Thursday, March 2, 2017

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज

शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथीनुसार आहे म्हणून विरोध करणारी बिग्रेड तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या हिंदूंच्या गुढीपाडव्याला मात्र विरोध करायचा म्हणून धर्मवीर संभाजी महाराजंच्या बलिदानाला तिथीनुसार स्वीकारते.

ज्या म्लेंच्छ औरंग्याने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून हालहाल करून ठार मारले त्या विषयी गप्प बसणारी ब्रिगेड "गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी संभाजी महाराजांना मारले म्हणून ब्राह्मणांनी आनंदासाठी गुढीपाडवा हा सन सुरु केला" अशी हिंदू समाजात फूट पडण्यासाठी सातत्याने दरवर्षी अफवा पसरवते.

आदर्शहीन समाजाला संपवणे सहज शक्य असल्याने हिंदूंच्या आदर्शांबद्दल गैरसमज पसरवून विश्वास नष्ट करणे या हेतूने भारत/हिंदू विरोधी शक्तींच्या पूर्ण अंकित असलेल्या संभाजी ब्रिगेडचा हा डाव आहे. गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे त्याची कारणमिमांसा व त्या संदर्भातले पुरावे आपण पुढे पाहूच. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून  ‘गुढी’ हा शब्द याच मातीतला आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये  ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे; प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात हर्षोल्हास पसरला आणि त्या आनंदाच्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥

गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,

रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ अ.क्र.१९२.५ ॥

कृष्णाने कालियामर्दन केल्यानंतर त्याच्या मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,

पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।

आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥ ४५५५.१,२ ।।

त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,

नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥ ४५५६.१-५ ॥

संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचे सगळे अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहीले गेले होते. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.

आता संत ज्ञानेश्वर काय म्हणतात पाहू:

आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥

‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत:

१: आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे  (स्मृतिस्थळ ८३)
२: गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले  (स्मृतिस्थळ ८५)

 ‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे

घेत स्पर्शसुखाची गोडी श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढी रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।

राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पराभव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्‍हाडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.

उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो. सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चैत्र पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय. म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे.

या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो. गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे. गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्‍या मुकुटाचे प्रतीक असू शकते.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजराकरण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्‍यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असाशुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.

आता काही शिवकालीन पुरावे पाहू:

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.



३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!

केवळ जिज्ञासूंकरता:

चैतन्य/ऊर्जा प्राप्त करण्यास जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये जी प्रतीके निर्माण केली जातात त्या सगळ्यांत निमुळता भाग वर आणि रुंद भाग खालच्या दिशेला असतो. मंदिराचे कळस, पिरॅमिडस्, स्तूप इ. गुढी उभारताना तांब्या उलटा ठेवण्याचे कारणही हेच आहे.

मग मंगलकलश सरळ का ठेवतात? पुन्हा तेच कारण; कलशात नारळ ठेवला जातो. त्याचा टोकेरी/ निमुळता भागच वर असतो. शिवाय त्यात पाणीही असते. उलट्या तांब्यात पाणी भरता येत नाही हे सामान्य ज्ञान आहे!

विखारी असत्याला बळी न पडता पारंपरिक गुढीपाडवा साजरा करा!!

- मंदार दिलीप जोशी

संदर्भः
१. इतिहासाच्या पाऊलखुणा फेसबुक समूह (शिवराम कार्लेकर, कौस्तुभ कस्तुरे, इत्यादी)
२. अखिल भारतीय मराठा महासंघ (श्री. राजेंद्र कोंढरे, श्री. गुलाब गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे)
३) डॉ परीक्षित शेवडे

24 comments:

  1. धन्यवाद मंदार!

    अप्रतिम लेख.👏
    पुराव्यासह सणसणीत चपराक दिली आहे.

    - मंदार मोडक

    ReplyDelete
  2. अभ्यासपूर्ण पुरावे दिलेत आपण

    ReplyDelete
  3. क्षमस्व,पण आपण पुरावे दरवर्षी देतो.त्याने काही फरक पडतोय का?
    झोपेचे सोंग घेणार्यांना कसे उठवणार?

    ReplyDelete
    Replies
    1. खरं सांगायचं तर ज्यांना ऐकायचंच नाही ते ऐकणार नाहीत. परंतु अनेक जणांकडून संदर्भासहित पुरावे दिल्यावर सकारात्मक प्रतिसाद आहे. पण अशांचा आवाज हा अधिक बुलंद होण्याची आवश्यकता आहे,

      Delete
  4. धन्यवाद !! खूप सुंदर माहिती मांडलीत 🙏

    ReplyDelete
  5. धन्यवाद !! खूप सुंदर माहिती मांडलीत 🙏

    ReplyDelete
  6. अभ्यासपूर्ण माहिती !

    ReplyDelete
  7. खूप छान....आपण जेव्हा पुराव्यानिशी बोलतो तेव्हा आपल्याकडे कोणच बोट दाखवू शकत नाही

    ReplyDelete
  8. उत्तम लेख. छान माहिती

    ReplyDelete
  9. Simply desire to say your article is as astounding.
    The clearness in your put up is simply excellent and that i could think
    you are knowledgeable in this subject. Well together with your permission allow me to grasp your feed to keep up to date with
    coming near near post. Thanks a million and please continue
    the rewarding work.

    ReplyDelete
  10. My brother recommended I might like this blog.
    He was entirely right. This post actually made
    my day. You cann't imagine simply how much time I had spent
    for this info! Thanks!

    ReplyDelete
  11. गुढीपाडवा कधीपासुन साजरा करत असत हा विचार बाजुला ठेवला तर आपल्याला एक कसं समजत नाही कि हे भारतीय नववर्ष आहे. मग ते साजरं करायला काय हरकत आहे.आपण इंग्रजी वर्ष साजरं करायला १२ वाजेपर्यंत ढोसून तरं$$$ राहु शकतो.मग त्यावेली असा प्रश्न करत नाही हे नवं वर्ष कधीपासून साजरं करीत भारतीय लोक? राहिला प्रश्न गुढीच्या अर्थाचा व ती कशी उभारायची याचा. तर भारतीय संस्कृति ने कुणावरही बंधन घातले नाही.जो तो आपल्या विचार शक्तीनुसार ती उभारु शकतं.आपल्या संस्कृति च्या परंपरेला नाव ठेवण्यापेक्षा त्या परंपरेतला मतितार्थ जाणा.शत्रू बुद्धीने नाहीतर स्वविवेकी बुद्धीने.

    ReplyDelete
  12. Aapan bramhan aahat tyamule defend karnarach.

    ReplyDelete
    Replies
    1. इतका कोता विचार करु नका. मी हिंदू आहे म्हणूनच डिफेन्ड करतो आहे. हा सण फक्त ब्राह्मणांचाच नाही आहे. समस्त हिंदूंचा आहे.

      Delete
  13. मला फक्त एक मुद्दा मांडायचा आहे कि, रामाने परशूरामाचा पराभव केला तेव्हा गूढी उभारल्या होत्या आणि त्या फक्त ध्वज पताकाच होत्या. मग तशाच गूढी उभी करा ना. त्या वेळच्या ब्राह्मणांना माहिती असेलच ना गूढी कशी उभारावी ते. अशीच चालवा परंपरा ध्वज पताका उभी करून उगाच स्त्रीयांचे वस्त्र,उलटा कलश, कडूनिंब इत्यादी एवढी उठाठेव कशाला.

    ReplyDelete
    Replies
    1. मला फक्त एक मुद्दा मांडायचा आहे कि, रामाने परशूरामाचा पराभव केला तेव्हा गूढी उभारल्या होत्या आणि त्या फक्त ध्वज पताकाच होत्या. मग तशाच गूढी उभी करा ना. त्या वेळच्या ब्राह्मणांना माहिती असेलच ना गूढी कशी उभारावी ते.
      >>>
      त्या वेळी फक्त ब्राह्मणच होते का पृथ्वीतलावर? बाकी कुणीच नव्हते? कशावरुन तेव्हा आतासारखीच गुढी उभी केली नसेल?
      आणि गुढी काय फक्त त्याच प्रसंगी उभी केली होती? इतर नव्हे? तेव्हा धोतर नेसत असतील लोक तर आताही धोतरच नेसायचं का?

      स्त्रीयांचे वस्त्र हा स्त्रीयांचा सन्मान असतो म्हणून वापरतात गुढीत. त्याचे आणि कलश, कडूनिंब इत्यादी बाबींचे महत्त्व लेखात आणि इतरत्र तुम्हाला सापडेलच.

      लेख परत, आणि परत परत वाचा.

      मुख्य मुद्दा,

      जातीय चष्मा बाजूला ठेऊन लेख वाचला असतात तर असा प्रश्न पडला नसता.

      इतका कोता विचार करु नका. सण फक्त ब्राह्मणांचाच नाही आहे. समस्त हिंदूंचा आहे.

      Delete
    2. केवळ जिज्ञासूंकरता;

      चैतन्य/ऊर्जा प्राप्त करण्यास जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये जी प्रतीके निर्माण केली जातात त्या सगळ्यांत निमुळता भाग वर आणि रुंद भाग खालच्या दिशेला असतो.

      मंदिराचे कळस, पिरॅमिडस्, स्तूप इ. गुढी उभारताना तांब्या उलटा ठेवण्याचे कारणही हेच आहे.

      मग मंगलकलश सरळ का ठेवतात? पुन्हा तेच कारण; कलशात नारळ ठेवला जातो. त्याचा टोकेरी/ निमुळता भागच वर असतो. शिवाय त्यात पाणीही असते. उलट्या तांब्यात पाणी भरता येत नाही हे सामान्य ज्ञान आहे!

      विखारी असत्याला बळी न पडता #पारंपरिक_गुढीपाडवा साजरा करा!!

      Delete
  14. आपण जी परंपरा कित्येक पिढ्या जोपासत आहोत, त्याचा इतिहासही आपल्याला ठाऊक हवा. तो खूपदा ठाऊक नसतो, आणि मग कुठेतरी संदर्भहीन काहीतरी लिहिलेलं बुद्धीभेद करून जातं. किमान आपल्यापुरतं जरी हे ज्ञान पक्कं झालं, तरी बऱ्याच गोष्टी साध्य होतील. बाकी ज्यांना वाचूनही न वाचल्यासारखं करायची कला अवगत आहे, त्यांचा विचार सोडून देऊ. या अभ्यासपूर्ण लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. ही प्रतिक्रिया म्हणजे प्रगल्भ विचारांचा परिपाक आहे. प्रतिक्रिया अशा असतील तर लिहायला हुरूप येतो.

      Delete
  15. अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  16. सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete