथानक सुधारून ओघवती कथावस्तू देणे, उत्कृष्ट पात्रनिवड यांनी या मालिकेच्या आधी काय घडते हे दाखवणाऱ्या सीझनने म्हणजेच प्रिक्वेलने खूप मजा आणली. अगद कमी फुटेज किंवा लहानात लहान व्यक्तीरेखाही लक्षात राहते. मुख्य म्हणजे या मालिकेतले कलाकार कपडे घालतात ते आवडले. म्हणजे इतर मालिकांसारखं संडासात जाताना लग्नाला निघाल्यासारखे कपडे घालणे किंवा नखशिखांत नट्टापट्टा केला असतानही "अभी तैय्यार होके आती हूं" म्हणणे नसायचे. कुठेही नाव ठेवायला जागा नाही.

अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा अतिशयोक्तीपेक्षाही जास्त भडक असल्याने पटत नव्हतं, पण असे लोक खरंच अस्तित्वात असल्याचं काही जणांनी किस्से सांगितले त्यातून कळलं. ही भूमिका साकारणारे श्री माधव अभ्यंकर यांच्याशी फेसबुकवरच बोलताना त्यांनीही असली माणसं अस्तित्वात असतात असं सांगितलं होतं. ते खरं असेल तर अवघड आहे.

<< माझं आधीचं मत हे होतं: अगदी अनेक जुन्या हिंदी सिनेमातले व्हिलनही कुटुंबवत्सल दाखवले आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस कितीही संतापी, विक्षिप्त, तिरसट, बाई आणि बाटलीत गुरफटलेला, लोकांना फसवून त्यांच्या जमिनी लाटणारा, वगैरे सगळे वाईट धंदे करणारा असला तरी तो शेवटी प्रॉपर्टी आणि पैसा जमवतो कुणा करता, तर आपल्या कुटुंबाकरताच. मग हा माणूस याला मारीन, गोळी घालीन, घराबाहेर काढीन, वगैरे करून शेवटी घरी कोण शिल्लकच उरलं नाही तर एवढी संपत्ती काय वर घेऊन जायची आहे का? म्हणूनच अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा एका मर्यादेपलीकडे पटत नाही. या सगळ्याचा लेखक व दिग्दर्शकांनी विचार करायला हवा होता.) >>

बाकी अण्णा नाईक यांच्या भूमिकेत श्री माधव अभ्यंकर आणि पांडूच्या भूमिकेत प्रल्हाद कुडतरकर रॉक्स! आपण फॅन!! नेने वकील (शेवटच्या काही भागांत कलाकार बदलले, ते ही छानच, पण माझे आवडते दिलीप बापटच), शेवंता (अपूर्वा नेमलेकर). सदा, वच्छी आणि आबा, शोभा, काशी, माई (शकुंतला नरे), रघूकाका (अनिल गावडे), दत्ता (सुहास शिरसाट), माधव (मंगेश साळवी), छाया (नम्रता पावसकर), सरिता (प्राजक्ता वाड्ये) आणि इतर सगळेच उत्तम. अधुनमधुन दिग्दर्शकाला ही गूढकथा आहे की रात्रीस खेळ चाले ऐवजी दिवसा केलेले चाळे (सॉफ्ट पॉर्न) दाखवायचे आहेत याचा गोंधळ झाल्यासारखं वाटत होतं, पण ठीक आहे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. द्वादशी, शके १९४२

टीपः रात्रीस खेळ चाले चे Meme: या मालिकेने मीम साठी अनेक फोटो मिळवून दिले. Zee5 App किंवा ब्राउझर वरून Zee5 वर मालिकेचा एखादा भाग सुरू असताना हवा तो क्षण किंवा पात्रांच्या चेहऱ्यावर हवे ते भाव आले की मी तो क्षण साधून स्क्रीनशॉट काढतो आणि वापरतो. असे अनेक फोटो/स्क्रीनशॉट माझ्या संग्रही असतात व एखादा विनोद सुचला की त्यातला एखादा काढून वापरतो. नेटवर असलेले आयते फोटो काही कामाचे नसतात कारण काही अपवाद वगळता मराठीत अजून Still Photography पुरेशी फोफावलेली नाही. म्हणून हे फोटो मालिकेच्या निर्मात्यांकडेही सापडणार नाहीत. त्यामुळे एखादा विनोद सुचल्यास त्याची मीम करायला मला ५ मिनिटेही लागत नाहीत.

Monday, August 17, 2020

बॉलिवुडचे तरुण(!) 'तुर्क', काँग्रेस, आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे

आज आमिर खान सबंधातली एक बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली एक बातमी आठवली.

काँग्रेस पक्ष अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तुर्कस्थानात इस्तंबुल इथं आपलं एक कार्यालय उघडल्याची ती बातमी होती. ही माहिती 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' नावाच्या गटातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुर्कीश माध्यमांना देण्यात आली. 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' हा भारताबाहेर राहणाऱ्या काँग्रेस समर्थकांचा एक गट आहे आणि पूर्वी स्व. राजीव गांधींचे खास असलेले आणि आताच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय 'हुआ तो हुआ' फेम सॅम पित्रोदा ह्या गटाचे अध्यक्ष आहेत. या कार्यालयाची धुरा मोहोम्मद युसूफ खान नामक एक इसम सांभाळेल. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या या मोहोम्मद युसूफ खान या व्यक्तीबद्दल मात्र आंतरजालावर फारशी माहिती मिळत नाही.


हे कार्यालय उघडण्यामागे काँग्रेस पक्षाचा हेतू सांगताना प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की भारत व तुर्कस्थान यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत या करता काँग्रेस पक्षाने हा पुढाकार घेतला आहे. यातली गोम अशी की असं करण्याचा राजमार्ग अर्थात भारतीय सरकारची अधिकृत वकीलात तिथे असताना काँग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय पिल्लू असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या या कार्यालयाचं औचित्य काय?

काही तथ्ये लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षाची ही कृती किती धोकादायक आहे हे लक्षात येईल. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांना इस्लामी जगताचा खलिफा बनण्याची सुरवातीपासूनक्सह स्वप्न पडत आली आहेत आणि त्यांनी तुर्कस्थानला मजहबी कट्टरतेच्या दिशेने नेण्यात एकही कसर बाकी ठेवलेली नाही. तुर्कस्थानचे पहिले राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांनी केलेल्या सुधारणांच्या बरोबर उलट दिशेला तुर्कस्थानला नेण्याचा त्यांनी चंगच बांधलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरातून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने बहुसंख्येने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत योग्य विधाने केली. मात्र राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्या नेतृत्वाखालील तुर्कस्थानने मात्र भारताला या मुद्द्यावर विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची ही पहिलीच खोडी नव्हती. या आधी २०१७ साली एप्रिल ३० ते १ मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर बहुपक्षीय चर्चा व्हावी असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यात लक्षणीय बाब अशी की २००२ साली राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळताना मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न शिमला कराराअनुसार द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा अशी भूमिका घेतली होती. अर्थात पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे तुर्कस्थानच्या ग्रीसशी असलेल्या वादात ग्रीस सायप्रस बाबत तेच करत असतो ही पार्श्वभूमी त्या भूमिकेमागे होती. पण हा यु टर्न भारतासाठी आश्चर्यकारक असल्याने त्यावेळी भारताकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता व काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मामला असल्याचे भारताने ठामपणे पुन्हा सांगितले होते.

अवांतर: याच दौऱ्यात एर्डोगन महाशयांना जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हा त्यांनी तुर्कीश भाषेत भाषण केले होते.

इतर इस्लामिक देश - जरा सुधारणा करतो - अनेक अरब देश राष्ट्रहिताकडे डोळा ठेऊन भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असताना इस्लामी जगताचे नेतृव करण्याची स्वप्ने बघणारा तुर्कस्थान आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने शब्द टाकला म्हणून इस्लामी जिहादी विचार पसरवणाऱ्या झाकीर नाईकला आश्रय देणारा मलेशिया हे मजहबी कट्टरतेकडे झुकलेले देश मात्र काश्मीर प्रश्नावर सातत्याने इस्लामी दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतात.  हाच झाकीर नाईक राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची उघडपणे इस्लामची तळी उचलल्या बद्दल तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो.आता तुर्कस्थान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या महाआघाडीत आता ओमानही आपली सुन्नी कट्टरता पोसायला सामील झाला आहे. राजकीय पाठिंबा इथवर ही गोष्ट थांबत नाही. भारताने एर्डोगन पाठिंबा सेट असलेल्या टर्किश संघटनांकडून काश्मीर व केरळमधल्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना पुरवला जाणारा पैसा या बाबतीत अनेकदा निषेध नोंदवलेला आहे.

अवांतर: हे लिहीत असतानाच अरब देश भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहेत हे दर्शवणारी एक आश्वासक बातमी आली. बहारीनमध्ये गणपतीच्या मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपावरुन एका बुरखाधारी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एर्डोगन मजहबी कट्टरतेची खुर्ची आपल्याकडे खेचून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न का करत आहे हे देखील अशा घटनांतून मिळणार्‍या संकेतांमधून  कळते. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने तुर्कस्थानात आपलं कार्यालय उघडणं हे निव्वळ संशयास्पदच ठरत नाही तर सरळ सरळ देशविरोधी भूमिका ठरते. पण मनमोहन सिंग पंतप्रधान आणि प्रत्यक्षात घटनाबाह्य सत्ताकेंद्र सोनिया गांधी अशी व्यवस्था राबवणाऱ्या काँग्रेसने अधिकृत भारतीय वकीलात असताना त्याला वळसा घालून वेगळं कार्यालय उघडण्यात खरं तर काहीच आश्चर्य नव्हे. कायम भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशी विधाने व कृती करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून ऑटोमन साम्राज्याच्या दिशेने जायची इच्छा बाळगणाऱ्या मजहबी कट्टर एर्डोगन यांच्या देशात वेगळे कार्यालय उघडणे हे काँग्रेसच्या बाबतीत नैसर्गिकच म्हणायला हवे.

अवांतर: २०१९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४व्या सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यू यॉर्क पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि आपले उत्सवमूर्ती एर्डोगन हे भेटले आणि या भेटीत त्यांच्यात 'इस्लामोफोबिया' शी लढायला एक टीव्ही चॅनल सुरू करण्यावर एकमत झालं.

आता आमिर खानच्या बातमीकडे वळूया.

बॉलिवूड आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी अंडरवर्ल्डचे संबंध आता काही गुपित राहिलेले नाहीत. तथापि इतर कट्टर मजहबी देश आणि बॉलिवूड यांच्यातल्या संबंधांबाबत फारशी माहिती उजेडात येत नाही. गेलाबाजार पीके सिनेमात भगवान शंकरांच्या बाबतीत खोडसाळपणा करणाऱ्या, हिंदू देवळांच्या बाबतीत डोस पाजणारा, आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल यथेच्छ गरळ ओकणारा आमिर खान हज यात्रेला जाऊन तिथे विविध देशातील मौलवींची गळाभेट घेताना फोटो चमकवतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ते तेवढंच. न्यू इअर पार्टी करून साजरे करण्याचे खूळ भारतात पुरेपुर असताना एकेकाळी उदारमतवादी व प्रगत होऊ बघणारा तुर्कस्थान हा बॉलिवुडमधल्या मंडळींच्या आवडत्या देशांपैकी एक देश आहे. आजही तिथे अनेक नाईटक्लब आहेत. अशाच एका नाईटक्लबात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या गोळीबारात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अबिस रिझवी आणि त्यांची मैत्रीण खुशी शहा हे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडच्या टर्किश कनेक्शनकडे लक्ष गेलं.

तर आमिर खान सबंधातली ती बातमी कोणती? तर फॉरेस्ट गम्प या टॉम हँक्स अभिनित हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाची नक्कल असलेल्या लालसिंग चढ्ढा या आपल्या सिनेमाचे शेवटचे काही चित्रीकरण आटपण्यासाठी आमिर खान तुर्कस्थानात होता. ही संधी साधत आमिरने १५ ऑगस्ट रोजी आपली द्वितीय हिंदू पत्नी किरण राव हिच्यासह राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची पत्नी इमिन एर्डोगन यांची हुबेर मॅन्शन या त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात भेट घेतली. आपल्या पानी फाउंडेशन या आपल्या एनजीओच्या दुष्काळ निवारण व पाणी संवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असे समजते. श्रीमती एर्डोगन यांनी आमिर खानची तो आपल्या चित्रपटांमधून 'सामाजिक प्रश्नांची' धाडसी मांडणी [courageous handling of social problems] (!) केल्याबद्दल स्तुती केली.

ही भेट इथली साधी सरळ असणार असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या नव-ऑटोमन धोरणानुसार चालणाऱ्या तुर्कस्थानने दक्षिण आशियातल्या मुसलमानांत आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे स्वतःला गैर-अरब इस्लामी जगताचा खलिफा किंवा सम्राट म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मलेशिया आणि पाकिस्तानशी संधान बांधलं असून या देशांच्या मदतीने दक्षिण आशिया व प्रामुख्याने भारतीय मुसलमानांना लक्ष्य करून तिथं आपलं कट्टर इस्लामी प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान व एर्डोगन पत्नीची भेट ही या परिप्रेक्ष्यात बघितली पाहिजे.

एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच परिस्थिती या खानावळीची असली तरी पाकिस्तानला गुड नेबर अर्थात चांगला शेजारी म्हणणारा शाहरुख खान आणि उघड गुंडासारखी वागणूक ठेऊन ती झाकायला बिइंग ह्युमन काढणारा हरणमाऱ्या सलमान खान यांच्यापेक्षा भारतीयांच्याच जीवावर कोट्यवधी कमावून मग २०१५ साली बायकोला भारतात असुरक्षित वाटतं असं साळसूद विधान करणारा आणि दक्षिण आशियाई देशांत इस्लामी कट्टरतेचा प्रभाव वाढवू बघणाऱ्या एर्डोगन यांच्या पत्नीची भेट घेणारा आमिर खान हा जास्त धोकादायक वाटतो.

ही सगळी माहिती आणि बातम्या अर्थातच उघड आहेत, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तरी राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांपेक्षा बॉलिवूडच्या चाळ्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या जनतेला त्याचं महत्व आणि धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही. आज एका नटाच्या संशयास्पद मृत्यूने पेटून उठणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी आणि तो कोण होता याची अचानक जाणीव झालेल्या इतरांनी बॉलिवूडमधली घराणेशाही, नेपोटीझम, वगैरेंत यथेच्छ डुंबून झाल्यावर त्याच्याकडे कसलेसे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट होते आणि ते चोरले गेले वगैरे जागृती आली. हे प्रकरण आणि जे या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत किंवा यात गुंतले आहेत असे जे आरोप होत आहेत ते बघता एक-दोन संशयास्पद मृत्यू आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांचा पाकिस्तानी अंडरवर्ल्डशी संबंध इतका आपल्या माहितीचा परीघ मर्यादित न ठेवता देशविरोधी शक्तींशी बॉलिवूडचे आंतरराष्ट्रीय संबंध या विरोधात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

या परिप्रेक्ष्यात बघितल्यास काँग्रेस पक्षाचे तुर्कस्थानात वेगळे कार्यालय उघडणे आणि तुर्कस्थानच्या मजहबी कट्टर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी आमिर खानच्या अहो रुपम अहो ध्वनी थाटाच्या गप्पा या एकटीदुकटी घटना उरत नाही, तर एका मोठ्या सुनियोजित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भारत आणि हिंदूद्वेषी राजकारणाचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं.

मात्र काँग्रेसच्या वळचणीला जाणाऱ्या नवनिधर्मांध पक्षांच्या लक्षात हे दुवे आलेले तरी दिसत नाहीत किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं जातं आहे. ही बाब अशा पक्षांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे हे नक्की. पण तो विषय वेगळा. 

चीनी व्हायरसमुळे उद्भवलेल्या नव्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक लोक अनावश्यक गोष्टींचा त्याग करत असताना आपणही अशी यादी तयार करून अशा अनावश्यकच नव्हे तर राष्ट्रविघातक गोष्टींना अंगावर बसलेल्या माशीप्रमाणे झटकून टाकणे आणि शक्य झाल्यास ठेचणे आवश्यक आहे.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ १३, शके १९४२


Monday, August 3, 2020

सहज सुचलं म्हणून - अखंड सावधान रहावे

प्रतिभाहीन महत्वाकांक्षा हिंसक असते, आपल्या जीवनप्रवासात जिथे जिथे जाते तिथल्या वातावरणालाही दूषित करत जाते. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले लोक तिचे नेहमी लक्ष्य ठरत राहणार.

तुम्ही सेलिब्रिटी झालात, किंवा कोट्यावधी संपत्तीचे धनी झालात तरी आर्थिक व्यवहार स्वतःकडेच ठेवा. नेट बँकिंग, एटीएम/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन शॉपिंग यातलं मला काहीही कळत नाही किंवा त्यामार्गे व्यवहार करायचा कंटाळा येतो या सबबी चालणार नाहीत. शेअर्स वगैरेंचे व्यवहार ब्रोकरच्या डोक्यावर टाकून निश्चित राहू नका, स्वतः शिकून घ्या आणि मगच इतरांना जबाबदारी द्या आणि त्यावर लक्ष ठेवा; नपेक्षा करू नका. अगदी प्रेम आणि लग्न करतानाही विचार करण्याचा अवयव हा कमरेखाली नसून मानेच्यावर आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या हुशारीवर भुलल्याचे दाखवणारी प्रत्येक व्यक्ती आणखी बरंच काही मनात ठेवून असू शकते. ओरबडणारी आणि कुरतडणारी माणसं अवतीभोवती जमतील असे वागू नका.

A chain is as strong as it's weakest link and a democracy is as firm as it's corruptest leaders. त्यामळे अखंड सावधान असावे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण पौर्णिमा, शके १९४२

Thursday, July 23, 2020

"तुम्ही बघता कशाला?" आणि "जीवावर उदार होणारे कलाकार"

[काही लोकांना #त्रागा / मालिकांवरच्या पोस्ट दिसल्या की लगेच "तुम्ही बघता कशाला?" असले अतार्किक प्रश्न घेऊन लोक परत परत हजर होतात. आमच्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा ते आम्हाला उत्तम समजतं, आणि टीव्ही समोर बसून सगळ्या मालिका बघू लागलो तर नोकरी/व्यवसाय सोडून घरी बसायला लागेल. घरी किंवा शेजारी नुसतं इकडून तिकडे गेलं टीव्ही असलेल्या खोलीतून तरी सगळ्या मालिकेचा फील येतो. एकाच घरात राहताना कान आणि डोळे बंद करुन बसता येत नाही, अगदी दुसरी खोली असेल तरीही. शिवाय, एका मिनीटाची जाहीरात जरी बघितली तरी मालिकेत काय चाललं आहे ते स्पष्ट कळतं. तेव्हा "तुम्ही बघता कशाला?" याला उत्तर एकच, "तुम्ही त्रागा दिसला की त्याच पोस्ट का वाचता? दुर्लक्ष करा!"]



अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्‍या कला क्षेत्रातल्या लोकांनी हे समजून घ्यावं की आम्हाला हे माहीत आहे की आर्थिक गरजा कुणाला चुकल्या नाहीत, शेवटी पोटासाठी करावं लागतं, त्यामुळे तुम्ही फालतू मालिकेत टुकार भूमिका करत असाल तर त्यात गैर काही नाही...पण मग टीका सहन करायला तयार राहावं माणसाने. दुर्लक्ष करता येत नसेल तर काही लोक सरळ ब्लॉक करुन मोकळ्या होतात, तसंही करायला हरकत नाही. अग्गंबाई सासूबाई वगैरे सारख्या भंगार मालिकेत काम केल्यावर काय स्तुतीसुमने उधळायची का लोकांनी तुमच्यावर? एकदा तुम्ही कॅमेर्‍यासमोर आलात की दिसणार्‍या आणि ऐकू येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा प्रेक्षक म्हणून आम्हाला अधिकार आहे. आम्ही नाटकाची व सिनेमाची तिकिटे, केबलचे पैसे, आणि वीज खर्च करतो.

कलाकार किंवा तत्सम लोक म्हणजे काही सैनिक, वैद्यकीय व्यावसयिक व कर्मचारी, पोलीस बँक कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारे वाहतुक व्यवसायिक वगैरे नाहीत जीवावर उदार व्हायला. कुणीतरी जीव धोक्यात घालून केलेलं काम आम्ही मनोरंजन म्हणून बघू इतक्या कोत्या आणि असंवेदनशील मानसिकतेचे आम्ही वाटलो का? रसिकांवर कसले उपकार करत आहात तुम्ही? तुम्ही ज्या व्यवसायात राहून पैसा कमावत आहात तोच मुळात लोकाश्रित आहे. लोकांचे उपकार आहेत तुमच्यावर. पैसा फेको तमाशा देखो. तुमच्या मालिका बंद झाल्या तर रसिक दुसरे मार्ग शोधतील (किंबहुना शोधतातच). तुम्ही काहीही तुमचं आयुष्य धोक्यात घालून करत नाही आहात हे, पैसे घेताय त्याचे निर्मात्याकडून. तेव्हा आमच्यासाठी जीवावर उदार होत आहात या गैरसमजातून कलाकारांनी लवकरात लवकर बाहेर आलं तर बरं. या असल्या मालिकांपेक्षा खाली डोंबारी आला तर त्याचा खेळ बघेन मी. तो खरं तर जीव धोक्यात घालतो दोरीवर चालून.

आणखी एक, "तुमच्या कामाचा असा जाहीर पंचनामा केला तर चालेल का?" असा बावळट प्रश्न एके ठिकाणी वाचला. आमचं काम जितक्या लोकांसमोर आम्ही करतो तितक्या लोकांसमोर आमच्या कामाचं नियमित मूल्यमापन होत असतं. आम्ही ऑफिसात काय काम करतो, कसं करतो म्हणजे पद्धत काय, आमच्या कामाचा इतरांवर काय परिणाम होतो याचा दर तीन, सहा, किंवा बारा महिन्यांनी आमच्या ठराविक बॉस समोर मूल्यमापन उर्फ पंचनामा होत असतो. अधुनमधून टोचायला मॅनेजर लोक असतातच. शिवाय कॉलवर क्लायंट आमची जी शाळा घेतो ती वेगळीच. तेव्हा असा बावळट प्रश्न पुन्हा विचारू नका. तेव्हा चूक झाली की किंवा अपेक्षित काम नाही झालं की लोक आम्हाला नावं ठेवतातच. कलाकार म्हणजे कुणीतरी परग्रहावरचे आहात हा समज दूर करा.

बाकी तुमच्या इतर मतांबद्दल निकोलस टालेब यांनी लिहीलेली वाक्ये जशीच्या तशी द्धृत करतो आहे, ती हॉलीवुडच्या कलाकारांबद्दल लिहीली असली तरी ती सगळ्याच कलाकारांना लागू पडतात:

1) To understand why what happens in Hollywood is irrelevant to the rest of humans: 1) How many ACTORs do you have among your friends? 2) How many ACTOR friends do your friends have? Actors rarely mix with real people.

2) Romans banned actors from marrying, even mixing with citizens. Same dynamics in modern times, but self-inflicted: engineers can mix w/gynecologists... actors stay with actors. Look at the funerals of "gens du spectacle".

3) I do not know many industries where people are hired either
a) on looks, or
b) ability to impersonate what one is not.

4) Actors should not be the ones lektchuring the rest of us on ethics & morality. They also have a tendency to conflate virtue and its external manifestation, given that everything in their world is appearance. 

5) And for the slow thinkers on the thread, you don't see gynecologists or train engineers lektchuring the rest of the world on virtue. Actors do. Gabish?

6) Remember: actors are trained to not seem stupid.

7) Now a harder questchon: what is the proportion of actors who voted for Hilary Monsanto-Malmaison?

8) OK, let me be blunt. How many professions do you know, other than the ones where physical attributes are essential, where the modus "sleep your way up" prevails?

© मंदार दिलीप जोशी
- एक अत्यंत संतापलेला प्रेक्षक

तळटीपः यातली काही वाक्ये काही मित्रांच्या पोस्ट व टिप्पण्यांतून घेतली आहेत, टंकायचा कंटाळा म्हणून. श्रेय न दिल्यास रागवू नये. 

Tuesday, July 14, 2020

केप फियर: तिटकाऱ्याची परिसीमा

Cape Fear नावाचा इंग्रजी सिनेमा आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्याखाली १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला मॅक्स हा त्याच्या वकीलाच्या मागे लागतो. खटल्या दरम्यान वकिलाने काही पुरावे दडवल्याने त्याची शिक्षा कमी होऊ शकणार असते ती झालेली नसते. कदाचित मॅक्स निर्दोष सुटू शकला असता ते ही अर्थातच होऊ शकलेलं नसतं.  

तुरुंगात वकिली शिकलेल्या मॅक्सच्या मनात यामुळे त्याच्या सॅम बावडेन या वकिलाबद्दल इतका द्वेष भरलेला असतो की तो त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मागे अत्यंत भयानकपणे लागतो. 

मॅक्स म्हणजे रॉबर्ट डी निरोची संवादफेक इतकी प्रभावी आहे की आपण अनेकदा डोकं धरून बसतो. आपल्या छातीतली धडधड शेवटपर्यंत थांबत नाही. सॅम इतका बोलतो, इतका बोलतो की अगदी चित्रपटाच्या शेवटी मॅक्स केडी बोटीबरोबर जखडला गेल्याने नदीत ओढला जातो त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सतत बोलत, गरळ ओकत असतो. 

हा कधी एकदाचा मरतो आणि याची कारस्थाने थांबतात आणि याचं बोलणं बंद होतं असं आपल्याला वाटत राहतं. 


Robert De Niro in White Shirt and Cap With Nick Nolte in Cape Fear ...

रॉबर्ट डी निरोच्या अफलातून अभिनयासाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा.


🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसास्वादक, 📗 पुणे ग्रीनकार्ड होल्डर