Friday, December 26, 2014

...का आज सारे गप्प

...का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?

तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?

तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!

ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?

ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?

माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली!

1 comment:

  1. शेवटचे कडवे अप्रतिम !बुद्धिवंतांना इशारा पुरेसा आहे ,निर्बुद्ध आणि ढोंगी मेणबत्त्यावाले फुकाचेच मरतील.
    अशोक महाजन

    ReplyDelete