आदरणीय(!) संपादक साहेब गिरीश कुबेर साहेबांस,
[लोकसत्तात मराठीची काय वाट लागलेली आहे याचा मी उल्लेखही करत नाही याची कृपया नोंद घ्या (किंवा घेऊ नका....आम्हाला काय त्याचे?)[]
मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. माझ्या सुरवातीच्या मराठी वाचनात लोकसत्ताचा मोठा वाटा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. आम्ही उभयतां नोकरी करत असल्याने छापील अंक वाचायला दोघांनाही वेळ नव्हता. आता मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हा वाचनीय होता. नंतर उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. हिंदूंच्या बाजूने बोलणार्या त्यांचे प्रश्न मांडणार्या कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता. आता तर या गरळओकीत मोदी सरकार आल्याने नवा जोम आला आहे. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही.
थोडासा ट्रॅक बदलतो. अनिसच्या भूमिकेनुसार "समाजामध्ये काम करताना थेट देवावर विश्वास/श्रद्धा ठेवू नका असे सांगत काम करता येत नाही, त्यामुळे बहुसंख्य समाज दूर जातो. त्यापेक्षा थेट अंधश्रद्धांवर (बुवाबाजी, ज्योतिष इत्यादी) हल्ला चढवत, त्यांचे दुष्परिणाम सांगत लोकांपर्यंत अधिक चांगले पोचता येते, प्रबोधन करता येते." याचाच अर्थ असा की आधी उघड दिसणार्या अंधश्रद्धांवर हल्ला चढवायचा. मग हळू हळू एक एक श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे हे पटवत पटवत लोकांना देव आणी श्रद्धा वगैर सब झूठ या पातळीवर यायला प्रवृत्त करायचं. उदाहरणतः नारळ फोडणे ही अंधश्रद्धा आहे, कोंबडी कापू नका, इत्यादी. मग हे भंपक आणि भेकड लोक बकरे कापणार्यांना जाऊन सांगणार नाहीत. कारण ते सेक्युलर आहेत. हा हलकटपणा लोक खपवून घेत नाहीत हे चांगलंच आहे. इथे कोणीही 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' हे पाळत नाही आणि स्वतः कष्ट करतोच. ते करत असताना आम्ही काही सण साजरे करत असलो आणि काही प्रथा पाळत असलो तर त्या आम्ही पाळणारच.
दाभोलकर हत्येनंतर ज्याप्रमाणे हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला त्यामुळे तर आधीच हास्यास्पद असलेली अनिसची विश्वासार्हता खड्ड्यात जात चाललेलीच आहे. त्यांच्याबरोबर लोकसत्तानेही बहुतेक आपली निष्ठा विकून स्वतःच्या अब्रूला चितेवर चढवून अनिसबरोबर सती जायची तयारी केलेली दिसते.
तेव्हा हिरवी हवा डोक्यात गेलेले संपादक महाशय गिरीश कुबेर, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली ऊठसूठ हिंदूना(च) अक्कल शिकवण्याचा आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि या उचापत्यांनी हेही स्पष्ट आहे की तुमची नियतही साफ नाही.
कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता टिकवून ठेवू शकत नाही. माझ्यासारखे अनेक जण केवळ इतक्या वर्षांची सवय मोडता येत नाही म्हणून लोकसत्ता घेत होते. त्यातल्या मी फक्त माझ्यापुरता एक निर्णय घेतला आहे. तुमचा पेपर मी माझ्यापुरता या महिन्यापासून बंद करतो आहे. सकाळी सकाळी डोक्याला शॉट लाऊन घेण्याची माझी इच्छा नाही. आत्तापर्यंत चालू होता कारण काही लेख वाचायला आवडत असे. आता आवडणारे लेख ऑनलाईन वाचत जाईन आणि वाटलंच तर आवडणार्या लेखांचे प्रिन्टाआउट काढत जाईन.
आपला,
लोकसत्तावरची श्रद्धा उडालेला,
मंदार दि. जोशी