लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची बालसुलभ उत्सुकता स्वस्थ बसू देईना. कालच त्याने खिडकीतून हळूच वाकून तिकडून इकडे येणार्या तीन हजार सातशे शहाऐंशी आणि पलिकडे जाणार्या पाच हजार आठशे बहात्तर गोळ्या मोजल्या होत्या. सरळमार्गी रियाझ नाईकुला गणिताची आवड निर्माण झाली ती अशी. त्याच्या घरच्यांचं त्याला प्रोत्साहन होतंच. त्याचे अब्बू त्याच्या अम्मीला त्याच्या छोटे छोटे शेणगोळे कसे मोजायचे ते शिकवलं होतं. एकदा एका शेणगोळ्यात अम्मीची पिन अडकली असे समजून निरागस रियाझने ती काढून अम्मीला दिली आणि शेणगोळाच तो असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला. पण खालून अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक ठो ठो ठो असे लहान आवाज पटापट येऊ लागले. अब्बू म्हणाले ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. तेव्हापासून रियाझला गोळ्या मोजण्याची आणि पर्यायाने गणिताची आवड निर्माण झाली. रियाझला चित्रकलेचीही आवड होती ति त्याने कशी जोपासली ते पुढे येईलच.
सनदी लेखपाल असलेल्या याकुब मेमन याचा त्याने आदर्श ठेवला व मोठा झाल्यावर गावातील इतर मुलांनाही गणिताची आवड निर्माण व्हावी असा ध्यास त्याने घेतला. पण फक्त गोळ्या मोजून त्याचे समाधान होईना. प्रत्येक गोष्टीच्या सम....सॉरी.... उगमाशी जायचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. म्हणूनच आपला उगम कुठून झाला असाही प्रश्न त्याला पडत असे. पण त्याला निर्माण झालेल्या या सायंटेफिक टेंपरबद्दल पुन्हा केव्हातरी. तर, त्या गोळ्या येतात कुठून आणि सोडल्या जातात कुठून याचा शोध घ्यायचे त्याने ठरवले. मुळातच काश्मीरी जनता परस्पर सहकार्यासाठी प्रसिद्ध. तेव्हा त्याच्या या शिक्षणाची जबाबदारी गावातील जेष्ठांनी घेतली व बाहेरून काही शिक्षक मागवले. त्या शिक्षकांनी रियाझला बंदूक म्हणजे काय, त्यातून गोळ्या कशा बाहेर पडतात, त्या माणसाला लागल्यावर काय होते, त्या का चालवाव्यात वगैरे आवश्यक आणि फुटकळ माहिती दिली. काश्मीरी लोकांचे आणि या बाहेरून आलेल्या शिक्षकांची सामाजिक जाणीव आपल्याला वाखाणलीच पाहीजे. कारण बाहेरचे निष्ठूर जग पदोपदी धनाची हाव ठेऊन पैसे मागत असताना आणि समाजकार्याचीही किंमत वसूल करत असताना रियाझला निर्माण झालेल्या बालसुलभ उत्सुकता शमवायला व त्याच्या गणिती ज्ञानार्जनासाठी दिलेल्या या शिक्षणासाठी मात्र त्या अमूर्त निर्गुण निराकार इंटानॅशनल शाळेच्या शिक्षकांनी एकही पैसा घेतला नाही. उलट बाहेरून आलेल्या या शिक्षकांनी त्याच्या अब्बू आणि अम्मीला या दिव्य कार्यासाठी तुमचा रियाझ आता आमचा (विद्यार्थी) झाला असे सांगून स्वतःहून पैसे दिले.
रियाझला चित्रकारही व्हायचं होतं हे आपल्याला विदीत आहेच. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्यांचे चित्र काढून त्यात लाल रंग भरायला त्याला फार आवडत असे. पण आपली ही आवड जोपासत असताना खूप वेळ वाया जात आहे असे त्याच्या लक्षात आलं. तसेच फक्त वेडीवाकडी चित्रे काढून देशविदेशात प्रदर्शने भरवण्यातही त्याला रस नव्हता. यावर त्याच्या शिक्षकांनी त्याला एक नामी युक्ती सुचवली. निर्जीव कागदावर त्याहून निर्जीव रंग भरण्यापेक्षा त्याने त्याच्या गणिती ज्ञानाच्या ध्यासापोटी मिळवलेले गोळ्या सोडायचे ज्ञान वापरून सजीव माणसांतच लाल रंग भरावेत असे त्यांनी सुचवले. मग सुरु झाला रियाझचा गणिती कलोपासनेचा रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रवास.
हळूहळू रियाझ मोठा होत होता. त्याला आता मिसरुड फुटलं होतं. आता रियाझचं गणित इतके पक्के होऊ लागले होते की तो दुसर्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्याच काय त्याने स्वतः बंदुकीतून सोडलेल्या गोळ्या देखील त्याला मोजता येऊ लागल्या होत्या. आता त्याच्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेने शिक्षक पाठवायचे कमी करुन पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर पाठवणे सुरु केले होते. त्या पर्यवेक्षकांना रियाझची गोळ्या मोजण्याची विलक्षण बुद्धीमत्ता खूप भावली, कारण त्यांनी गणिती सरावासाठी तसेच प्रत्यक्ष प्रयोगासाठी पुरवलेल्या गोळ्यांचा हिशेब त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना देणे सोयीचे ठरू लागले. परिणामी शिक्षण व प्रत्यक्ष प्रयोगाकरता शाळेने करावयाचा पुरवठा भरमसाठ वाढला.
रियाझने आता तारुण्यात पदार्पण केलं होतं. नाकाखाली असलेल्या मिसरुडाबरोबर तो आता हनवटीवरही डौलदार दाढीसंभार बाळगू लागला होता. रियाझने आता अनेक मुलांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्याही अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कधी तो एकटाच तर कधी त्या मुलांन घेऊन तो इंटरनॅशनल शाळेत शैक्षणिक सहलींन जात असे. हळुहळू रियाझने आपल्यासारखे अनेक जण गणितात तयार केले. पण आता त्या शाळेला रियाझने पुस्तकी ज्ञानातले लक्ष कमी करुन प्रत्यक्ष प्रयोगांकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटू लागले. रियाझही एव्हाना फक्त थिअरीला कंटाळला होताच. रियाझचे शिक्षक ज्या शाळेतून यायचे त्या शाळेची एक शाखा होती हिजबुल मुजाहिदीन अर्थात पवित्र योद्धे. या शाखेच्या प्रमुखपदी त्याची नेमणूक करण्यात आली. आता त्याने भारतीय बंदुकधारी सैन्य, इतर नागरिक, दुकानदार, अशा सजीवांसमोर आपल्या गणिती कलोपासनेचे रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रयोग सुरु केले.
पण २००२...सॉरी...२०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर कलेचा व गणिताचा र्हास सुरु झाला व सायंटेफिक टेंपर नसलेल्यांची चलती सुरु झाली. आपल्याकडे असहिष्णुता तेव्हापासूनच आणखी वाढली. याचेच पर्यावसान आधी बुरहान वाणी नामक मुख्याध्यापकपुत्राच्या प्राणोत्क्रमणात झाले. पण एवढ्यावर समाधान मानतील ते भारतीय बंदुकधारी सैन्याधिकारी कसले. रियाझ नाईकूला आपल्या कलेचे प्रात्यक्षिक आपण कसे दाखवले याचा व आपल्या गणिती ज्ञानाचा व कलोपासनेचा साप्ताहिक हवाल त्याला आपल्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांना शुक्रवारी नजिकच्या प्रार्थनास्थळात द्यावयाचा होता. पण आधी काहीतरी भव्यदिव्य कार्य ताबडतोबीने करावयास हवे म्हणोन तो बुधवारी बाहेर पडला आणि घात झाला. तो कुठे आहे याचा सुगावा सैन्याला लागला व त्याला भारतीय बंदूकधारी सैन्याने त्याच्याच कलोपासनेचे प्रयोग त्याच्यावरच करुन त्याला या भौतिक जगातून कायमचे नाहीसे केले.
जा रियाझ जा, या जगात, ज्या देशात तुझ्या कलेची कदर नाही अशा देशात राहून अवहेलना झेलण्यापेक्षा त्या तुझ्या निर्गुण निराकार निर्मात्याकडे जा. तिथे तुझ्या गणिती कलोपासनेचे तुला निश्चितच बक्षिस मिळेल. तुझे गणित चांगले असल्यामुळे तुला बहात्तर पर्यंत आकडे नक्की मोजता येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुझा उगम कुठे झाला हे ही तुला तिथेच समजेल.