Tuesday, August 23, 2011

पारिजातक

आठवतं तुला? दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता
एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो
तेव्हा तू हातात हात गुंफुन
थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस
एकत्र चालायचं का रे?

"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
म्हणूनच साद घालते आहे तुला
निव्वळ माझ्यासाठी नव्हे रे
तुझीही तगमग बघवत नाहीये मला

सारे "पण" विसरुन तुझा हात हातात घेतला
ती जागा आणि तो क्षण अविस्मरणीयच
पण वादळ गेलं आणि लाटा पुन्हा शांत झाल्या
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या
आणि....
तो क्षण निसटलाच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तसा

आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!

Monday, August 15, 2011

देशील का?

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?