Friday, October 15, 2010

ज्याची त्याची बांधीलकी

स्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.

विषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).

वक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, "काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो?"

आलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे "मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो", "मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो", "मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो", वगैरे.
"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही", एक कर्मचारी उत्तरतो.

झटक्यात सगळ्यांच्या नजरा 'हा आहे तरी कोण प्राणी' हे बघायला त्याच्याकडे वळतात.

"मला समाजसेवेत आनंद मिळत नाही", तो पुन्हा बोलतो.

"तुम्ही तुमचं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगाल का?" आता समुपदेशकाची उत्सुकताही चाळवली गेली असते.

"मला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.

मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधीलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, कारण माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy."

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत?  हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का?  एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच. तुम्हाला काय वाटतं?

1 comment:

  1. मंदार,
    त्या माणसाने प्रांजळपणे दिलेलं उत्तर
    आणि त्यानंतर तू मांडलेले विचार ....
    ... दोन्ही खूप अंतर्मुख करणार्‍या गोष्टी आहेत.

    एक छोटासा प्रसंग थोडक्यात पण प्रभावीपणे कथन करून मनात खूप वादळं निर्माण केलीस.
    आवडलं तुझं लिखाण.

    ReplyDelete