माझ्या तीर्थरुपांनी मला लावलेली इंग्रजी सिनेमाची सवय मी चिरंजीवांना लावली. त्यातूनच अधुनमधून कंटाळा आला की जेम्स बाँडचा एखादा सिनेमा लावा असा मस्का लावला जातो. अशीच एकदा अशीच शिफारस झाल्यावर मी Moonraker हा Roger Moore चा सिनेमा लावला.
ताबडतोब चिरंजीवांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि म्हणाला बाबा हा नाही हो, तो आधीचा जेम्स बाँड लावा. त्याला Sean Conneryचे नाव पटकन आठवेना म्हणून 'आधीचा जेम्स बाँड'. मला अगदी रिमोटने बदलायचाही आळस म्हणून म्हणालो आधीचा कोण? तर म्हणजे सगळ्यात पहिला जेम्स बॉन्ड होता ना तो. तो जास्त डॅशिंग आणि जबरा बॉन्ड आहे ना बाबा, म्हणून.
हिंदू घरात वाढलेल्या मराठी माध्यमातल्या ज्या मुलाला सिनेमातलं इंग्रजी फारसं कळत नाही त्याला जेम्स बॉन्डची भूमिका उत्तम करणारा नट कोणता आणि चालसे नट कोणता याची जाण असेल, तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचं रामायण कसं असावं, चांगलं/वाईट काय याबद्दल त्याला किंवा त्याच्या 'जनरेशनच्या' वयाच्या मुलांना किती जाण असेल याचा निर्णय परस्पर कुणीही घेऊ नये.
माझं भाग्य थोर की मी मुलांना तो आदिघाणेरडा आणि आदिबुद्धीमंद प्रकार दाखवला नाही, नाहीतर मला मुलांच्यासमोरच मान खाली घालायची वेळ आली असती. तसंही सगळ्यांच्या तोंडी असलेले काही संवाद ऐकवून झाल्यावर "शीssss ब्यॉकsss बाबा काहीही काय हो दाखवता!" असा उद्धार झालाच आहे.
टीपः मुलं रामानंद सागर कृत रामायण जनरेशनची नक्कीच नाहीत. मुलांनी सिया के राम मालिका थोडीशी आधी बघितली होती, आणि मग रामानंद सागर यांची रामायण पुनर्प्रसारित झाल्यावर. त्याच सुमारास कधीतरी लेजेन्ड ऑफ राम हा सिनेमा सुद्धा. त्यामुळे जनरेशनच्या गप्पा नकोत. आक्रमक भाषा, साधी भाषा, आणि टपोरी भाषा यातला फरक त्यांना नक्कीच कळतो.
#आदिपुरुष #AdipurushReview #adipurushmovie #Adipurush #JamesBond #SeanConnery #RogerMoore
© मंदार दिलीप जोशी