Friday, December 23, 2011

चित्रपट परिचय - ५ | इनव्हिक्टस Invictus: खेळातून राष्ट्रीय एकात्मता - एक आगळावेगळा प्रयत्न

सत्तावीस वर्ष गोर्‍या लोकांनी तुरुंगात खितपत पडायला लावल्यावर - आणि त्यापैकी बहुतांश काळ सहा बाय पाच फुटांच्या एका खोलीत काढायला लागल्यावर - एका सामान्य कृष्णवर्णीय माणसाची सुटकेनंतर काय प्रतिक्रिया होईल? सुटल्यावर पहिली गोळी त्याने एका गोर्‍याला घालणे हीच. आणि समजा त्याच माणसाच्या ताब्यात देशाची धुरा सोपवली तर? कल्पना करवत नाही ना?

पण इथेच माणूस आणि देवमाणूस यातला फरक स्पष्ट होतो. ही गोष्ट आहे अर्थातच नेल्सन मंडेला यांची. इतकी वर्ष तुरुंगात खितपत पडल्यावरही 'सूड' ही भावना या महामानवाला शिवली देखील नाही. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपद हातात आल्यावर राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांमधे गोरे आणि काळे यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येईल हेच प्रमुख उद्दिष्ट त्यांनी ठेवलं.

दोन देशांमधली दरी मिटवण्यासाठी क्रिकेटचा वापर म्हणजेच क्रिकेट डिप्लोमसी आपल्याला नवीन नाही. मंडेलांनी देशांतर्गत एकी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रग्बी या खेळाचा साधन म्हणून केलेला उपयोग मात्र नाविन्यपूर्ण म्हटला पाहीजे. इनव्हिक्टस हा अशाच धाडसी प्रयत्नांवर आधारलेला चित्रपट.


मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून झालेली सुटका इथे हा चित्रपट सुरू होतो. मग झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात त्यांचा पक्ष विजयी झाल्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडही होते. वाढत चाललेली गुन्हेगारी आणि बेरोजगारी यांना रोखणे आणि आर्थिक डोलारा सावरणे या आणि अशा अनेक आव्हानांना ते भिडतात. राष्ट्रीय रग्बी संघाच्या म्हणजेच स्प्रिंगबॉक्सच्या एका सामन्याला ते हजेरी लावतात तेव्हा यच्चयावत कृष्णवर्णीय प्रेक्षक हे आपल्याच राष्ट्रीय संघाच्या विरोधात घोषणाबाजी करताना तर विरोधी संघाला पाठिंबा देताना त्यांना दिसतात. कारण काळ्यांच्या दृष्टीने स्प्रिंगबॉक्स म्हणजे अपार्थाइड या वर्णद्वेषी कायद्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ असतो. हे पाहिल्यावर कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्यातील दुरावा मिटवणं ही किती कर्मकठीण गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात येतं. पण "An optimist is a person who finds an opportunity in every calamity" हे वाक्य अंगी भिनवलेल्या मंडेला यांना या खेळातच एक आशेचा किरण दिसतो. जवळ जवळ वर्षभरातच दक्षिण आफ्रिका रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार असल्याने ही संधी साधून रग्बी हा खेळच राष्ट्रीय एकात्मता साधायला उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची मनोमन खात्री होते.



आधीच वर्णद्वेषी राजवटीचं प्रतीक म्हणून कृष्णवर्णिय जनतेत बदनाम असलेल्या स्प्रिंगबॉक्स संघाला त्याच्या वाईट कामगिरीचं कारण पुढे करुन सरळ बरखास्त करावं अशा निर्णयाप्रत कृष्णवर्णियांचं संख्याधिक्य असलेली दक्षिण आफ्रिकन क्रिडा समिती येते. पण निराळाच विचार आणि एक निश्चित ध्येय मनात असलेल्या मंडेलांच्या हस्तक्षेपामुळे स्प्रिंगबॉक्स संघाला आणखी संधी द्यावी या त्यांच्या विनंतीला समिती तयार होते. आणि मग सुरू होतो एक जबरदस्त प्रवास.

स्प्रिंगबॉक्स संघाने विश्वचषक जिंकल्यास ते राष्ट्रीय ऐक साधण्याच्या दृष्टीने एक मोठे यश ठरू शकेल असा विश्वास मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचा कप्तान François Pienaar (मॅट डेमन) याच्याकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतात. तुरुंगात असताना त्यांना स्फूर्तीदायक ठरलेली Invictus ही कविता ते François ला ऐकवतात.



हा अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात आणायचा असेल तर कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे जाणून François आणि त्याचे संघ ढोर मेहनतीला सज्ज होऊन प्रशिक्षण आणि सरावाला सुरवात करतात. एकदा तर मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सरावाच्या ठिकाणी अचानक भेट देतात. मंडेलांच्या कल्पनेशी संघनायक François सहमत असला तरी वांशिक संघर्ष, रक्तपात, आणि परस्पर द्वेष यांनी अनेक तपं देशात आंतरिक कलह माजवलेला असताना रग्बी हा खेळ देशात काळ्या-गोर्‍यांची कशी काय एकी घडवून आणणार अशी शंका अनेक दक्षिण आफ्रिकी नागरिकांना असते.


मंडेलांच्या सूचनेनुसारच संघातले खेळाडू फक्त बंदिस्त सरावात आनंद न मानता सामान्य नागरिकांत - मुख्यत्वेकरून कॄष्ण्वर्णीय नागरिकात मिसळणे - हा सरावाचा एक भागच बनवून टाकतात. चित्रपटातला हा भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. खेळाडू रस्त्यावर, मैदानात गरीब वस्तीतल्या कॄष्ण्वर्णीय लहान मुलांबरोबर खेळतात तेव्हा त्या लहानग्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हे काही सांगून जातो, ते शब्दांत माडणं निव्वळ अशक्य आहे. यासाठी हा चित्रपटच बघायला हवा.

सरावाचा भाग म्हणून लोकांत मिसळल्याने जनतेत एक सुंदर सकारात्मक संदेश जातो आणि अधिकाधिक कॄष्ण्वर्णीय नागरिक स्प्रिंगबॉक्सला पाठिंबा देऊ लागतात. पहिल्या सामन्यात स्थानिक जनतेचा फारसा पाठिंबा मिळवू न शकलेला हा संघ मात्र दुसर्‍या आणि पुढच्या सामन्यांत मात्र सर्व जमातींचे प्रेक्षक बघून हरखून जातो. अर्थात साक्षात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचा वरदहस्त या मोहिमेला असल्याने जनता अधिकच विश्वासाने आणि आत्मीयतेने स्प्रिंगबॉक्सकडे पाहू लागते. मंडेलांचा सशक्त पाठिंबा, नियोजनबद्ध सराव, जनतेच्या सर्व थरातून मिळणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा पाठिंबा यांनी संघाची कामगिरी सातत्याने सुधारत जाते आणि विजेतेपद तर सोडाच, पण हा संघ फारफार तर उप-उपांत्य फेरी गाठेल हा तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरवत स्प्रिंगबॉक्सचा संघ न्युझिलंड ऑल ब्लॅक्स या जगातल्या सर्वोत्तम संघाविरुद्ध अंतीम सामना खेळायला सज्ज होतो. अंतीम सामन्यात राष्ट्राध्यक्ष मंडेला हे स्प्रिंगबॉक्स संघाचा शर्ट घालून मैदानात दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी अवतारतात.


मग पुढे काय होतं? François Pienaar च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा स्प्रिंगबॉक्स संघ अंतीम सामना जिंकतो का? मंडेलांचं स्वप्न पूर्ण होतं का? हे सगळं बघायला मात्र चित्रपट प्रत्यक्षच बघा.

मला वाटलेला चित्रपटाचा सगळ्यात जमेचा भाग म्हणजे इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखं (उदा. गांधी) कुठेही चरित्रनायकाचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं नाही, त्याला देवत्व वगैरे बहाल केलेलं नाही. गोरे आणि काळे यांची एकी घडवून आणण्यामागे मंडेला यांची फक्त आणि फक्त मानवतावादी वृत्ती आहे असं न दाखवता त्यामागचा त्यांचा वास्तववादी दृष्टीकोन आणि राजकीय दूरदृष्टीही चित्रपटात दाखवली आहे. प्रशासकीय व्यवस्थेतले महत्वाचे घटक असलेले नोकरशहा आणि संरक्षण ज्यांच्या हातात ते सैन्य आणि पोलीस यांत असलेल्या गौरवर्णीयांचं अनुभव (आणि संख्याधिक्य सुद्धा) लक्षात घेऊन अतिशय कौशल्याने त्यांचे हितसंबंध जपत, कुणालाही फारसं न दुखावता कृष्ण्वर्णीयांनाही या विभागात योग्य संधी कशा मिळतील याची काळजी मंडेलांनी घेतली त्याचीही छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते.

मंडेला यांच्या अंगरक्षकांमधे असलेले गोरे आणि काळे सदस्य यांच्यातली धुसफुस दाखवणारं दॄश्य इथे ठळकपणे आठवतं. एकाच वेळी गंभीर आणि गंमतीदार वाटणारं दृश्य लक्ष देऊन बघण्यासारखं आहे. तसंच आणखी एक दृश्य - आपल्याला गोर्‍यांसोबत काम करावं लागणार हे समजताच अंगाचा तीळपापड झालेल्या काळा अंगरक्षक जेसन राष्ट्राध्यक्ष मंडेलांच्या ऑफिसात आपलं गार्‍हाणं घेऊन जातो. याच गोर्‍यांनी कदाचित आपल्यावर गोळ्या झाडल्या असतील मागे अस उद्विग्नपणे म्हणणार्‍या जेसनला समजावताना मंडेला म्हणतात "Reconciliation starts here.........." हे वाक्य त्यांच्यातला नेता जागा असल्याचं दाखवतं तर "Forgiveness starts here too. Forgiveness libarates the soul. It removes fear. That is why it is such a powerful weapon.", या वाक्यातून त्यांच्यातला महामानव बोलतो.

पात्रनिवडीसाठी संबंधितांचं खास अभिनंदन केलंच पाहिजे. नेल्सन मंडेला यांच्या भूमिकेसाठी मॉर्गन फ्रीमन या जेष्ठ आणि गुणी चरित्र अभिनेत्याची इतर कुठल्याही पर्यायांचा विचार न करता झालेली निवड हा एक अचूक ठरलेला निर्णय. मॉर्गन फ्रीमन यांनी नेल्सन मंडेला यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच अभ्यास केलेला स्पष्ट दिसतो. संपूर्ण चित्रपट बघताना कुठेही आपण मॉर्गन फ्रीमन या स्टारला बघत नसून साक्षात मंडेलाच पडद्यावर वावरत आहेत असं वाटत राहतं इतका अप्रतीम मुद्राभिनय आणि मंडेला यांच्या देहबोलीची आणि उच्चारांची उत्कृष्ठ नक्कल फ्रीमन यांनी केली आहे. मंडेला यांना बोलताना ज्यांनी टीव्हीवर ऐकलं असेल त्यांना फ्रीमन यांचं कौतुक करण्यावाचून पर्याय राहणार नाही. बॉर्न आयडेंटिटी आणि त्याचे सिक्वेल, ऑशन्'स चित्रपट मालिका, सिरिआना, द डिपार्टेड आणि अशा अनेक यशस्वी चित्रपटातून आपला चतुरस्त्र अभिनय सादर करणारा मॅट डेमन याने आपल्या नेहमीच्या डॅशिंग अ‍ॅक्शन हीरोचं बेअरिंग थोडं बाजूला ठेऊन संयत अभिनयाचं सुंदर दर्शन घडवलं आहे. बॉलिवुडशी तूलना करायची तर अशा प्रकारच्या भूमिका आपल्याकडे जॅकी श्रॉफच्या वाट्याला यायच्या.

पण आधी एक इशारा देऊ इच्छितो. दिग्दर्शक म्हणून क्लिंट इस्टवूड हे नाव आणि कलाकारात मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन ही नावं वाचून हा सिनेमा बघायला जाणार असाल तर पुन्हा विचार करा. कारण या दोघांच्या सशक्त अभिनयाने नटलेला या चित्रपट मात्र थरारक, वेगवान, किंवा अंगावर काटा आणणारा वगैरे अजिबात नाही. अनेक ठिकाणी बर्‍यापैकी संथ तर काही ठिकाणी तर हा चक्क डॉक्युमेंटरी चालली आहे की काय असं वाटण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना हा चित्रपट चक्क कंटाळवाणाही वाटू शकतो. सुरवातीला काही दृश्यांमधे संवादही कृत्रिम आणि पाठांतर करुन म्हटल्यासारखे - म्हणजेच सहजतेनं न येता नाटकी वाटतात. पण कथेच्या आत्म्याशी मात्र चित्रपट संपूर्ण प्रामाणिक राहतो. शिवाय नेल्सन मंडेलांच नामक जादुगार मॉर्गन यांनी इतक्या जबरदस्तपणे उभा केला आहे की चित्रपटातल्या बाकी तृटींकडे लक्षच जात नाही.

मंडेला यांच्या बरोबर उलट मार्गाक्रमण केलेल्या शेजारच्या झिंबाब्वेतल्या रॉबर्ट मुगाबे यांच्या नेतृत्वाखाली आज झिंबाब्वेची आज अराजक, हिंसा, आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे चालेलेली ससेहोपलट आपण बघतोच आहोत. मंडेला यांनी स्प्रिंगबॉक्स रग्बी संघात गोर्‍यांच संख्याधिक्य असूनही हा संघ जास्तीत जास्त ताकदवान आणि यशस्वी कसा होईल याकडे लक्ष दिलं, तर मुगाबे यांच्या द्वेष आणि सूडानेच भरलेल्या राजवटीने देशाच्या सर्वच क्षेत्रात बजबजपुरी ही माजवलीच पण कमकुवत असलेला - म्हणजे 'झिंबाब्वे उभा राहिला, आम्ही नाही पाहिला' - असा झिंबाब्वेचा क्रिकेट संघ फ्लॉवर बंधू, अ‍ॅन्डी ब्लिगनॉट, मरे गुडविन, पॉल स्ट्राँग, नील जॉनसन, एड्डो ब्रँडिस यांच्यासारख्या अनेक गुणी खेळाडूंमुळे हळूहळू प्रगती करत सामने आणि मालिका जिंकायला सुरवात करत असतानाच त्यांना त्यांच्या गौरवर्णामुळे (रिव्हर्स रेसिझम/डिस्क्रिमिनेशन?) संघाबाहेरच नव्हे तर देशाबाहेरही पडायला भाग पाडून झिंबाब्वेतल्या क्रिडा क्षेत्राचीही ससेहोलपट केली. १९९५ साली रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्या पाठोपाठ २००३ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१० सालचा फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपदही भूषवलं आणि खेळजगतावर आपला ठसा उमटवला.

