Monday, October 9, 2023

अंतर न देणे

 


दुर्मिळ दोस्त झाले


 

प्राजक्त

लहानपणी आईला पूजेला लागायची तेव्हा सोसायटीच्या कम्पाउंडमध्येच असलेल्या प्राजक्ताच्या झाडाची फुलं भरपूर मिळायची म्हणून आणायचो, आणि इतर पर्यायही कमी होते.

प्राजक्त

पण मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. असं वाटतं की सडा पडला असेल तिथे उभं रहावं, तो गंध नाकावाटे मनात भरून घ्यावा. नुकताच पाऊस पडून गेला असेल तर अत्युत्तम.

जसं आपण अथर्वशीर्षात "त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं‌ चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्" म्हणत असताना तंद्री लागते, किंवा आरती संपल्यावर भान हरपून "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नमः पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!" अशी अनेक देवतांची आणि संतांची नावे एकत्र घेताना आपण जी दैवी अनुभूती येते, अगदी तशीच भावना मृदगंध मिसळलेला प्राजक्ताच्या फुलांचा सुवास नाकावाटे थेट नेणिवेत पोहोचतो तेव्हा निर्माण होते.

म्हणूनच कदाचित, मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. बास बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १०, शके १९४५

Tuesday, June 20, 2023

पिढीनिरपेक्ष अभिरुची

माझ्या तीर्थरुपांनी मला लावलेली इंग्रजी सिनेमाची सवय मी चिरंजीवांना लावली. त्यातूनच अधुनमधून कंटाळा आला की जेम्स बाँडचा एखादा सिनेमा लावा असा मस्का लावला जातो. अशीच एकदा अशीच शिफारस झाल्यावर मी Moonraker हा Roger Moore चा सिनेमा लावला. 

ताबडतोब चिरंजीवांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि म्हणाला बाबा हा नाही हो, तो आधीचा जेम्स बाँड लावा. त्याला Sean Conneryचे नाव पटकन आठवेना म्हणून 'आधीचा जेम्स बाँड'. मला अगदी रिमोटने बदलायचाही आळस म्हणून म्हणालो आधीचा कोण? तर म्हणजे सगळ्यात पहिला जेम्स बॉन्ड होता ना तो. तो जास्त डॅशिंग आणि जबरा बॉन्ड आहे ना बाबा, म्हणून.


हिंदू घरात वाढलेल्या मराठी माध्यमातल्या ज्या मुलाला सिनेमातलं इंग्रजी फारसं कळत नाही त्याला जेम्स बॉन्डची भूमिका उत्तम करणारा नट कोणता आणि चालसे  नट कोणता याची जाण असेल, तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचं रामायण कसं असावं, चांगलं/वाईट काय याबद्दल त्याला किंवा त्याच्या 'जनरेशनच्या' वयाच्या मुलांना किती जाण असेल याचा निर्णय परस्पर कुणीही घेऊ नये. 

माझं भाग्य थोर की मी मुलांना तो आदिघाणेरडा आणि आदिबुद्धीमंद प्रकार दाखवला नाही, नाहीतर मला मुलांच्यासमोरच मान खाली घालायची वेळ आली असती. तसंही सगळ्यांच्या तोंडी असलेले काही संवाद ऐकवून झाल्यावर "शीssss ब्यॉकsss बाबा काहीही काय हो दाखवता!" असा उद्धार झालाच आहे.

टीपः मुलं रामानंद सागर कृत रामायण जनरेशनची नक्कीच नाहीत. मुलांनी सिया के राम मालिका थोडीशी आधी बघितली होती, आणि मग रामानंद सागर यांची रामायण पुनर्प्रसारित झाल्यावर. त्याच सुमारास कधीतरी लेजेन्ड ऑफ राम हा सिनेमा सुद्धा. त्यामुळे जनरेशनच्या गप्पा नकोत. आक्रमक भाषा, साधी भाषा, आणि टपोरी भाषा यातला फरक त्यांना नक्कीच कळतो.

#आदिपुरुष #AdipurushReview #adipurushmovie #Adipurush #JamesBond #SeanConnery #RogerMoore

© मंदार दिलीप जोशी

Friday, June 9, 2023

खर्रा इतिहासः मंगळवारचे व्रत करणारा शहेनशहा

एकदा बादशहा सलामत जिल्लेइलाही शहेनशहा-ए-(पाव)हिंद सुबह-ए-सजदा औरंगजेब सर सैन्यासहवर्तमान जंगलातून निसर्ग सौंदर्य न्याहाळत चालले असता त्यांना एके ठिकाणी वेगळेच निसर्गसौंदर्य दिसले. बादशहा सलामत सौंदर्यस्थळांचा फारच आदर करित. अनेकदा एकांतात...असो. त्यामुळे त्यांनी आपल्या सरदारांना आणि वजीर-ए-आजमला "इथेच तंबू टाका. आम्ही शिकार करुन येतोच" अस हुकूम दिला, आणि शहेनशहा सर त्या सौंदर्यस्थळांचा मागोवा घ्यायला एकटेच निघाले. त्यांना ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी आवडत नसे असे काही विकेंड इतिहास्यकारांचे यांचे फावल्या वेळेतले संशोधन सांगते. असो.

तर, बादशहा सलामत असेच एकटे निघाले असता ते सौंदर्यस्थळ त्यांच्या नजरेच्या टप्प्यात असले तरी नीट न्याहळण्यासाठी हाताच्या टप्प्यात येईना. सौंदर्यस्थळ पुढे औरंगजेब सर मागे सौंदर्यस्थळ पुढे औरंगजेब सर मागे असा खेळ बराच काळ चालला. शेवटी ते सौंदर्यस्थळ तलावात शिरले आणि औरंगजेब सरांना हुरुप आला. लगेच त्यांनी तलावावर चेक इन करत भुर्जपत्रावर "फीलिंग हॉट विथ समवन अननोन" असं स्टेटस लिहून ते ही त्या तलावात शिरले. 

