इथे चूक की बरोबर यात मला पडायचं नाही. पण हल्ली नातेवाईकांमध्ये कुणी गेलं, तरी फोनवर निरोप आल्यावर जेमतेम त्या शहरात असलेलीच माणसं जमतात. अगदी पुणे, मुंबई, असं जवळपासच्या शहरात कुणी असेल तरी आपल्याला सांगितलं जातं की लगेच नेतोय, तुम्ही येण्याची घाई करु नका. मग आता नेलंच आहे तर कशाला नंतर तरी जा, असं म्हणत जसे संबंध असतील तसं एक फोन करुन काम भागवलं जातंं किंवा मग ते ही नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागली, तसं संपर्काची साधने वाढल्यापासूण नियमित संपर्क उरलेला नाही. थोडक्यात, नातेवाईक म्हणजे आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे झाले आहेत. त्यातला एखादा निखळल्याची बातमी आपल्याला कळते, पण तो 'सोहळा' बघायला न मिळाल्याने क्लोजर मिळत नाही. आणि अनेकांना ते नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही.
कोविडकाळात आणि नंतरही लग्नेही पटापट उरकली गेली, जात आहेत. अर्थात तुम्ही त्या ५० निमंत्रितांच्या यादीत नसणे यावरुन असलेले फेसबुकीय विनोद सोडले तर किमान 'आमचे येथे आमचे चिरंजीव / कन्या यांचे लग्न अमुक अमुक यांच्याशी ठरले असून श्रींच्या कृपेने व अत्यंत मर्यादित निमंत्रितांसह हा सोहळा पार पडेल. तुम्हाला बोलावणे शक्य झाले नाही तरी तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद नवदांपत्याच्या पाठीशी असू देत." असं दोन ओळींचं पत्र पाठवायला काय होतं?
Ships that pass in the night, and speak each other in passing,
Only a signal shown and a distant voice in the darkness;
So on the ocean of life we pass and speak one another,
Only a look and a voice, then darkness again and a silence
– Henry Wadsworth Longfellow
तुमच्यापैकी किंवा ओळखीपाळखीच्यांपैकी नौदलात (सशस्त्र किंवा मर्चंट) कुणी असेल, किंवा अगदी सामान्य ज्ञानाचा भाग म्हणूनही, तर तुम्हाला जवळपास असणार्या बोटी, मग त्या विरुद्ध दिशेला जात असोत किंवा एकत्र, एकमेकांशी संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी भोंगे आणि दिवे यांचा प्रयोग करतात हे माहित असेल (सिग्नल). हल्ली नातेवाईकांचं त्या बोटींपेक्षा बेक्कार झालंय. आयुष्याच्या प्रवासात इकडून तिक्डे जाताना सिग्नलही देण्याचेही कष्ट कुणी घेत नाही. आजवर लग्न झाल्याचं थेट न कळवायची पद्धत सुरु झालीच होती, इकडून तिकडून कळत असे. काही काळाने कुणी गेल्यावरही कळवण्याचे कष्ट कुणी घेणार नाही. ते ही असंच, इकडून तिकडून कळेल.
पण हल्ली कशाचं काही न वाटण्याचा काळ आहे. त्याचंही काही वाटणार नाही. त्याचीही मनाची तयारी झालीच आहे.
How still,
How strangely still
The water is today,
It is not good
For water
To be so still that way
– Langston Hughes
पण हे बरोबर आहे का? असं सारखं का वाटतं? कदाचित मनातलं पाणी तितकं स्तब्ध नसावं. आहे, थोडक्यात, 'माझ्या मना बन दगड' ही अवस्था प्राप्त व्हायला आणखी थोडा वेळ आहे... अजून जीव आहे!
© मंदार दिलीप जोशी
माघ शु. ३, शके १९४३