चित्रपटातील एका दृश्यात मंडेला यांच्या सुटकेनंतर त्यांच्या मोटारींचा ताफा एका रग्बी मैदानावरुन जात असताना एक शा़ळकरी मुलगा शाळेच्या रग्बी प्रशिक्षकाला विचारतो, "हे कोण आहे सर?" त्याला उत्तर मिळतं, "It's the terrorist Mandela, they let him out. Remember this day boys, this is the day our country went to the dogs."

या पार्श्वभूमीवर मुगाबेंच्या सारखं वागणं मंडेला यांना अशक्य होतं का? नक्कीच नाही. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इतकी वर्ष ज्यांच्यामुळे तुरुंगात सडावं लागलं, तर बाहेर पडल्यावर पहिली गोळी त्यातल्याच एका गोर्‍यालाच घालावीशी वाटली असती. पण हाडाचे लोकशाहीवादी असलेल्या नेल्सन मंडला यांच्या मनाला सूड, प्रतिशोध वगैरे तर नाहीच, पण गोर्‍यांप्रती द्वेषभावनाही शिवली नाही. दक्षिण आफ्रिकेत अनेक शतकं गोर्‍यांचे अत्याचार सहन केल्यानंतर काळ्यांची मानसिकता काय असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. तसंच 'आता काळ्यांच्या हातात राज्य गेलं - मग आपलं भवितव्य काय' ही चिंता गोर्‍यांनाही सतावणं साहजिकच. पण याही परिस्थितीतून मार्ग काढून मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला स्थैर्य मिळवून देण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली. अनेक जाती-जमातींमधे विभागले गेलेले आणि गुलामी आणि भेदभाव यांच्याखाली पिचलेले कृष्ण्वर्णीय आणि वर्षानुवर्ष फक्त राज्यकर्त्याची भूमिका करण्याची सवय झालेले गौरवर्णीय यांच्यात परस्पर सहकार्यच नव्हे तर सौहार्द निर्माण करण्याची किमया त्यांनी करुन दाखवली. काळ्यांची प्रगती व्हावी आणि गोर्‍यांना हा देश त्यांचाच वाटत रहावा ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यात आज जर दक्षिण आफ्रिका बर्‍याच अंशी यशस्वी झाला असेल तर तो निव्वळ नेल्सन मंडेला आणि त्यांच्या समविचारी सहकार्‍यांमुळेच.

चित्रपटातील एका दृश्यात एक सुंदर संवाद आहे. François Pienaar आणि त्याचा संघ मंडेला यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं त्या तुरुंगाला भेट देतात. ते ठिकाण बघून एका संघसहकार्‍याशी बोलताना François म्हणतो ".......I was thinking about how you spend 30 years in a tiny cell, and come out ready to forgive the people who put you there." हे वाक्य ऐकल्यावर मंडेला नामक महामानवाला मनोमन वंदन केल्यावाचून राहवत नाही.

कधी कधी वाटतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच आपल्याकडे नेल्सन मंडेला यांच्याइतकी दूरदृष्टी असलेला, समाजाभिमुख राजकारण करणारा आणि अर्थातच त्यांच्या इतका करिश्मा असलेला नेता आपल्या देशाला मिळाला असता तर....... तर कदाचित आज जी जातीय राजकारणाची बजबजपुरी माजली आहे ती माजली नसती. सार्‍या जर आणि तर च्या गोष्टी. दुर्दैवाने हल्ली समाजोपयोगी कामे किती यापेक्षा उपद्रवमूल्य किती हे बघितले जाते. भविष्यात असा नेता कदाचित निर्माण झालाच तर त्याच्यावर असा चित्रपट आपल्याकडे निर्माण होईलही. पण तो पर्यंत आपण इन्व्हिक्टस सारख्या चित्रपटांचा आस्वाद जरूर घेऊ शकतो.  

हा लेख वाचून चित्रपट बघावासा वाटल्यास आणि बघून चित्रपट आवडल्यास जरूर कळवा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

Thursday, October 27, 2011

चैतन्यमूर्ती शम्मी कपूर

एका रविवारची सुस्त सकाळ. अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळ बघितलं तर सात वाजलेले. "रंगोली लागलं असणार" असं म्हणून रिमोटकडे हात गेला. आणि पहिल्याच गाण्याने रविवारी सकाळी सात वाजता जो काही आळस अंगात भरलेला असतो तो पार कुठच्याकुठे पळाला. मी ताडकन उठून उभा राहिलो. "ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा...." म्हणत काश्मीरच्या दाल लेकमधे शिकार्‍यात शम्मी कपूर शर्मिला टागोरला पटवण्यासाठी बेभान होऊन नाचत होता. आमच्या पिढीतल्या कित्येकांना याच गाण्याने शम्मीचा परिचय करून दिला होता. काही माणसात अजब जादू असते. आपल्या नुसत्या असण्याने ते आसपासच्या सगळ्या मनुष्यमात्रात चैतन्य आणतात. शम्मी कपूर त्यातलाच. घरी कुणी नव्हतं हे माझ्या पथ्यावरच पडलं. सगळ्या खिडक्यांचे पडदे लावून शम्मीच्या नाचावर घरातल्या घरात त्याच्या उत्स्फूर्तपणा आणि बेभानपणाला गाठण्याची पराकाष्ठा करत नाचायला सुरुवात केली.

शेवटी एकदाचा तो बोटीतून धप्पकन पाण्यात पडला, गाणं संपलं, जाहिरात लागली आणि मी भानावर आलो. अचानक एक पोकळी निर्माण झाल्याचं वाटू लागलं. पण तो रविवार त्या काही मिनिटातच साजरा झाला होता.



शमशेरराज कपूर असं भारदस्त नाव घेऊन मुंबईत जन्मलेल्या शम्मी कपूरच्या बालपणीची सुरुवातीची वर्ष कलकत्त्यात गेली. वडील पृथ्वीराज कपूर कलकत्त्याच्या न्यू थिएटर्समध्ये अभिनेता म्हणून काम करायचे. सुरुवातीची काही वर्ष तिथे शिक्षण घेतल्यावर मुंबईत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमधे तो मात्र फार काळ रमला नाही. लवकरच त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये उमेदवारीला सुरुवात केली.

काही काळ तिथे घालवल्यावर १९५३ साली त्याने जीवन ज्योत या चित्रपटाद्वारे नायक म्हणून पडद्यावर पदार्पण केलं. मनमोहक निळे डोळे, अत्यंत देखणा चेहरा, तलवारकट मिशा आणि एकंदरीत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या शम्मीला सुरूवातीला मात्र यशाने सतत हुलकावणी दिली. त्या काळी प्रस्थापित असलेल्या स्टार्स मधुबाला, नलिनी जयवंत, नूतन यांच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर अनेक चित्रपट करूनही शम्मीच्या पदरात सतत अपयशाचं दान पडत गेलं. मोठा भाऊ राज कपूरच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्त्व ही त्याच्या विरोधात जाणारी एक महत्त्वाची गोष्ट. त्या मिशांमुळे म्हणा किंवा सारख्या केशरचनेमुळे म्हणा, तो तसा दिसायचाही. त्याच्यावर राजची नक्कल केल्याचा सुरूवातीला आरोप केला जायचा.

   
यशाच्या प्रतिक्षेत असलेल्या शम्मीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना घडली. त्या काळात यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अत्यंत गोड चेहर्‍याच्या गीता बाली बरोबर रंगीन रातें (१९५६) हा चित्रपट करत असताना साहेब तिच्या प्रेमात पडले. "माझ्याशी लग्न कर!" म्हणून अनेक आर्जवं केल्यानंतर अचानक एके दिवशी गीताने "लग्न करते तुझ्याशी, पण आजच्या आज करत असलास तर!" अशी विचित्र अट घातली. मग काय, एका पायावर तयार झालेल्या शम्मीने लगेच तयारी दाखवली आणि दोघे मुंबईतील बाणगंगा परिसरातल्या एका देवळात विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे तेव्हा शम्मी हा चित्रपटसृष्टीत कुणीही नव्हता आणि गीता लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आधीच प्रस्थापित झाली होती. शम्मीच्या आयुष्यात एका भक्कम आधाराने आता प्रवेश केला होता.

शम्मीने त्याच्या तलवारकट मिशांना सोडचिठ्ठी दिल्यावर त्याचं नशीब फळफळलं. मग आला तो फिल्मिस्तान स्टुडिओजच्या नासिर हुसैनने काढलेला तुमसा नहीं देखा (१९५७). तोपर्यंत अपयशाला कंटाळलेल्या आणि हा चित्रपट न चालल्यास चित्रपटसृष्टीलाच रामराम ठोकण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या शम्मी कपूरला या सिनेमाने चांगलाच हात दिला. तिकीटबारीवर घवघवीत यश तर या चित्रपटाने मिळवलंच, शिवाय शम्मीला रातोरात तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणून स्थानही मिळवून दिलं. चॉकलेटी अभिनय करणारा देव आनंद, तुपकट चेहर्‍याचा राज कपूर आणि 'करुण' कुमार दिलीप कुमार यांनी आपल्याभोवती बांधलेल्या चाहत्यांच्या आवडीनिवडीच्या अभेद्य भासणार्‍या कवचाला शम्मीने अखेर भेदलं होतं. मूर्तीमंत चैतन्य असलेल्या शम्मीच्या रूपात तरुण वर्गाला या सिनेमाने एक नवा 'युथ आयकॉन' मिळवून दिला. एका आख्ख्या पिढीला वेड लावलं, बेभान केलं.

तुमसा नहीं देखा नंतर दोन वर्षांनी आलेल्या दिल देके देखो (१९५९) या चित्रपटामुळे उंच, गोर्‍यागोमट्या, खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या शम्मी कपूरचं धडाकेबाज नायक म्हणून तरुणांच्या हृदयातलं स्थान आणखी पक्कं झालं. हे दोन चित्रपट केवळ शम्मीसाठीच नव्हे तर अनुक्रमे अमिता व आशा पारेख या दोन नवोदित अभिनेत्रींसाठीही परीसस्पर्श ठरले. दोघी पुढे नामवंत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेल्या. यानंतर नवोदित अभिनेत्रींना शम्मी कपूरबरोबर संधी देण्याची निर्मात्यांमध्ये स्पर्धाच लागली.

