रशियाचे सम्राट झार निकोलस, त्यांची पत्नी, चार मुली, आणि राजकुमार अलेक्सी यांची निघृण हत्या करुन साम्यवादी बोल्शेविक क्रांतीने रशियातली राजेशाही संपवली आणि गरीब, पिडीत, शोषित, कष्टकरी (proletariat) जनतेचा प्रतिनिधी म्हणून गर्भश्रीमंत कॉम्रेड लेनिन सोवियत रशियाचा अध्यक्ष बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर कॉम्रेड स्टालिन. याच स्टालिनच्या मृत्यू आणि त्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट साम्यवादी हुकुमशाही व्यवस्थेची भयानकता आणि दहशत आपल्यापर्यंत चक्क विनोदाच्या माध्यमातून पोहोचवतो.
स्टॅलिनच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग, त्यातूनच त्याच्या या सहकार्यांना दिसणार्या विविध संधी, त्यात एकमेकांचा कल कुठे आणि कुणाकडे आहे याचा अंदाज घेत कुरघोडी करण्याची आणि आघाडी उघडण्याची सतत चालवलेली अगदी पार स्टालिनच्या अंत्यविधीपर्यंत आणि नंतरही चाललेली कटकारस्थानं, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारण्यासाठी चिह्नित केलेल्या लोकांच्या यादीत सतत होणारे बदल, दीर्घकाळ स्टालिनच्या मर्जीने अत्याचार करत अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या आणि जीव अबाधित राखणाऱ्या त्याच्या सहकारी मंत्र्यांनी तो मेल्यावर अचानक आपण उदारमतवादी आहोत हे दाखवायची धडपड करणे आणि दिखाऊपणासाठी का होईना अनेक कैद्यांना सोडणे इत्यादी दयाळू धोरणे आखणे, स्टालिनची मुलगी स्वेतलाना आणि मुलगा वॅसिली यांना 'मॅनेज' करण्याची धडपड, अशा प्रसंगांमुळे परिस्थिती प्रत्येक क्षणाला कूस बदलते आणि आपली उत्कंठा वाढवत नेत एका अंगावर येणार्या प्रसंगाने चित्रपटाचा शेवट होतो.
साम्यवादी राजवटीत होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी; संपत्ती, जीव, आणि अब्रू यापैकी कशाचीच शाश्वती नसणे आपलं बूड शाबूत रहावं म्हणून सतत चालणारी नेत्यांची केविलवाणी धडपड आणि जनरल सेक्रेटरी (इथे स्टालिन) यांच्याशी एकनिष्ठ असण्याच्या शपथा घेणे; ठार मारावयाच्या व्यक्तींच्या याद्या स्टालिनच्या कार्यालयवजा निवासस्थानाबाहेर एनकेव्हिडी (NKVD) च्या अधिकार्यांच्या हातात ठेवताना बेरिया त्यांना देत असलेल्या सूचना ही दृश्ये प्रथम हसवत असली तरी चित्रपट जसजसा शेवटाकडे जाऊ लागतो तसतसं त्यातला थंड क्रूरपणा ठळकपणे जाणवू लागतो. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर झालेल्या पार्टी मिटींगमधे विविध पदे आणि जबाबदार्यांचे वाटप इत्यादी बाबतीत 'एकमताने' घेतलेले निर्णय हे दृश्य साम्यवादी राजवटीत असलेला वास्तविक भंपकपणा दाखवतं., याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात प्रमुख घटना किंवा मुख्य पात्रांच्या मागे पार्श्वभूमीवर सतत हिंसा दिसते. म्हणजे एकट्याने किंवा घोळक्याने लोकांना धरुन नेलं जात आहे, बंद दाराआडून ऐकू येणारा गोळीबार, ढकलून दिल्याने कुणीतरी जिन्यावरुन गडगडत खाली पडतंय, निव्वळ स्टालिन आजारी असल्याची बातमी घेऊन आलेल्या सैनिकाला झालेली अटक, इत्यादी प्रसंग संपूर्ण चित्रपटभर दिसत राहतात, आणि हे असं सतत दिसणारं थंडपणे चालणारं दमन हा कम्युनिस्ट कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा स्थायी भाव सतत चित्रपटभर अधोरेखित होत राहतो. म्हणूनच चित्रपटाच्या पोस्टरवर शेक्स्पिअरच्या 'कॉमेडी ओफ एरर्स'च्या धर्तीवर असलेले 'कॉमेडी ओफ टेरर्स' हे शब्द शोभतात.
पु. ल. देशपांडे आपल्या अंतु बर्वा या व्यक्तिचित्रात म्हणतात, "विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य अस कवच." हा चित्रपट त्याही पलिकडे जाऊन आपल्याला हसवत हसवत अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, आणि म्हणूनच वेगळा ठरतो. नेहमीच्या हेरकथा आणि विनोदपटांनी कंटाळला असाल तर हा चित्रपट नक्कीच एक सुखद धक्का देऊन जाईल हे नक्की.
म्हणूनच 'द डेथ ऑफ स्टालिन' बघायला विसरू नका!
© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. १३, शके १९४२, महाशिवरात्री