Monday, February 14, 2022

खर्रा इतिहास: इष्क-ए-हिंद-ए-दिन अर्थात व्हॅलंटाइन डे

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

एकदा सहज विचार करत बसले असता जलालुद्दीन सरांच्या मनी आले की मुघल सलतनतीत एखादा तरी प्रेम दिवस असावा. पण आता इतक्या बायका आणि अंगवस्त्रे असताना बादशहा हुजूरांचा रोजच प्रेमदिवस असे. त्यांची अडचण त्यांनी (पुन्हा) बिरबलालाच सांगितली. बिरबलाने त्यांना अरबस्थानातील प्राचीन पीर संत वळवळताहेन या थोर इश्वरी पुरुषाबद्दल सांगितले. "शहेनशहा साहेब, आपण आपल्या वर्षातील प्रत्येक दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा करावा, पण इंग्रजी क्यालेंडरातील चौदा फेब्रुवारी हा दिवस सरजमीन-ए-हिंदूस्थानात प्रेम दिवस म्हणून साजरा करावा. 

"पण चौदा फेब्रुवारीच का?" जहांपन्हांनी पुन्हा अजागळ शंका विचारलीच. 

"सारख्या मालिका पाहून तुम्हाला काही सुचत नाहीसे झाले आहे झालं जहांपन्हा. मालिका सुरु असतील तेव्हा तुम्ही दीवान-ए-खास सोडून दीवान-ए-आम मध्ये बसून आवामच्या तक्रारी ऐकत चला, डोक्याची मंडई कमी होईल." बिरबल वैतागून म्हणाला.

मालिकांचा उल्लेख बिरबलाने करताच "आमच्या दुखत्या नसीवर बोट ठेवायला आम्ही तुला फर्मावलेले नाही. तेव्हा आमच्या समस्येवर तोडगा सांग पटकन", असं शहेनशहा उद्गारले.

"अहो बादशहा साहेब, चौदा फेब्रुवारी हा संत वळवळताहेन याचा स्मृतिदिन. तसेच आपल्या पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस कधी येतो सांगा बरं?"

मागच्या वेळी पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस विसरल्याने त्यांनी आख्खी "अम्मी कुठे कडमडते" मालिका सोबत बसवून बघायला लावली होती त्याची याद येऊन बादशहा कळवळले. तेव्हापासून पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस हा चौदा फेब्रुवारीला येत असल्याचे त्यांच्या मश्तिष्कच्या 'गहराईयां'त कोरले गेले होते.

बिरबलाच्या हुशारीवर बादशहा मनातल्या मनात खुष झाले आणि त्यांनी फरमान सोडून चौदा फेब्रुवारी हा इष्क-ए-हिंद-ए-दिन म्हणून घोषित केला. त्याचा पुढे अपभ्रंश शाखावाल्यांनी वळवळताहेन दिन असा केला.

हा खर्रा इतिहास हे संघी चड्डीवाले तुम्हाला कधी सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४४४४, ओळ २३

#इष्क_ए_हिंद_ए_दिन #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी







Friday, February 11, 2022

खर्रा इतिहासः अफझलखान कसा मेला?

आपल्या मुलाची मुंज प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचा अफजलखानाचा मानस होता म्हणून गागाभट्ट गुरुजी यांना डेप्युटशनवर पाठवावे अशी विनंती करायला खान आला होता. दुर्दैवाने त्याला ब्रेन ट्यूमरचा हार्ट ऍटॅक आला आणि त्यात तो गेला. 

अफझल-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ २७

© मंदार दिलीप जोशी






खर्रा इतिहासः शाईस्तेखानाची बोटे का तुटली?

 शाईस्तेखानास भाषांतराचे वेड होते. उत्तमोत्तम धार्मिक ग्रंथांचे तो रेमिंगटन टाईपरायटरवर फारसीत भाषांतर करत असे. दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका त्याचे टाइपिंग सुरूच असायचे. एकदा असाच लाल महालात बसून भगवद्गीतेचे भाषांतर टंकलिखित करत असताना स्वराज्यातून त्याला नजराण्यातून भेट मिळालेला गोदरेज टाईपरायटर नजरेस पडला. त्यावर अतिशय झटपट टाइपिंग होत असल्याचे लक्षात आल्याने त्याने अधिकच जोमाने टाइपिंग सुरू ठेवले, दुर्दैवाने त्याच टाईपरायटरमध्ये त्याचा हात अडकून तीन बोटे तुटली. 

औरंग्या-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान १८८४, ओळ २२

© मंदार दिलीप जोशी

Shaista Khan



खर्रा इतिहासः जगन्नाथ यात्रा आणि अकबर

एकदा दक्षिण सफरीवर असताना बादशहा अकबराच्या बग्गीचा टायर पंक्चर झाला. नेहमीचा अब्दुल पंक्चरवाला हग यात्रेला गेल्याने अंमळ अडचणच झाली. मग अकबराने भगवान जगन्नाथाचा धावा सुरू केला. अचानक देवळातून एक शेंडीधारक इसम आला व त्याने बग्गीच्या चाकाचे पंक्चर काढून दिले. तुला पैसे देतो असं अकबर म्हणाला पण तो इसम पैसे न घेता परत गेला आणि पुन्हा सापडलाच नाही. आपल्या मदतीला भगवान जगन्नाथच धावून आले असं समजून बादशहा अकबराने जगन्नाथ यात्रा सुरू केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ११

© मंदार दिलीप जोशी

Akbar praying






खर्रा इतिहासः मुमताज बेगम आणि ताज महाल

मुमताज बेगम निष्णात रांगोळी काढणारी होती. ती अस्थम्याची रुग्ण सुद्धा होती. तिला शाहजहान म्हणायचा सुद्धा की प्रिये, रांगोळी नाकातोंडात गेली तर तुला अस्थम्याचा ऍटॅक येईल. पण ती सोळाव्या वेळी गरोदर असताना आपल्या पहिल्या डिलिव्हरीच्या म्हणजे मुलाच्या लग्नात स्वतः जातीने रांगोळी काढायला बसली होती. दुर्दैवाने बादशहा शाहजहान सरांची भीती खरी ठरली आणि रांगोळी तिच्या नाकातोंडात जाऊन दम्याचा विकार बळावून त्यात ती गेली. तिचे अत्यसंस्कार यमुनेच्या काठी करण्यात येऊन तिच्या अस्थी ताज महालात ठेवण्यात आल्या आहेत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ८७

© मंदार दिलीप जोशी


Mumtaj Begum and Taj Mahal



खर्रा इतिहासः कोजागिरी पौर्णिमा आणि अकबर

आजच्याच रात्री बादशहा हुमायूंने बाळ अकबराला सोन्याच्या चषकातून दुध पाजले होते. त्यात हुमायूं जायफळ टाकायला विसरल्याने बाळ जलालुद्दीन जागाच राहिला. म्हणून हुमायुं अकबराला म्हणाला "कोजागरती" म्हणजे "का रे (दिवट्या) जागा आहेस?" (माझा पुढचा प्लॅन बोंबलला ना. बेगम, तुम्ही झोपा). अशा रीतीने हा उत्सव सुरु झाला.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४८८, ओळ २४

© मंदार दिलीप जोशी