खूप पूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. लिहायला कारण असं झालं की सणवार सुरु होण्याआधीच आणि सुरु असताना कर्मकांडांच्या अनुषंगाने अनेक नकारात्मक पोस्ट दृष्टोत्पत्तीस पडल्या. त्या लिखाणाचा साधारण सूर असा की 'मी अमुक व्रतवैकल्ये आणि/किंवा उपास करत नाही, त्यातलं अमुक करत नाही, तमुक करणार नाही, इत्यादी. त्यावर मी काय लिहीलं होतं ते या लेखनाच्या शेवटी पाहूया.
या गणेशोत्सवाच्या दरम्यानही असं काही लिखाण दिसलं ते वाचून लिहिल्यावाचून राहावलं नाही. अर्थात कुणी काय केलं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे पण सार्वजनिक पटलावर अशा गोष्टींचं समर्थन दिसलं तर त्यावर भाष्य करणे अपरिहार्य आहे. तसेच, या लेखनातून व्यक्तीवर नव्हे तर प्रवृत्तीवर टीका आहे, किंबहुना टीका करण्याचा नव्हे तर प्रबोधन हाच हेतू आहे. त्यामुळे राग मानू नये. समाजमाध्यमांवर लिहीणार्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तींनी, आपल्या लिखाणात व्यक्त केलेल्या विचारांना वाचक सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर अशा लोकांना स्खलनशील वर्तनाला प्रवृत्त न करता धर्मपालनाकडे कसे नेता येईल हे बघितले पाहीजे. मार्ग कठीण आहे, पण दुर्दैवाने लोक वाचून लगेच मान हलवतील असं लिखाण करण्याकडे अनेकांचा कल होत चालला आहे असं दिसल्याने हे लिहीणे भाग आहे.
धर्माची अनेक अंगे असतात, त्यातच कर्मकांड हे एक अंग आहे. धर्माचा र्हास घडवून आणायचा झाला की त्यातली अशी अंगे निवडून स्खलनशील मनुष्यस्वभावाला भावेल अशा प्रकारे ती कशी गरजेची नाहीत हे दाखवायचं आणि त्या शब्दांना अपमानकारक पद्धतीने सातत्याने वापरून ते शब्द ऐकताच सामान्यजनांच्या मनात आपल्याच धार्मिक बाबींबाबत चीड उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण करायची ही डावे आणि हिंदूद्वेष्ट्यांची जुनी कार्यपद्धती आहे. असेच दोन शब्द म्हणजे सनातनी आणि कर्मकांडं हे होत. सनातनी म्हणजे धर्माचे काटेकोर पालन करणारा अथवा करण्याकडे कल असलेला तसेच कर्मकांड म्हणजे आपल्या धार्मिकतेचे ऐहिक प्रकटीकरण किंवा परमेश्वराशी जोडले जाण्याचा एक मार्ग होय.
आपला धर्म लवचिक आहे. कर्मकांडांच्या संदर्भात याचा अर्थ असा की एखादी प्रथा, परंपरा, नेम आपण पाळत असू आणि एखाद्या वेळी जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ती प्रथा, परंपरा, नेम पाळणे अशक्य असेल तर त्याने आपल्याला दोष लागत नाही किंवा इतरही काही बिघडत नाही. तिथे ताठरपणा दाखवण्यात अर्थ नसतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते.
मात्र कर्मकांड ज्याला जमतं त्यानेच करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. आपल्या सोयीने खंड पाडला तरी देव समजून घेईल, भाव हवा, या सगळ्या आपल्या मनाच्या धारणा आहेत, खेळ आहेत, बाकी काही नाही, कारण ते आपल्या सोयीचं आहे. प्रत्यक्षात मात्र नियम म्हणजे नियम असतो. सगुण उपासना आणि कर्मकांड हे हातात हात घालून जाणारे विषय आहेत. ज्यांना कर्मकांडातला कर्मठपणा झेपत नाही, त्यांनी तो करू नये, इतकी साधी गोष्ट आहे. पण आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी अर्धवट करून, मध्येच खंडित करून, त्याचं लंगडं समर्थन करू नये, तेव्हा सामान्य विचारी व्यक्तीने इतका शहाणपणा तरी दाखवायला हरकत नसावी.
उदाहरणार्थ, गणपती बसवणे हे आजीवन करायचे व्रत आहे. मनात आलं तेव्हा फिरायला गेलो आणि मनात आलं तेव्हा बसवला, असं करायला तो काही करमणुकीचं साधन नाही. जेव्हा संस्कृती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, तेव्हा जे लोक ते आजीवन करतात, पाळतात, त्यांच्याकडून ते कार्य होतं. नाहीतर नाही केलं तरी चालतंय, असे म्हणणारे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे काळाच्या ओघात अनेक गोष्टी हरवून गेल्या आहेत. धर्माच्या लवचिकतेचा अर्थ ज्याला जेवढे झेपेल तेवढेच करावे. गणपती अखंडित बसवता येणार नसेल तर त्या मार्गाला जाऊच नये, एवढी साधी गोष्ट आहे. मग नित्यपूजा तुम्हाला जशी आणि जेवढी आणि जेव्हा करायची आहे, त्यात तुम्हाला मुभा आहेच की. पण सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या मनाप्रमाणे आणि सोईप्रमाणे करायला हे काही सहलीचे नियोजन नाही. काही लोक सुरवातीला उत्साहाने दहा दिवस बसवतात, मग झेपत नाहीसे झाल्यावर सात दिवस, पाच दिवस करता करता दीड दिवसावर येतात, मग न बसवण्यासाठी आज काय फिरायला गेलो, उद्या काय महत्त्वाची व्यावसायिक मिटींग होती, अशी काहीही हास्यास्पद कारणे चालतात. ज्यांच्याकडे ठराविक धार्मिक कार्ये ठराविक दिवशी होतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की सणासुदीचे दिवस म्हणजे फिरायला जाण्याचे दिवस, पार्टी करण्याचे दिवस, सिनेमे बघण्याचे दिवस, खेळायला जाण्याचे दिवस ही अत्यंत घातक कल्पना आहे. आपल्याच पिढीने अशी गैरवर्तणूक केली तर पुढच्या पिढीला पूजा करणे, गणपती बसवणे किंवा इतरही काही नियम पाळणे, म्हणजे अनावश्यकच वाटणार यात शंकाच नाही.
आपल्या योजनांत व्यत्यय यायला सणवार हे काही अचानक येत नाहीत, त्यांचे दिवस ठरलेले असतात. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला पुढील कित्येक वर्षांच्या सणावारांच्या तारखा कळू शकतात. अशा वेळी काही ठरवून करायची असलेली कामं तारखा पाहून करता येतात. नियम पाळणे, व्रतपालन करणे यांना दुराग्रह, ताठरपणा असली स्वतःच्या मनाला शांती देणारी नावं दिली म्हणून आपली चूक झाकली जात नाही. कुठल्याही परिस्थितीत नियम पाळणे याला दुराग्रह म्हणत नाहीत, निश्चय आणि व्रताचरण म्हणतात. व्रत ज्याला जमते त्यानेच करावे, बाकीच्यांनी या भानगडीत पडून परंपरा कमकुवत करण्याचे आणि बिघडवण्याचे काम करू नये. आणि केले तर हे काय चालतं, ते काय चालतं, अशा पद्धतीचे लंगडे स्पष्टीकरण तर मुळीच देऊ नये. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा अचानक आलेल्या अडचणीमुळे खंडित झाल्या तर इलाज नसतो. आजारपण, जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतात. घरी पण पूर्वनियोजन करतांना त्या अनुषंगाने करणं अपेक्षित असतं. देव रागवत नाही, शिक्षा करत नाही हे खरंच आहे. पण आपण केलेले, घालून घेतलेले नियम आपणच काटेकोर पाळणं हितकर. त्यामुळे आज काय फिरायला गेलो, उद्या काय ऑफिसची पार्टी होती, तेरवा आणखी काही, अशा सबबी लंगड्याच असतात.
धर्मात आध्यात्मिक प्रगती सर्वतोपरी आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे समजून घ्यावं की 'आपण नेम/कर्मकांड भाव म्हणून पाळावीत सोय म्हणून नव्हे' ही गोष्ट लक्षात येणे हा आध्यात्मिक प्रगतीचाच अविभाज्य भाग असतो. आपल्या सोयीने धर्मकार्य करायची आणि सोयीने खंडित करायची यात आपण आपल्याच नैतिक अधःपतनाला हातभार लावत असतो. मग कसली आध्यात्मिक प्रगती घेऊन बसलात?
आपण अमुक अमुक करत नाही किंवा अमक्या कार्यात क्षुल्लक कारणाने खंड पडला याचं समर्थन करायला समाजमाध्यमांवर कुणाला मोठमोठे लेख लिहावे लागत असतील तर त्याचे दोनपैकी एक अर्थ होऊ शकतो. एक तर आपण जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी असलो तरी त्याचवेळी किती लिबरल आहोत हे सांगायला सवंग लोकप्रियतेचा आधार घ्यायचा असतो..... किंवा जे असं करतात त्यांचं मन त्यांना खात असतं पण आपण केलं ते कसं बरोबर हे सांगून आणि लोकांची मान्यता मिळवून आपली अपराधीपणाची भावना शमवण्याचा तो प्रयत्न असतो. मन खात राहणं हे काही केवळ अपराध भावनेने होत नाही. आपल्या हातून राहिलं याची हूरहूर, रुखरुख असतेच आणि ते अतिशय साहजिक असतं. अपराधीपणा म्हणा किंवा रुखरुख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, समाजमाध्यमांवर लोकांचं समर्थन मिळवण्याने जो बूंद से गयी वो लाईक और बदाम से परत नहीं आती.
मी व्रतवैकल्ये व उपास यांच्यासंदर्भात आधी लिहीलं होतं, तेच सर्व कर्मकांडांच्या बाबतीत लागू आहे की ज्यांना करायचे आहेत त्यांनी करावं, ज्यांना करायचं नाहीत त्यांनी ते करू नयेत. पण 'अमुक अमुक केलं नाही किंवा करत नाही' हे लोकांना दाखवायला लहान ते लघुनिबंधाइतकी लांबी असलेले लेख का लिहिता? आज आपण धर्मपालनाच्या बाबतीत तरुण पिढीला नावे ठेवतो, पण तरीही अनेक तरूण तरुणी प्रथा, परंपरा पाळायला उत्सुक आहेत; एखादा केलेला नेम पाळला की त्यांना आनंद देऊन जातो. त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काही लिहीता येत नसेल तर नकारात्मक तरी लिहू नका. अशा नकारात्मक लेखबाजीने ज्यांना करायची इच्छा आहे त्यांची उत्सुकता व इच्छा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मारत आहात.
सार हे की परंपरा पाळतांना 'आपल्या सोयीला' प्राधान्य नसावं. ती खंडित करण्यासाठी तसंच प्रबळ आणि अपरिहार्य असं कारण असलं पाहिजे, इतकंच. करायचं नसेल, करु नका. केलंत तर निष्ठेने करा. आणि खंडित केलंतच तर त्याचं केविलवाणे जाहीर समर्थन करू नका.
एक मित्र म्हणतो: With Hindus, it seems the pattern is always towards 'reforming' the religion to suit one's own cravings and convenience, rather than reforming oneself, by using the disciplines of the religion. And I suppose such lack of discipline and commitment, is presented as being "Spiritual but not religious" or "Progressive Scientific temper" etc. Well I can't say I am disciplined either. But I totally own up, I am just lazy, indolent etc., I will try to do better, but will never need the religion to be 'reformed', to fit my fecklessness.
हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे वाक्य अनेकदा पळवाटेसारखं वापरलं जातं, कारण धर्मपालन करायचं नसेल तिथे इतर मुद्द्यांच्या अभावी हे एक लक्षवेधक आणि दुर्दैवाने टाळ्या मिळवणारं वाक्य झालं आहे. जिथे धार्मिक बाबींच्या अनुषंगाने हिंदूंमधे नेहमी स्वतःच्या लालसापूर्ती आणि सोयिस्कर वर्तनाला पूरक असं समर्थन धर्मातून मिळवता आलं नाही की धर्मातच त्या अनुसार "सुधारणा घडवून आणणे" याकडे कल दिसतो. आणि मग याच बेशिस्त आणि लेच्यापेच्या वागण्याचे प्रकटीकरण्गं "आध्यात्मिक, पण धार्मिक नव्हे" आणि "प्रगतीशील वैज्ञानिक दृष्टिकोन" वगैरे शब्दांत केले जाते. गंमत म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर आत्मिक प्रगती घडवून आणाल, काहीतरी बिघडलेली वस्तू असल्यासारखं धर्माला सोयीस्करपणे वाकवून घेणार नाही. कर्मकांडांना कालसुसंगत करण्याच्या नादात आपण काळाबरोबर वाहवत जात नाही ना हे आपल्याच मनाला वारंवार विचारणे योग्य ठरेल.
मी ही माणूसच आहे, माझ्याकडून चुका होत असतील तर त्या सुधारण्याकडे माझा कल असला पाहीजे. प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील, पण माझ्यातले दोष सुधारण्याऐवजी त्यांना पूरक असं धर्माला मी कधीही वाकवणार नाही.
तेव्हा जे करायचं ते निश्चयावर दृढ राहून करावं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे 'उपासनेला दृढ चालवावे'.
© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ४, शके १९४४
आभार: परिज्ञा भीमाशंकर पुरी, सौ. राधा मराठे
तळटीपः माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. आपण घसरतो म्हणजे काय, आपली लिमिट काय यावर विवेचन करणारा एक जुना लेख आहे तो अवश्य वाचावा.
No comments:
Post a Comment