Friday, April 27, 2018

प्रथम तुज पाहता

प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. सीतामाईंना बघितल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांची अवस्था ही काहीशी अशीच झाली होती. त्या वेळी गौरीपूजनाला सीतामाई उद्यानात आल्या होत्या. अशा वेळी उद्यानात फिरणार्‍या प्रभू रामचंद्र व त्यांचे धाकटे भ्राता लक्ष्मण यांना सीतामाईंच्या एका सेविकेने बघितले आणि सीतामाईंकडे येऊन हर्षभरित भावाने दोन्ही बंधूंचे वर्णन केले. आपल्या त्या सेविकेकडून त्या अयोध्येच्या राजकुमारांचे वर्णन ऐकल्यावर सीतामाई आपल्या सख्यांसह प्रभू रामचंद्रांना बघण्यास आतुर झाल्या.

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि। कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही। मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥1॥

सीतामाई आणि त्यांच्या सेविकांच्या वावराने त्यांच्या बांगड्या, कंबरपट्टा, आणि पैंजणांचा आवाज ऐकून प्रभू रामचंद्रांचं लक्ष तिकडे गेलं. त्या वेळी झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या अवस्थेचं वर्णन गोस्वामी तुलसीदास असं करतातः

अस कहि फिरि चितए तेहि ओरा। सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल। मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥2॥

सीतामाईंच्या मुखचंद्राकडे बघण्याकरता प्रभूंच्या नेत्रांनी चकोर आकार धारण केला आणि ते सीतेकडे स्थिर दृष्टीने पाहू लागले, जणू निमी (राजा जनकाचे पुर्वज) (ज्यांचा निवास मानवाच्या पापण्यात आहे असे मानतात) यांनी मुलगी आणि जावई यांच्यात हा प्रसंग घडत असताना आपण तिथे उपस्थित राहू नये असे वाटून संकोचाने पापण्यांचा त्याग केला आणि त्यामुळे (हलक्या झाल्याने) प्रभू रामचंद्रांच्या पापण्या न मिटता त्या स्थिर राहून ते सीतामाईंकडे एकटक पाहू शकले.

देखि सीय शोभा सुखु पावा। हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई। बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥3॥
सुंदरता कहुँ सुंदर करई। छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी। केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥4॥
सिय शोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥230॥
तात जनकतनया यह सोई। धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं। करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥1॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा। सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता। फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥2॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥3॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी। नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं। ते नरबर थोरे जग माहीं॥4॥

सीतामातेच्या सौंदर्याचे वर्णन मात्र प्रभू रामचंद्र उघड बोलून दाखवत नाहीत. पण ते लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, हीच ती जनककन्या सीता जिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याची कठीण अट आहे. या सीतेला पाहून माझ्या मनात जे चालले आहे त्याचे कारण त्या विधात्यालाच ठावूक, पण हे लक्ष्मणा, माझी ऊजवी पापणी मात्र फडफड करते आहे. पण रघुवंशात जन्म घेतलेल्यांचा हा स्वभावच आहे की ते स्वप्नातही परस्त्रीवर (जी विधिवत आपली झालेली नाही ती) लालसायुक्त दृष्टी ठेवत नाहीत. इथे गंमत पहा, आपल्याला विश्वामित्र ऋषींनी इथे का आणलं आहे याची या दोघांना कल्पना आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या पराक्रमाबद्दल खात्रीही आहे की आपण शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा नक्की चढवू आणि सीतेला पत्नी म्हणून प्राप्त करु. पण त्यांना आपण थोर अशा रघुकुलातले आहोत याची जाणीव आहे आणि त्या कुलाची मर्यादाशील परंपरा राखायची आहे म्हणून आपल्या भावना ते नियंत्रणात ठेऊ इच्छितात.

चितवति चकित चहूँ दिसि सीता। कहँ गए नृप किसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी। जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥1॥

आता सीतामाईंना त्यांच्या सखीने प्रभूंचे वर्णन करुन दोघांच्या दिशेने आणलं खरं पण सीतेला राम दिसेना. आपल्या लहानशा मृगनयनांनी सीतामाई प्रभूंना शोधू लागल्या.

लता ओट तब सखिन्ह लखाए। स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने। हरषे जनु निज निधि पहिचाने॥2॥

त्यांची ही अवस्था न बघवल्याने शेवटी सख्यांनी त्यांचे लक्ष प्रभू व भ्राता लक्ष्मण जिथे होत तिथे वेधून घेतलेच. वेलींच्या आडून प्रभूंचा चेहरा दिसताच सीतामाईंच्या डोळ्यांत अतीव समाधान दाटलं, की जणू त्यांना त्यांचा खजिनाच मिळाला असावा.

थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी। सरद ससिहि जनु चितव चकोरी॥3॥
लोचन मग रामहि उर आनी। दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी। कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥4॥

सीतामाईंचे डोळे आता प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहू लागले. ते रूप डोळ्यांच्या मार्गे हृदयात साठवून घेत तो खजिना बाहेर पडू नये म्हणून की काय सीतामाईंनी डोळे मिटून घेतले.

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
तकिसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाई॥232॥

(इतक्यात एकमेकांशी बोलता बोलता) दोघे बंधू वेलींच्या आडून बाहेर आले. ढगांच्या आडून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे चंद्रदर्शन होते तसेच ते दृश्य होते. प्रभू रामचंद्रांचे सौंदर्य व पराक्रमी व्यक्तिमत्व सीतामाईंना मोहित करुन गेले.

सकुचि सीयँ तब नयन उघारे। सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा। सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥2॥

पण त्याच वेळी आपल्या पित्याने आपल्याशी लग्न करायला ठेवलेली अट आठवून सीतामाई घाबरल्या. प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावर कितीही विश्वास असला तरी मन चिंती ते वैरी न चिंती असे वाटणे साहजिकच होते.

परबस सखिन्ह लखी जब सीता। भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली। अस कहि मन बिहसी एक आली॥3॥

पण अशा प्रकारे बराच वेळ उद्यानात घालवल्याची जाणीव झाल्यावर सीतामाईंची अशी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात मुग्ध झालेली अवस्था पाहून सख्या घाबरून म्हणाल्या की आता फारच उशीर झाला बाई. सीतामाईंना पाहून एका सखीला मात्र चेष्टा करण्याची हुक्की आली. ती म्हणते कशी, आपण उद्या पुन्हा याच वेळी इथे येऊ.

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी। भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने। फिरी अपनपउ पितुबस जाने॥4॥

आणि प्रभू रामचंद्रांना बघण्यात आपण खूपच वेळ घालवला हे लक्षात आल्याने आता आई काय म्हणेल या भीतीने सीतामाईंचा जीव कासावीस झाला आणि त्या प्रभू रामचंद्रांची छबी आपल्या हृदयात साठवून आपल्या राजवाड्यात परतल्या.

म्हटलं होतं ना, 
प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन तुलसीदासच करू जाणोत.

बोला, जय श्री राम !

- मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. नवमी, शके १९३९


Saturday, April 21, 2018

कठुआच्या निमित्ताने मतदानावर बहिष्कार घातक

सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही - अशा अर्थाची पोस्ट ज्याने पहिल्यांदा लिहीली तो इसम चपलेने बडवून काढण्याच्या लायकीचा आहे.

ही पोस्ट ज्या भोळसटपणे** काही महिलावर्गाने पोस्ट केली त्यांना माझा कोपरापासून नमस्कार.

NOTA चा प्रचार कमी पडतो आहे असं वाटलं म्हणून आता कठूआ आणि उन्नाओ प्रकरणाचा फायदा घेऊन टाळूवरचं लोणी खाणारेच हा धंदा करत आहेत.

मतदान न केल्याने काय होणार आहे ते आपण आता पाहू.

आपण लोकशाहीत राहत असल्याने तुम्ही मतदान केलं नाहीत तरी निवडणुका व्हायच्या थांबणार नाहीत.

मतदान करणार नाही असं "माझी झांशी मी देणार नाही" या आवेशात ज्या म्हणत आहेत त्यातल्या बहुतेकांनी मोदी सरकारला मत दिलेलं आहे. मी हे ठामपणे म्हणू शकतो की हे सरकार त्याच्या सर्व गुणदोषांसकट काँग्रेस व त्याच्या भेळपुरी सरकारांच्या हजारो पटींनी चांगले आहे. असं असताना मतदान न केल्याने फक्त मोदी सरकारची अर्थात भाजपची मते कमी होतील आणि पुन्हा इटालियन मम्मी प्रणित काँग्रेस पुरस्कृत सरकार सत्तेवर येईल. मग कर्नल पुरोहित वगैरेंवर जे झालं ते सामान्य नागरिकांवर सुरु होईल. हिंदूंचं जगणं सद्ध्या मुश्कील असेल तर तेव्हा ते अशक्य होऊन बसेल. विचार करा, मतदान करु नका असं आवाहन करणार्‍या लोकांना कुणाच्याही अब्रूची पडलेली नाही. त्यांना फक्त या घटनांचा फायदा घेऊन मोदी सरकार खाली खेचायचे आहे आणि परत जनतेला आणि हिंदूंना छळायला सत्तेत यायचे आहे. आणि ते सत्तेत आल्यावर नक्की असं म्हणणार आहेत की "तुम्ही तर मतदान केलंच नाहीत, आम्ही कशाला तुमचे प्रश्न सोडवू".

खात असलेल्या अन्नाला चव नाही म्हणून ते टाकून तुम्ही शेण खाणार का? तसं असेल तर खरंच मतदान करु नका.

पण भावनेच्या भरात एका देशविघातक लांडग्याने केलेले घातक आव्हान भोळसटपणाने** आपल्या टाईमलाईनवर शेअर करु नका. हलकट लोकांनी टाकलेल्या वैचारिक शेणाचे पो आपल्या भिंतींवर थापू नका - दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. परमेश्वराने डोक्यावर जो अवयव बसवला आहे त्याचा उपयोग करा आणि काहीही पोस्ट करण्याआधी सांगोपांग विचार करा.

माझं म्हणाल तर मी २०१९ मधे कमळावरच बटन दाबणार आहे. फिर एक बार, मोदी सरकार.

© मंदार दिलीप जोशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155670347982326&id=652482325

**बावळटपणा म्हणणार होतो, पण जाऊदे म्हटलं आणि भोळसटपणे हा शब्द वापरला.

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma