Friday, May 29, 2020

दुसरा पुलवामा हल्ला आणि काही निरीक्षणे

काल पुलवामा इथेच आणखी एक दहशतवादी हल्ला लष्कराने उधळून लावला. 

४० जवान गमावलेल्या या आधी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष होऊन गेलेलं आहे तो अजूनही आपल्या स्मरणात ताजा आहे. कारण तो झाला होता. यात काही वेगळं नाही, कारण सर्वसाधारण मानवी स्वभावाचा एक भाग असा आहे की एखादे संकट ओढवले तर त्याच्या स्मृती मनात कोरल्या जातात आणि जी संकटे आपल्या कळत नकळत टाळली जातात त्यांना आपले मन विस्मृतीच्या कप्प्यात ढकलते आणि त्या भोवताली घडणार्‍या घटनांना महत्त्व दिले जात नाही. मात्र प्रत्येक घटना जोडून बघितली तर ती टळलेली संकटे घडण्यामागे किती भानगडी दडलेल्या आहेत हे लक्षात येतं. 

अधिक खोलात जाण्याआधी काल नेमकं काय घडलं ते थोडक्यात पाहूया. तब्बल ६० किलो हून अधिक आयईडी स्फोटके भरलेली मोटार उडवून देऊन 'पुलवामा'सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवण्याचा मोठा कट सुरक्षा दलांनी गुरुवारी उधळला (काही ठिकाणी हा उल्लेख ४५ किलो आहे पण हे प्रमाणही कमी नाही व त्याने घटनेचे गांभीर्यही कमी होत नाही). याचा व्हिडिओ आपण बघितला असेलच, सहज उपलब्ध आहे. स्फोटकांच्या वजनावरुन साधारणतः सर्वसामान्य जनतेला त्याची तीव्रता कळत नाही. पण तूलना केली तर पटकन लक्षात येतं. ६० किलो स्फोटके काय हाहा:कार घडवू शकतात हे समजून घेण्याकरता या संदर्भात एक उदाहरण पाहूया. आंतरजालावर शोध घेतला तर आपल्याला सहज ही माहिती मिळू शकेल की ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वॉरहेड म्हणजे स्फोटके असलेला भाग हा २०० किलोचा असतो. या कार मधली स्फोटके जवळजवळ त्याच्या एक तृतियांश होती. आता क्षणभर थांबून विचार करा. ६०+ किलो स्फोटके. लष्कराच्या सुमारे पन्नासएक जवानांना घेऊन जाणार्‍या एखाद्या बसवर किंवा इतर साधारण वाहनावर याचा काय परिणाम झाला असता याचा विचार करा. मागचा पुलवामा हल्ला आठवून बघा. आता आलं ध्यानात?


आपल्या जबरदस्त सैन्याने हा हल्ला उधळून लावताना निव्वळ एक दहशतवादी हल्ला टाळलेला नाही, तर एक मोठा लष्करी कारवाई देखील टाळलेली आहे. मागच्या वेळी बालाकोट प्रतिहल्ला करुन पाकीस्तानची जिरवून खरोखर 'करुन दाखवणार्‍या' केंद्र सरकारकडून त्याहून तीव्र आणि कितीतरी पटीने मोठ्या स्वरुपाची प्रतिशोधात्मक कारवाई केली जावी म्हणून दबाव आला असता आणि ते एरवी योग्यही झालं असतं, पण संपूर्ण जगासहित भारतही चीनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी झुंजत असताना या कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम अजिबात परवड्ण्यासारखे ठरले नसते आणि ठरणार नाहीत. अर्थात पाकिस्तानही कोरोनाबाधित आहेच, पण अस्मानी आदेश असताना ते सदसद्विवेक बुद्धीने वागतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे घोर मूर्खपणा आहे. शिवाय चीनच्या सीमेवरील कुरापती आणि अचानक धूमजाव करुन सामंजस्याचे नाटक करणे या घडामोडीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. भारताने चीनसमोर लष्करी आणि राजकीय कणखरता दाखवल्याने नरम पडल्याचा देखावा करणारा चीन स्वस्थ बसला असेल असं अजिबात नाही. भारत-चीन सीमेवरुन भारतीय सैन्यबळ आणि जगाचं लक्ष भारताच्या पश्चिम सीमेकडे वळवून भारताला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी पाकिस्तानला "छू" केलं असल्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. 

आता काही थेट गोष्टी या हल्ल्याच्या परिप्येक्ष्यात बघू:

एकः
आणखी एक  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या साधारण महिनाभरात केलेल्या काही ट्वीट्स पहा. त्या अशा अर्थाच्या होत्या की "पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे खोटे आरोप भारत करत आहे. पाकिस्तानवर बलप्रयोग करण्याचे भारत कारण शोधत असून असे निमित्त भारत स्वतःच्याच भूमीत एक खोटा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे". असे खोटारडे आरोप करणार्‍या इम्रान खानच्या एक नव्हे तर तब्बल चार ट्वीट्स सापडल्या. इतक्या वेळा बोंब ठोकण्यामागचे कारण उघड आहे. पाकिस्तान पुलवामा येथे नव्याने हल्ला घडवून आणण्याची योजना खूप पूर्वीपासून आखत होता आणि आपण त्या गावचेच नाही असं जगासमोर भासवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. दुर्दैवाने जगात मूर्खांचा आणि भारतात घरभेद्यांचा आणि एकंदरच कुठेही लिबरलांचा तुटवडा नसल्याने अनेकांचा त्यावर विश्वासही बसला असता. 

इम्रान खानच्या ट्विट्स

दोन:
काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्रमंडळी साकेत गोखले नामक एका इसमाने केलेल्या एका ट्वीट बद्दल एका ग्रूपवर बोलत होत. या इसमाने १३ मे रोजी एक ट्विट केलं होतं त्यात लष्करी तपासणी नाक्यावर वारंवार इशारे देऊनही न थांबून गाडी तशीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका २५ वर्षीय इसमाला काश्मीरमधल्या बुडगाम येथे भारतीय लष्कराने गोळी घालून ठार मारलं असा उल्लेख केला होता. साकेत गोखलेने ट्विटमध्ये 'आता जगातील सर्वात मोठी लोकशाही ट्रॅफिकचे नियम मोडले म्हणुन जनतेला गोळ्या घालत आहे' अशी मखलाशी केलेली होती.  ट्रॅफिकचे नियम मोडणं आणि काश्मीरमध्ये तपासणी नाक्यावर न थांबता वाहन तसेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे यातला फरक गोखले साहेबांना कळत नसावा असं नाही, पण या निमित्ताने दहशतवादी हल्ला करायची पूर्वतयारी किंवा सराव म्हणून ज्या घटनेकडे बघता येईल त्या घटनेला या ट्विटमधून ट्रॅफिक नियमांचे साधं उल्लंघन या सदराखाली किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या इसमाने रिट्वीट केलेली एक ट्वीटही इथे देतो आहे. किती जबरदस्त वातावरणनिर्मितीची तयारी असते पहा. तपासणी नाक्यांचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणारी असू शकेल अशी ही घटना १३ मेला घडते आणि २८ मेला ६०+ किलो स्फोटकांनी भरलेली गाडी लष्कराने उडवून देत आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला टाळणे हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. पण खरंच तो योगायोग असेल का, याचा सूज्ञ वाचकांनीच विचार करावा. 

Saturday, May 9, 2020

आदिवासी विनिताने कोयत्याने नक्षलवादी एरिया कमांडर बसंत गोप याला कापून केलं ठार

आपल्याकडे एक म्हण आहे, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. अर्थात मनातली भीतीच आपल्याला संकटांना तोंड देण्यापासून परावृत्त करते. ही भीती निघाली की समोर असलेला शत्रू कुणीही असो, कितीही ताकदवान असो, त्याच्याकडे कुठलीही हत्यारे असोत त्याचा पराभव ठरलेला असतो. ही गोष्ट आहे झारखंडच्या गुमलामधल्या एका आदिवासी खेड्यातल्या विनिता उरांव हिची. मुलाखत देताना अतिशय साधी आणि शांत वाटणारी विनिता प्रत्यक्षात वाघीण आहे. कसं ते आपण पाहू.

रणरागिणी विनिता उरांव
पण पूर्ण गोष्ट सांगण्याआधी नक्षलवाद्यांची विनिताच्या परिवाराशी नेमकं काय शत्रुत्व होतं हे जाणून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. काही वर्षांपूर्वी विनिताचे वडिल शनिचरवा उरांव हे जलसंधार, जलयुक्त शिवार वगैरे कामं करायचे. त्याच काळात नक्षलवाद्यांनी एकदा त्यांच्याकडे पन्नास हजाराची खंडणी मागितली. शनिचरवा यांनि खंडणी देण्यास नकार दिल्याने नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेनंतर नक्षलवाद्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी उर्वरित परिवाराने रांची गाठली आणि तिथे मोलमजूरी करुन आपला उदर्निर्वाह करु लागले. लॉकडाऊनमुळे सगळा परिवार पुन्हा आपल्या गावी परतला. आणि मंगळवारी.....

