Tuesday, July 28, 2015

डॅा ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

निआषाढ शु१२शके १९३७
© Mandar D. Josh
i

2 comments: