Sunday, February 5, 2017

भन्साळी पॅटर्न


हे नक्की कुठून सुरू झालंय माहित आहे? भन्साळीचा पॅटर्न लक्षात घ्या.

गोलीयों की रासलीला रामलीला
आधी त्याने सिनेमाचं नाव ठेवलं राम लीला. मग बोंबाबोंब झाल्यावर नाव बदललं गोलीयों की रासलीला रामलीला. आता बघा, सिनेमाचं नाव आणि बदललेलं नाव या दोन्हीत त्याने प्रचंड लबाडी केली आहे. सिनेमाचं नाव इतर काहीही ठेवता आलं असतं. चित्रपटातला मसाला (किंवा शेण) लक्षात घेतलं तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातल्या कुठल्याही मसाला मारधाड चित्रपटाचं नाव उचललं असतं तरी चाललं असतं. उदाहरणत: आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार म्हणजे अक्षरशः काहीही. पण नाव काय ठेवलं? राम लीला. भारताचं सामूहिक आराध्य दैवत कोणतं? राजाधिराज रामचंद्र महाराज. मग त्यावरच हल्ला करा. तुम्ही अभिमान बाळगावा, भक्ती करावी, पूजा करावी, आदर्श जीवानाचा वस्तुपाठ घालून ध्यावा असं जे कुणी असेल त्यावरच घाला घातला जातो. रामाची भक्ती करता काय? तुम्हाला राम मंदिर बांधायचंय काय? थांबा एका थिल्लर नट, त्याहून थिल्लर नटी आणि अतिशय बकवास सिनेमाचं नावच रामलीला ठेवतो. का काय विचारता. अपमान? तो कसा काय? सिनेमातल्या हिरोंच नाव आहे ते. लीला नावाच्या हिरोईन बरोबरच्या त्याच्या लीला दाखवायच्या आहेत. मग नाव रामलीला ठेवलं तर बिघडलं कुठे?

बरं नाव बदलतानाही त्याने काय लबाडी केली आहे लक्षात आलंय का? गोलीयों की रासलीला रामलीला हे बदललेलं नाव. रासलीला हा शब्द कुणाशी संबंधित आहे? भगवान श्रीकृष्णांशी. बघा. रामलीला नाव ठेऊन एका गालावर थोबाडीत मारली. आणि मिळमिळीत विरोध बघून भन्साळीने तुमचं पाणी जोखलं आणि बदललेल्या नावाने दुसर्‍या गालावर पाच बोटं उमटवली. तुम्ही किती भेकड आहात हे त्याने एका उथळ सिनेमाच्या फक्त नावाशी खेळून तुम्हाला दाखवून दिलं. तुमचा विरोध लक्षात घेऊन नाव बदलतानाही तो तुमचा अपमान करायला विसरला नाही. आणि तुम्हीच त्याचा सिनेमा हिट केलात. वेडे रे वेडे.

बाजीराव-मस्तानी
हिंदूंवर हल्ला करुन झाला एका सिनेमात. आता पुढची पायरी म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाला तोडायचे प्रयत्न खूप पूर्वी सुरू झालेत. अगदी ऐंशीच्या दशकापासून. आणि ज्या क्लुप्त्या हिंदूंचा अपमान करण्यात वापरल्या जातात त्याच एक महत्त्वाचा फरक करुन मराठी माणसात भेदभावाची भावना रुजवण्यासाठी केले जातात. मराठा, दलित आणि ब्राह्मण यांना आपापसात झुंजवत ठेवायचं. काय बिशाद मराठी माणूस डोकं वर काढेल. आता या तीन वर्गातला फरक लक्षात घ्या. दलितांचा किंवा त्यांच्या प्रतीकांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान झाल्याचा नुसता संशय जरी आला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केली जाऊ शकते. या कायद्या अंतर्गत जामीन मिळू शकत नाही. शिवाय निदर्शनं आणि हिंसेची भीती आहेच. मराठा समाजाच्या प्रतीकांवर सिनेमा बनवायची कल्पनाही कुणी करु शकत नाही कारण ब्रिगेडसारख्या संघटनांची दहशत. मग ज्यांच्या प्रतीकांवर आणि आदरणीय पुरुषांवर हिणकस सिनेमा काढला तर कुणी ब्र सुद्धा काढणार नाही असं कोण? सगळ्यात उत्तम सॉफ्ट टार्गेट कोण? ब्राह्मण.

तुमच्यातला सगळ्यात पराक्रमी पुरुष कोण? आता यावर वाद होऊ शकेल पण त्यातही तुम्हाला ज्याची कमी माहिती आहे पण ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा माणूस मी निवडणार. श्रीमंत बाजीराव पेशवे. आणि त्याचा पराक्रम अत्यंत हास्यास्पद पद्धतीने रजनीकांत काय मारामारी करेल असा दाखवणार. तो कसा, तर एकदम एक माणूस आणि शेकडो सैनिक आणि बाणाचा वर्षाव कापत पुढे जाणारा सुपरमॅन. ते पण मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला बाजीराव एकटा सैन्यात घुसतो असं दाखवणार. म्हणजे बाजीराव हा इष्कात वेडा होऊन राज्यकारभाराला गुंडाळून ठेवणारा आणि सणक आल्यावर लढाई करणारा होता असं मी दाखवणार. मग पालखेडच्या संघर्षात अजिबात लढाई न करताही निजामाला शरण यायला लावलं ते नेमकं कसं हे दाखवून डोकं वापरावंच लागू नये. चाळीस लढाया कशा केल्या, काय डोकं वापरलं, मस्तानी किती वर्ष त्याच्या आयुष्यात होती वगैरे तपशील दाखवणारच नाही. निजाम वाघाला कुरवाळत बसलेला आणि बाजीराव तिरसटासारखा पाण्यात पाय मारत मारत चालत त्याला भेटायला गेलेला दाखवणार. तुमच्या विधवा लाल आलवणात असल्या तरी बाजीरावाची आई मात्र पांढर्‍या साडीत वेडाच्या भरात बडबडत आपलं बोडकं डोकं मिरवताना दाखवणार. त्याच्या बायकोला पायाचं दुखणं असतानाही नाचताना दाखवणार. बाजीराव वेडसर, त्यांचे चिरंजीव नानासाहेब तिरसट आणि खुनशी, नाचकाम करणारी बायको, डोक्यावर परिणाम झालाय असं वाटावं अशी आई... हे अस्संच सगळं मी दाखवणार. काय कराल तुम्ही? मी घरी बसून मस्त निदर्शनं बघतोय. एका चित्रपटगृहात सिनेमा बंद पाडल्याने मला काहीही फरक पडत नाही हो, तुमच्या दोन्ही गालांवर थोबाडीत आणि पार्श्वभागावर लाथ मारण्याचे पैसे मला केव्हाच मिळालेत. ते बघा सोशल मिडियावर जातीजातीत भांडणं कशी मस्त चाललीयेत. तुमच्या घरंदाज स्त्रीयांना पडद्यावर आंघोळ घातली, त्यांना नाचवलं. वरणभातवाले पुळचट कुठले. ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून मला हिंदूंनाच अपमानित करायचं होतं ते मी केलं. बाकीचे करतात तस्संच. हा हा हा.

पद्मिनी
आता पुढचं लक्ष्य दुसरी पराक्रमी जमात, राजपूत. तुमचं आराध्य दैवत झालं. जातीजातीत भांडणं लावून झाली. आता पुढची पायरी. तुमच्या आदरणीय स्त्रीयांवर हल्ला. कुठलंही युद्ध झालं की त्यातला एक अविभाज्य भाग म्हणज शत्रूच्या स्त्रीयांचा शीलभंग करणं, त्यांची इज्जत लुटून त्यांना नासवणं. मग हा प्रकार सिनेमाच्या माध्यमातून मानसशास्त्रीय युद्ध खेळताना कसा वर्ज्य?

असंख्य स्त्रीयांची अब्रू लुटणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर हल्ला केल्यावर आपल्या सैन्याचा पराभव दिसू लागताच त्याने आपल्याला स्पर्शच काय आपलं नखही त्याला दिसायला नको म्हणून हजारो....हो हजारो राजपूत स्त्रीयांबरोबर आगीत उडी घेऊन जोहार करणारी महाराणी पद्मिनी - तुमचा अपमान करायला याहून योग्य कोणती उमेदवार असणार?

अरे तुम्ही दोन थपडा मारल्यात, कॅमेरा फोडलात, चित्रपट निर्माण संचाला मारहाण केलीत, बस्सं! याहून जास्त काय करणार तुम्ही? मला या सगळ्याचे पैसे मिळालेत, मिळतील. माझ्या खिशाला अजिबात भोक पडलेलं नाही. लोकेशनवर नाही करु दिलंत तर जसं बाजीराव मस्तानी मधे केलं तसं कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरून राजस्थानी महाल उभे करीन. पण मी हा सिनेमा काढणार. तुमच्या छातीवर नाचणार. आणि हा सिनेमा तुम्हीच येऊन हिट कराल.

कारण माहित्ये? तुम्ही भेकड आहात. स्वार्थी आहात. प्रत्यक्ष भगवान रामाच्या वेळी कुणी आलं नाही. बाजीरावाच्या वेळी इतर लोक ब्राह्मण आणि मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आता राजपूत लोकांच्या पाठीशी कसे उभे राहतात तेच मी बघतो. काय करणार तुम्ही?

घंटा?

#पद्मिनी

© मंदार दिलीप जोशी

हिंदी रूपांतर इथे आहे

No comments:

Post a Comment