Wednesday, October 12, 2016

मी आणि माझा होऊ पाहणारा शत्रूपक्ष

आमच्या सोसायटीच्या चेअरमनबाईंनी नुकतीच एक कुत्री पाळली आहे. तिचं नाव लायका. कुत्री असल्यामुळे नाव लायकी असावं असं मी म्हणालो, म्हणजे मनातल्या मनात म्हणालो. आम्ही मनातच म्हणायचे. पण अंतराळात गेलेला पहिला प्राणी म्हणजे रशियाने पाठवलेली (आणि परत न आलेली) लायका ही कुत्री म्हणून तिचे ते नाव तसे असल्याचे समजले.

परवा काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो असता "ती काही करत नाही, आपण स्वस्थ उभं रहायचं" हे पुल्देश्पांडे नावाच्या द्रष्ट्या माणसाने लिहीलेलं वाक्य पुन्हा ऐकायला आलं. बरमुडा घालून गेल्याने दोन्ही पायांना गधडीने तेल आणि उटणं रगड रगड रगडल्यागत चाट चाट चाटलं आणि हा मनुष्यप्राणी उपद्रवी नसल्याची खात्री पटल्यावर पाडवा साजरा झाल्याचा आनंद झाल्यासारखी आत निघून गेली.

आत गेल्यावर काम करत बसलो होतो तेवढ्यात बाईसाहेब (म्हणजे लायका, चेअरमनबाई नव्हे) आतून परत बाहेर आल्या. लायकाला मी खूपच आवडलो होतो की काय कळेना कारण तिने माझ्याकडे मोर्चा वळवला. ते बघताच तिचा पट्टा धरून बाईसाहेब (म्हणजे चेअरमनबाई, लायका नव्हे) त्यांच्या ऑफिसातला एक तरुण डायनिंग टेबलवर बसला होता त्याच्याकडे बोट दाखवून "लायका, यु आर डुइंग अ व्हेरी बॅड बॅड काम बरं का" या चालीवर त्या म्हणाल्या, "अं हं, असं नाही करायचं, तिकडे जा तो बघ दादा आलाय!"

लायकाच्या दादाकडे माझी पाठ असल्याने त्याचा खर्रकन् उतरलेला चेहरा मला दिसू शकला नाही पण जाहीरातीत दाखवतात तसं इज्जत का फालुद्याची काच खळ्ळकन फुटल्याचा आवाज ऐकल्याचा भास मात्र नक्की झाला.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. १, शके १९३८

No comments:

Post a Comment