Thursday, July 14, 2016

पंडित नामा - २: अशोक कुमार काजी

अशोक कुमार काजी जन्मः अज्ञात | हत्या: २४ डिसेंबर १९९० नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांवर वाघ कसे शिकार करतात ते बघितलंय कधी? ते मुके प्राणी सुद्धा सावज एकदा तावडीत सापडलं की आधी त्याच्या नरडीचा घोट घेतात. त्याला जितक्या लवकर ठार मारता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शत्रूला संपवणे किंवा आपली भूक भागवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. एखाद्याच्या क्रूरतेबद्दल वर्णन करताना आपण अनेकदा त्याला जनावरांची उपमा देतो. ते किती चुकीचं आहे हे या प्राण्यांचं फक्त निरीक्षण केल्यास आपल्याला सहज लक्षात येईल. श्रीनगर मधल्या टांकीपोराचे रहिवासी असलेले अशोक कुमार काजी हे सामाजिक कार्याची आवड असलेले अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सरकारी कर्मचारी होते. समाजातल्या सर्व स्तरांच्या समस्या सोडवण्यात त्यांना रस असे. समाजकार्याच्या याच आवडीतून त्यांचे श्रीनगरमधील सर्व स्तरातील लोकांशी ओळखी व संपर्क प्रस्थापित झाले होते. सर्व जातीधर्मांचे लोक आपल्या समस्या सोडवायला आवर्जून त्यांच्याकडे जात. जबरदस्त संघटन कौशल्य असणारे अशोक कुमार काजी यांनी श्रीनगरमधील एक सामाजिक संघटनेमार्फत समाजकार्य सुरु ठेवलं होतं. काश्मीर मधला नुकताच सुरू झालेला हिंसाचार पंडितांना लक्ष्य करणारा आहे हे लवकरच स्पष्ट झालेलं होतं. या हिंसाचारा विरोधात त्या संघटनेने थेट अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना जाब विचारण्याचं धाडस केलं होतं. आणि हेच धाडस श्री अशोक कुमार यांच्या हत्येला कारणीभूत ठरलं. संघटनेच्या या कृत्याचा बदला इस्लामी अतिरेक्यांनी श्री अशोक कुमार यांना संपवून घेण्याचं ठरवलं. त्या वेळी साधारण तिशीत असणारे श्री अशोक कुमार एके दिवशी नेहमीप्रमाणे बाजारहाट करायला बाहेर पडले. त्यांची खरेदी सुरू असतानाच त्यांना एका मुस्लीम टोळक्याने त्यांना घेरलं. काय होतंय हे लक्षात यायच्या आत त्यांनी अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळ्या घातल्या. भयंकर वेदनांनी कळवळत ते खाली कोसळले. आजूबाजूचे सगळे दुकानदार आपल्या ओळखीचेच आहेत, ते आपल्या मदतीला येतील, त्या अतिरेक्यांना रोखतील अशा भाबड्या आशेने त्यांनी त्या दुकानदारांना व इतर ओळखीच्या लोकांना मदतीसाठी आर्त हाका मारायला सुरवात केली. पण आत्तापर्यंत आपण आपल्या समस्या ज्या भल्या माणसाकडे घेऊन जात होतो, ज्या माणसाबरोबर आपलं रोज संवाद व्हायचा, त्या माणसाला मारू नका अशी साधी विनंती करण्याचंही सौजन्य तिथल्या एकाही मुस्लीम व्यापार्‍याने दाखवलं नाही. कारण हे अतिरेकी म्हणजे इस्लामसाठी लढणारे धर्मयोद्धे असल्याने त्यांनी अशोक कुमार यांचा जीव घेण्याचा पूर्ण अधिकार होता अशी त्या दुकानदारांची ठाम समजूत होती. त्यामुळे जणू काही घडतच नाही आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे व्यवहार सुरु ठेवले. आपला कुणीच विरोध करत नाही हे पाहून या नराधमांचं नेतृत्व करणार्‍या बिट्टा कराटे या त्यांच्या म्होरक्याला आता चेव आला. वेदनांनी तडफडत असणार्‍या अशोक कुमार यांच्या भोवती फेर धरत त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. अशोक कुमार यांच्या तोंडातून वेदनेने येणारा प्रत्येक आवाज हा बिट्टा व त्याच्या साथीदारांचा जल्लोष आणखी वाढवत होता. आता त्यांनी हातांनीच अशोक कुमार काजींचे केस उपटायला आणि त्यांच्या थोबाडीत द्यायला सुरवात केली. मग एकाएकी संतापाने ते सगळे त्यांच्या तोंडावर थुंकले. आता त्यांच्यापैकी एकाला आणखी एक घाणेरडं कृत्य करावसं वाटलं. त्याने त्याच्या विजारीची चेन काढली आणि आपलं लिंग अशोक कुमार यांच्या समोर नाचवत त्यांच्यावर तो मुतला. हा प्रकार बराच वेळ चालला होता. एव्हाना अशोक कुमार यांच्या वेदनांनी कळस गाठला होता. आता कदाचित परमेश्वरालाच त्यांची दया आली असावी. अचानक दुरून पोलीसांच्या जीपचा सायरन ऐकून आला. आता मात्र तिथून काढता पाय घ्यावा लागेल हे बिट्टा व त्याच्या साथीदारांच्या लक्षात आलं. त्यांनी अशोक कुमार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांना त्या वेदनांपासून कायमची मुक्ती दिली, व विजेत्यांच्या थाटात आणखी जोरात जल्लोष करत आसपासच्या चिरपरिचित भागातून पलायन केलं. श्री अशोक कुमार यांची चूक काय? ते काश्मीरी पंडित होते. म्हणजेच ते हिंदू होते. त्यांना नुसतं ठार मारण्यात आलं नाही. त्यांना मुक्ती देण्याआधी इस्लामी अतिरेक्यांनी त्यांच्या वेदनांचा आनंद घेत त्यांचा होईल तितका अपमान करायची एकही संधी सोडली नाही. कारण त्यांना नुसतीच हत्या करुन पळून जाण्यात स्वारस्य नव्हतं, तर त्यांना अशोक कुमार काजींच्या वेदनांनी तळमळणार्‍या हाका काश्मीर खोर्‍यातल्या सगळ्या हिंदूंना ऐकवत दहशत निर्माण करायची होती. त्यांना हिंदूंना तुम्ही आता पळून गेला नाहीत तर तुमची ही हीच अवस्था होईल हा ठाम संदेश द्यायचा होता. आणि त्यात ते यशस्वी ठरले. पोलीस येऊन चौकशी करुन पंचनामा होईपर्यंत श्री अशोक कुमार यांचा मृतदेह तिथेच रक्ताळलेल्या बर्फात अनेक तास पडून होता. काश्मीरच्या तथाकथित आझादीच्या जिहादमधे आणखी एक हिंदू बळी गेला होता. काश्मीरमधल्या इस्लामी दहशतवादाचा एक बळी. श्री अशोक कुमार काजी. आता मला सांगा, यांच्यापेक्षा जनावरं कित्येक पटींनी बरी, नाही का? कारण मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. पुढची गोष्ट लवकरच. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. १०, शके १९३८ १४ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2016

पंडित नामा - १: गिरीजाकुमारी टिक्कू

त्यांच्यावर अन्यन्वित अत्याचार झाले. घरंदारं उध्वस्त करण्यात आली. तुम्ही इथून निघून जा, आणि तुमच्या मुली इथे सोडून जा अशा घोषणा ऐकून घ्याव्या लागल्या. दिलेल्या धमक्या खर्‍या करुन दाखवत त्यांच्या आयाबहिणींवर, मुलींवर, आणि बायकांवर निघृण बलात्कार करुन त्यांची त्याहून क्रूरतेने हत्या करण्यात आली. जे स्त्री-पुरुष गोळीने मेले, ते सुटले म्हणायचे अशा भयानक पद्धतीने क्लेष देत देत त्यांना अत्यंत वेदनादायी पद्धतीने हळू हळू मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलं. सीमेपलिकडच्या ओळखदेख नसलेल्यांनी तर घात केलाच पण वर्षानुवर्ष ओळख असलेल्यांनीही पाठीत खंजीर खुपसला. साडेतीन लाखाहून अधिक लोक देशोधडीला लागले......अहं...शब्द चुकला. आपल्याच देशात माणूस देशोधडीला कसा लागेल? पण तसंच काहीसं झालं खरं. उत्पन्नाचे स्त्रोत, जगण्याचे साधन, आणि साधनच काय जगण्याची परवानगीही त्यांना नाकारली गेली. आपल्याच देशात परक्यासारखं ट्रॅन्झीट कॅम्प मधे राहणं, अन्न-पाणी-निवार्‍याच्या शोधात भटकणं नशीबात आलं. आत्तापर्यंत ओळखलंच असेल तुम्ही मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आपलेच काश्मीरी पंडित. त्यांच्याच काही सत्यकथा सांगणार आहे. पण आधीच सांगतो. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. गोष्ट पहिली: गिरीजाकुमारी टिक्कू. जन्मः १५ फेब्रुवारी १९६९ | हत्या: ११ जून १९९० या महिलेबद्दल मी प्रथम फेसबुकवर वाचलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबाबत पूर्ण कल्पना असली, तरी फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरुन आलेल्या ढकलसंदेशात बर्‍यापैकी मसाला मिसळलेला असतो याची कल्पना असल्याने यात वर्णन केलेल्या तपशीलांवर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी जरा साशंकच होतो. पण ती पोस्ट एका मैत्रिणीला दाखवल्यावर तिने त्याची सत्यता पटवली. कारण तिच्याच कंपनीत गिरीजाचा भाचा की पुतण्या काम करत होता आणि त्याने या कथेची सत्यता प्रमाणित केली. एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा अंत होता होता काश्मीरात नुकताच हिंसाचार सुरु झाला होता. त्रेहगामच्या एका मुलींच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गिरीजाला कुणीतरी निरोप दिला की काश्मीर खोरे कायमचे सोडण्याआधी निदान तुझा पगार तरी घेऊन जा. ती शाळेत गेली, पगार घेतला, आणि मग तिच्या एका मुस्लिम सहकार्‍याच्या घरी काही कामानिमित गेली. तिच्या शाळेत जाण्यापासून ते मुस्लीम सहकार्‍याच्या घरी जाईपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर अतिरेक्यांकडून नजर ठेवली जात होती. त्या सहकार्‍याच्या घरी ती जाताच अतिरेकी त्या घरात घुसले आणि तिला घेऊन जाऊ लागले. यावर तिच्या मुस्लीम सहकार्‍यानेही काहीच आक्षेप घेतला नाही. जणू काही अंगणात घुसलेल्या एखाद्या वांड जनावराला त्याचा मालक येऊन घेऊन जातो आहे आणि ब्याद टळली असाच त्याचा आविर्भाव होता. इतरही कुणीच आक्षेप घेतला नाही. कारण ती हिंदू होती. काफीर होती. तिच्या शरीरावर त्यांची मालकी असणं इस्लाममधे धर्ममान्य होतं. ती त्यांची "मालमत्ता" होती. मग तिला विवस्त्र करण्यात आलं. तिच्यावर त्या अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक दिवस. आणि मग जिवंतपणीच त्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी तिच्या शरीराचे लाकडे कापण्याच्या करवतीने दोन तुकडे करुन मग तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तुम्हा आम्हाला तिला झालेल्या वेदनांची स्वप्नातही कल्पना करता येणं निव्वळ अशक्य आहे. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी आपण वेदनांनी किती कळवळतो ते आठवा. आणि मग कल्पना करा. आधी सामूहिक बलात्कार झाला आहे त्या स्त्रीवर. आणि मग लाकडे कापण्याच्या करवतीने शरीराचे दोन तुकडे. आपण एक वाकप्रचार वापरतो. एखादी फार वाईट घटना घडली की आपण म्हणतो, "शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये". इथे ती ज्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहत होती, ज्यांना मित्र समजत होती त्यांनीच शत्रू बनून तिच्यावर हे नृशंस अत्याचार केले होते. तिचा बळी घेतला होता. का? कारण ती काश्मीरी पंडीत होती. हिंदू होती. त्यांना म्हणे आझादी हवी होती. आझादीसाठी हिंसेचं समर्थन करायचंच झालं, तर हे असे अत्याचार कुठल्या मापदंडात बसवायचे? भारतालाही आझादी काही निव्वळ बिना खडग बिना ढाल मिळालेली नाही. आपल्याकडेही क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा आहे. पण असे अत्याचार तर सोडाच, त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. मग जे आपल्याच सोबत राहतात, आपले शेजारी-सहकारी आहेत, काश्मीरच ज्यांची मातृभूमी आहे, त्यांच्या अब्रूवर, जीवावर अशा प्रकारे राक्षसांनाही लाजवेल अशा पद्धतीने घाला घालण्याची ही कृत्ये कुठल्या क्रांतीकार्यात मोडतात? इस्लामी दहशतवादाने काश्मीरात अशा प्रकारे अनेक बळी घेतले. या महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचा योगायोगाने शोध लागला म्हणून ही गोष्ट पहिली लिहायला घेतली. तुम्हाला कंटाळा आला का? की अंगावर काटा आला? काही असो, आपल्याला हे सारं माहीत हवं. कारण हाताला लागल्यावर डोळ्यांतून पाणी येतं, तसं आपल्याच देशातील एका राज्यात आपल्याच बांधवांवर झालेले अन्यन्वित अत्याचार आपल्या अंतःकरणाला भिडायला हवेत. कारण एखाद्या अवयवाला झालेला कर्करोग जसा पूर्ण शरीरात पसरतो, तसा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी लांब कुठेतरी काश्मीरात सुरु झालेला दहशतवाद आता तुमच्या आमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. आता अतिरेकी फक्त सीमेपलिकडून काश्मीरात येत नाहीत. ते बोटीतूनही येतात. त्यांना आपल्यातच राहणारे अस्तनीतले हिरवे निखारे मदत करतात.आणि या अत्याचारांची लांबूनही झळ न लागलेले काही हिरवट पत्रमहर्षी अतिरेक्यांशी चर्चा करा असा फुकटचा सल्ला देतात. काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडताना त्यांनी सर्वस्व गमावलं असेल, पण स्वाभिमान सोबत होता. त्या जोरावर ते उभे राहीले. नोकरी केली. धंदा केला. देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून नाव कमावलं. पण आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या नावाखाली एकाही काश्मीरी पंडीताने, कुणाचीही हत्या करण्यासाठी बंदूक नाही उचलली. बंदूक सोडा हो रागाच्या भरात साधा दगड नाही उचलला भिरकवायला कुणाच्या अंगावर. त्यामुळे दहशतवादाला धर्म नसतो वगैरे भूलथापा माझ्यासमोर तरी नका ठोकू. हा सरळसरळ एका वंशाचा विच्छेद करण्यासाठी पेटून उठलेला इस्लामी दहशतवाद होता. आणि आहे. नावं वेगवेगळी असतील. पण आहे. आपल्याला हे सारं माहीत हवं. काश्मीरसाठी मोजलेली किंमत समजली की मग, "देऊन टाका एकदाचा तो काश्मीर" अशी मुक्ताफळं कुणी उधळणार नाही. कदाचित. पुढची गोष्ट उद्या. अहं... इतकी भयानक नसेल कदाचित.............कदाचित असेलही. बघा बुवा. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. ९, शके १९३८ १३ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------

