Tuesday, July 14, 2020

केप फियर: तिटकाऱ्याची परिसीमा

Cape Fear नावाचा इंग्रजी सिनेमा आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्याखाली १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला मॅक्स हा त्याच्या वकीलाच्या मागे लागतो. खटल्या दरम्यान वकिलाने काही पुरावे दडवल्याने त्याची शिक्षा कमी होऊ शकणार असते ती झालेली नसते. कदाचित मॅक्स निर्दोष सुटू शकला असता ते ही अर्थातच होऊ शकलेलं नसतं.  

तुरुंगात वकिली शिकलेल्या मॅक्सच्या मनात यामुळे त्याच्या सॅम बावडेन या वकिलाबद्दल इतका द्वेष भरलेला असतो की तो त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मागे अत्यंत भयानकपणे लागतो. 

मॅक्स म्हणजे रॉबर्ट डी निरोची संवादफेक इतकी प्रभावी आहे की आपण अनेकदा डोकं धरून बसतो. आपल्या छातीतली धडधड शेवटपर्यंत थांबत नाही. सॅम इतका बोलतो, इतका बोलतो की अगदी चित्रपटाच्या शेवटी मॅक्स केडी बोटीबरोबर जखडला गेल्याने नदीत ओढला जातो त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सतत बोलत, गरळ ओकत असतो. 

हा कधी एकदाचा मरतो आणि याची कारस्थाने थांबतात आणि याचं बोलणं बंद होतं असं आपल्याला वाटत राहतं. 


Robert De Niro in White Shirt and Cap With Nick Nolte in Cape Fear ...

रॉबर्ट डी निरोच्या अफलातून अभिनयासाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा.


🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसास्वादक, 📗 पुणे ग्रीनकार्ड होल्डर 


Monday, July 13, 2020

देवाचिये द्वारी गुदमरे जीव

खूप पूर्वी 'दी ओमेन' नावाचा एक इंग्रजी हॉरर सिनेमा बघितला होता. त्यात जन्माला आल्यावर थोड्याच वेळात बाळ मृत झाल्याने हॉस्पिटलचा फादर त्या बाळाच्या वडिलांना म्हणजे रोबर्टला गुप्तपणे दुसरंच बाळ त्याचंच आहे असं त्याच्या बायकोला म्हणजे कॅथरीनला भासवत दत्तक घ्यायला लावतो. ते बाळ म्हणजे डेमियन (संपूर्ण कथा नेटवर उपलब्ध आहे म्हणून इतकंच सांगतो की डेमियन हा अँटीख्राईस्ट/माणूस नसलेला/सैतान/वगैरे असतो). 

डेमियनला एकदा रॉबर्ट आणि कॅथरीन त्याला चर्चमध्ये घेऊन जायला म्हणून निघतात. जसेजसे ते चर्चच्या जवळ येतात तसतसा डेमियन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतो आणि शेवटी तो इतका हिंसक होतो की त्याला परत घरी घेऊन जावं लागतं.

आज ग्रेगरी पेकचा एक दुसरा सिनेमा बघताना हा सिनेमा सहज आठवला. अगदी सहज.

https://youtu.be/LO3KlIShoHo

देवाचिये द्वारी गुदमरे जीव
दिशा चुकलेल्या मनुष्याचा

🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसस्वादक, 📗 पुणे ग्रीन कार्ड होल्डर

Friday, July 10, 2020

विकास दुबेच्या निमित्ताने

विकास दुबे अमुक पक्षाचा समर्थक आणि अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मारणार नाहीत असा दावा करणारे आता त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठोकल्यावर म्हणत आहेत की त्याने तोंड उघडू नये म्हणून मारलं. अशी डबल ढोलकी सगळीकडे आहेत.

मला सांगा, असं आजवर किती वेळा झालंय की कुख्यात गुंड किंवा गुन्हेगार कोर्टात उभा राहिला आणि त्याच्या साक्षीने नेते मंडळी तुरुंगात गेली आहेत? शून्य!

तेलगीला विसरलात का? नार्को टेस्टमध्ये ज्या कुणाचं नाव घेतलं होतं त्याने तो गेला का आत? अबू सालेम ने नावे तरी घेतली का? हे तर गुन्हेगारी आणि खंडणीखोरीचा दैदिप्यमान इतिहास असलेलं उत्तर प्रदेश आहे जे आता कुठे योगीजींच्या ताब्यात आलंय.

हिंदू डॉन वगैरे ठीक आहे पण यातून दोन प्रश्न उद्भवतात: (१) आजवर त्याने हिंदुत्वासाठी काय केलं?
(२) पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी? असं करणाऱ्या कुणाचीही अशीच अवस्था व्हायला हवी. (गंमत अशी की हिंदू डॉन नेहमी आपल्याच लोकांचे शोषण करतो तर म्लेंच्छ डॉन आपल्या लोकांचा जास्तीत जास्त फायदा आणि काफिरांचे शोषण होईल असे बघतो. त्यामुळे हा मुद्दाही निकालात निघतो. पण तो विषय जरासा वेगळा आणि मोठा आहे, पुन्हा केव्हातरी.)

सर्वांना सारखा न्याय हवा हे मान्य. पण तो हिंदू होता म्हणून मारला, ब्राह्मण होता म्हणून मारला अशी बकवास करायची हौस असेल तर त्यांनी लवकर मानसोपचार घ्यावेत.

गुन्हेगारांच्या मागच्या खऱ्या चेहऱ्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे किंवा ते पकडले गेले पाहिजेत वगैरे बरोबर आहे पण आधी हे लक्षात घ्या की या खऱ्या चेहऱ्यांना आपणच निवडून देतो आणि योग्यतेपेक्षा कितीतरी मोठं करतो. मूल्यांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्व देतो. मग यांच्या नावावर साधी एक चारचाकी गाडी नसते पण संपूर्ण राज्याला वेठीला धरण्याइतके उपद्रवमूल्य ते नक्कीच बाळगून असतात आणि खरोखर प्रामाणिक व काम करणाऱ्या माणसांना जातीवरून, शरीरयष्टीवरून, घरातल्या महिलांवरून टोमणे मारून आणि इतर सर्व मार्गांनी टोचून टोचून हैराण करतात. याला लोकच जबाबदार आहेत.

🖋️ मंदार दिलीप जोशी
📃 रोखठोक
आषाढ कृ ५, शके १९४२