आता वळूया मुख्य बातमीकडे. गुमला जिल्ह्यापासून दहा किलोमीटरवर वृंदा नायक टोली गाव आहे. या गावात वृंदा आपला नवरा भीमराव, दोन मुलं, भाऊ पियुष आणि आईसह राहते. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले. अचानक गोळीबाराच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली. पाच ते सहा नक्षलवाद्यांनी विनिताच्या घराला वेढा घातला. हे पीएलएफआय  या नक्षलवादी संघटनेचे अतिरेकी असल्याचं लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. ते विनिताचा नवरा भीमराव याला हाका मारुन बाहेर यायला सांगत होते. विनिताच्या कुटुंबाला आणि गावातल्या इतरांना दहशत बसावी म्हणुन हवेत गोळीबार सुरुच होता. असा काही वेळ गेला. कुणीच दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर नक्षलवाद्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करायचा प्रयत्न केला. एवढ्यात त्यांच्यापैकी कुणालाही काहीही कळण्याच्या आत विनिताने कोयता घेऊन त्यातल्या एकावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तो नक्षलवादी खाली पडला. तो खाली पडल्यावर विनिताने त्याच्यावर त्वेषाने आणखी अनेक वार केले. आता त्याचे साथीदार बावचळले. अशा प्रकारच्या हल्ल्याची अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. त्यांनी कसंतरी गंभीर जखमी झालेल्या आपल्या म्होरक्याला उचललं आणि तिथून पळून गेले. 

नक्षलवादी पळून गेल्यावर विनिताने गुमलाचे पोलीस निरिक्षक असलेल्या श्री जनार्दन यांना फोन करुन सगळा वृत्तांत कथन केला. सद्ध्या पोलीसांनी गावातच मुक्काम ठोकला आहे. बुधवारी पोलीसांना छापा टाकताना बसंत गोपचा मुडदा जंगलात बेवारस अवस्थेत पडलेला सापडला. जखमी बसंत गोपचा मृत्यू झाल्यावर त्याचं शरीर पळून जाणार्‍या नक्षलवाद्यांनी तिथेच फेकून दिलं होतं. 

बेवारस अवस्थेत फेकून दिलेला नक्षलवादी अतिरेकी बसंत गोपचा मुडदा

दैवदुर्विलास बघा. या नक्षलवादी संघटनेचं पूर्ण नाव आहे पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया. सामान्य जनतेची मुक्ती नावात(च) असणार्‍या या संघटना मात्र प्रत्यक्षात लोकांच्या हत्या करत फिरतात. काही वर्षांपूर्वी खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करायला आलेल्या नक्षलवादी नरधमांनी तो व्यक्ती पळून गेल्यावर त्याच्या बायकोच्या हतातून त्यांच्या चार महिन्याच्या बाळाला हिसकावून घेतलं आणि लोखंडी सळीने मारहाण केली, व ध त्याचा बळी घेऊन त्याच्या आईसमोरच त्याला पुरलं होतं. तेव्हा कुणी नक्षलवादी कसे जन्माला येतात वगैरे बकवास केली तर त्यांच्या तोंडावर ही उदाहरणे फेकून मारा. सरकारने अतिशय नीच अशा या अवलादीला आणि त्यांच्या शहरी पाठीराख्यांना निर्घृणपणे ठेचलं पाहीजे. तसेच जनतेनेही विनिताप्रमाणे सावध राहून अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवावा. 

सरकारने विनिताला संरक्षण द्यावं तसंच काही बक्षिस सुद्धा जाहीर करावं अशी नम्र विनंती. झारखंडमधलं सद्ध्याचं सरकार लक्षात घेता ही अपेक्षा मोठी आहे पण तरी...

© मंदार दिलीप जोशी 
वैशाख कृ २, शके १९४२

परिशिष्ट १: विनिताची मुलाखत



परिशिष्ट २: काही बातम्या


Thursday, May 7, 2020

गणिती कलोपासनेचा निर्घृण अंत (अर्थात एक न छापताच मागे घेतलेला अग्रलेख)

लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची बालसुलभ उत्सुकता स्वस्थ बसू देईना. कालच त्याने खिडकीतून हळूच वाकून तिकडून इकडे येणार्‍या तीन हजार सातशे शहाऐंशी आणि पलिकडे जाणार्‍या पाच हजार आठशे बहात्तर गोळ्या मोजल्या होत्या. सरळमार्गी रियाझ नाईकुला गणिताची आवड निर्माण झाली ती अशी. त्याच्या घरच्यांचं त्याला प्रोत्साहन होतंच. त्याचे अब्बू त्याच्या अम्मीला त्याच्या छोटे छोटे शेणगोळे कसे मोजायचे ते शिकवलं होतं. एकदा एका शेणगोळ्यात अम्मीची पिन अडकली असे समजून निरागस रियाझने ती काढून अम्मीला दिली आणि शेणगोळाच तो असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला. पण खालून अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक ठो ठो ठो असे लहान आवाज पटापट येऊ लागले. अब्बू म्हणाले ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. तेव्हापासून रियाझला गोळ्या मोजण्याची आणि पर्यायाने गणिताची आवड निर्माण झाली. रियाझला चित्रकलेचीही आवड होती ति त्याने कशी जोपासली ते पुढे येईलच.

सनदी लेखपाल असलेल्या याकुब मेमन याचा त्याने आदर्श ठेवला व मोठा झाल्यावर गावातील इतर मुलांनाही गणिताची आवड निर्माण व्हावी असा ध्यास त्याने घेतला. पण फक्त गोळ्या मोजून त्याचे समाधान होईना. प्रत्येक गोष्टीच्या सम....सॉरी.... उगमाशी जायचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. म्हणूनच आपला उगम कुठून झाला असाही प्रश्न त्याला पडत असे. पण त्याला निर्माण झालेल्या या सायंटेफिक टेंपरबद्दल पुन्हा केव्हातरी. तर, त्या गोळ्या येतात कुठून आणि सोडल्या जातात कुठून याचा शोध घ्यायचे त्याने ठरवले. मुळातच काश्मीरी जनता परस्पर सहकार्यासाठी प्रसिद्ध. तेव्हा त्याच्या या शिक्षणाची जबाबदारी गावातील जेष्ठांनी घेतली व बाहेरून काही शिक्षक मागवले. त्या शिक्षकांनी रियाझला बंदूक म्हणजे काय, त्यातून गोळ्या कशा बाहेर पडतात, त्या माणसाला लागल्यावर काय होते, त्या का चालवाव्यात वगैरे आवश्यक आणि फुटकळ माहिती दिली.  काश्मीरी लोकांचे आणि या बाहेरून आलेल्या शिक्षकांची सामाजिक जाणीव आपल्याला वाखाणलीच पाहीजे. कारण बाहेरचे निष्ठूर जग पदोपदी धनाची हाव ठेऊन पैसे मागत असताना आणि समाजकार्याचीही किंमत वसूल करत असताना रियाझला निर्माण झालेल्या बालसुलभ उत्सुकता शमवायला व त्याच्या गणिती ज्ञानार्जनासाठी दिलेल्या या शिक्षणासाठी मात्र त्या अमूर्त निर्गुण निराकार इंटानॅशनल शाळेच्या शिक्षकांनी एकही पैसा घेतला नाही. उलट बाहेरून आलेल्या या शिक्षकांनी त्याच्या अब्बू आणि अम्मीला या दिव्य कार्यासाठी तुमचा रियाझ आता आमचा (विद्यार्थी) झाला असे सांगून स्वतःहून पैसे दिले. 

रियाझला चित्रकारही व्हायचं होतं हे आपल्याला विदीत आहेच. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्यांचे चित्र काढून त्यात लाल रंग भरायला त्याला फार आवडत असे. पण आपली ही आवड जोपासत असताना खूप वेळ वाया जात आहे असे त्याच्या लक्षात आलं. तसेच फक्त वेडीवाकडी चित्रे काढून देशविदेशात प्रदर्शने भरवण्यातही त्याला रस नव्हता. यावर त्याच्या शिक्षकांनी त्याला एक नामी युक्ती सुचवली. निर्जीव कागदावर त्याहून निर्जीव रंग भरण्यापेक्षा त्याने त्याच्या गणिती ज्ञानाच्या ध्यासापोटी मिळवलेले गोळ्या सोडायचे ज्ञान वापरून सजीव माणसांतच लाल रंग भरावेत असे त्यांनी सुचवले. मग सुरु झाला रियाझचा गणिती कलोपासनेचा रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रवास.

हळूहळू रियाझ मोठा होत होता. त्याला आता मिसरुड फुटलं होतं. आता रियाझचं गणित इतके पक्के होऊ लागले होते की तो दुसर्‍यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्याच काय त्याने स्वतः बंदुकीतून सोडलेल्या गोळ्या देखील त्याला मोजता येऊ लागल्या होत्या. आता त्याच्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेने शिक्षक पाठवायचे कमी करुन पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर पाठवणे सुरु केले होते. त्या पर्यवेक्षकांना रियाझची गोळ्या मोजण्याची विलक्षण बुद्धीमत्ता खूप भावली, कारण त्यांनी गणिती सरावासाठी तसेच प्रत्यक्ष प्रयोगासाठी पुरवलेल्या गोळ्यांचा हिशेब त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना देणे सोयीचे ठरू लागले. परिणामी शिक्षण व प्रत्यक्ष प्रयोगाकरता शाळेने करावयाचा पुरवठा भरमसाठ वाढला. 

रियाझने आता तारुण्यात पदार्पण केलं होतं. नाकाखाली असलेल्या मिसरुडाबरोबर तो आता हनवटीवरही डौलदार दाढीसंभार बाळगू लागला होता. रियाझने आता अनेक मुलांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्याही अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कधी तो एकटाच तर कधी त्या मुलांन घेऊन तो इंटरनॅशनल शाळेत शैक्षणिक सहलींन जात असे. हळुहळू रियाझने आपल्यासारखे अनेक जण गणितात तयार केले. पण आता त्या शाळेला रियाझने पुस्तकी ज्ञानातले लक्ष कमी करुन प्रत्यक्ष प्रयोगांकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटू लागले. रियाझही एव्हाना फक्त थिअरीला कंटाळला होताच. रियाझचे शिक्षक ज्या शाळेतून यायचे त्या शाळेची एक शाखा होती हिजबुल मुजाहिदीन अर्थात पवित्र योद्धे. या शाखेच्या प्रमुखपदी त्याची नेमणूक करण्यात आली. आता त्याने भारतीय बंदुकधारी सैन्य, इतर नागरिक, दुकानदार, अशा सजीवांसमोर आपल्या गणिती कलोपासनेचे रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रयोग सुरु केले. 

पण २००२...सॉरी...२०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर कलेचा व गणिताचा र्‍हास सुरु झाला व सायंटेफिक टेंपर नसलेल्यांची चलती सुरु झाली. आपल्याकडे असहिष्णुता तेव्हापासूनच आणखी वाढली. याचेच पर्यावसान आधी बुरहान वाणी नामक मुख्याध्यापकपुत्राच्या प्राणोत्क्रमणात झाले. पण एवढ्यावर समाधान मानतील ते भारतीय बंदुकधारी सैन्याधिकारी कसले. रियाझ नाईकूला आपल्या कलेचे प्रात्यक्षिक आपण कसे दाखवले याचा व आपल्या गणिती ज्ञानाचा व कलोपासनेचा साप्ताहिक हवाल त्याला आपल्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांना शुक्रवारी नजिकच्या प्रार्थनास्थळात द्यावयाचा होता. पण आधी काहीतरी भव्यदिव्य कार्य ताबडतोबीने करावयास हवे म्हणोन तो बुधवारी बाहेर पडला आणि घात झाला. तो कुठे आहे याचा सुगावा सैन्याला लागला व त्याला भारतीय बंदूकधारी सैन्याने त्याच्याच कलोपासनेचे प्रयोग त्याच्यावरच करुन त्याला या भौतिक जगातून कायमचे नाहीसे केले. 

जा रियाझ जा, या जगात, ज्या देशात तुझ्या कलेची कदर नाही अशा देशात राहून अवहेलना झेलण्यापेक्षा त्या तुझ्या निर्गुण निराकार निर्मात्याकडे जा. तिथे तुझ्या गणिती कलोपासनेचे तुला निश्चितच बक्षिस मिळेल. तुझे गणित चांगले असल्यामुळे तुला बहात्तर पर्यंत आकडे नक्की मोजता येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुझा उगम कुठे झाला हे ही तुला तिथेच समजेल. 

#वक्रोक्ती #Sarcasm

 

Riyaz Naikoo Encounter: Hizbul Mujahideen Chief Riyaz Naikoo, Most ...


© पिरिष गूबेर (मंदार दिलीप जोशी)