Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन - आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) च्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना "अपेक्षित" ऐवजी "उपेक्षित" असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

2 comments: