Sunday, October 23, 2011

निर्माल्य

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
'मोगरा फुलला दिवाळी अंक २०११' इथे पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Wednesday, October 19, 2011

अस्तित्व

आज रात्री जेव्हा
तू चंद्र बघशील ना रे
तेव्हा माझी आठवण काढ...
तो सुंदर दिसतो म्हणून नव्हे रे!
तर अशासाठी,
की जसा असंख्य तार्‍यांच्या
संगतीत असूनही तो एकलाच
तशीच सार्‍यांत असलेली
मी ही...

तुझ्याच अमर्याद मनोधैर्याच्या साथीने
जगते आहे रे
माझ्या अस्तित्वाची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त....

तुझीच प्रभा
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच रवीकिरणं झेलून
परावर्तित करणार्‍या
त्या चंद्रासारखीच

तरीही...
हा एकलेपणा संपवण्याची
भलती स्वप्नं
नको रे दाखवूस
आपल्यातलं अंतरच करेल
माझी राखण!

पण...
काहीही झालं तरी
माझं अस्तित्वच
तुझ्या 'असण्यावर' अवलंबून!!

Tuesday, October 11, 2011

धडा

जरा काही खुट्टं झाल्यावर
राईचा पर्वत करण्याचा
स्वभावच त्याचा...

मग आज काय?
तर म्हणे कालच आणलेले
नवीन बूट अचानक आवडेनासे!
मग ते बदलायला...
तणतणतच गेला दुकानात

गल्ल्यावर बसलेल्या तिने
हसत चौकशी केली

"मॅडम,
फार घट्ट होताहेत"
तो फणकारला
.....उगाचच काहीतरी कारण

'अरे दुसरे जोड दाखव रे
या साहेबांना'

"हिला स्वत: उठायला काय होतं"
तो विचारात असतानाच

पोर्‍याची धांदल पाहून
ती उठलीच

पण तो मात्र......
'तिने' काढलेला
छानसा नवा जोड
घालून बघण्याआधीच
बदलायला आणलेले बूट घेऊन
केव्हाच परतलेला....
....खालमानेनं.

तर ती...अचंबित....
पण तेच तजेलदार हसू
चेहर्‍यावर लेऊन
पुन्हा गल्ल्यावर....
....दोन्ही पायात घातलेले
जयपूर फुट सावरत.

Tuesday, September 20, 2011

अंतर

एरवी आपल्यातल्या अंतराला
नियतीची क्रूर चेष्टा
म्हटल्यावर...
"पार्ट ऑफ लाईफ आहे,
तक्रार नाही रे कसलीच"
असं धिटाईनं
समजावणारी तू

आणि आज.........
"आपण काय एकमेकांना
'एका हाकेवर' आहोत"
म्हटल्यावर....
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच

आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?

Saturday, September 17, 2011

पावती

तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली

तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली

तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Monday, September 5, 2011

पत्र

तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
आज मात्र
नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय......
अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय

...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?