Friday, September 25, 2020

काही नाही, इ-शाळा चालली आहे!

प्रसंग एकः

"अरे, मल्हारचं नाव घेतल्यावर मल्हारनी बोलायचं, बाकीचे कशाला बोलताय?"

- हे बोलताना शिक्षिकेने प्रचंड संयम ठेवल्याचं आवाजात आणलेल्या सुलोचनाबाईं इतक्या आर्ततेवरुन स्पष्ट कळत होतं. पण मुलं आर्तता वगैरे समजण्याच्या पलिकडे गेलेली असतात. 

मी शिक्षक झालो नाही तेच बरं आहे. "अरे काय वर्ग आहे की मासळी बाजार?" असं खेकसलो असतो. 

प्रसंग दोनः मराठीचा तास.

"बाई मी भूप राग म्हणून दाखवू?" असं अनेकदा ऐकल्यावर... "हं आता समीर भूप राग म्हणून दाखवतोय हं, ऐका रे सगळ्यांनी समीरचं!" असं "आलीया भोगासी" च्या चालीवर ताई म्हणतात.

मग समीर भूप राग म्हणतो. सगळे टाळ्या वाजवतात. मग समीर म्हणतो, "बाई आमचे आठ राग शिकून झालेत." आता बाईंच्या आणि बाकी औरंगजेबांच्या पोटात गोळा येतो. तरी आणखी एक दोन जणं नरडं साफ करुन घेतातच. एक जण पियानो वाजवतो. कार्टं पियानो वाजवत असताना मला, "बाई मी 'चलो इक बार फिर से, अजनबी बन जायें हम दोनो' म्हणू का?" असं विचारण्याची सुरसुरी येते पण मी ती "असं मुलांच्या वर्गात घुसू नये" असं स्वतःला मनातल्या मनात बजावून आवरतो. 

त्यात आवाज ब्रेक होत असतो. तरी सगळं झाल्यावर एक जण मधेच, "बाई मी अमुक वाजवू?" असं विचारतो. नेमका तेव्हा आवाज ब्रेक होत नाही. त्यामुळे शिक्षिका, "वाजव बाबा!" म्हणतात. आता शिक्षिकेच्या आवाजात हताशपणा दिसू लागतो. पुन्हा आवाज ब्रेक व्हायला लागतो त्यामुळे तो नक्की काय वाजवतो आहे कळत नाही. एक जण, "चायला काय चाललंय" असं वैतागून म्हणतो. तेव्हा नेमका आवाज व्यवस्थित येत असल्याने ते सगळ्यांना नीट ऐकू जातं, आणि "कोरोना जाऊदे आणि हा शाळेत येऊदे मग बघतो" असं तो वाजवणारा मनातल्या मनात म्हणतो.  

तेवढ्यात एक जण, "ताई मला साप खूप आवडतात" असं म्हणतो. इ-शाळा असली, तरी बाई बसल्या जागी दचकतात. तरीही "हो का, वा वा, छान छान" असं म्हणतात. तेवढ्यात कुणीतरी, "ए घाणेरड्यांनो" असं म्हटलेलं स्पष्ट ऐकू येतं. 

सुमारे पावणेचार वाजता "बाई मला भूक लागली मी जेवायला जाते" असं गीता नामक एक कन्या विव्हळते. मागून गीताच्या आईचा पार बाहेरच्या खोलीतून आलेला "पय्चक्" असा आवाजही नीट ऐकू येतो. "अरे गीता असं काय ते करायचं" असं म्हणून बाई तिला जाऊ देतात. जाऊ न देऊन सांगतात कुणाला?!

"आता आपण थांबू" बाई म्हणतात.

"बाई मी एक कविता म्हणून दाखवू?" असं महेश नामक एक पिल्लू म्हणतं. आता मात्र ताईंचा संयम संपतो. "आता महेश कविता म्हणतोय मग आपण थांबणार आहोत आज", बाई ठणकावतात. महेश कविता म्हणत असताना मध्येच कुणीतरी "पॅयँsssssssss" अशी सायरन वाजवतो. महेशची कविता म्हणून संपते, आणि ताई पटकन सेशन संपण्याच्या बटणावर क्लिक करतात.