Thursday, June 23, 2016

यस्य कस्य तरोर्मूलं

काल परवा व्हॉट्सॅपवर कोथिंबीर वापरून किडनी साफ करा अशा आशयाची एक पोस्ट वाचली त्या संदर्भात:

आपल्याकडे लोक पुन्हा आयुर्वेदाकडे व आजीबाईचा बटवा या प्रकाराकडे पुन्हा वळू लागले आहेत. पण आपल्याकडे लोकांच्या उत्साहाने उसळून वर यायला काही कळीचे शब्द (की वर्ड) - उदाहरणतः आयुर्वेदिक, organic, घरगुती, देशी उपचार, वगैरे - पुरेसे ठरतात.  हे शब्द दिसले रे दिसले की अतीउत्साहात 'आला मेसेज केला फॉरवर्ड' असं केलं जातं.

कोथींबीर काय, लिंबू काय, किंवा मध काय - या सगळ्याच गोष्टी आहारात असाव्यातच आणि योग्य प्रमाणात असाव्यात. पण त्याचा उल्लेख जेव्हा औषध म्हणून केला जातो तेव्हा त्याचा धोका आपल्याला जाणवायला हवा.

आयुर्वेदात शंभरपैकी शंभर वेळा प्रत्येक व्यक्तीला तपासूनच त्या व्यक्तीला योग्य ठरेल तो उपाय सुचवला जातो. तेव्हा एखाद्या वैद्याकडून एखादा उपाय एखाद्याला सुचवला गेला असेल तर त्याला सब घोडे बारा टक्के असा न्याय लावता येत नाही. त्या उपायात उल्लेख असलेला त्रास तुम्हाला असेल तर, पुन्हा सांगतो, तुमचा वैद्य तुम्हाला स्वतः तपासून मगच उपाय सुचवेल.

समजा तुम्ही तुमच्या वैद्याला न विचारताच तो प्रयोग केलात आणि त्याचा काहीही अपाय झाला नाही तरी त्याचा अर्थ तो औषध म्हणून सर्रास वापरायचा असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ एकच - तुम्हाला काहीही नुकसान झालेलं नाही.

बरं, असा संदेश पुढे ढकलायचाच असेल तर पुढील दोन गोष्टी कराच म्हणजे कराच.

(१) वैद्याकडून तो धोकादायक नाही याची खातरजमा करुन घ्या
(२) धोकादायक नसेल तर त्याचा उल्लेख औषध म्हणून न करता "माझे स्वतःवर केलेले घरगुती प्रयोग" अशा मथळ्याखाली पाठवा. आता तुम्ही म्हणाल की वैद्यांना आक्षेप नाही तर तुम्हाला काय त्रास आहे?

पण पुन्हा वरचा मुद्दा सांगतो. कुठलाही वैद्य तुम्हाला हे असे ढकलसंदेशातले उपाय, अपायकारक नसले तरी, इतरांना औषध म्हणून सांगा असं सांगणार नाही.

हे इतके पाल्हाळ लावण्याचा उद्देश असा की आजही अनेक जण असे संदेश वाचून घरगुती प्रयोग करतात आणि उपाय लागू पडला नाही की निराश होतात. क्वचित असा प्रयोग उलटला, तर तब्येतही बिघडू शकते.

आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात असं लोक म्हणतात, पण योग्य मार्गदर्शना अभावी अशा अघोरी प्रयोगाद्वारे काही गोष्टींचे सेवन केले गेले तरी जो इफेक्ट व्हायचा तो होतोच ना! नैसर्गिक रेचक असलेला एखादा पदार्थ घेतल्यावर डोकेदुखी उद्भवणार नाही कदाचित, पण लोटा परेड अंमळ वाढण्याचीही शक्यता आहेच की!

समारोप करता करता शाळेत संस्कृत शिकत असताना वाचलेला श्लोक आठवला, तो आठवेल तसा देतो आहे.

यस्य कस्य  तरोर्मूलं, येनकेनापि मिश्रितम् ।
यस्मै कस्मै प्रदातव्यं, यद्वा तद्वा भविष्यति ।।

अर्थातः कशाचे तरी मूळ कशात तरी मिसळून कुणालातरी दिले असता काहीतरी होते. (नाही का?)

तेव्हा, सावधान!

आपला तार्किक,

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ३, शके १९३८ | संकष्ट चतुर्थी