Monday, September 12, 2016

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका

- Maria Wirth

या लेखाचं मराठी भाषांतर/रूपांतर:

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका
- मारीया वर्थ

ख्रिश्चन धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही, आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांच्याकडून ही निरीक्षणे आलेली आहेत. मारीया वर्थ ख्रिश्चन धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या तरी त्या हिंदू धर्मातला स्वातंत्र्य व मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रसंशक राहिल्या आहेत. हिंदू धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ठ पर्याय असताना काही हिंदू आपल्या हिंदू असण्याची जवळ जवळ लाज बाळगल्यासारखं करतात ही बाब मारीया यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहीली आहे.

आता वाचूया मारीया यांची निरिक्षणे:
हिंदू आधी म्हणायचे, "सर्व धर्म सारखे". दुर्दैवाने हिंदूंना एक तर हे दिसत नव्हतं किंवा दिसत असलं तरी मान्य करायचं नव्हतं की जगातले सगळ्यात मोठे दोन धर्म ही समानता मान्य करायला कधीच तयार नव्हते. हे दोन्ही धर्म म्हणतात, "आमचाच धर्म खरा. आमचाच देव हाच एकमेव सर्वशक्तीमान आणि खरा परमेश्वर." "सर्व धर्म सारखे" या गोष्टीवर विश्वास ठेऊन हिंदू धर्मीय त्यांच्या धर्माला ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या पातळी पर्यंत आणू इच्छितात ही ख्रिश्चन व इस्लाम धर्मीयांच्या दृष्टीने चेष्टेचा व दया दाखवण्याचा विषय होता. अर्थातच ख्रिश्चॅनिटी व इस्लाम अशा समानतेला कधीच मान्यता देणार नाहीत हे उघड होतं.

आता हिंदूंचं वृत्ती असते, "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हे आमच्या मुलांना शिकवतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम बाबत आमच्या मुलांच्या कानावर येतं असतं की हे दोन्ही धर्म किती छान आहेत. आम्हाला कुणाला दुखवायचं नसल्याने आम्ही मुलांना हिंदू धर्माबद्दल फारच कमी शिकवतो आणि जे शिकवतो ते फारच वरवरचं असतं - म्हणजे उत्सव आणि काही प्रथा वगैरे. आम्ही अजिबात खोलात जाऊन हिंदू तत्त्वज्ञान आणि आपल्या धर्माला असलेलं वैज्ञानिक अधिष्ठान या बाबत काहीच सांगत नाही. कारण एक तर मुळात आम्हाला त्याबद्दल काही माहीत नसतं आणि असलं तरी न सांगितलेलंच बरं कारण उगाच हिंदू धर्म सगळ्यात चांगला हे त्यातून स्पष्ट झालं तर इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील ना!"

लक्षात घ्या, हिंदू धर्मीयांना मुळातून हे समजूनच घ्यायचं नसतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे हिंदू धर्माचा आदर करत नाहीत. त्या धर्मांचे मौलवी आणि पाद्री हे हिंदूंना हे उघडपणे सांगत नसले, तरी स्वधर्मीयांना सतत सांगत असतात, की "आपल्या धर्मात आले नाहीत, आपल्या देवाचं अस्तित्व कबूल केलं नाही, तर हिंदू नरकात जातील. आपण त्यांना अनुक्रमे जीझस आणि आकाशातला बाप व मोहम्मद आणि अल्लाह यांच्या विषयी सांगूनही ते इतके जिद्दी आणि मूर्ख आहेत की त्यांच्या खोट्या देवदेवतांना ते अजूनही चिकटून आहेत. ही त्यांची घोडचूक आहे. पण गॉड/अल्लाह महान आहे. तो त्यांना त्यांच्या या चुकीची शिक्षा म्हणून असह्य नरकयातना देईल."

हिंदूंच्या "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो" या मताचं एक प्रतिरूप म्हणजे "सगळे धर्म एक उत्तम आणि चारित्र्यवान माणूस कसं व्हावं हे शिकवतात आणि माणसाला त्याच्या निर्मात्याकडे नेण्याचा, म्हणजेच परमेश्वराची भेट घडवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात." म्हणून मग हिंदू सर्वधर्मीय चर्चासत्रांमधे भाग घेतात आणि सगळ्या धर्मांमधल्या समान बाबी शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच काही समान बाबी आहेतच, पण त्या सापडल्या रे सापडल्या की हे हिंदू त्यावर समानतेचे ईमले बांधत सुटतात. "हो, सगळ्या धर्मात चांगल्या बाबी आहेत. हो, सगळ्या धर्मात चांगले लोक असतात". सगळे धर्म चांगल्या गोष्टी शिकवतात ही पोपटपंची हिंदूकडून इतक्या वेळा केली जाते जणू काही ही गोष्ट ते स्वत:लाच समजावत असावेत.

पण खरं सांगायचं झालं तर हिंदूंना कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात हे ठावूक असतं की यात काहीही तथ्य नाही. हिंदूंना हे माहित असतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे केव्हाच पथभ्रष्ट होऊन वेगळेपणाचा पुरस्कार आणि हिंदूंचा द्वेष करु लागले आहेत. या दोन्ही धर्मांनी नेहमी इतर धर्मीयांचा छळ केला आहे आणि असंख्य हुशार व चांगल्या व्यक्तींचा बुद्धीभेद करुन त्यांना अशा एका काल्पनिक परमेश्वरासाठी लढायला प्रवृत्त केलं आहे की जो त्याच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा आत्यंतिक द्वेष करतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम या दोन्ही धर्मांचा इतिहास हा रक्तलांछित आहे. पण हिंदूनी आजवर याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं आहे. जवळ जवळ एक हजार वर्षांच्या दमनचक्रातून जाऊनही "उगाच का डिवचायचं कुणाला" ही घात करणारी भावनाच ते अजूनही जोपासत आहेत.

तुम्हाला असं वाटत नाही का की आता हिंदूंनी नागड्याला नागडं म्हणायला सुरवात केली पाहीजे? स्वामी विवेकानंद म्हणून गेले आहेत की एका हिंदूने त्याच्या धर्माचा त्याग करणे म्हणजे केवळ हिंदू धर्मात एक व्यक्ती कमी इतकाच त्याचा अर्थ होत नाही तर हिंदूंच्या शत्रूमधे एकाची भर असा त्याचा अर्थ होतो". स्वामीजींच्या मते ब्रिटीश राज्यात ख्रिश्चन व मुसलमान जनतेस श्रेष्ठत्वाची भावना जोपासण्यास सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जायचे.

या विरोधात हिंदूंना या विरोधात काहीही करता येईना कारण त्यांची बाजू घेऊन ब्रिटीश सरकारशी भांडायच्या ऐवजी त्यांचे अनेक आंग्लाळलेले नेते ब्रिटीशांच्या घातक शैक्षणिक धोरणामुळे जाणते किंवा अजाणतेपणाने हिंदुत्वाचा सातत्याने अपमान करण्यात गुंतलेले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही हेच नेते सत्तेवर आल्याने तेच धोरण पुढे राबवले गेले. आता स्वातंत्र्याला एकोणसत्तर वर्ष झाल्यावर मात्र हिंदू धर्म म्हणजे काय हे जगाला उच्चरवाने व निर्भीडपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.

हिंदुत्वाचा अर्थ जगावर राज्य करणे नव्हे. हिंदुत्व म्हणजे कुठलाही पुरावा न देता पुढे रेटलेल्या एखाद्या अतार्किक समजूतीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःच्या धर्म तो बाळ्या आणि इतरांचं ते कार्टं हे सुद्धा नव्हे. तर हिंदुत्व म्हणजे शरीर व मनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने आपण कोण आहोत (आत्मन) याचा घेतलेला शोध होय. या भूमीतल्या प्राचीन काळच्या ॠषीमुनींना विविधतेमधे एकता म्हणजे काय याचा अर्थ केव्हाच कळला होता, अगदी पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांच्या खूप आधी. सुखतत्वाचा शोध कुठेही बाहेर घेणे उपयोगाचे नसते, तर हे तत्त्व आपल्या सगळ्यांच्यात (इतकेच नव्हे तर चराचरात) भिनलेले असल्याने त्याचा शोध प्रत्येकाने स्वतःमधेच घ्यायचा असतो. याचाच अर्थ आपण सारे एकाच इश्वरी तत्त्वाचा अंश आहोत. आपण सगळे एका विशाल कुटुंबाचा भाग आहोत. वसुधैव कटुम्बकम् - सगळ्या विश्वाला एक कुटुंब मानणारी ही धारणा सर्वसमावेशक आणि म्हणूनच अधिक स्वीकारार्ह नव्हे काय?!

- मारीया वर्थ

ता.क. मारीया वर्थ यांचा लेख वाचत असताना मला पु.ल.देशपांडे यांच्या म्हैस या कथेतल्या बगुनाना या व्यक्तीरेखेची आठवण आली. बगुनाना हे उस्मान शेठ या मुसलमान व्यक्तीरेखेच्या डब्यातले आमलेट खाताना, "तुम्ही काहीss म्हणाss उस्मानशेssssठ, सर्व धर्म सारखे." यावर कथाकथन ऐकत असलेल्या प्रेक्षकांत हशा उसळतो. पण यातल्या कळीच्या शब्दांकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. ते म्हणजे "तुम्ही काही म्हणा". उस्मानशेठ म्हणोत की न म्हणोत, आम्ही मात्र सर्व धर्म सारखे म्हणत त्यांच्या डब्यातलं आमलेट जिभल्या चाटत हाणणार. पण उज्जैनमधले मदरसे इस्कॉन मंदिरातून पुरवल्या जाणार्‍या दुपारच्या जेवणाला 'इस्लाम खतरे में हैं' ची आरोळी देत झिडकारतात त्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करणार.

अशा हिंदूंना एकच सांगावंसं वाटतं.....

आता तरी म्हणू नका सर्व धर्म सारखे.
म्हणणारे केव्हाच झाले जीवाला पारखे

काय समजलात?

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद शु. १०, शके १९३८

Thursday, September 1, 2016

पंडित नामा १०: ए. के. रैना

ए. के. रैना (एम.टेक., केमिकल इंजिनिअरिंग)
निवासः हंदवाडा
जन्मः ४ जून १९४६
हत्या: २० मार्च १९९०




बटा चालीव, मगर बटीने वरय

अर्थः सगळी पुरुष मंडळी काश्मीर सोडून जा, आणि तुमच्या बायका मुली मात्र मागे सोडून जा.

काश्मीरी पंडितांना फक्त या घोषणाच ऐकू यायच्या असं नव्हे, तर ज्यांच्या शेजारी ते वर्षानुवर्ष राहिले तेच मुसलमान शेजारी अगदी बायकापोरांसकट जोरजोरात मशीदीत या घोषणा द्यायला जमताना दिसायचे. हे दृश्य बघितल्यावर पंडितांचा धीर खचत चालला होता. इतका, की घरातल्या पुरुष दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले किंवा त्यांना अतिरेक्यांनी गायब केलं तर मागे राहीलेल्या घरातल्या बायकामुलींची अब्रू सुरक्षित रहावी म्हणून जीव देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरात रॉकेल, पेट्रोल, डिझेल, केरोसीन यापैकी जे मिळेल ते जसं साठवता येईल तसं आणि जिथे साठवता येईल तिथे साठवायला सुरवात केली होती. अर्थात किती जणींवर स्वतःला जाळून घेण्याची वेळ आली या संदर्भात काही तपशील उपलब्ध नाही. आणि ज्या कुणी जळून केल्या असतील त्यांच्यापैकी किती जणींनी स्वतःला जाळून घेतलं असेल आणि किती जणींना अत्याचार झाल्यावर जाळून टाकण्यात आलं असेल याबद्दलही काहीच माहिती उपलब्ध नाही. इतिहास जसा जेते लिहीतात तसा आपल्याला सोयीचा नसेल तो इतिहास जेते पुसूनही टाकतात याचा प्रत्यय काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार शोधताना पुरेपूर येतो. तर, पाठीत वार करणार्‍या शेजार्‍यांबरोबरच जहाल इस्लामी मानसिकतेची लागण झालेले राज्यातले पोलीस दल आणि अतिरेक्यांबद्दल सहानुभूती असलेले अतिशय भ्रष्ट प्रशासन यांनी पंडितांना खोर्‍यात राहूच द्यायचं नाही असा चंग बांधला होता.

सरकारी सेवेत उच्चपदावरील काश्मीरी पंडितांच्या निवासाची, त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्ग व वेळांची इत्यंभूत माहिती त्यांचेच शेजारी व कार्यालयातील सहकारी अतिरेक्यांना पुरवत असत.

श्री ए. के. रैना हे असेच एक उच्चपदावर असलेले सरकारी नोकर. नियमितपणे येणार्‍या हिंदू सरकारी कर्मचार्‍यांच्या हत्येच्या बातम्यांनी ते विचलित नक्कीच होत असत. एकदा त्यांच्या एका मित्राची त्याच्याच घरासमोर करण्यात आली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला होता. काही दिवस काश्मीर खोरे सोडून मग परिस्थिती पुर्वपदावर आली की परत येऊ अशी चर्चा रैना यांच्या घरात चालत असे. पण श्री रैना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट मुलांना बोलून दाखवत की, "मी कुणाचं काही वाईट केलेलं नाही, कुणाकडून एक छदामही लाच न मागता कायम प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत आलो आहे, मग माझं कुणीच काही वाकडं करणार नाही".

नियमित होणारे बाँबहल्ले व गोळीबार अशा अतिरेकी कारवाया, कधीही निघणारे मोर्चे, दगडफेक व इतर हिंसक घटनांमुळे तेव्हा संचारबंदी लागू होण्याचे प्रसंग वारंवार येत असंत. पळवलं जाण्याच्या भीतीने श्री रैना यांच्या मुलांचं शाळेत जाणं केव्हाच बंद झालेलं असलं तरी अन्नपुरवठा खात्याचे उपसंचालक असल्याने त्यांना स्वतःला मात्र कुठल्याही परिस्थितीत नोकरीवर हजर रहावं लागत असे. मग तो सरकारी सुट्टीचा दिवस असो किंवा रविवार. अगदी सणासुदीला सुद्धा त्यांना उपलब्ध रहावं लागत असे. त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तडकाफडकी सुट्टीवर जाणं शक्य नव्हतं. म्हणून रैना कुटुंबियांनी हळू हळू घरातल्या जीवनावश्यक वस्तूंच्या बांधाबांधीला प्रारंभ केला होता. कुटुंबियांना जम्मूला सोडून पुन्हा परत कामावर हजर व्हायचं अशी श्री रैना यांची योजना होती. त्यांचा मुलगा विकास यामुळे जरा खट्टू झाला होता, कारण त्याला समाजकार्याची प्रचंड आवड होती आणि जसं जसं वय वाढत जाइल तसं तसं ते वाढवत नेण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्या वेळी जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचं असल्याने ते तात्पुरतं बासनात गुंडाळून ठेवायला तो तयार झाला.

२० मार्चच्या सकाळी नेहमीप्रमाणे ध्यानधारणा व पूजाअर्चा संपल्यावर श्री रैना यांनी घरच्यांशी गप्पा मारल्या, भरपूर थट्टामस्करी केली व हसतमुखाने त्यांच्या कार्यालयात गेले. विवेकला पोटात दुखत होतं म्हणून तो परिचयाच्या एका डॉक्टरांकडे गेला आणि आल्यावर औषध घेऊन झोपून गेला. पण लवकरच त्याची झोपमोड झाली. अचानक दारावर थाप पडली आणि श्री रैना यांच्या ऑफिसात काम करणारा एक सहकारी रडत रडत घरात शिरला. श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत ही बातमी घेऊन तो आला होता. ताबडतोब विवेकचा मोठा भाऊ आणि त्याचा एक मित्र त्याच्या आईवडीलांना घेऊन श्री रैनांच्या ऑफिसात जायला निघाले. सगळ्यांना आशा होती की श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत म्हणजे ते अजून हयात आहेत आणि उपचाराअंती ते लवकरच बरे होतील. तिथे पोहोचल्यावर त्यांना जरासं वेगळं दृश्य बघायला मिळालं. कदाचित त्या वेळी झालेल्या आवाजांनी बसलेल्या धक्क्याने त्या सहकार्‍याचा नक्की काय घडलं याबाबत गोंधळ उडाला असावा. श्री रैना हे बाँबस्फोटात जखमी झालेले नव्हते तर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. श्री रैना यांच्या उजव्या हाताचं मधलं बोट एका गोळीने छाटलं गेलं होतं तर त्यांचा बळी छातीत घुसलेल्या दोन गोळ्यांनी घेतला होता. जागोजागी पसरलेलं रक्त आणि ऑफिसातलं फर्निचरची अवस्था या दोन गोष्टी काय घडलं असेल याची गोष्ट सांगत होत्या.  श्री रैना यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना त्यांनी टेबलाची ढाल करुन स्वसंरक्षणाचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण कलाशनिकोव्ह मधून सुसाट निघालेल्या गोळ्यांनी त्या टेबलाचा फार काळ निभाव लागला नव्हता हे उघड होतं.या हत्येला जबाबदार होता तो कुप्रसिद्ध अतिरेकी बिट्टा कराटे. श्री रैना त्यांना हॉस्पिटलमधे नेतानाच मरण पावले.

श्री रैना यांच्या ऑफिसातल्या सगळ्या मुस्लीम सहकार्‍यांना त्या दिवशी काय होणार आहे याची कल्पना होती असं नंतर समोर आलं. पण श्री रैना यांना योग्य इशारा देण्याची कुणीही तसदी घेतली नाही. एक काफीर कमी होतो आहे तर कशाला आपण मधे पडा असा विचार करुन सगळे गप्प बसले. ओठांवर अल्लाहचं नाव आणि कलाशनिकोव्ह घेतलेले त्यांना अधिक प्रिय वाटत होते हे उघड होतं.

आधी एका भागात आपण वाचल्याचं आठवत असेल तर बिट्टा कराटेचं यथावकाश 'पुनर्वसन' झालं, त्याने लग्न केलं आणि त्याला मूलंही झालं. थोडक्यात, अनेकांचा बळी घेतलेला नराधम आता कुटुंबवत्सल झाला. सौ चूहे खाके बिल्ली चली हजको या म्हणीआ उगम नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही, मात्र ही म्हण अनेकांचे संसार उध्वस्त करुन मग स्वतः संसारात 'सेटल' झालेल्या अशाच हरामखोरांना बघितल्यावर निर्माण झाली असावी.

रैना कुटुंब एक अत्यंत सुखी कुटुंब होतं. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असणारी ही मंडळी शांतपणे आपलं आयुष्य कंठत होती. संध्याकाळी जमल्यावर दिवसभरात काय काय झालं ते सगळं मुलं त्यांच्या वडिलांना म्हणजे श्री रैना यांना सांगायची आणि वडील त्यांच्या कार्यालयात घडणार्‍या गंमती जमती घरच्यांना सांगत. दोन्ही मुलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. असं एक आनंदी शांततप्रिय कुटुंब बिट्टाने उध्वस्त केलं.

श्री रैना यांच्या हत्येनंतर इतर पंडित कुटुंबांप्रमाणेच रैना कुटुंबियही जम्मूला स्थलांतरीत झाले. रैनांच्या पत्नीला तब्बल पाच वर्षांनी पेन्शन मंजूर झालं, कारण त्याही तेव्हा सरकारी सेवेत होत्या. त्यांची बदली जम्मूला करण्यात आली होती. विवेकला जम्मूतल्या स्थानिक सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला तर कालांतराने त्याच्या मोठ्या भावाने पटना  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रैना कुटुंबियांचा चरितार्थ व नातेवाईकांच्या मदतीने मुलांचे शैक्षणिक प्रवेश व नंतरचे शिक्षण जरी सुरळीत चालू झाले असले तरी त्यांना बसलेला मानसिक धक्का जबरदस्त होता. आर्थिक नुकसान भरुन काढता येतं. पण मनाला झालेली खोल जखम अनेक दिवस ठसठसत राहते. एकेमेकांना घट्ट धरुन राहणार्‍या रैना कुटुंबियांना काय धक्का बसला असेल याची आपण कदाचित कल्पनाही करु शकणार नाही. विवेक म्हणतो "बदला घेण्याची भावना मला कधी कधी रात्र रात्र झोपू देत नसे."

पण इतर अनेकांप्रमाणेच विवेकनेही झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायला हातात बंदूकच काय, साधा दगडही नाही घेतला. त्याच्या गुरूच्या सल्ल्याने विवेकने यंग्स इंडिया ही सेवाभावी संस्था सुरु केली. निर्वासित काश्मीरी पंडित व इतर सर्वांसाठी पर्यावरण विषयक, ग्रामस्वच्छता, पाण्यासाठी हँडपंप बसवून देणे, काश्मिरी पंडित युवकांना नोकरीसाठी सहाय्य करणे, या कामांपासून ते सरकारी कामात गोरगरीबांना  सहाय्य करणे इथपर्यंत ही संस्था काम करु लागली. या संस्थेने पार युनिसेफबरोबर काम करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. विवेकचं म्हणणं आहे की "मला मित्रासारख्या असलेल्या परमप्रिय वडिलांच्या हत्येनंतर मी चुकीच्या मार्गाला लागू शकलो असतो. पण मी तसं न करता सकारात्मकतेकडे वळलो आणि माझं आयुष्य बर्‍यापैकी सुखकर झालं."

हे बरोबर की चूक माहित नाही. पण विवेकसारखे अनेक आहेत ज्यांच्यापैकी कुणीही बदला घ्यायला हिंसेचा मार्ग स्वीकारलेला नाही.

पण हे धर्माच्या नावावर हिंसेचा नंगानाच घालणार्‍यांना कोण समजावणार? अल्लाहला न मानणारे काफीर आहेत आणि काफीरांना ठारच मारलं गेलं पाहीजे या भावनेने ग्रस्त असलेल्यांना कोण समजावणार? आणि आपली काहीही चूक नसताना आपल्या जीवावर उठलेल्यांना चर्चेने नव्हे तर गोळीनेच उत्तर द्यायचं असतं हे तरी सत्तेतल्या लोकांना कोण समजावणार?

---------- काही मनातले ----------

आत्तापर्यंतचे दहा भाग वैय्यक्तिक हत्त्यांची गोष्ट सांगणारे होते. त्यानंतरचे एक किंवा दोन भाग सामूहिक हत्याकांडांवर आधारित असतील. त्यानंतर ही मालिका संपेल. ही मालिका लिहायला सुरवात करताना अमुक भाग लिहावेत असं ठरवलेलं नव्हतं. काश्मीरमधे अतिरेकी बुरहान वानीला सैन्याने संपवल्यानंतर उसळलेल्या पण आधीपासून व्यवस्थित पूर्वतयारीकरुन सुरु झालेल्या हिंसाचाराने हे लिहायला मला भाग पाडलं असं म्हटलं तरी चालेल.

ही मालिका लिहीत असताना मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. मी काही फार मोठा लेखक नाही, मला जे मनापासून भावतात त्या विषयांवर मी लिहीतो इतकंच. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। या समर्थवचनांचं जितकं शक्य होईल तितकं पालन मी करतो. तेव्हा माझ्या लेखनकौशल्याबद्दलच्या कौतुकपर टिप्पण्यावगळून बाकीच्या गोष्टींकडे वळतो. मुळात या विषयावर तू लिहीतोस याचंच कौतुक आहे असं एका जाणकाराने मला सांगितलं. तसंच तुमच्या या मालिकेमुळे बर्‍याच माहित नसलेल्या गोष्टी समजल्या अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. माझे बरेच गैरसमज होते ते दूर झाले असंही एका व्यक्तीने सांगितलं.

या उलट "हे लिहून काय होणार, 'हा मेला, ती मेली' या माहितीचा फायदा काय?" अशीही एक अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया एका व्यक्तीकडून मिळाली. त्यात त्या व्यक्तीचा दोष नाही. मुळात आपल्यात राष्ट्रीय चरित्र हीच गोष्ट नव्याने निर्माण करायला हवी आहे. इस्लामी दहशतवाद हा आतासारखा आपल्या दारापर्यंत यायलाच हवा असं नाही. ज्याप्रमाणे आपल्या पायाला ठेच लागली की तोंड वेदनेने कळवळतं, डोळ्यांतून पाणी येतं, आणि हात लगेच पायाच्या मदतीला धावतो, त्याप्रमाणे देशात कुठेही घडणार्‍या अशा घटनांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया झाली पाहीजे. अगदी रस्त्यावर उतरून निदर्शनं करणं जमलं नाही तरी चालेल पण आपापले कामधंदे सांभाळूनकरता येण्याजोगी अनेक कामं आहेत. उदाहरणतः सरकारला पत्र पाठवणं, ज्या लोकांकडून आपल्या जवानांचा अपमान होतो त्या लोकांकडून काहीही खरेदी न करणं, आपल्या जवळपासच्या अशा गरजूंना मदत करणं, आपल्यापैकी जे उत्तम लेखन करु शकतात त्यांनी या विषयावर लेखन करुन जनजागृती करावी, अशी अनेक कामं आपण नक्कीच करु शकतो.

प्रश्न उरला मी का लिहीतो याचा. एका व्यक्तीने मला विचारलं होतं, तुला या लिखाणाचा त्रास होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना अरनेस्ट हेमिन्गवे या लेखकाचं एक वाक्य आठवलं: "Write hard and clear about what hurts". माझ्या आजूबाजूला आणि देशात काय चाललंय याचा मला त्रास होतो म्हणूनच मी लिहीतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर लिहीलं नाही तरच मला त्रास होईल.

आता शेवटच्या भागात लवकरच भेटूया. तेव्हा संदर्भांचीही यादी देईन.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण अमावस्या, बैल पोळा, शके १९३८
१ सप्टेंबर इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Sunday, August 28, 2016

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस खुले पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस,

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

पत्र लिहिण्यास कारण की गणेशोत्सव जवळ आला आहे व हल्ली तुमच्या परवानगीशिवाय देशात काहीही होत नसल्याने हे काही प्रश्न:

१) घरी गणपती आणू की नको? आमच्याकडे सद्ध्या दीड दिवस गणपती असतो. दुसर्‍या दिवशी मधलाच वार असल्याने यंदा सुट्टी काढावी लागलेली आहे. राष्ट्रहिताविषयी तुमची तळमळ लक्षात घेता गणपती आणणे रद्द करावे व एक दिवस राष्ट्राच्या उभारणीसाठी फुकट घालवू नये की कसे या विषयी आपले यंदा काय निर्देश आहेत?

२) गणपती किती दिवस आणू? दीड/५/७/११/२१?

३) गणपती आणताना व विसर्जन करावयास नेताना आम्ही आमची खाजगी चारचाकी वापरतो. यंदाही तीच वापरली चालेल का? की गणेशोत्सवात चारचाकी मोठ्या प्रमाणात वापरल्याने प्रदूषण खूप होते असे आपले मत आहे? तसे असल्यास दुचाकी वापरली चालेल का?
३) अ) दुचाकी वापरल्यास त्यावर दुचाकी चालवणारा व मागे गणपती (आणि जीव मुठीत) धरुन बसणारा अशा दोन व्यक्ती चालतील का? की सोबत गणपती आहे म्हणून ते तीन धरले जाऊन दंड होईल? मग गाडी चालवणार्‍याने गणपतीला पाठुंगळीला बांधून बसावे असे आपले निर्देश आहेत काय?
३) ब) चारचाकी वापरणे चालणार असल्यास प्रश्न क्रमांक ३ उपप्रश्न अ प्रमाणे चालक धरुन पाच माणसे बसलेली चालतील की फक्त चार जणांनी बसून गणपतीला चालकाच्या बाजूला सीटबेल्ट लावून बसवावे? यासंदर्भात आपले निर्देश काय असणार आहेत?
३) क) गणपती आणण्यात व विसर्जन करायला जाताना दुचाकीवरुन जाणार्‍या मर्त्य मानवांबरोबरच गणपतीलाही हेल्मेट घालणे गरजेचे असेल का? कारण आम्हा मागासलेल्या हिंदूंमधे प्राणप्रतिष्ठापना होण्याअगोदर मूर्तीत प्राण नसतात व उत्तरपूजा झाल्यावर तो पार्थीव होतो त्यामुळे त्याला हेल्मेट घालणे गरजेचे नसावे. तरी पण आपण म्हणालात तर घालतो. काय करावे त्या सूचना आपण द्याव्यात ही विनंती.

४) गणपती किती उंच चालेल? आम्ही नेहमी १२ इंचाचा आणतो. कारण आमच्याकडे तेवढ्याच उंचीची मूर्ती मावेल एवढाच मीठा लाकडी देव्हारा आहे. यंदाही १२ इंचाचा चालेल की कमी करू?

५) नैवैद्य म्हणून केल्या जाणाऱ्या मोदकांचा परीघ व उंची किती असावी?
५) अ) प्रतिमोदक किती ग्रॅम साखर व नारळ वापरले जावेत?

६) गणेशोत्सवात प्रत्येक घराला किती किलो तुप वापरावयाची परवानगी आहे? त्यासंदर्भात आपण नि:संदिग्ध निर्देश देणार आहात काय?

७) प्रत्येक आरतीच्या वेळी किती आरत्या म्हटल्या जाव्यात? आमच्याकडे जुनाट, बुरसटलेल्या प्रथेनुसार अर्थातच गणपतीच्या आरती पासून सुरवात करुन मग देवीची, शंकराची, रामाची, मारुतीची, विठ्ठलाची, दत्ताची, आणि शेवटी घालीन लोटांगण अशा आरत्या म्हटल्या जातात. या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालतील का? की नेहमीच्या पूजेत आम्ही फक्त गणपती, देवी, असं म्हणून घालीन लोटांगण घालतो तसं घातलेलं चालेल? की गणेशोत्सव आहे म्हणून फक्त गणपतीचीच आरती म्हणावी?
७) अ) या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालणार असतील तर आरत्या म्हणण्याचा क्रम काय असावा? त्याच क्रमाने यंदाही म्हटल्या चालतील का? आपण क्रम ठरवून दिल्यास सोपे पडेल.
७) ब) यात देवीची म्हणजे महिषासुरमर्दीनीची आरती म्हणावी की वगळावी? की म्हटल्याने महिषासुरसमर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

८) आरत्या म्हणताना त्यात किती जण असावेत?

९) आरत्या म्हणताना आवाजाची पातळी किती असावी म्हणजे शेजार्‍यांना आवाजाचा त्रास होणार नाही?
९) अ) त्या संदर्भात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असल्यास डेसिबल मापक यंत्र सरकारने जनतेला सवलतीत उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश आपण द्यावेत अशी नम्र आणि लोटांगण घालून विनंती.

१०) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची संख्या किती असावी?
१०) अ) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची जातीनिहाय विभागणी काय असावी? उदाहरणतः समजा १० व्यक्ती जमल्यास त्यापैकी किती तथाकथित उच्चवर्णीय, अनुसूचीत जातीजमातीचे, आर्थिकदृष्ट्या मागास, दलित, महादलित, वगैरे असावेत? या संदर्भातल्या आपल्या निर्देशांची वाट बघत आहे.

११) दुसर्‍या दिवशी जेवायला आमच्याकडे ब्राह्मण बोलावण्याची पद्धत आहे. ते बोलवावेत काय? की आम आदमी पक्षाच्या तिहार मधल्या एखाद्या आमदार किंवा कार्यकर्त्याला बोलवावे?

१२) पूजेसाठी दुर्वा आणल्या चालतील की तो वृक्षतोडीच्या कसल्याशा कायद्याखाली गुन्हा ठरवण्याचा आपला मानस आहे?

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्‍या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्‍या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा दिवाळीचे फटाके, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता गणेशोत्सव कसे साजरे करावेत याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मुख्य न्यायाधीश म्हणून आपण पुढाकार घेतच आहात तर मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला खाजगी गणेशोत्सव नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरे करता येतील अशी आपल्याला नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला नम्र,
© मंदार दिलीप जोशी

ता. क. संघी पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी हे रीतसर निवडणूक लढवून लोकनियुक्त सरकार तुमच्या मर्जीशिवाय चालवतात म्हणजे काय? त्यांचे ऑडिट तातडीने होणे आवश्यकच आहे. त्यासाठी जनमताचा कौल घ्यायला २०१९ पर्यंत थांबण्याची काय गरज? ते लगेचच करायला पायजेल आहे. (सॉरी बारामतीशेजारच्या पुण्यात राहत असल्याने पटकन ती भाषा तोंडात आली.) शिवाय तुम्हाला फालतू प्रक्रीयेतून न जाता जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून न्यायालयासमोरच्या प्रश्नांना वाचा फोडायचे महत्त्वाचे काम आहेच, तिथे आपण कार्यक्रमांची शोभा (डे नव्हे) वाढवायला जालच. ते आटपले असल्यास आमच्या वरील प्रश्नांसंदर्भात आपण सहानुभूतीने विचार करुन निर्देश द्याल ही खात्री आहे.