आणि अशा रीतीने "मराठीचा तास" संपतो आणि माझ्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

© मंदार दिलीप जोशी

टीप: शाळा आणि इतर संदर्भ दिलेले नसले तरी नावं बदलली आहेत.

तुम्हीही जेक गार्डनर

जेक Gardner ही व्यक्ती कोण होती? तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं का आवश्यक आहे? 

जेक गार्डनरचा अमेरिकेतील ओमाहामध्ये एक बार होता. मे महिन्यात एकदा त्याच्या बार मध्ये ब्लॅक लाईवज मॅटर (Black Lives Matter) वाले घुसले आणि नासधूस करायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली. 

तो मागच्या खोलीतून बाहेर आला आणि ओरडून सांगितलं की आत्ताच्या आत्ता थांबा आणि चालते व्हा. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातून पिस्तुल काढली आणि हवेत दोन बार उडवले. आता लोकांनी त्याला खाली पाडलं. तो ओरडू लागला की मला सोडा, मला सोडा. आता जीवावर बेतणार असं वाटल्याने त्याने त्याला खाली पाडून दाबणाऱ्या एकावर गोळी झाडली, त्यात तो माणूस मेला.

CCTV मध्ये पूर्ण घटना चलचित्रमुद्रित झाली होती. पब्लिक प्रोसिक्युटरने ते पाहून निर्णय घेतला की जेकने स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली असल्याने केस होऊ शकत नाही.



BLM वाल्यांनी बोंबाबोंब केली आणि एक नवाच प्रोसिक्युटर आणला गेला. त्याने एका न्यायाधीशाकडून जेकच्या अटक वॉरंटवर सही करून घेतली.

जेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.


जेकने कायदेशीर कारवाईत त्याला लोकांकडून पैशाची मदत व्हावी  म्हणून GoFundMe वर खातं  उघडलं होतं, जे BLM वाल्यांनी बंद करायला लावलं. 

तुम्ही तुमचा जीव देऊन सुद्धा डाव्यांचं समाधान करू शकत नाही.

एकदा स्वतःलाच पीडित घोषित करायचं म्हणजे सहानुभूती मिळते, आणि डावे म्हणतात की जे पीडित असतात त्यांना कायदा पाळायची गरज नसते. हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (उदा. गरीब बिचारा भाडेकरू, कुठे जाईल)

डावे म्हणतात तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करायचा अधिकार नाही, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (कारखाना जाळला कामगारांनी, पण शोषक आहे कारखाना मालक!).

आता डावे म्हणू लागलेले आहेत की त्यांच्यातल्या पीडितांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करायचाही अधिकार नाही. 

आणि त्यांच्या मते पीडित कोण आहेत? ज्यांना त्यांनी पीडित असल्याचं सर्टिफिकेट वाटलं आहे ते.

दंगलखोर, अतिरेकी यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी पैसे कुठून येणार? तर तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करांवर डल्ला मारून. पण तुम्हाला कायदेशीर मदत लागली त्यासाठी तुम्ही लोकांकडून दानमार्गाने पैसे गोळा करायचे ठरवलेत तर तुम्हाला ते ही करू दिलं जाणार नाही.

तुम्ही तुमची नैतिकता इतरांना ठरवू दिलीत, तर तर तुमची जीवनकथा एक दिवस तुमचा नरबळी घेऊनच संपेल हे नक्की. 

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे ही व्यवस्था तुम्ही मान्य केलीत, तर 'त्यांना' हवा म्हणून तुमच्याविरुद्ध काय कायदा निर्माण होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 

मागे घरकाम करणार्‍या एका बाईंचा व्हिडीओ फिरत होता, ज्यात तिला तीन पाचशेच्या नोटा म्हणजे पंधराशे हे कळत होतं, पण वर तीनशे म्हणजे एकूण अठराशे हे कळत नव्हतं म्हणे. त्या व्हिडिओत ती सरळ सरळ जास्त पैसे उकळायला बघत होती, आणखी पाचशे असं काहीतरी म्हणत. त्या बाईबद्दल अनेकांना सहानुभूतीचा पुळका आला  होता. तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या बाईंची कटकट बंद व्हावी म्हणून त्या तरुणांनी तिला अठराशे पेक्षा एक रुपयाही जास्त दिला असेल, तर त्यांनी उद्या आपल्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायला तयार रहावं.

कारण वामपंथ हा एक असा साप आहे की ज्याला कितीही दूध पाजलंत तरी तो एक दिवस तुम्हाला डसणारच आहे, गिळणारच आहे. 

If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

आता तुम्हाला जेक गार्डनरचं नाव ठावूक असणं का आवश्यक आहे?

कारण तुम्हीही जेक गार्डनर आहात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ९, शके १९४२


Monday, September 14, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग २: खाजगीकरणाला आक्षेप कुणाचा?

समजा एक प्रवासी व्हॅन ८ जण त्यात बसल्यावर निघणार आहे. या क्षणाला त्यात फक्त ३ जण आहेत. त्यातल्या एकाला खूप घाई आहे. तो बाकी दोघांना सांगतो की आपण तिघे एकूण ८ जणांचं प्रवासभाडं देऊया म्हणजे आपण लवकर पोहचू. आता बाकीचे दोघे विचार करतात की आपण का द्यायचे? त्याला घाई असेल तर त्याने त्याचं अधिक पाच जणांचं भाडं द्यावं. तिसऱ्या माणसाकडे इतर काहीच पर्याय नसल्याने तो झक मारत याला तयार होतो. बाकी दोघे खुश होतात की आपण आपल्या आधीच्याच भाड्यात लवकर पोहोचणार! 

आता प्रसंग तोच. तिसरा माणूस तोच उपाय सुचवतो. बाकीचे पुन्हा तेच सांगतात, की घाई असेल तर तू दे बाकीच्या लोकांचं भाडं, आम्ही का द्यायचं?! पण आता गंमत अशी आहे की आता पर्याय असल्याने तो सरळ ओला/उबर/वगैरे बुक करतो आणि लवकर पोहोचतो. 

आता व्हॅनमध्ये फक्त २ जणं आहेत. त्यामुळे आता ८ प्रवासी जमायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू लागतो. त्या तिसऱ्या प्रवाशाच्या घाईचा फायदा घेऊन त्याच्या पैशाने जे बाकीचे दोन जण जलद प्रवास करण्याची मजा घेत होते आता त्यांना त्रास होऊ लागतो. आता ८ प्रवासी जमायला आणखी वेळ लागत असल्याने व्हॅनचालक भाडं वाढवतो, कारण त्यालाही एक मर्यादेपलीकडे एका जागी व्हॅन उभी ठेवणं परवडणारे नसते.

३ जणांनी भाडं वाटून घेतलं असतं तर जितका जलद प्रवास झाला असता तो तर होतच नाही वर आहे ते भाडं सुद्दा वाढतं. यात तिसरा माणूस हा प्रवाशांचा प्रातनिधिक समजावा, कारण जसा तिसऱ्या माणसाने पर्याय वापरला तसं इतरही प्रवासी विचार करतात आणि ते पर्याय वापरून जलद प्रवास करू लागतात.

आता खाजगीकरणाला विरोध कोण करतं? ― ना व्हॅनवाला विरोध करतो ना ज्याला ओला/उबर परवडतं तो विरोध करतो ― ते बाकीचे दोन जण, जे तिसऱ्याच्या जीवावर आणि पैशावर जलद प्रवासाची मजा घेत होते आता ते खाजगीकरणाला विरोध करू लागतात.


ते विरोध करतात कारण त्यांना वाटतं हा माणूस जो आमच्याबरोबर व्हॅनमधून प्रवास करत असे आणि त्याच्यामुळे माझा वेळ वाचत असे त्याने आता मला ओला/उबर मधूनही व्हॅनच्याच भाड्यात प्रवास घडवावा.

आहे की नाही मज्जा?

©️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १२, शके १९४२

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग १

Tuesday, September 8, 2020

गतानुगतिको लोकः

१९९७ साली कॅलिफोर्नियात नेथन जॉनर नामक एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने एक पेटीशन तयार केलं: Ban Dihydrogen Monoxide.

त्याचं म्हणणं होतं की हे रसायन अतिशय खतरनाक असून अनेक कारखान्यांच्या औद्योगिक कचऱ्यात अर्थात वेस्ट प्रॉडक्ट मध्ये त्याचा समावेश होतो. याचा आण्विक ऊर्जा प्रकल्पात याचा उपयोग केला जातो. आग विझवायलाही हे रसायन वापरतात. पण हेच कर्करोगाने ग्रस्त पेशींतही आढळते. हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांत याचे आधिक्य आढळते. हेच धोकादायक रसायन प्रक्रिया केलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगात, औषधांत, आणि सौंदर्यप्रसाधनांत याचा सर्रास वापर होतो. म्हणून यावर बंदी घालायलाच हवी.

नेथनच्या या पेटीशनवर अक्षरशः हजारो लोकांनी सह्या केल्या. सह्या करणाऱ्यांत अनेक विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक, पीएचडी धारक, बुद्धिजीवी विचारवंत, आणि सिनेटर (लोकप्रतिनिधीही) सुद्धा सामील होते.

हा प्रयोग त्या मुलाने फक्त हे दाखवण्यासाठी केला होता की लोक कसे विचार न करता आणि विषयाची माहिती न घेता आलेल्या प्रत्येक प्रचाराच्या लोंढ्यात वाहून जातात.

नेथन जॉनर खोटं बोलत होता का? नाही. त्याने केलेला प्रत्येक दावा खरा होता. 

पण ते खतरनाक रसायन नेमकं काय होतं? डाईहायड्रोजन मोनोऑक्साइड अर्थात H2O अर्थात आपलं सरळ साधं पाणी!

म्हणून प्रत्येक बातमीच्या प्रत्येक शीर्षकामागे अर्थात हेडलाईनमागे धावण्याआधी हा विचार करा ― आपल्याला त्या विषयातलं किती कळतं? तुम्हाला असलेली माहिती किती खरी आहे? ― हा विचार केला नाहीत, तर तुमच्यावर डाईहायड्रोजन मोनोऑक्साइडवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहिलेलं आणि नंतर पोपट झालेला बघण्याची वेळ येईल.

©️ मंदार दिलीप जोशी

मूळ हिंदी: ©️ डॉ राजीव मिश्रा

Thursday, August 20, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग १

चीनी व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला जो फटका बसला, त्या अवस्थेच्या निवारणार्थ मोदींनी जेव्हा २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले, तेव्हा एका कॉपी पेस्ट छाप पोस्टवर पोस्टकर्त्याला मी प्रश्न विचारला  (त्याचं गणित गंडलं आहे ते सोडून द्या), की बाबा रे, तू म्हणतोस की पॅकेज घोषित करण्याऐवजी प्रत्येकाला १ कोटी द्यायचे, तर मग 

(१) प्रत्येकाला १ कोटी दिले तर सगळ्यांची सांपत्तिक स्थिती तीच नाही का राहणार, मग फायदा काय? आणि 

(२) प्रत्येकाला फुकटचे १ कोटी दिल्याने उद्योगांना चालना कशी मिळेल आणि रोजगार निर्मिती कशी होईल? 

उत्तरादाखल नेहमीप्रमाणेच संघोटा ही पदवी प्राप्त झाली.

या समाजवाद्यांना समजावणे अशक्य आहे, पण काठावर असणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण देतो. नव-समाजवाद्यांच्या तोंडावर मारायला उत्तम आहे.

समजा तुम्ही काही एक रक्कम खर्च केली, उदाहरणार्थ आपण ₹१०० घेऊ, तर तुम्ही कुणाच्यातरी कमाईची सोय करत आहात. सोयीसाठी त्या व्यक्तीला आपण 'अ' म्हणू.

पण जेव्हा सरकार तुमच्याकडून ते ₹१०० काढून घेते आणि दुसऱ्या एका व्यक्तीला देते, आपण त्याला सोयीसाठी 'ब' म्हणू, जो काहीच करत नाही - याचा अर्थ सरकारने 'अ' ची कमाई सुद्धा काढून घेतली आहे.

आता गरीब झालेला 'अ' फुकटेगिरीची सवय लागलेल्या 'ब' च्या मागे रांगेत जाऊन उभा राहतो.

आता त्या दोघांना पोसायला सरकारला तुमच्याकडून ₹२०० घेणं भाग पडतं.

पण या रकमेपैकी जे जास्तीचे ₹१०० असतात ते तुम्ही खर्च केल्यावर आणखी एका व्यक्तीची कमाई असणार होती. आपण सोयीसाठी त्या व्यक्तीला 'क' म्हणू. आता सरकारने ते तुमच्याकडून काढून घेतल्याने 'क' हा नाईलाजाने फुकटेगिरी करायला 'अ' आणि 'ब' च्या रांगेत जाऊन उभा राहतो.

आता सरकारला तुमच्याकडून पुढच्यावेळी ₹३०० घेणं भाग पडतं.

आणि अशा प्रकारे अधिकाधिक लोक गरीब होत जाऊन शेवटी सगळे रस्त्यावर येतात.

या मतिमंद, डाव्या लुटारूंना हे समजत नाही की अंबानी त्याने कमावलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उशा आणि गाद्या करून त्यावर लोळत नाही, तो तो पैसा खर्च करतो, गुंतवतो, नोकऱ्या निर्माण करतो - थोडक्यात वरील उदाहरणात दिलेले कित्येक ₹१०० लोकांत त्यांच्या कष्टांची कमाई म्हणून वाटतो.

डाव्यांनी हे पैसे फुकट्या लोकांत वाटायला घेतले, तर अंबानीच्या उद्यमशीलतेवर अवलंबून असलेल्या या सगळ्या लोकांची कमाई बंद होईल, आणि ते असेच फुकटेगिरीच्या समाजवादी रांगेत जाऊन उभे राहतील.

The problem with socialists is that they eventually run out of other people's money.
- Margaret Thatcher 

🖋️ मंदार दिलीप जोशी

संदर्भ आभार: डॉ राजीव मिश्रा

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग २

Tuesday, August 18, 2020

रात्रीस खेळ चाले, कोकण, आणि मी

ही मालिका २९ ऑगस्टला निरोप घेते आहे त्या निमित्ताने...

मुळात आधीपासून ग्रामीण भागात आणि विशेषतः कोकणात संध्याकाळ झाली की एकदम सामसूम होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही. आतासारखी सगळीकडे वीज नसल्याने पूर्वी दोन घरातलं अंतर कितीही असलं तरी रात्रीच्या भयाण शांततेत दार प्रत्यक्ष वाजवून माणूस बाहेर आल्याशिवाय शेजार आहे हे जाणवत देखील नसे; आताही फार फरक पडलेला नाही, पण अनेक घरात आलेल्या मठ्ठ खोक्यामुळेही लोक एकमेकांना भेटायला फार बाहेर पडत नसावीत. तर, संध्याकाळी दिवेलागणीनंतर करण्यासारखं काही नसल्याने मुलांचे अभ्यास, जेवणं, आणि झोप यांच्यात मध्ये भरपूर वेळ मिळे. दिवसा ज्याकडे लक्षही जात नसे असे एखादे झाड रात्री उगाचच भयानक वाटतं. 

मुबलक प्रमाणात असलेली झाडं झुडपं आणि पानाफांद्यातून रात्री डोकावणारा चंद्रप्रकाश आणि वीज आल्यानंतरच्या काळात रोजच चाललेला बल्बच्या प्रकाशाचा खेळ त्या वातावरणाच्या गूढतेत आणखीच भर टाकतो. कोकणातल्या गावांत अनेक गल्ल्या आणि आळ्यांत खांबांवरून जे दिवे सोडलेले असतात त्यांचे काम म्हणजे परिसर उजळून टाकणे हे नसून तो खांब तिथे आहे हे वाटसरूंना दाखवण्यापूरते मर्यादित असते. त्यामुळे दोन खांबांच्या मधला भाग लोक घाबरत घाबरतच पार करतात. 

त्यामुळे मग वेळ घालवायला म्हणा किंवा आलेले खरे खोटे अनुभव वाटून घ्यायला म्हणा असंख्य भूतकथांचा जन्म झाला यात नवल नाही. याला वर वर्णन केल्याप्रमाणे असलेल्या कोकणातल्या नीरव शांततेची आणि भरपूर आणि दाट वृक्षसंपदेची फोडणी मिळाली आणि खऱ्या खोट्या असंख्य भुतांनी गोष्टीरुपाने वावरायला सुरवात केली.

काही काळापूर्वी कोकणातल्या भुतांचे प्रकार वाचले होते ते जसे आठवतात तसे देतो आहे:

वेताळ, ब्रह्मग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, गिऱ्हा, चेटकीण, झोटिंग, वीर, बायंगी, जखीण, हडळ, म्हसोबा, लावसट, भानामती, चकवा, वगैरे. यांची वर्णने देत बसत नाही कारण फेसबुकवर किंवा नेटवर इतर ठिकाणी शोधल्यास सहज सापडेल.

लहानपणी आजी आजोबांनी भरपूर भुतांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे "रामाच्या देवळासमोर एक बाई राहते, तिचा दरवाजा वाजवल्यावर ती बसल्याजागेवरून लांबूनच हात लांब करून दार उघडते" ही होती. गंमतीशीर अशाकरता म्हणालो की तेव्हा जाम तंतरली असली तरी नंतर रामाच्या देवळसमोर भूत कसं राहील असं आजीने विचारल्यावर आजोबा आपली खेचत होते हे लक्षात आलेलं. तरीही त्या घरासमोरून जाताना काही दिवस घाबरायला व्हायचंच!

मी मूळचा कोकणचा असल्यामुळे कोकणावर भयंकर प्रेम आहे हे वेगळं सांगायला नकोच. पूर्वी पडघवली वगैरे मालिकांतून कोकण दर्शन झालं खरं, पण तरी कोकणाला टीव्हीवर पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने तो अनुशेष कोण भरून काढणार हा प्रश्न होताच. अशात #झी_मराठी वर #रात्रीस_खेळ_चाले सुरू झाली आणि आता मजा येणार असं वाटू लागलं. पण झीवरच्या इतर (म्हणजे जवळपास प्रत्येक) मालिकांसारखीच आरंभशूर झालेल्या या मालिकेने नंतर कंटाळवाणं केलं. एखादा विषय सुरू केल्यावर त्याचं पुढे काहीही होताना न दाखवता विसरून जाणं आणि शेवटी प्रत्येकावर का संशय आहे याची कारणे देऊन शाळेत आदा मादा कोण पादा केल्यागत त्यातल्या एकीला अटक करणं यामुळे मालिकेने खूपच अपेक्षाभंग केला. पात्रयोजना जरी चपखल असली तरी यामुळे शेवटी शेवटी वैताग आला होता. त्यात मालिकेतले क्वचितच दिसणारे आणि कपाटातून बाहेर येणारे अण्णा ही माझी विशेष आवडती व्यक्तिरेखा.

ही मालिका परत सुरू होणार म्हटल्यावर फार आशा नव्हतीच पण उत्तम अभिनय, मागल्या सीझनमधे गंडलेलं कथानक सुधारून ओघवती कथावस्तू देणे, उत्कृष्ट पात्रनिवड यांनी या मालिकेच्या आधी काय घडते हे दाखवणाऱ्या सीझनने म्हणजेच प्रिक्वेलने खूप मजा आणली. अगद कमी फुटेज किंवा लहानात लहान व्यक्तीरेखाही लक्षात राहते. मुख्य म्हणजे या मालिकेतले कलाकार कपडे घालतात ते आवडले. म्हणजे इतर मालिकांसारखं संडासात जाताना लग्नाला निघाल्यासारखे कपडे घालणे किंवा नखशिखांत नट्टापट्टा केला असतानही "अभी तैय्यार होके आती हूं" म्हणणे नसायचे. कुठेही नाव ठेवायला जागा नाही.

अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा अतिशयोक्तीपेक्षाही जास्त भडक असल्याने पटत नव्हतं, पण असे लोक खरंच अस्तित्वात असल्याचं काही जणांनी किस्से सांगितले त्यातून कळलं. ही भूमिका साकारणारे श्री माधव अभ्यंकर यांच्याशी फेसबुकवरच बोलताना त्यांनीही असली माणसं अस्तित्वात असतात असं सांगितलं होतं. ते खरं असेल तर अवघड आहे.

<< माझं आधीचं मत हे होतं: अगदी अनेक जुन्या हिंदी सिनेमातले व्हिलनही कुटुंबवत्सल दाखवले आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस कितीही संतापी, विक्षिप्त, तिरसट, बाई आणि बाटलीत गुरफटलेला, लोकांना फसवून त्यांच्या जमिनी लाटणारा, वगैरे सगळे वाईट धंदे करणारा असला तरी तो शेवटी प्रॉपर्टी आणि पैसा जमवतो कुणा करता, तर आपल्या कुटुंबाकरताच. मग हा माणूस याला मारीन, गोळी घालीन, घराबाहेर काढीन, वगैरे करून शेवटी घरी कोण शिल्लकच उरलं नाही तर एवढी संपत्ती काय वर घेऊन जायची आहे का? म्हणूनच अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा एका मर्यादेपलीकडे पटत नाही. या सगळ्याचा लेखक व दिग्दर्शकांनी विचार करायला हवा होता.) >>

बाकी अण्णा नाईक यांच्या भूमिकेत श्री माधव अभ्यंकर आणि पांडूच्या भूमिकेत प्रल्हाद कुडतरकर रॉक्स! आपण फॅन!! नेने वकील (शेवटच्या काही भागांत कलाकार बदलले, ते ही छानच, पण माझे आवडते दिलीप बापटच), शेवंता (अपूर्वा नेमलेकर). सदा, वच्छी आणि आबा, शोभा, काशी, माई (शकुंतला नरे), रघूकाका (अनिल गावडे), दत्ता (सुहास शिरसाट), माधव (मंगेश साळवी), छाया (नम्रता पावसकर), सरिता (प्राजक्ता वाड्ये) आणि इतर सगळेच उत्तम. अधुनमधुन दिग्दर्शकाला ही गूढकथा आहे की रात्रीस खेळ चाले ऐवजी दिवसा केलेले चाळे (सॉफ्ट पॉर्न) दाखवायचे आहेत याचा गोंधळ झाल्यासारखं वाटत होतं, पण ठीक आहे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. द्वादशी, शके १९४२

टीपः रात्रीस खेळ चाले चे Meme: या मालिकेने मीम साठी अनेक फोटो मिळवून दिले. Zee5 App किंवा ब्राउझर वरून Zee5 वर मालिकेचा एखादा भाग सुरू असताना हवा तो क्षण किंवा पात्रांच्या चेहऱ्यावर हवे ते भाव आले की मी तो क्षण साधून स्क्रीनशॉट काढतो आणि वापरतो. असे अनेक फोटो/स्क्रीनशॉट माझ्या संग्रही असतात व एखादा विनोद सुचला की त्यातला एखादा काढून वापरतो. नेटवर असलेले आयते फोटो काही कामाचे नसतात कारण काही अपवाद वगळता मराठीत अजून Still Photography पुरेशी फोफावलेली नाही. म्हणून हे फोटो मालिकेच्या निर्मात्यांकडेही सापडणार नाहीत. त्यामुळे एखादा विनोद सुचल्यास त्याची मीम करायला मला ५ मिनिटेही लागत नाहीत.