Thursday, October 6, 2022

बॉयकॉट बॉलीवूड आणि युद्धभूमीची निवड

#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्‍या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.

आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.

हा गुगली कसा?


पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.


आता दुसर्‍या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.

अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्‍या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्‍या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्‍या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.

कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.

Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.

पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.

उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.

थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही. 
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा.

प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.

© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४

Wednesday, September 14, 2022

खर्रा इतिहास: किस्सा ए तालीम

शहजादा असताना औरंगजेब साहेबांना लहानपणापासून शिक्षणात फार रस नव्हता. व्होकेशनल कोर्सेस करण्याकडे त्यांचा अधिक कल असे. मग कुठल्यातरी वर्गात शिवणकामाचा तास सुरु असेल तिथे जाऊन टोप्या वीण, कुठे रफू कर, साडी फेड्....आपलं सॉरी...साडीला फॉल पिको कर, असे उद्योग चालत. मग ते तलवारबाजी शिकले. एकाच घरातल्या सगळ्याच भावांनी मुलुखगिरी करुन कशी चालेल म्हणून ते आपला भाऊ दाराला "दारा, शाळेत शिको" "दारा शिको" असे सतत म्हणत असत. त्यावरुनच भावाचे नाव पुढे दारा शिकोह पडले. पण हा इतिहास विकेंड इतिहासकार तुम्हाला सांगणार नाहीत.



#किस्सा_ए_तालीम
मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनुद्दीन खान फोदरी
पान २६, ओळ ४

#म्हैत_नसलेला_औरंग्या #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी




Tuesday, September 13, 2022

वाहवत जाण्याआधी - २: केरळ मॉडेलचे अनाठायी कौतुक

तर मेहेरबान, कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

 आज फेसबुकवर एक गंमत वाचली. त्या <पोस्टचा गोषवारा तपशील न गाळता आधी देतो>

देशांत सगळीकडे झाले तसे कैनाकारी, जि. अलाप्पुळा, केरळ येथेही लॉकडाऊनमुळे अकरावीचे बोर्डाचे पेपर रद्द करावे लागले (कैनाकारी म्हणजे छोटं बेटंच असल्याने कुठेही जायला फेरीबोटी व्यतिरिक्त पर्याय नाही.). नंतर पेपरच्या नव्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा लक्षात आलं की लॉकडाऊनमुळे शाळेत तिथे राहणारी सतरा वर्ष वयाची सॅन्ड्रा बाबू ही मुलगी परीक्षा देऊ शकणार नाही. तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर. त्यांनी 'स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट'ला विनंती केली, आणि शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी केरळ स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनं बंदी असताना पण अलप्पुळाच्या MN ब्लॉक ते कोट्टायमच्या कांजीराम पर्यंत (जवळजवळ ३० किमी) एका मुलीच्या परीक्षेसाठी चक्क ७० जणांची फेरी बोट सर्व कर्मचार्‍यांसह चालवली. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता पेपर संपेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची, आणि तिला परत घेऊन यायची. जाण्या-येण्याचं तिकीट ₹१८. परतीची फेरी करायला चार हजार खर्च येतो. पण केरळ सरकारनं एका मुलीसाठी हा खर्च सोसला. दुसरीकडं महाराष्ट्रात १० लाख मुलांच्या परीक्षा रद्द केल्यात. म्हणूनच केरळची साक्षरता भारतात सगळ्यात जास्त आहे. कोरोना त्यांनाही होता, अडचणी त्यांनाही होत्या. पण मार्ग काढता येणं गरजेचं असतं.

जपानमध्ये एक मुलगी एका स्टेशनवरून रेल्वेनं शाळेत ये-जा करत होती. जपान सरकारनं त्या मुलीसाठी ते स्टेशन तीन वर्षं सुरू ठेवलं होतं...

देश असे घडत असतात.

केरळ मध्ये सॅन्ड्रा ला शाळेपर्यंत नेण्यात ज्या कोणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता, त्या सगळ्यांना प्रणाम... 


<पोस्टचा गोषवारा संपला.>

देशातलं उदाहरण देऊन भागलं नाही म्हणून पोस्टमधे जपानला घुसवलंय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे, मग एका मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय जपान करु शकलं नसतं का? का अशा शेंड्या लावायला जातात कय माहित. असो, पण आपण फॉरेनपेक्षा केरळच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करु.

विल स्मिथने क्रिस रॉकला मारलेली झापड 'बायकोच्या सन्मानार्थ' होती या भाकडकथेवर ज्यांचा विश्वास बसतो त्यांचा या भावनिक गोष्टींनी भारावून जाऊन व्यावहारिक कंगोर्‍यांकडे दुर्लक्ष होणार यात शंका नाही. पण त्यापलीकडे जाऊन माझ्या काही शंका व मुद्दे आहेत त्या मांडतो. 

(१) एवढा हजारोंचा खर्च करण्यापेक्षा त्या मुलीची परीक्षेच्या कालावधीसाठी परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करता आली असती ना? सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ओळखीने (कोण रे तो दहशत म्हणतोय? लब्बाड!) कुठेही सुरक्षित जागी स्वस्तात, खरं तर फुकटातही, रहायची सोय झाली असती. 

तर, अशा प्रकारे सोय झाली असती तर सरकारचा, म्हणजे पर्यायाने करदात्यांचा खर्च पण कमी झाला असता आणि आणि जाण्यायेण्याचा वेळही वाचला असता. तोच वेळ तिला अभ्यासाला मिळाला असता आणि परीक्षा केंद्र जवळच असल्यामुळे कोरोनाकाळात रोज बोटीने जाण्यायेण्याचा ताण तिला सोसावा लागला नसता. तिची परीक्षा ताणविरहित पार पडली असती.

(१) (अ) खरं म्हणजे चर्चनेच आपल्या लेकराची परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करुन द्यायला हवी होती. पण त्यांची भूमिका फक्त  धर्ममत परिवर्तन करण्यापुरती असावी, बाकी 'सारी प्रभूची लेकरे' वगैरे वचने नंतर विसरायची असतात असं त्यांना वाटतं का? शंका घ्यायला जागा आहे.

(२) सकाळी अकरा वाजल्या पासून दुपारी पेपर संपेपर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची कारण बाकी फेर्‍या मारायला परवानगीच नव्हती. मग थांबून राहिली यात कौतुक कसलं?

(३) रिकामी बोट असली तरी तिकीट काढायला कंडक्टर लागतोच, तसेच निघताना आणि पोहोचताना जी काळजी घ्यावी लागते आणि कामे करावी लागतात ती करायला आणि चालकाला सहाय्य करायला माणसे लागतातच. मग संपूर्ण क्रू होता यात आश्चर्य काय?

यातल्या मुद्दा क्रमांक एक अ सकट दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्यांकडे "असेल काही कारण" म्हणून दुर्लक्ष केलं तरी पहिला मुद्दा उरतोच. पण... पण... पण...

  • तशी सोय केली असती तर "बघा बघा आम्ही एका मुलीच्या परीक्षेसाठी किती खर्च सोसला!" आणि "बोट कशी थांबून राहिली" हे रोमँटिसाईझेशन कसं करता आलं असतं? (माणसाने किती narcissistic असावं याला काही मर्यादा?)
  • तशी सोय केली असती तर करदात्यांच्या पैशाने प्रसिद्धी कशी करता आली असती? (कुणाला रे केजरीवालची आठवण झाली? लब्बाड!)
  • बाकी ठिकाणी परीक्षा रद्द केली आणि केरळच्या कम्युनिस्ट सरकारने एका मुलीसाठी बोट चालवली असा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना असं संधीसाधू शरसंधान कसं करता आलं असतं?

तेव्हा, खर्च टाळता येणे सहज शक्य असताना मुद्दाम भरमसाठ खर्चं करुन वर "शिक्षणाला आम्ही कित्ती कित्ती महत्त्व देतो" म्हणून केरळची साक्षरता भारतात जास्त आहे ही मखलाशी करण्यात काय अर्थ आहे? (बरं, ती मुलगी आधीच साक्षर होती हं. साक्षर असण्यासाठी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं हे अजब तर्कट आहे).

यावरुन एक आठवण झाली. जॉर्ज फर्नांडीस यांनी संरक्षणमंत्री असताना कुणालाही बंगल्यात प्रवेश करण्यास धाक वाटू नये म्हणून बंगल्याचे गेट पाडून टाकले होते म्हणेपण एक पाटी लावून कायम गेट उघडून ठेवलं असतं तरी चाललं असतं, आहे ते पाडून आर्थिक नुकसान करणं हे समाजवादी आणि डावेच जाणोत.

कारे भुललासी वरलिया अंगा? दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. तृतिया, शके १९४४

Sunday, September 4, 2022

धर्मः लवचिकता आणि सोय

खूप पूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. लिहायला कारण असं झालं की सणवार सुरु होण्याआधीच आणि सुरु असताना कर्मकांडांच्या अनुषंगाने अनेक नकारात्मक पोस्ट दृष्टोत्पत्तीस पडल्या. त्या लिखाणाचा साधारण सूर असा की 'मी अमुक व्रतवैकल्ये आणि/किंवा उपास करत नाही, त्यातलं अमुक करत नाही, तमुक करणार नाही, इत्यादी.  त्यावर मी काय लिहीलं होतं ते या लेखनाच्या शेवटी पाहूया.

या गणेशोत्सवाच्या दरम्यानही असं काही लिखाण दिसलं ते वाचून लिहिल्यावाचून राहावलं नाही. अर्थात कुणी काय केलं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे पण सार्वजनिक पटलावर अशा गोष्टींचं समर्थन दिसलं तर त्यावर भाष्य करणे अपरिहार्य आहे. तसेच, या लेखनातून व्यक्तीवर नव्हे तर प्रवृत्तीवर टीका आहे, किंबहुना टीका करण्याचा नव्हे तर प्रबोधन हाच हेतू आहे. त्यामुळे राग मानू नये. समाजमाध्यमांवर लिहीणार्‍या सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तींनी, आपल्या लिखाणात व्यक्त केलेल्या विचारांना वाचक सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर अशा लोकांना स्खलनशील वर्तनाला प्रवृत्त न करता धर्मपालनाकडे कसे नेता येईल हे बघितले पाहीजे. मार्ग कठीण आहे, पण दुर्दैवाने लोक वाचून लगेच मान हलवतील असं लिखाण करण्याकडे अनेकांचा कल होत चालला आहे असं दिसल्याने हे लिहीणे भाग आहे. 

K N Krishna Bhat

धर्माची अनेक अंगे असतात, त्यातच कर्मकांड हे एक अंग आहे. धर्माचा र्‍हास घडवून आणायचा झाला की त्यातली अशी अंगे निवडून स्खलनशील मनुष्यस्वभावाला भावेल अशा प्रकारे ती कशी गरजेची नाहीत हे दाखवायचं आणि त्या शब्दांना अपमानकारक पद्धतीने सातत्याने वापरून ते शब्द ऐकताच सामान्यजनांच्या मनात आपल्याच धार्मिक बाबींबाबत चीड उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण करायची ही डावे आणि हिंदूद्वेष्ट्यांची जुनी कार्यपद्धती आहे. असेच दोन शब्द म्हणजे सनातनी आणि कर्मकांडं हे होत. सनातनी म्हणजे धर्माचे काटेकोर पालन करणारा अथवा  करण्याकडे कल असलेला तसेच कर्मकांड म्हणजे आपल्या धार्मिकतेचे ऐहिक प्रकटीकरण किंवा परमेश्वराशी जोडले जाण्याचा एक मार्ग होय.   

आपला धर्म लवचिक आहे. कर्मकांडांच्या संदर्भात याचा अर्थ असा की एखादी प्रथा, परंपरा, नेम आपण पाळत असू आणि एखाद्या वेळी जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ती प्रथा, परंपरा, नेम पाळणे अशक्य असेल तर त्याने आपल्याला दोष लागत नाही किंवा इतरही काही बिघडत नाही. तिथे ताठरपणा दाखवण्यात अर्थ नसतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. 