उपरोल्लेखित दोन चित्रपटांनी शम्मी कपूरच्या एक धडाकेबाज आणि बिंधास नायक म्हणून प्रस्थापित केलेल्या प्रतिमेवर त्यानंतर आलेल्या जंगलीने (१९६१) शिक्कामोर्तब केलं. 'जंगली' तून सायरा बानोने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटातलं (अर्थातच रफीच्या आवाजातलं) याssssssहू हे गाणं त्या वेळीच काय तर आजही तितकंच लोकप्रिय आहे.

यानंतर शम्मीने जंगली, दिल तेरा दीवाना, प्रोफेसर, चायना टाऊन, ब्लफ मास्टर, राजकुमार, कश्मीर की कली, आणि जानवर अशा यशस्वी चित्रपटांची रांगच लावली. शम्मीच्या चित्रपटांचं एक अविभाज्य अंग (म्हणजे काश्मीर हे भारताचं अविभाज्य वगैरे अंग आहे त्यापेक्षा जास्तच अविभाज्य) म्हणजे रफीच्या स्वर्गीय आवाजात गायलेली कर्णमधुर गाणी. तुमसा नहीं देखा मधलं "यूं तो हमने लाख हसीं देखें है, तुमसा नहीं देखा" आणि दिल देके देखो मधलं "दिल देके देखो, दिल देके देखो, दिल देके देखो जी, दिल लेने वालों दिल देना सीखो जी" या चित्रपटांपासून सुरू झाला तो रफी आणि शम्मीचा चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असा सुरेल आणि देखणा प्रवास. मुळातच संगीताची उत्कृष्ट जाण असलेल्या शम्मी कपूरने प्रत्येक गाण्यातली प्रत्येक फ्रेम आपल्या चैतन्यपूर्ण देहबोलीने आणि नितांतसुंदर अभिनयाने पडद्यावर प्रेक्षणीय केली, तर स्वर्गीय गळ्याच्या रफीने प्रत्येक गाणं श्रवणीय करून सोडलं. शम्मीच्या अभिनयाला साजेसा आवाज देण्याकडे रफीचा नेहमीच कटाक्ष असे. शम्मी स्वतःच्या प्रत्येक गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी जातीने हजर असे. शम्मी कपूरने अनेकदा "रफी साहेबांशिवाय मी कुणीच नव्हतो!" हे जाहीररीत्या कबूल केलं आहे. जेव्हा रफीचं निधन झालं तेव्हा ती बातमी त्यांना "शम्मीजी, तुमचा आवाज गेला!" अशी सांगण्यात आली.

अर्थात यामुळे धम्माल आणि धागडधिंगा असलेला नाच एवढीच शम्मीच्या गाण्यांची ओळख आहे असा समज मात्र कुणी करून घेऊ नये. सुंदर मुद्राभिनयातही तितकंच प्राविण्य मिळवलेल्या शम्मीने हळुवार रोमँटिक गाण्यांनाही तितकंच प्रेक्षणीय केलं. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ, एहसान तेरा होगा मुझपर, ए गुलबदन, है दुनिया उसीकी जमाना उसीका, हम और तुम और ये समां, तुमने किसी की जान को जाते हुए देखा है, इशारों इशारों मे दिल लेने वाले, रात के हमसफर थक के घर को चले, मै जागू तुम सो जाओ ही व अशी अनेक गाणी आठवून बघा. शम्मी कपूर हा अष्टपैलू अभिनेता असल्याची तुमची नक्की खात्री पटेल.

देव आनंदला नाचता येत नसेच. पण राज आणि दिलीप या दोघांनी नाचण्याचा फारसा प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाही. तेव्हा चित्रपटांत कथेच्या नावाखाली काहीही चालून जात असलं तरी प्रेक्षक मोर आणि माकड यांमध्ये नक्कीच फरक करू शकत असले पाहिजेत, कारण पुढे एक गृहस्थ जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्धीस आले तरी त्यांना कुणी छान 'नाचतो' असं म्हणायला धजावलं नाही. शम्मीने मात्र उत्तम नाचणारा नायक म्हणून अनेक वर्ष सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याला नाचता येत नसे असे तो म्हणे. विश्वास बसतो? गाण्यात नाचणं कुठे आवश्यक आहे, कुठे लयबद्ध पदलालित्य अपेक्षित आहे हे अचूक ओळखून तो स्वतःच कसं नाचायचं ते ठरवी. शम्मीला संगीताची आणि ठेक्याची इतकी चांगली जाण होती की त्याच्या गाण्यांसाठी त्याला कधीही नृत्यदिग्दर्शकाची गरज पडलीच नाही. एक काळ असा होता की गाण्यावर शम्मी नाचतोय की त्याच्या नाचामुळे गाणं बहरतंय असा प्रश्न पडावा. 'गोविंदा आला रे आला' हे गाणं आठवा, आजही हे गाणं लागलं की कृष्णभक्ती आणि कान्हाचा नटखटपणा याचं मिश्रण चेहर्‍यावर बाळगत रस्त्यावर बेभान होऊन नाचणारा शम्मीच डोळ्यांसमोर येतो.


जणू शम्मीच गातोय असं वाटावं इतका फिट बसणारा रफीसाहेबांचा आवाज आणि उत्स्फूर्ततेचं उत्तम उदाहरण असलेला शम्मीचा अप्रतिम नाच या गोष्टींमुळे शम्मी 'भारताचा एल्विस प्रिस्ली' म्हणून ओळखला जाऊ लागला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९६६ साली आलेला गोल्डीचा तीसरी मंझिल हा चित्रपट. प्रचंड लोकप्रिय झालेला हा रहस्यपट मात्र अत्यंत नाट्यमय रीतीने शम्मीच्या पदरात पडला. एका पार्टीत निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता) आणि शम्मी कपूरचा नायक म्हणून चित्रपटात प्रवेश झाला. दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. 'ओ हसीना जुल्फों वाली' या गाण्यात नृत्यनिपुण हेलनच्या प्रत्येक अदा आणि पदलालित्याला तोडीस तोड नाच शम्मीने करून दाखवला आहे. या चित्रपटातलं एक दृश्य शम्मी त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर ('पीक') असल्याची जाणीव करून देतं. प्रेमनाथने एका खोलीत पाठवल्यावर कपाट उघडून त्यातला एक वेश तो परिधान करतो. त्याच वेळी त्याची बटणं बघून त्याला अचानक खुनी कोण ते ध्यानात येतं, तेंव्हा त्याचे विस्फारलेले डोळे आणि अप्रतिम मुद्राभिनय आपल्याला जिंकून जातो.

तीसरी मंझिलचं चित्रीकरण सुरू असतानाच गीता बाली देवीच्या आजाराला बळी पडून हे जग सोडून गेली. या घटनेने शम्मीला बसलेला धक्का इतका मोठा होता की जवळजवळ तीन महिने तो चित्रीकरणात सहभागी होऊ शकला नाही. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण केला. नायक म्हणून कारकिर्दीसाठी शम्मीच्या आयुष्यात गीताचा प्रवेश जसा शुभशकुन ठरला, तसाच गीताचा मृत्यू हा अपशकुन. याच चित्रपटानंतर शम्मी्चा कारकिर्दीतला दुसरा टप्पा सुरू झाला. अनेक चित्रपटांमधून झालेल्या अनेक छोट्यामोठ्या अपघातांमुळे झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या नाचण्यावर बंधनं आली आणि त्याची कारकिर्द नायक म्हणून हळूहळू उतरणीला लागायला सुरुवात झाली.

अर्थात या कालावधीतही शम्मीने अनेक सुंदर आणि लोकप्रिय कलाकृतींचा आनंद सिनेरसिकांना दिला. बदतमीज, लाट साहब, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस, प्रिन्स यासारखे सिनेमे हे याहू पठडीतल्या शम्मी कपूरची आठवण करून देत राहिले, तर ब्रह्मचारी आणि अंदाज या चित्रपटातून त्याच्या प्रगल्भ आणि संयत अभिनयाचं दर्शन घडलं. यांपैकी 'ब्रह्मचारी' ने त्याला त्याच्या कारकिर्दीतलं एकमेव फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ठ अभिनेता हे पारितोषिक मिळवून दिलं. याच सिनेमातील 'मैं जागू तुम सो जाओ' या गाण्यात शम्मीच्या चेहर्‍यावर मूर्तीमंत वात्सल्य झळकताना आपल्याला दिसतं.

शम्मीच्या चरित्र भूमिकांची खर्‍या अर्थाने सुरुवात झमीर या चित्रपटापासून झाली आणि या अष्टपैलू अभिनेत्याने कारकिर्दीतला हा टप्पाही यशस्वीपणे पेलला. इंग्रजी चित्रपट इर्मा ला दूस (Irma La Douce) ची नक्कल असलेला मनोरंजन या चित्रपटात अभिनयाबरोबाच दिग्दर्शनही करुन त्याने एका वेगळ्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यानंतर आलेल्या बंडलबाज या चित्रपटापर्यंतच टिकला. विधाता चित्रपटातल्या भूमिकेने त्याला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलं. मग परवरिश, मीरा, रॉकी, नसीब, हीरो, बेताब, इजाजत अशा चित्रपटांद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकत राहिला. शेवटी नव्वदच्या दशकात त्याने चित्रपटामधे भूमिका करणं कमी कमी करत शांत जीवन जगणं पसंत केलं.

पण शांत बसेल तर तो शम्मी कसला? कंप्यूटर सॅव्ही असलेला शम्मी भारतात इंटरनेटच्या पहिल्या वापरकर्त्यांपैकी एक होता. इतकंच नव्हे तर आंतरजाल वापरणार्‍यांची संघटना 'इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडिया' (ICUI) चा तो संस्थापक अध्यक्षही होता. त्याच्याच म्हणण्यानुसार "भारतात इंटरनेट येण्याआधीपासून मी इंटरनेट वापरतोय!". गंमत म्हणजे शेवटपर्यंत विंडोज आणि मायक्रोसॉफ्टच्या आहारी न जाता निष्ठेने अ‍ॅपल मॅक वापरलं. शम्मी त्याच्या भरभराटीच्या काळात जसा शांत आणि समजूतदार होता, तसाच तो निवृत्तीनंतरही तितकाच प्रेमळ आणि दानशूर राहिला. अनेक वर्षांपूर्वी 'जयबाला आशर' नामक एका तरुणीवर रेल्वेगाडीत एका व्यसनाधीन तरुणाने हल्ला करुन चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले होते आणि या घटनेत तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. शम्मीने त्या तरुणीस बर्‍याचदा भेट देऊन तिचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि ती इस्पितळातून घरी गेल्यावर तिला एक नवा कोरा संगणक भेट म्हणून दिला.

किडनीच्या विकाराने ग्रासलेल्या शम्मीला डायलिसिस सारख्या त्रासदायक प्रक्रियेसाठी आठवड्यातून तीनदा इस्पितळात यावं लागे. अशावेळी स्वभावात कडवटपणा, किरकिरेपणा शिरण्याची शक्यता असते. पण "The difficulties of life are intended to make us better, not bitter" ह्या पंक्ती अक्षरशः जगलेल्या शम्मीचा एकंदर जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कधी बदलला नाही. शेवटपर्यंत त्याची 'देवाने मला आयुष्यात भरभरून दिलं आहे आणि माझी कशाबद्दलही काहीच तक्रार नाही' हीच वृत्ती कायम राहिली. ह्या त्याच्या प्रवासात त्याला खंबीर साथ होती ती त्याची द्वितीय पत्नी नीलाची.

याच आजाराशी लढता लढता अखेर शम्मी कपूरने १४ ऑगस्ट २०११ च्या पहाटे इहलोकीची यात्रा संपवली. त्याच्या अंत्यसंस्कारांना त्याचा धाकटा भाऊ शशी कपूर व्हीलचेअरवर हजर होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जणू म्हणत होते, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे."

मला खात्री आहे. शम्मी कपूरचा आत्मा न्यायला यम स्वतः आला असणार. इतकंच नव्हे तर त्याच्यासारख्या राजकुमाराला न्यायला स्वर्गातून एक स्पेशल हत्तीही सोबत आणला असणार. त्याच्या पृथ्वीतलावरच्या वास्तव्याची स्तुती करत कुणीतरी गाणंही म्हणत गेलं असेल "आगे पीछे तुम्हारी सरकार, तुम थे यहाँ के राजकुमार".
 


© मंदार दिलीप जोशी

Sunday, October 23, 2011

निर्माल्य

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
'मोगरा फुलला दिवाळी अंक २०११' इथे पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Wednesday, October 19, 2011

अस्तित्व

आज रात्री जेव्हा
तू चंद्र बघशील ना रे
तेव्हा माझी आठवण काढ...
तो सुंदर दिसतो म्हणून नव्हे रे!
तर अशासाठी,
की जसा असंख्य तार्‍यांच्या
संगतीत असूनही तो एकलाच
तशीच सार्‍यांत असलेली
मी ही...

तुझ्याच अमर्याद मनोधैर्याच्या साथीने
जगते आहे रे
माझ्या अस्तित्वाची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त....

तुझीच प्रभा
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच रवीकिरणं झेलून
परावर्तित करणार्‍या
त्या चंद्रासारखीच

तरीही...
हा एकलेपणा संपवण्याची
भलती स्वप्नं
नको रे दाखवूस
आपल्यातलं अंतरच करेल
माझी राखण!

पण...
काहीही झालं तरी
माझं अस्तित्वच
तुझ्या 'असण्यावर' अवलंबून!!

Tuesday, October 11, 2011

धडा

जरा काही खुट्टं झाल्यावर
राईचा पर्वत करण्याचा
स्वभावच त्याचा...

मग आज काय?
तर म्हणे कालच आणलेले
नवीन बूट अचानक आवडेनासे!
मग ते बदलायला...
तणतणतच गेला दुकानात

गल्ल्यावर बसलेल्या तिने
हसत चौकशी केली

"मॅडम,
फार घट्ट होताहेत"
तो फणकारला
.....उगाचच काहीतरी कारण

'अरे दुसरे जोड दाखव रे
या साहेबांना'

"हिला स्वत: उठायला काय होतं"
तो विचारात असतानाच

पोर्‍याची धांदल पाहून
ती उठलीच

पण तो मात्र......
'तिने' काढलेला
छानसा नवा जोड
घालून बघण्याआधीच
बदलायला आणलेले बूट घेऊन
केव्हाच परतलेला....
....खालमानेनं.

तर ती...अचंबित....
पण तेच तजेलदार हसू
चेहर्‍यावर लेऊन
पुन्हा गल्ल्यावर....
....दोन्ही पायात घातलेले
जयपूर फुट सावरत.

Tuesday, September 20, 2011

अंतर

एरवी आपल्यातल्या अंतराला
नियतीची क्रूर चेष्टा
म्हटल्यावर...
"पार्ट ऑफ लाईफ आहे,
तक्रार नाही रे कसलीच"
असं धिटाईनं
समजावणारी तू

आणि आज.........
"आपण काय एकमेकांना
'एका हाकेवर' आहोत"
म्हटल्यावर....
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच

आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?