Thursday, January 7, 2016

कोण तू? ते गळेपडू!

सद्ध्या एका विशिष्ठ प्रकारच्या लोकांशी सातत्याने संपर्क होतो आहे. त्या प्रकारच्या लोकांना कोठले विशेषण लावावे हा प्रश्न पडला आहे. संधीसाधू म्हणावे असे एक जण म्हणाला पण हा प्रकार जरासा वेगळा आहे.

सांगतो काय ते. व्यवसाय व नोकरी निमित्ताने कार्यालयात व बाहेर, शेजारीपाजारी, जवळचे व लांबचे नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, आणि इतर परिचित अशा असंख्य लोकांशी आपला संपर्क येत असतो. सोशल नेटवर्किंगवरही अनेकांशी ओळख होत असते.

यातले काही जण अनपेक्षितपणे खूप चांगले मित्र होतात, काहींचे संबंध कामापुरते मर्यादित राहतात, तर काहींशी जेमतेम ओळख राहते. काहींना चॅटिंग आवडत नाही, काहींना व्यक्तिगत फोनवरुन किंवा प्रत्यक्ष संपर्क आवडतो, तर काहींना फक्त ऑनलाईन गप्पा मारायच्या असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यातल्या अनेकांचे व्यवसाय असतात व त्याबद्दल ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून माहितीही देत असतात. अगदी अपरिचित व्यक्तींनीही त्यांच्या व्यवसायाबाबत संपर्क केल्यास माझा अजिबात आक्षेप नाही. माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, तुम्हाला रस असल्यास भेटूया ही सेल्स पीच साधी आणि सरळ आणि म्हणूनच माझी आवडती आहे.

पण काही जण असेही असतात की परिचय असूनही आंतरजालावर हाय केल्यावर प्रतिसाद देणार नाहीत, कार्यालयात समोर भेटल्यावर आपण बोलल्याशिवाय दिवसाच्या वेळेनुसार शुभेच्छांची देवाणघेवाण करणार नाहीत, रस्त्यात दिसल्यावर पुढे जाण्याआधी साधं ओळखीचं हसणार नाहीत, पण काम असेल तर मात्र अचानक सलगी करु लागतील.

कार्यालयात कलीग म्हणून काम करताना अनेकांशी आपला फारसा संपर्क येत नाही. नोकरी सोडल्यावर जो थोडाफार संभाषण असतं ते ही अनेकांच्या बाबतीत नाहीसं होतं. नोकरी सोडल्यावर अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांना आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या सहकारी मंडळींची आठवण येते. अशा वेळी ज्यांच्याशी फारसं बोलणं होत नसेल, त्यांना सरळ माझं अमुक अमुक काम आहे, त्यासाठी तुमच्याशी बोलायचं आहे असं स्पष्ट सांगितलं तर बरं पडतं. आधी फेसबुकवर अनेक वर्षांच्या गॅपनंतर मित्रविनंती पाठवायची, हवापाण्याच्या गप्पा करायच्या, मग कुटुंबियांची चौकशी करायची, मग स्वत:च्या कुटुंबियांची माहिती द्यायची, मग हळूच फोन नंबर मागायचा, पहिल्यांदा फोन  केल्यावर कौटुंबिक आणि कार्यालयीन गप्पा मारायच्या, आणि मग लगेच काही दिवसांनी पुन्हा फोन केल्यावर "आय हॅव अ‍ॅन ऑस्सम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, तुला वेळ असेल तर बोलूया" असं म्हणायचं - या प्रकाराची मला प्रचंड चीड आहे. कामापुरता मामा करायची इच्छा असेल, तर स्पष्ट काम आहे असं सांगावं - मला पटलं तर मी त्यात भाग घेईन आणि आनंदाने मामा होईन, नाही पटलं तर स्पष्ट नाही म्हणून सांगेन. आधी अनेक वर्षांनंतर घनिष्ट मैत्री असल्याच्या थाटात कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं गळ्यात पडायचं आणि मग हळूच काम काढायचं या वृत्तीला कुठलं विशेषण लावावं या विचारात मी आहे.

ही वृत्ती असलेले लोक कार्यालयातच भेटतात असं नाही. लांबचा नातेवाईक आहे असं पाहून फेसबुकवर मित्रविनंती स्वीकारावी, तर आपण नंतर हाय केल्यावर वाचूनही त्या हायकडे दुर्लक्ष करण्यात येतं. संभाषणाचा प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडण्यात येतं. आणि मग काम असेल तेव्हा कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं प्रेमाने गुड मॉर्निंग, कसे आहात होतं. बरं, यांच्या 'बिझनेस ऑपॉर्टुनिटीला' अप्रत्यक्ष भाषेत नकार द्यावा तर ते ही चालत नाही. तुम्ही 'बिझनेस ऑपॉर्ट्युनिटी' आधी ऐकून घ्या, मग बोला; तुमचा आणि वहिनींचा फोन नंबर द्या बरं" अशी वैतागवाणी प्रेमळ दटावणी ऐकून वैताग येतो.

अशा लोकांना एक तर स्पष्ट नकार देणे किंवा साफ दुर्लक्ष करणे या पैकी एक उपाय मी सहज यशस्वीपणे हाताळतो, मात्र अशा लोकांना नक्की काय विशेषण लावावं, या संभ्रमात मी आहे.

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १२, शके १९३७
--------------------------------------------------

1 comment:

  1. Absolutely correct. Especially people promoting MLM schemes use various tactics to approach others.

    ReplyDelete