Saturday, December 27, 2025

ब्राह्ममुहूर्त

दिवसभराच्या कामात काही सुधारणा हव्या असतील किंवा त्रुटी राहिल्या असतील तर मला ते अचानक साधारण अशाच वेळी आठवतं. खूप वर्षांपूर्वी मी एकदा रात्री अडीच वाजता उठून ऑफिसमध्ये फोन करून रात्रपाळीवर असलेल्या एकाला मला लक्षात आलेली त्रुटी सांगितली आणि वेळीच दुरुस्त करून घेतली. ती क्लायंटच्याही सहज लक्षात आली नसती इतकी छुपी गडबड होती.

रात्री जवळ वही आणि पेन ठेवायची सवय लावून घेतली पाहिजे. मोबाईल उघडायचा नाही, कागदावर कल्पना लिहायच्या.

थोडासा वेगळा मुद्दा आहे, पण आपण जेव्हा हाताने लिहितो तेव्हा ते मनातल्या मनात म्हटलं जातं, वाचलं जातं, मेंदूत प्रक्रिया होते त्यामुळे लक्षात चांगलं राहतं. एका प्रोजेक्टच्या वेळी मुख्य काम सुरू करण्याआधी एक चेकलिस्ट मी कागदावर लिहून जवळ ठेवली आणि त्यात पाहून काही गोष्टी आधी तपासून घेत असे. ही सवय लावल्यापासून लक्षणीय प्रगती जाणवली. इतकी की आता या गोष्टी अगदी अंगवळणी पडल्यासारख्या तपासल्या जातात.

 ©️ 🖊️ मंदार दिलीप जोशी
पौष शु. ७, शके १९४७