Monday, August 18, 2014

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

मित्रहो, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मला हे देखील मान्य आहे की अक्कल शिकवण्याची वेळ येते तेव्हा पहिल्यांदा काही घटिंगणांना हिंदूंचेच सण सुचतात. पण मी या बाबतीत भाष्य करण्याचे कारण म्हणजे दहीहंडीचा सण ज्या प्रकारे साजरा केला जातो त्याला प्राप्त झालेले विकृत रूप. आपण आपल्याच बांधवांना मृत्यूच्या दाढेत आणखी किती काळ लोटत राहणार आहोत? पडल्यावर ब्रह्मांड कशा प्रकारे आठवतं हे जाणून घ्यायचे असेल तर घरातल्या घरात पार्श्वभागावर पडून पहावे. म्हणूनच मेले ते सुटले असं म्हणावं अशी अवस्था अपंगत्व आलेल्यांची होते हे वेगळं सांगायला नकोच.  तेव्हा अशा प्रकारे वर्षानुवर्ष आपण मानवी नुकसान सोसून आपल्याच धर्माची हानी करुन घेण्यापेक्षा निदान या सणाच्या विकृतीकरणाकडे तरी गंभीर लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. यावरुन मला हा उत्सव साजरा करण्याची जी कल्पना सुचली आहे ती तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला आवडली तर ती जरूर तुमच्या लाडक्या राजकीय नेत्यांपर्यंत किंवा पक्षापर्यंत पोहोचवा. एकाने जरी ही कल्पना उचलून धरली तरी मला भरून पावल्यासारखे होईल.

सद्ध्या दहीहंडी आणि त्यात लागणार्‍या मानवी थरांबद्दल बरंच काही वाचायला मिळत आहे. हंडी फोडत असताना झालेले अपघात हे अशा प्रत्येक चर्चेच्या आणि वादविवादाच्या केंद्रस्थानी दिसतात. यावर एक कल्पना सुचली आहे जेणेकरुन उत्सव उत्साहात साजराही करता येईल आणि होणारे मानवी नुकसान टाळताही येईल.

श्रीकृष्णाच्या काळात गृहिणी काही दह्याच्या हंड्या मोठमोठ्या इमारतींमधे बांधून ठेवत नसत. त्या घरातच छताला टांगून ठेवत होत्या. त्यामुळे हा उत्सव साजरा केला जाण्याची आताची पद्धत ही चर्चांमध्ये म्हटले जात असल्याप्रमाणे धोकादायकच नव्हे तर धार्मिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्याही चुकीची वाटते.

तेव्हा हा उत्सव साजरा करताना शाळांमधल्या वर्गात किंवा सभागृहात किंवा मग चक्क मंगल कार्यालय भाड्याने घ्यावा व तिथे हंडी बांधावी. जिथे हंडी बांधली जाईल तिथे हंडीची उंची साधारणपणे गावाकडच्या घरांच्या छताएवढीच असेल असे पहावे. गोविंदा म्हणून लहान मुलांना घ्यावे व जास्तीत जास्त तीन थर होतील अशा प्रकारे त्यांना हंडी फोडायला लावावी

हे करण्यासाठी जी जागा निश्चित केली जाईल तिथे गणपतीत जसे देखावे केले जातात तशा प्रकारे देखावा उभा करावा. म्हणजे जुन्याकाळचे वाटेल असे सामान, दह्याच्या हंड्या इकडेतिकडे ठेवलेल्या, एखादी जुनाट खाट, वगैरे. या देखाव्यांमुळे जास्त लोकांना काम मिळेल. अधिकाधिक सुंदर देखावा तयार करणार्‍या कलाकारांना किंवा असणार्‍या दहीहंडी मंडळांना रोख पुरस्कार द्यावेत. त्या देखाव्यात दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांची त्या वर्षीची शाळेची फी परस्पर भरली जावी. आणखी अनेक गोष्टी राबवल्या जाऊ शकतात.

तर मित्रहो, कशी वाटली कल्पना. ही कल्पना आवडल्यास इथे सांगायला विसरू नका. तसेच वर आवाहन केल्याप्रमाणे तुमच्या आवडत्या राजकीय नेत्यापर्यंत आणि पक्षापर्यंत पोहोचवायला विसरू नका.|| धर्मो रक्षति रक्षित: ||

7 comments:

 1. मला स्वतःला तुझी कल्पना एकदम आवडली. असा उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी एकाचवेळी राबवता येईल. अनेकांना सहभागी होता येईल. सणाचे काय महत्त्व तेही समजून येईल. नासधूस कमी आणि आनंद जास्त. प्रत्यक्षात कृती करण्यासाठी मात्र सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. केवळ विचार व्यक्त करून उपयोग नाही.

  ReplyDelete
 2. वा छान कल्पना आहे
  लेख आवडला

  ReplyDelete
 3. आपली कल्पना अतिशय सुंदर व तर्काला धरून आहे ... शंकाच नाही ... मला फार चांगल्या शब्दात भावना मांडता येत नाही म्हणून एक विनंती करतो मला एक पत्र लिहून हवे आहे त्यात मजकुरा असावा

  जगाच्या पाठीवर असंख्य खेळ खेळले जातात ज्यात जीवाला धोका असतो दही हांडी त्यातलाच एक आहे यात अपार बौद्धिक शारीरिक कसोटी आहे पण या खेळाला सनान पुरताच मर्यादित ना ठेवता किंवा राजकीय धार्मिक मुद्दा न बनवता याला नियमबद्ध करून आधुनिक वळण देऊन जगाच्या समोर आणावा त्यासाठी या खेळाचे पारंपरिक खेळाडू प्रशिक्षक क्रीडतत्ज्ञ यांची मदत घ्यावी म्हणजे संपूर्ण जगतात हा खेळ खेळाला जाईल


  हे पत्र आपण सर्व राजकीय पक्षांना धार्मिक संस्थानांना दही हंडी खेळाडूंना तसेच सोशल मीडिया द्वारे घरा घरात पाठवू मग पाहू काही बदल होतो का ते

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच. आपल्याला काही मुद्दे सुचल्यास ते मला पाठवावेत. मी योग्य शब्दबद्ध करायचा प्रयास करतो. मग पाठवूया नक्की पत्र.

   Delete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. Shrikrishnachya kaLat lahan mule dahyachi handi fodat hoti. vayachi maryada ghalun mothyancha sahabhag band ch kela tar barech dhoke kami hotil.

  ReplyDelete