लेकिन बदनसीबी! ते सौंदर्यस्थळ पोहत पोहत तलावाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचले आणि अदृश्य जाहले. इकडे औरंगजेब सरांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले आणि उपरवाल्याचा धावा करु लागले. आणि काय आश्चर्य, तिकडून त्यांना हत्तींची एक झुंड पाणी प्यायला तलावाच्या दिशेने येताना दिसली. बादशहा सलामतांनी हातात घेतलेली एक लहान फांदी उंच धरली आणि हत्तींच्या दिशेने आरडाओरडा करायला सुरवात केली. त्यातल्या हत्तींच्या टीम लीडरने ती फांदी धरली आणि खेचायला सुरवात केली. बादशहा सरांनी पटकन संधी साधली आणि तलावाबाहेर आले. गणपती म्हणजे गणांचा पती म्हणजेच उपरवाल्याने त्या हत्तींना आपली जान वाचवायला पाठवले असे वाटून त्यांनी त्या हत्तींचा सन्मान करायचे ठरवले. पण छावणीपर्यंत हत्तींना एकट्यानेच कसे नेणार अशी रास्त शंका आल्याने (ते बीरबल नसला तर कधी कधी स्वतःच्या दिमाग-ए-मस्तिष्कचा वापर सुद्धा करीत असत) त्यांनी तिथलीच माती वापरून हत्तींच्या मुंडक्याची एक प्रतिकृती बनवली आणि आपल्याबरोबर छावणीत व तिथून दिल्लीला घेऊन गेले. 

तर, ही घटना घडली तो दिवस मंगळवारचा (الثلاثاء) असल्यामुळे बादशहा सलामत जिल्लेइलाही शहेनशहा-ए-(पाव)हिंद सुबह-ए-सजदा औरंगजेब सरांनी मंगळवारी उपास करायला सुरवात केली व दर मंगळवारी ते मनोभावे (मनोभावे म्हणजे मनापासून, औरंगजेब सरांना दाढी होती म्हणून अनंत भावेंचे कुणी नव्हेत) त्या गणपतीसमोर बसत. तसेच त्या दिवशीची आठवण म्हणून त्या फांदीच्या झाडाची वीणा तयार करुन घेतली होती ती खाजवत.... माफी असावी.....वाजवत बसत. आपण मौसिकीच्या विरोधात असल्याने कुणाला ती वाजवलेली कळू नये म्हणून त्यांनी खोली आवाज-ए-बंद अर्थात साउंड प्रूफ करुन घेतली होती. 

पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहास्यकार सांगणार नाहीत.

औरंग्या-ए-सनातनी
पान ४८८८, ओळ २४
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद: मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनभर ओकरी

#तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Saturday, April 15, 2023

दुर्लक्षं सदासुखी

काल फेसबुकवर या चित्रासह एक पोस्ट बघितली आणि त्यातल्या विचारांत थोडी भर टाकणारे काही विचार मला सुचले. हे एक प्रकारचे note to self म्हणायला हरकत नाही.



रिकामा वेळ असणाऱ्यांना आणि तो घालवायला वाट्टेल ते करणाऱ्या लोकांना आपण सरसकटपणे रिकामटेकडे म्हणतो. पण हे वर्गीकरण रिकामटेकडे आणि रिकामचोट असं असायला हवं.

सर्वसाधारणपणे:
रिकामटेकडे लोक गाणी ऐकतात, टीपी जोक्स सांगतात, उगाचच घर आवरतात, इकडेतिकडे फेरफटका मारतात, चकाट्या पिटतात, मधेच तुम्हाला नर्मविनोदी चिमटा काढतात, गॉसिप करतात, वगैरे. असे लोक तसे निरुपद्रवी असतात.

रिकामचोट लोक या चित्रातील पक्षासारखे असतात. उगाचच एखादं भडक विधान करणे आणि मजा बघत बसणे, आपला संबंध नसताना इतरांच्या व्यवहाराबद्दल नकारात्मक टिप्पणी करुन समोरच्याला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडणे, काड्या घालणे आणि नंतर तिखट उत्तर मिळालंच तर victimhood छाप कांगावा करणे, इत्यादी प्रकारच्या कारवाया हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण असते.  कुठल्याही प्रकारची रचनात्मक बौद्धिक किंवा तात्विक चर्चा करण्याची यांची कुवत तरी नसते किंवा स्वभाव तरी.

रिकामचोट लोक वेळ घालवायला जरी हे करत असले तरी तो त्यांचा मूळ स्वभाव असतो, जो इतर कामाच्या वेळी त्यांना बाहेर काढणे परवडणारे नसते. मग रिकामा वेळ मिळाला की उपरोल्लेखित प्रकार सुरू होतात.

तुमचा वेळ आणि तुमची बुद्धिमत्ता आणि शक्ती मौल्यवान आहेत, त्या अशा लोकांवर खर्च करू नका. अशा लोकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हाच उपाय असतो. संपूर्ण म्हणजे संपूर्ण. हे बोलायला सोपं असलं तरी व्यवहारात अगदीच अशक्य नाही. थोडी साधना लागते इतकंच. माझी साधना सुरू आहे, तुमचं काय?

© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ. दशमी, शके १९४५ | विक्रम संवत २०८०