अशोक कुमार काजी
जन्मः अज्ञात | हत्या: २४ डिसेंबर १९९०
नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांवर वाघ कसे शिकार करतात ते बघितलंय कधी? ते मुके प्राणी सुद्धा सावज एकदा तावडीत सापडलं की आधी त्याच्या नरडीचा घोट घेतात. त्याला जितक्या लवकर ठार मारता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शत्रूला संपवणे किंवा आपली भूक भागवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. एखाद्याच्या क्रूरतेबद्दल वर्णन करताना आपण अनेकदा त्याला जनावरांची उपमा देतो. ते किती चुकीचं आहे हे या प्राण्यांचं फक्त निरीक्षण केल्यास आपल्याला सहज लक्षात येईल.
श्रीनगर मधल्या टांकीपोराचे रहिवासी असलेले अशोक कुमार काजी हे सामाजिक कार्याची आवड असलेले अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सरकारी कर्मचारी होते. समाजातल्या सर्व स्तरांच्या समस्या सोडवण्यात त्यांना रस असे. समाजकार्याच्या याच आवडीतून त्यांचे श्रीनगरमधील सर्व स्तरातील लोकांशी ओळखी व संपर्क प्रस्थापित झाले होते. सर्व जातीधर्मांचे लोक आपल्या समस्या सोडवायला आवर्जून त्यांच्याकडे जात. जबरदस्त संघटन कौशल्य असणारे अशोक कुमार काजी यांनी श्रीनगरमधील एक सामाजिक संघटनेमार्फत समाजकार्य सुरु ठेवलं होतं. काश्मीर मधला नुकताच सुरू झालेला हिंसाचार पंडितांना लक्ष्य करणारा आहे हे लवकरच स्पष्ट झालेलं होतं. या हिंसाचारा विरोधात त्या संघटनेने थेट अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना जाब विचारण्याचं धाडस केलं होतं. आणि हेच धाडस श्री अशोक कुमार यांच्या हत्येला कारणीभूत ठरलं. संघटनेच्या या कृत्याचा बदला इस्लामी अतिरेक्यांनी श्री अशोक कुमार यांना संपवून घेण्याचं ठरवलं.
त्या वेळी साधारण तिशीत असणारे श्री अशोक कुमार एके दिवशी नेहमीप्रमाणे बाजारहाट करायला बाहेर पडले. त्यांची खरेदी सुरू असतानाच त्यांना एका मुस्लीम टोळक्याने त्यांना घेरलं. काय होतंय हे लक्षात यायच्या आत त्यांनी अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळ्या घातल्या. भयंकर वेदनांनी कळवळत ते खाली कोसळले. आजूबाजूचे सगळे दुकानदार आपल्या ओळखीचेच आहेत, ते आपल्या मदतीला येतील, त्या अतिरेक्यांना रोखतील अशा भाबड्या आशेने त्यांनी त्या दुकानदारांना व इतर ओळखीच्या लोकांना मदतीसाठी आर्त हाका मारायला सुरवात केली. पण आत्तापर्यंत आपण आपल्या समस्या ज्या भल्या माणसाकडे घेऊन जात होतो, ज्या माणसाबरोबर आपलं रोज संवाद व्हायचा, त्या माणसाला मारू नका अशी साधी विनंती करण्याचंही सौजन्य तिथल्या एकाही मुस्लीम व्यापार्याने दाखवलं नाही. कारण हे अतिरेकी म्हणजे इस्लामसाठी लढणारे धर्मयोद्धे असल्याने त्यांनी अशोक कुमार यांचा जीव घेण्याचा पूर्ण अधिकार होता अशी त्या दुकानदारांची ठाम समजूत होती. त्यामुळे जणू काही घडतच नाही आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे व्यवहार सुरु ठेवले.
आपला कुणीच विरोध करत नाही हे पाहून या नराधमांचं नेतृत्व करणार्या बिट्टा कराटे या त्यांच्या म्होरक्याला आता चेव आला. वेदनांनी तडफडत असणार्या अशोक कुमार यांच्या भोवती फेर धरत त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. अशोक कुमार यांच्या तोंडातून वेदनेने येणारा प्रत्येक आवाज हा बिट्टा व त्याच्या साथीदारांचा जल्लोष आणखी वाढवत होता. आता त्यांनी हातांनीच अशोक कुमार काजींचे केस उपटायला आणि त्यांच्या थोबाडीत द्यायला सुरवात केली. मग एकाएकी संतापाने ते सगळे त्यांच्या तोंडावर थुंकले. आता त्यांच्यापैकी एकाला आणखी एक घाणेरडं कृत्य करावसं वाटलं. त्याने त्याच्या विजारीची चेन काढली आणि आपलं लिंग अशोक कुमार यांच्या समोर नाचवत त्यांच्यावर तो मुतला. हा प्रकार बराच वेळ चालला होता. एव्हाना अशोक कुमार यांच्या वेदनांनी कळस गाठला होता. आता कदाचित परमेश्वरालाच त्यांची दया आली असावी. अचानक दुरून पोलीसांच्या जीपचा सायरन ऐकून आला. आता मात्र तिथून काढता पाय घ्यावा लागेल हे बिट्टा व त्याच्या साथीदारांच्या लक्षात आलं. त्यांनी अशोक कुमार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांना त्या वेदनांपासून कायमची मुक्ती दिली, व विजेत्यांच्या थाटात आणखी जोरात जल्लोष करत आसपासच्या चिरपरिचित भागातून पलायन केलं.
श्री अशोक कुमार यांची चूक काय? ते काश्मीरी पंडित होते. म्हणजेच ते हिंदू होते. त्यांना नुसतं ठार मारण्यात आलं नाही. त्यांना मुक्ती देण्याआधी इस्लामी अतिरेक्यांनी त्यांच्या वेदनांचा आनंद घेत त्यांचा होईल तितका अपमान करायची एकही संधी सोडली नाही. कारण त्यांना नुसतीच हत्या करुन पळून जाण्यात स्वारस्य नव्हतं, तर त्यांना अशोक कुमार काजींच्या वेदनांनी तळमळणार्या हाका काश्मीर खोर्यातल्या सगळ्या हिंदूंना ऐकवत दहशत निर्माण करायची होती. त्यांना हिंदूंना तुम्ही आता पळून गेला नाहीत तर तुमची ही हीच अवस्था होईल हा ठाम संदेश द्यायचा होता. आणि त्यात ते यशस्वी ठरले.
पोलीस येऊन चौकशी करुन पंचनामा होईपर्यंत श्री अशोक कुमार यांचा मृतदेह तिथेच रक्ताळलेल्या बर्फात अनेक तास पडून होता. काश्मीरच्या तथाकथित आझादीच्या जिहादमधे आणखी एक हिंदू बळी गेला होता. काश्मीरमधल्या इस्लामी दहशतवादाचा एक बळी. श्री अशोक कुमार काजी.
आता मला सांगा, यांच्यापेक्षा जनावरं कित्येक पटींनी बरी, नाही का? कारण मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत.
पुढची गोष्ट लवकरच.
--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. १०, शके १९३८
१४ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------
हृदयाला भेदणारे वर्णन.
ReplyDelete