गेले अनेक दिवस रावणाचं उदात्तीकरण करणारा आणि रामावर दोषारोपण करणारा एक संदेश व्हॉसॅप आणि फेसबुकवर फिरतो आहे आणि त्यावर अनेकांकडे उत्तर नाही. राखीपौर्णिमा किंवा दसरा असे सण आले की अशा संदेशांना ऊत येतो. त्या संदेशात रावणासारखा भाऊ हवा, रामासारखा नको असं ती मुलगी आईला उत्तर देते आणि त्याकरता रामाने सीतेचा त्याग केला पण रावणाने आपल्या बहिणीसाठी म्हणजे शूर्पणखेसाठी युद्ध करुन जीवही दिला एवढंच नव्हे तर सीतेचं हरण केल्यावर तिला स्पर्शही नाही केला असं कारण देते. यावर आई अवाक होते. असे अनेक संदेश आहेत, पण थोड्याफार फरकाने मुद्दे तेच उचलले गेले आहेत.
आता आपण एक एक मुद्दा घेऊ. पहिला मुद्दा सीतेच्या त्यागाचा. मुळात सीतेच्या त्यागाचा प्रसंग हा 'उत्तर रामायणात' (उत्तर कांड) आलेला आहे. ‘उत्तर’ या शब्दाचा संस्कृत भाषेनुसार अर्थ होतो ‘च्या नंतर’. जसे की आयुर्वेदात ‘उत्तरतंत्र’ आढळते. हे उत्तरतंत्र मूळ संहितेच्या नंतर कोणीतरी इतर लेखकाने भर घालण्याकरता जोडलेले असते. थोडक्यात, उत्तर रामायण हे रामायण रचून झाल्यावर मागाहून जोडण्यात आले असून महर्षी वाल्मिकी हे त्याचे लेखक नाहीतच मुळी! त्यांनी रचलेले रामायण संपते ते युद्धकांडात. युद्धकांडाच्या शेवटी रामायणाची फलश्रुतीदेखील आलेली आहे हा आणखी एक पुरावा. कोणत्याही स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. ती संपली की स्तोत्र पूर्ण होते हा साधा नियम इथेही लागू होतो.
जे मूळ रामायणातच नाही ते त्या बिचार्या रामाच्या माथी मारायचे उद्योग हे ‘काड्याघालू’ लोक करत असतात. पण तसे करताना सीतामातेच्या धरणीप्रवेशानंतर प्रभू रामचंद्रांनी केलेल्या दुःख विलापाचे उत्तर रामायणातील वर्णन मात्र सोयीस्करपणे विसरतात! मुळात रामायण संपूर्ण वाचायचं नाही; वर स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्यासाठी कपोलकल्पित गोष्टी चघळत बसायच्या असे यांचे उद्योग.**
आता काही अतीहुशार लोक असं म्हणतील की मग लव आणि कुश यांचे काय? त्यांचा जन्म झालाच नाही का? आणि त्यांचा जन्म वाल्मीकी ॠषींच्या आश्रमात झाला त्याचे काय? उत्तर असं की राम आणि सीता अयोध्येला परत आल्यावर त्यांना मुलं होऊ शकत नाहीत का? लव आणि कुश अयोध्येत जन्माला आलेच नाहीत असं कशावरुन? त्यांचं जन्म प्रमाणपत्र आहे का? समजा मानलं की सीता वनात गेली. बरं, सीता वनात गेली असेल तर त्याचं कारण फक्त रामाने तिला 'टाकलं' असंच का असावं? दुसरं काहीही कारण असू शकतं ना? धार्मिक बाबतीत राजांना सल्ला देणारे, प्रसंगी दटावणारे ऋषीमुनी हे सर्वसामान्य लोकांपेक्षा धार्मिक बाबतीत निश्चितच कट्टर असणार. त्यामुळे सीतेला वाल्मीकींच्या आश्रमात पाठवण्याचा हा निर्णय कुणाशीही सल्लामसलत न करता घेतला असण्याची शक्यता शून्य आहे. आजही कदाचित तिला प्रसूतीआधी अधिक सात्त्विक वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात रहायला मिळावं अशीही शक्यता असूच शकते ना? लोकांपेक्षा अधिक "सनातनी" असणारे हे साधूसंत-ऋषीमुनी, सीतेच्या चारित्र्यावर किंवा पावित्र्यावर संशय घेऊन तिला सोडलं, लोकापवादामुळे तिचा त्याग केला म्हणावं तर ती वनात गेल्यावर तिला आश्रमात इतर साधूसंतांच्या सोबत सुखेनैव कशी राहू देतील? याचा विचार ना उत्तर रामायण रचणार्यांनी केला ना आज रामावर दोषारोपण करणार्या ढकलबहाद्दरांनी.
आता जर तरच्या भाषेतून बाहेर पडूया. सीतामातेला आपल्या मुलांचा जन्म ऋषींच्या आश्रमात व्हावा असे डोहाळे लागले आहेत असे रामायण सांगते!! आता बोला!!! पण त्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण वाचावं लागतं. टीव्हीवरच्या मालिका पाहून इतिहास आणि पौराणिक बाबी समजत नसतात.
आता वळूया रावणाकडे. रावण वेदशास्त्रसंपन्न विद्वान होता, वीणावादनात प्राविण्यप्राप्त होता हे खरेच आहे. पण म्हणून तो मोठा ठरत नाही. याकुब मेमन चार्टर्ड अकाउटंट होता (तोच तो कुबेरांचा सनदी लेखपाल), ओसामा बिन लादेन सिव्हील इंजिनिअर होता, आणखी अनेक दहशतवादी उच्चशिक्षित होते आणि आहेत म्हणून ते महान ठरत नाहीत. सुशिक्षित असणं ही सुसंस्कृतपणाचा मापदंड असू शकत नाही हे आजही आपण समाजात बघतो.
रावणाची पापकर्म अनेक आहेत. रावण हा अत्यंत स्त्रीलंपट होता. स्त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्तू म्हणूनच तो बघत असे. रावणाने सीतेला हात का नाही लावला, त्या मागे देखील त्याचे एक पापकर्म दडलेले आहे. एकदा देवलोकावर आक्रमण करण्याच्या हेतूने निघाला असता त्याच्या सैन्याचा कैलास पर्वतावर तळ पडला. त्याच वेळी स्वर्गलोकीची अप्सरा रंभा तिथून जात असलेली त्याला दिसली. तिच्यावर अनुरक्त झालेल्या रावणाने तिला त्याच्याशी रत होण्याविषयी विनंती केली (व्हॉट्सअॅप ढकलबहाद्दरांसाठी कठीण शब्दांचे अर्थ = माझ्याबरोबर शय्यासोबत कर असं विनवलं). पण रंभा त्याला नकार देत म्हणाली की "हे रावण महाराज, मी तुमचे बंधू कुबेर महाराजांचा पुत्र नलकुबेर याच्यावर अनुरक्त झाले असून मी त्याला भेटायला चालले आहे. तस्मात मी तुमच्या सुनेसारखी आहे. तेव्हा असे वागणे आपल्याला शोभत नाही."
रंभेच्या या बोलण्याचा रावणावर काहीही परिणाम झाला नाही. कामातुराणां न भयं न लज्जा म्हणतात त्याप्रमाणे तो म्हणाला, "हे रंभे, तू स्वर्गलोकीची अप्सरा आहेस. तुम्ही अप्सरा कोणत्याही एका पुरुषाबरोबर लग्न करुन राहूच शकत नाही. तू कुणा एकाची असूच शकत नाहीस." असं म्हणून रावणाने रंभेवर बलात्कार केला. हे कुबेरपुत्र नलकुबेर याला समजताच त्याने रावणाला शाप दिला की तू रंभेची इच्छा नसताना तिच्याशी रत होण्याचे पाप केले आहेस, त्यामुळे तू यापुढे कोणत्याही स्त्रीशी तिच्या परवानगीशिवाय रत होऊ शकणार नाहीस. तू तसं केलंस तर तुझ्या मस्तकाचे सात तुकडे होऊन तू मृत्यू पावशील / भस्म होशील'.
म्हणून सीतेला प्रदीर्घकाळ बंदीवासात ठेऊन देखील तिला तो साधा स्पर्श करु शकला नाही. त्यामुळे सीतेला त्याने हातही लावला नाही यात त्याचा सात्त्विकपणा नव्हे तर नाईलाज आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही नाही का, सिग्नल लाल असला तर इकडे तिकडे बघता आणि पोलीसमामा दिसला की चुपचाप थांबून आपण किती कायदा पाळतो हे दाखवायला अगदी गाडीची पुढची चाकं झेब्रा क्रॉसिंगच्या मागे ठेऊन भोळेभाबडे भाव चेहर्यावर आणून थांबता, अगदी तसंच.
त्यामुळे रावण सीतेला फक्त हत्या करण्याची धमकीच देऊ शकला. अनेक विनवण्या करुन सीता बधत नाही हे बघितल्यावर शापग्रस्त रावणाने सीतामातेला एक वर्षाची मुदत देऊन सांगितलं की एक वर्षाच्या आत तू स्वतःहून माझ्याशी रत झाली नाहीस तर मी तुझी हत्या करेन. सीतेने आपल्याशी स्वतःहून रत व्हावे म्हणून तिचे मन वळवण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे (वाल्मिकी रामायण, सुंदरकांड, सर्ग २२). अशी विशिष्ठ धमकी देण्याचे कारण म्हणजे रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. जेव्हा हनुमान सीतेला भेटायला लंकेला गेला, तेव्हा त्याने रावणाला "तू माझ्याशी स्वतःहून रत झाली नाहीस तर तुझी आणखी दोन महिन्यांनी हत्या करेन" अशी धमकी सीतेला देताना ऐकलं. यावरुन काय ते समजून जा.
रावणाला फक्त स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय होती. जेष्ठांनी व हितचिंतकांनी दिलेला सल्ला ऐकणे त्याला आवडत नसे. म्हणूनच सीतामातेला परत करा आणि रामाशी शत्रूत्व करू नका असा सल्ला देणार्या स्वतःच्या सख्ख्या भावाला म्हणजेच बिभीषणाला स्वतःपासून दूर केलं. मंत्री शुक आणि स्वतःचे आजोबा माल्यवान यांचाही योग्य पण त्याच्या मताविरुद्ध जाणारा सल्ला पसंत न पडल्याने या दोघांनाही त्याने स्वतः पासून दूर केलं.
या उलट रामाने स्वतःच्या वडिलांनी दिलेल्या वराचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला. इतकंच नव्हे तर परत चलण्यासाठी विनवायला आलेल्या भावावरच राज्याचा भार सोपवून परत पाठवलं.
मुळात राक्षस लोक कसे होते त्याचंही वर्णन रामायणात आलेलं आहे. रावणी वृत्तीचे लोक हे नरमांसभक्षक असून त्याचे अनेक उल्लेख वाल्मिकी रामायणात आले आहेत. रावणाचे राज्य गोदवरी पर्यंत पसरलेले नसून चंपा सरोवर म्हणजे सुग्रीवाच्या राज्यापर्यंत पसरले होते.तिथे कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले तपस्वी आपली नित्यकर्मे करीत त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना मारुन खाणे हि मानवी संस्कृतीला घातक असे रावणाचे अन्यायी राज्य संपवणे हा हेतु होता.
येता जाता दुसर्याच्या शेतातली कणसं कापून खावीत तसं राक्षस लोक दंडकारण्यातल्या मनुष्यवस्तीचा वापर करत. स्वत: रामानेच सीतेजवळ या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे,
ते चार्ता दण्डकारण्ये मुनय: संशितव्रता: वसंत: कालकालेषु नवे मूलफलाशना:।
न लभंते सुखं भीरु राक्षसै: क्रूरकर्मभि" ॥५॥
भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभि: ।
ते भक्श्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिन: ॥६॥
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग १०
"हे सीते ,हे दण्डकारण्यातले व्रतधारी मुनि अत्यंत दीन झालेले आहेत. ते बिचारे समयानुरुप उत्पन्न होणार्या कंदमूलफलावर उपजिविका करणारे आहेत व आपल्या व्रतनियमात दंग राहून ते कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तरिही क्रुरकर्मे नरमांसभक्षक भयानक राक्षस त्यांना खाऊन फस्त करित असतात. कारण नरमांस हे तर राक्षसांच्या उपजिविकेचे साधनच होय.मानवजातीचा केवढा भयानक संहार या दुष्ट सवयींच्या लोकांनी चालवला असेल."
रावणाची बहीण शूर्पणखेच्या सन्मानाला धक्का लागला म्हणून रावणाने युद्ध केलं अशी फेकाफेकी केली जाते. त्याच बहिणीशी तो कसा वागला याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. शूर्पणखेचं पाळण्यातलं नाव मीनाक्षी असं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यावर तिने दुष्टबुद्धी/विद्युतजिव्हा या असुराशी रावणाच्या परवानगी शिवाय विवाह केला. दुष्टबुद्धी हा महत्वाकाक्षी असल्याने रावणाला असा संशय होता की शूर्पणखेशी विवाह करण्यामागे दुष्टबुद्धीचा रावणाचे राज्य हडप करण्याचा उद्देश असावा, म्हणून त्याने प्रथम या विवाहाला आक्षेप घेतला. मात्र पत्नी मंदोदरीने त्याला बहिणीच्या इच्छेचा मान राखण्याविषयी विनवलं तेव्हा त्याने या विवाहाला मान्यता दिली. असे जरी असले तरी त्याच्या मनात राग खदखदत होताच. पुढे रावणाने दुष्टबुद्धीवर हल्ला करुन त्याला ठार मारलं. याला आपण आजच्या काळात काय म्हणतो बरं? बरोब्बर, हॉनर किलिंग. बहिणीच्या नवर्याची हत्या करणारा रावण तुम्हाला महात्मा आणि आदर्श भाऊ वाटतो?
यामुळे साहजिकच कृद्ध झालेली शूर्पणखा सूडाने खदखदू लागली. आपल्या नवर्याची हत्या करणार्या भावाचा सूड घेण्यासाठी ती तडफडू लागली. अशात इकडे तिकडे भटकत असताना तिला राम व लक्ष्मण हे रघुकुळातले वीर पुरुष दिसले व तिच्या मनातल्या रावणाविषयीच्या सूडभावनेने आता एका षडयंत्राला जन्म दिला. आधी राम व नंतर लक्ष्मणावर अनुरक्त झाल्याचे दाखवणार्या शुर्पणखेने सीतेवर हल्ला करताच लक्ष्मणाने तिला रोखून तिचे नाक कापले. शूर्पणखेने याची तक्रार आधी तिचा एक भाऊ खर या राक्षसाकडे केली. खर आणि दूषण हे दक्षिण भारतात रावणाचे राज्य राखत असत. या दोन राक्षसांनी राम व लक्ष्मणावर हल्ला केला असता राम व लक्ष्मण या दोघांनी त्यांचे सहजपणे पारिपत्य केले. रावणाचे राज्य थोडे थोडे कुरतडले जाण्याने आनंदीत झालेली शूर्पणखा आता रावणाकडे राम व लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली. आता मात्र रावण भडकला, कारण राम व लक्ष्मणांनी "त्याच्या राज्यात घुसखोरी करुन त्याच्या बहिणीला विद्रूप केलं होतं आणि मग खर आणि दूषण या भावांना ठार मारलं होतं." आत्तापर्यंत शूर्पणखेच्या सन्मानाशी काहीही कर्तव्य नसणारा रावण त्याच्या राज्यावर झालेल्या हल्ल्याने मात्र चिडला व त्याने रामपत्नी सीतामातेचे हरण केले. पुढे जे घडलं ते सर्वविदीत आहेच त्यामुळे ते सांगत बसत नाही.
रावणाच्या वासनांधते विषयी आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा हिमालयात फिरत असताना रावणाला ब्रह्मर्षी कुशध्वज यांची कन्या वेदवती दिसली. मुळातच स्त्रीलंपट असणारा रावण तिच्यावर लट्टू झाला नसता तरच नवल होतं. तिला बघताच रावणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व तिला अविवाहित राहण्याचे कारण विचारले. तिने रावणाला सांगितले की तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्याचा माझ्या पित्याचा मानस होता. हे कळताच माझी अभिलाषा बाळगणार्या एका दैत्यराजाने माझ्या वडिलांची हत्या केली. त्याने दु:खी झालेल्या माझ्या मातेनेही त्यांच्या मागे आपला जीव दिला. तेव्हा पासून माझ्या पित्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी श्रीविष्णूची आराधना करत आहे. हे ऐकताच अनाथ व 'उपलब्ध' असलेल्या वेदवतीला रावणाने 'त्याची' होण्याविषयी विनवणी करण्यास सुरवात केली. पण वेदवती मनाची पक्की होती. तिने रावणाला साफ नकार दिला. रावणाने तिचे केस पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच वेदवतीने स्वतःचे केस कापून टाकले व अग्नीत प्रवेश केला. आणि मरता मरता रावणाला शाप दिला की मी आता मृत्यू पावते आहे पण पुन्हा जन्म घेऊन तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेन.
इथून पुढे वेदवतीविषयी काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका गोष्टीत अग्नीत प्रवेश केलेल्या वेदवतीला अग्नीदेवांनी वाचवून स्वतःच्या घरी सांभाळ केला. पुढे रावण सीतेला पळवून घेऊन जात असताना सीतेच्या जागी वेदवतीला ठेऊन रावणाला फसवलं आणी सीतेला स्वतःच्या घरी ठेवलं. पुढे सीतेनेच रामाला ही गोष्ट सांगून वेदवतीचाही पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा आग्रह केला तेव्हा रामाने तो एकपत्नीव्रता असल्याचे सांगून त्याला नकार दिला. तेव्हा वेदवतीने पुन्हा अग्नीत प्रवेश केला. पुढे एका जन्मात पद्मावती म्हणून पुनर्जन्म झालेल्या वेदवतीशी विवाह करुन श्रीविष्णूने श्रीनिवासरूपात तिच्या पित्याच्या इच्छेचा मान राखला.
अशीही गोष्ट सांगितली जाते की वेदवतीच सीतेच्या रूपात जन्म घेऊन रावणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. काय आहे की मी जसा त्या काळात नव्हतो तसेच रामावर वाट्टेल ते आरोप करणारे हिंदू द्वेषीही नव्हते आणि त्यांनी पसरवलेले ढकलसंदेश खरे मानून चालणारे भोळसट लोकही.
त्यामुळे सख्ख्या बहिणीच्या नवर्याची संशयावरुन हत्या करणारा आणि दिसेल त्या सुंदर स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न किंवा प्रत्यक्ष बलात्कार करणारा रावण हा आजच्या बहिणींचा आदर्श कसा असू शकतो हे माझ्या अल्पबुद्धीच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे.
त्याची तूलना करायचीच तर आजकालच्या बिल क्लिंटन, टायगर वुड्स किंवा तत्सम बाईलवेड्या एतद्देशीय बलात्कार्यांशी करता येईल. सत्ताप्राप्तीसाठी खुर्ची राखण्यासाठी जीवाचं रान करणार्या अनेक आधुनिक स्वयंघोषीत जाणत्या राजांशी करता येईल. अनेक मोहात पाडतील असे प्रसंग आले असतानाही शेवटपर्यंत एकपत्नीव्रत पाळणार्या रामाशी नक्कीच नाही.
वाचकहो, एक मोठे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचले जात आहे. जे जे भारतीय, ते ते कसे टाकाऊ हे सिद्ध करण्याचा व ते निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक सण आला की तो सण कसा प्रदूषण पसरवतो, नैसर्गिक साधनांचा र्हास कसा करतो हे सांगणारे संदेश सोशल मिडियावर फिरू लागतात. मग भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम, कृष्ण, यांच्यावर चिखलफेक सुरू होते. इतकंच नव्हे तर डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या देवमाणसाबद्दलही "बाँब डॅडी" आणि संघाचा युद्धखोर अजेंडा पुढे चालवणारे भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीचे पुरस्कर्ते असेही घृणास्पद आरोप केले जातात. विश्वास बसत नसेल तर राजदीपपत्नी सागरिकाच्या नावाने आंतरजालावर शोधा. हीच गत सचिन तेंडुलकरने आपल्या उद्योगपती मित्राचे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पर्रीकरांकडे शब्द टाकण्याची कंंडी पिकवणे असो किंवा अमिताभ बच्चनचे नाव पनामा पेपर्स मधे येण्याची.
दुर्दैवाने आपल्या भारतीय लोकांची एक वाईट सवय आहे. आत्मक्लेषाची. आत्मपीडेची. या बद्दल डॉक्टर सुबोध नाईक यांनी लिहीलेला एक परिच्छेद उद्धृत करु इच्छितो: "स्वतःमध्येच तुमचा परीक्षक असणे हे तसे तुमच्या प्रगतीसाठी खूप छान आहे. पण तुमच्यामध्ये असलेला समीक्षक हा कधी तुमचे मूल्यमापन करता करता तुमचे अवमूल्यन करायला लागतो हेच तुम्हाला बऱ्याच वेळा समजत नाही. तुमच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही फक्त आणि फक्त टीकाच करता. "माझ्याजवळ काहीही चांगले नाही, मी कधीही चांगला नव्हतो" असा तुमचा विश्वास ठाम होत जातो. स्वतःची टीका, स्वतःचे अवमूल्यन केल्याशिवाय तुम्हाला बरेच वाटत नाही. एका अर्थाने तुम्ही आत्मक्लेषक (masochist) बनता आणि तिथेच तुम्ही संपता. ब्रह्मदेव सुद्धा मग तुम्हाला मदत करू शकत नाही.
हे जसे वैयक्तिक झाले तसे हे राष्ट्राचेही होते."
अहो ते प्रभू रामचंद्र साक्षात मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्या पायाच्या नखांची सरदेखील आम्हाला येणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आत्मक्लेषास प्रवृत्त करणार्या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देऊ नका. रामाच्या आडून हिंदूंच्या श्रद्धा-आस्था यांवर बंदूक चालवू बघणार्या शक्तींना बळ देऊ नका.
सहज जाता जाता सांगतो, शंबूक वधाची गोष्टदेखील मूळ रामायणात नाही !
सहज जाता जाता सांगतो, शंबूक वधाची गोष्टदेखील मूळ रामायणात नाही !
संदर्भः
१) वाल्मीकी रामायण
२) वैद्य परीक्षित शेवडे, डोंबिवली
३) रामायणाशी संबंधीत अनेक स्त्रोत
४) चंद्रशेखर साने
© मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ११, शके १९३८