मात्र कर्मकांड ज्याला जमतं त्यानेच करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. आपल्या सोयीने खंड पाडला तरी देव समजून घेईल, भाव हवा, या सगळ्या आपल्या मनाच्या धारणा आहेत, खेळ आहेत, बाकी काही नाही, कारण ते आपल्या सोयीचं आहे. प्रत्यक्षात मात्र नियम म्हणजे नियम असतो. सगुण उपासना आणि कर्मकांड हे हातात हात घालून जाणारे विषय आहेत. ज्यांना कर्मकांडातला कर्मठपणा झेपत नाही, त्यांनी तो करू नये, इतकी साधी गोष्ट आहे. पण आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी अर्धवट करून, मध्येच खंडित करून, त्याचं लंगडं समर्थन करू नये, तेव्हा सामान्य विचारी व्यक्तीने इतका शहाणपणा तरी दाखवायला हरकत नसावी.

उदाहरणार्थ, गणपती बसवणे हे आजीवन करायचे व्रत आहे. मनात आलं तेव्हा फिरायला गेलो आणि मनात आलं तेव्हा बसवला, असं करायला तो काही करमणुकीचं साधन नाही. जेव्हा संस्कृती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, तेव्हा जे लोक ते आजीवन करतात, पाळतात, त्यांच्याकडून ते कार्य होतं. नाहीतर नाही केलं तरी चालतंय, असे म्हणणारे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे काळाच्या ओघात अनेक गोष्टी हरवून गेल्या आहेत. धर्माच्या लवचिकतेचा अर्थ ज्याला जेवढे झेपेल तेवढेच करावे. गणपती अखंडित बसवता येणार नसेल तर त्या मार्गाला जाऊच नये, एवढी साधी गोष्ट आहे. मग नित्यपूजा तुम्हाला जशी आणि जेवढी आणि जेव्हा करायची आहे, त्यात तुम्हाला मुभा आहेच की. पण सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या मनाप्रमाणे आणि सोईप्रमाणे करायला हे काही सहलीचे नियोजन नाही. काही लोक सुरवातीला उत्साहाने दहा दिवस बसवतात, मग झेपत नाहीसे झाल्यावर सात दिवस, पाच दिवस करता करता दीड दिवसावर येतात, मग न बसवण्यासाठी आज काय फिरायला गेलो, उद्या काय महत्त्वाची व्यावसायिक मिटींग होती, अशी काहीही हास्यास्पद कारणे चालतात. ज्यांच्याकडे ठराविक धार्मिक कार्ये ठराविक दिवशी होतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की सणासुदीचे दिवस म्हणजे फिरायला जाण्याचे दिवस, पार्टी करण्याचे दिवस, सिनेमे बघण्याचे दिवस, खेळायला जाण्याचे दिवस ही अत्यंत घातक कल्पना आहे. आपल्याच पिढीने अशी गैरवर्तणूक केली तर पुढच्या पिढीला पूजा करणे, गणपती बसवणे किंवा इतरही काही नियम पाळणे, म्हणजे अनावश्यकच वाटणार यात शंकाच नाही. 

आपल्या योजनांत व्यत्यय यायला सणवार हे काही अचानक येत नाहीत, त्यांचे दिवस ठरलेले असतात. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला पुढील कित्येक वर्षांच्या सणावारांच्या तारखा कळू शकतात. अशा वेळी काही ठरवून करायची असलेली कामं तारखा पाहून करता येतात. नियम पाळणे, व्रतपालन करणे यांना दुराग्रह, ताठरपणा असली स्वतःच्या मनाला शांती देणारी नावं दिली म्हणून आपली चूक झाकली जात नाही. कुठल्याही परिस्थितीत नियम पाळणे याला दुराग्रह म्हणत नाहीत, निश्चय आणि व्रताचरण म्हणतात. व्रत ज्याला जमते त्यानेच करावे, बाकीच्यांनी या भानगडीत पडून परंपरा कमकुवत करण्याचे आणि बिघडवण्याचे काम करू नये. आणि केले तर हे काय चालतं, ते काय चालतं, अशा पद्धतीचे लंगडे स्पष्टीकरण तर मुळीच देऊ नये. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा अचानक आलेल्या अडचणीमुळे खंडित झाल्या तर इलाज नसतो. आजारपण, जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतात. घरी पण पूर्वनियोजन करतांना त्या अनुषंगाने करणं अपेक्षित असतं. देव रागवत नाही, शिक्षा करत नाही हे खरंच आहे. पण आपण केलेले, घालून घेतलेले नियम आपणच काटेकोर पाळणं हितकर. त्यामुळे आज काय फिरायला गेलो, उद्या काय ऑफिसची पार्टी होती, तेरवा आणखी काही, अशा सबबी लंगड्याच असतात.

धर्मात आध्यात्मिक प्रगती सर्वतोपरी आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे समजून घ्यावं की 'आपण नेम/कर्मकांड भाव म्हणून पाळावीत सोय म्हणून नव्हे' ही गोष्ट लक्षात येणे हा आध्यात्मिक प्रगतीचाच अविभाज्य भाग असतो. आपल्या सोयीने धर्मकार्य करायची आणि सोयीने खंडित करायची यात आपण आपल्याच नैतिक अधःपतनाला हातभार लावत असतो. मग कसली आध्यात्मिक प्रगती घेऊन बसलात?

आपण अमुक अमुक करत नाही किंवा अमक्या कार्यात क्षुल्लक कारणाने खंड पडला याचं समर्थन करायला समाजमाध्यमांवर कुणाला मोठमोठे लेख लिहावे लागत असतील तर त्याचे दोनपैकी एक अर्थ होऊ शकतो. एक तर आपण जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी असलो तरी त्याचवेळी किती लिबरल आहोत हे सांगायला सवंग लोकप्रियतेचा आधार घ्यायचा असतो..... किंवा जे असं करतात त्यांचं मन त्यांना खात असतं पण आपण केलं ते कसं बरोबर हे सांगून आणि लोकांची मान्यता मिळवून आपली अपराधीपणाची भावना शमवण्याचा तो प्रयत्न असतो. मन खात राहणं हे काही केवळ अपराध भावनेने होत नाही. आपल्या हातून राहिलं याची हूरहूर, रुखरुख असतेच आणि ते अतिशय साहजिक असतं. अपराधीपणा म्हणा किंवा रुखरुख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, समाजमाध्यमांवर लोकांचं समर्थन मिळवण्याने जो बूंद से गयी वो लाईक और बदाम से परत नहीं आती.

मी व्रतवैकल्ये व उपास यांच्यासंदर्भात आधी लिहीलं होतं, तेच सर्व कर्मकांडांच्या बाबतीत लागू आहे की ज्यांना करायचे आहेत त्यांनी करावं, ज्यांना करायचं नाहीत त्यांनी ते करू नयेत. पण 'अमुक अमुक केलं नाही किंवा करत नाही' हे लोकांना दाखवायला लहान ते लघुनिबंधाइतकी लांबी असलेले लेख का लिहिता? आज आपण धर्मपालनाच्या बाबतीत तरुण पिढीला नावे ठेवतो, पण तरीही अनेक तरूण तरुणी प्रथा, परंपरा पाळायला उत्सुक आहेत; एखादा केलेला नेम पाळला की त्यांना आनंद देऊन जातो. त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काही लिहीता येत नसेल तर नकारात्मक तरी लिहू नका. अशा नकारात्मक लेखबाजीने ज्यांना करायची इच्छा आहे त्यांची उत्सुकता व इच्छा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मारत आहात.

सार हे की परंपरा पाळतांना 'आपल्या सोयीला' प्राधान्य नसावं. ती खंडित करण्यासाठी तसंच प्रबळ आणि अपरिहार्य असं कारण असलं पाहिजे, इतकंच. करायचं नसेल, करु नका. केलंत तर निष्ठेने करा. आणि खंडित केलंतच तर त्याचं केविलवाणे जाहीर समर्थन करू नका.

एक मित्र म्हणतो: With Hindus, it seems the pattern is always towards 'reforming' the religion to suit one's own cravings and convenience, rather than reforming oneself, by using the disciplines of the religion. And I suppose such lack of discipline and commitment, is presented as being "Spiritual but not religious" or "Progressive Scientific temper" etc. Well I can't say I am disciplined either. But I totally own up, I am just lazy, indolent etc., I will try to do better, but will never need the religion to be 'reformed', to fit my fecklessness.

हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे वाक्य अनेकदा पळवाटेसारखं वापरलं जातं, कारण धर्मपालन करायचं नसेल तिथे इतर मुद्द्यांच्या अभावी हे एक लक्षवेधक आणि दुर्दैवाने टाळ्या मिळवणारं वाक्य झालं आहे. जिथे धार्मिक बाबींच्या अनुषंगाने हिंदूंमधे नेहमी स्वतःच्या लालसापूर्ती आणि सोयिस्कर वर्तनाला पूरक असं समर्थन धर्मातून मिळवता आलं नाही की धर्मातच त्या अनुसार "सुधारणा घडवून आणणे" याकडे कल दिसतो. आणि मग याच बेशिस्त आणि लेच्यापेच्या वागण्याचे प्रकटीकरण्गं "आध्यात्मिक, पण धार्मिक नव्हे" आणि "प्रगतीशील वैज्ञानिक दृष्टिकोन" वगैरे शब्दांत केले जाते. गंमत म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर आत्मिक प्रगती घडवून आणाल, काहीतरी बिघडलेली वस्तू असल्यासारखं धर्माला सोयीस्करपणे वाकवून घेणार नाही. कर्मकांडांना कालसुसंगत करण्याच्या नादात आपण काळाबरोबर वाहवत जात नाही ना हे आपल्याच मनाला वारंवार विचारणे योग्य ठरेल.

मी ही माणूसच आहे, माझ्याकडून चुका होत असतील तर त्या सुधारण्याकडे माझा कल असला पाहीजे. प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील, पण माझ्यातले दोष सुधारण्याऐवजी त्यांना पूरक असं धर्माला मी कधीही वाकवणार नाही.

तेव्हा जे करायचं ते निश्चयावर दृढ राहून करावं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे 'उपासनेला दृढ चालवावे'. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ४, शके १९४४

आभार: परिज्ञा भीमाशंकर पुरी, सौ. राधा मराठे

तळटीपः माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. आपण घसरतो म्हणजे काय, आपली लिमिट काय यावर विवेचन करणारा एक जुना लेख आहे तो अवश्य वाचावा. 

Sunday, August 14, 2022

हे मातृभू

बरेच दिवस हे रूपांतर करायचं मनात होतं पण अनेकांच्या स्टोरीमध्ये राझी चित्रपटातील "ए वतन, मेरे वतन" हे गाणं ऐकून अचानक स्फुरलं आणि लिहून टाकलं. ते गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी त्याचा चित्रपटातला संदर्भ आठवून आपल्या स्वातंत्र्यदिनी ते वाजावं हे कुठेतरी खटकत होतं. चित्रपटात पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शाळेत बसवलेल्या मुलांच्या गाण्याचा उपयोग आपला स्वातंत्र्यदिन साजरा करताना होऊ नये असं वाटतं. असंही उर्दू हा प्रकार डोक्यात जातो माझ्या. तर, नमनाला घडाभर तेल झाल्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रस्तुत आहे या गाण्याचे संस्कृतप्रचुर मराठी रूपांतर. 

मूळ गाण्याच्या चालीवर मनातल्या मनात म्हणून पहा. आवाज चांगला असलेल्या कुणी हे गायचं मनावर घेतलं तरी त्यासाठी अनुमतीची आवश्यकता नाही, लेखनश्रेय दिले तरी पुरेसे आहे. 

हे मातृभू

हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू, मम मातृभू

तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला

विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू 

रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जरी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू 

सुजलाम रहा तू, सुफलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू

हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू














© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. ३, शके १९४४

Sunday, August 7, 2022

पुस्तक परिचय – स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी

एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.

साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!


टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला.  मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.

सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.

किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.

हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.

हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४