Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उचकावून सोबतीला घेऊन बंड केलं आणि अनेक विजयही मिळवले. वेगळं राज्य स्थापन केल्यावर ते टिकवायला जी दृष्टी लागते ती नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, पण तो सरते शेवटी रोमन साम्राज्याकडून पराभूत झाला आणि त्याला क्रॉसवर लटकवलं गेलं.

Spartacus

त्याकाळी गुलाम विकले जायचे आणि त्यांना पैसे देऊन स्वतंत्र सुद्धा केलं जाऊ शकायचं. शेवटच्या दृश्यात स्पार्टाकसच्या पत्नीला असंच स्वतंत्र केलं गेलं आहे आणि ती त्यांच्या बाळाला घेऊन क्रॉसवर लटकावलेल्या स्पार्टाकसचा निरोप घ्यायला आली आहे. मृत्यूच्या जवळ जात असलेल्या स्पार्टाकसला ती त्यांचं बाळ दाखवत म्हणते की बघ स्पार्टाकस, हा तुझा मुलगा आहे, आणि तो स्वतंत्र आहे. हे दृश्य इतक्या प्रभावीपणे चित्रित करण्यात आलं आहे की ती हे बोलत असताना त्या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळेच आनंदी भाव दिसल्याचा भास झाला, जणू त्याला कळत होतं काय चाललंय ते.

स्वतंत्र असणं म्हणजे काय, ते या दोन मिनिटांच्या दृश्यात समजतं. पूर्ण सिनेमा बघितला होता, त्यामुळे हे दृश्य जास्तच परिणाम करून गेलं. पहिल्यांदा बघितल्यावर जो आणि जसा परिणाम माझ्यावर तेव्हां झाला होता तसाच आजही होतो.

स्पार्टाकस सिनेमा याच नावाच्या कादंबरीवर बेतला होता. सिनेमाची पटकथा आणि कादंबरी या दोन्हीचे लेखक होते हॉवर्ड फास्ट. अत्यंत यशस्वी लेखक असलेल्या हॉवर्ड यांना साहित्य आणि सिनेमा क्षेत्रात खूप मागणी होती, आणि या मागणीची किंमत ते पुरेपूर वसूल करत असत. आपल्या आयुष्यात त्यांनी खूप वैभव कमावलं आणि ऐशआरामात जगले. आता कष्ट केले की त्याचे पैसे मिळायलाच हवेत, पण मग हे मुद्दाम सांगायचं प्रयोजन काय? तर, हॉवर्ड फास्ट साहेब घनघोर साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट होते. पण नंतर स्टालिनची कृष्णकृत्ये पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.

आपल्या The Naked God: The Writer and the Communist Party आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ― There was the evil in what we dreamed of as Communists: we took the noblest dreams and hopes of mankind as our credo; the evil we did was to accept the degradation of our own souls—and because we surrendered in ourselves, in our own party existence, all the best and most precious gains and liberties of mankind—because we did this, we betrayed mankind, and the Communist party became a thing of destruction.

स्पार्टाकस सिनेमा तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी ठरला, आणि त्याला चार ऑस्कर पुरस्कारही मिळाले. आलम दुनियेतल्या कम्युनिस्टांनी स्पार्टाकसला आपला हिरो, आपला आयकॉन बनवला नसता तरच नवल होतं. आजही स्पार्टाकस वामपंथी लोकांसाठी आयकॉन आहे. डाव्यांनी या कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद देखील करवला. भारतात 'अमृतराय' यांनी त्याचा 'आदिविद्रोही' नावाने हिंदीत अनुवाद केला आणि तो डाव्यांच्या 'हंस प्रकाशनाने प्रकाशित केला. नेटवर शोधल्यास पीडीएफ चकटफू उपलब्ध आहे, त्यात हॉवर्ड फास्ट साहेबांचे रसभरीत गुणवर्णन केलेलं आहे. त्यात त्यांच्या कलाकृतींचा उल्लेखही आहे, पण उल्लेख गायब आहे तो त्यांच्या ऐशआरामी आयुष्याचा. इतकंच काय, त्यांच्या - द नेकेड गॉड या आत्मचरित्राचाही उल्लेख केलेला नाही. आश्चर्य वाटलं? नाही, कदाचित उल्लेख केला असता तरच आश्चर्य वाटलं असतं. संपूर्ण सत्य सांगतील तर ते कम्युनिस्ट कसले?

या सगळ्याचं सार इतकंच की वामपंथ आणि प्रत्येक वामपंथी हा गुलामीचा कडवा विरोधक असतो, पण हे त्यांचे निव्वळ दाखवायचे दात असतात. नाहीतर त्यांनी 'प्रत्येक मनुष्य हा त्या दयाळू शांतीदेवाचा गुलाम आहे' हे सांगणाऱ्यांना पाठिंबा दिला नसता. जी विचारधारा स्वतःला त्यांच्या शांतीदेवाची आणि त्या शांतीदेवाचा प्रेषित मानणाऱ्या व्यक्तीची गुलाम मानते, आणि स्वतःसकट पूर्ण जगावर ती गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असते, त्याच विचारधारेची पाठराखण हे गुलामीचे स्वघोषित विरोधक डावे कसे काय करू शकतात?!

१९४७ साली आपण 'स्वतंत्र' झालो, आपल्याला 'आझादी' नाही मिळाली ― ती मिळाली पाकिस्तानला, जिथे त्याच विचारधारेची सत्ता आहे.

आपला वारसा स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेला देवी मानून लिहिलं ―
जयोsस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे।
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे।

हिंदुत्वाची अधिष्ठात्रीच मुळात स्वतंत्रता आहे. आपण स्वतंत्र आहोत, राहू, आणि आपला देशही स्वतंत्र राहील आणि ते राखणे हेच आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आपापल्या इष्टदेवतेचे आम्ही भक्त आहोत, आणि कुणाला देव मानायचा नसेल तर तसे न मानायलाही स्वातंत्र्य आहे.... पण गुलाम किंवा बंदे नाही म्हणजे नाहीच!

जाता जाता, स्पार्टाकसच्या त्या प्रसिद्ध शेवटच्या दृश्याची ही लिंक, अवश्य पाहून घ्या. ही लिंक काम करत नाहीशी झाली तर हे दृश्य युट्युबवर कुठेही या सिनेमाच्या व्हिडिओवर उपलब्ध असेलच. 

🖌️ मंदार दिलीप जोशी


2 comments:

  1. विरोधाभास उत्तम समजावून सांगितलास दादा!

    ReplyDelete