Thursday, July 6, 2017

चुळचुळ मुंगळा, एकसुरीपणा, एकाग्रता आणि मन:स्वास्थ्य

[काही दिवसांपूर्वी आनंद राजाध्यक्ष यांनी हिंदीत एक लेख टाकला होता. मोनोटोनी किंवा एकसुरीपणा याबद्दल ती पोस्ट होती. ती टाकली असती तर लगेच मराठीत पण लिही अशी मागणी झाली असती म्हणून मराठी करुन टाकतो आहे. ती पोस्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांनी आज एका फिजेट स्पिनर नामक खेळण्यावर लिहीलेली पोस्ट. या दोन्ही लेखांतला संबंध लक्षात आला आणि डोक्यात असंख्य दिवे पेटले. दोन्ही लेखांची सांगड घालून लिहीण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखाचे श्रेय संपूर्णपणे वरील दोघांना आहे. माझं श्रेय असेल तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित करणार्‍या चंद्राला जातं तेवढंच.]


लहानपणी सतत अस्वस्थ असणार्‍या आणि अंगात प्रचंड उर्जा असणार्‍या उपद्व्यापी मुलांसाठी, अर्थात त्यात अस्मादिकही होते, चुळचुळ मुंगळा हा एक मजेशीर शब्दप्रयोग केला जायचा. लहान मुलांना कुठलेही काम सतत करायला किंवा करत राहायला आवडत नाही. कारण लहान मुलांचा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा वेळ हा मुळातच कमी असतो. त्यामुळे थोड्या मोठ्या काळासाठी जिथे लक्ष केंद्रित करावं लागतं अशा गोष्टी मुलांना करायला आवडत नाहीत. अशी कामं मुलांना फार लवकर एकसुरी म्हणजे ज्याला इंग्रजीत मोनोटोनस म्हणतात तशी वाटू लागतात. मुले संपूर्ण सिनेमा बघत नाहीत, पण अ‍ॅनिमेशन किंवा आपण ज्याला कार्टून म्हणतो ते मात्र मुलं अगदी आवडीने बघतात. याचं कारण तिथे सेकंदाच्या शंभराव्या भागातही सतत वेगाने पात्रे हालचाल करत असतात असं वैविध्य असतं.
कालांतराने हीच मुलं मोठी होऊन नोकरीला लागल्यावर मात्र मल्टीटास्किंग नावाचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसवण्यात आलं. कारण एकच काम सतत करण्याचा संयम वय वाढल्यावर आला खरा, पण अनेक दिवस किंवा अनेक महिने तेच काम केल्याने कंटाळाही येऊ लागला. किंवा तो कंटाळा तुम्हाला येतो आहे असं सातत्यने मनावर बिंबवलं जाऊ लागलं. समस्येच्या समाधानावर लक्ष केंद्रित न करता सातत्याने समस्येच्या शोधात असलेल्या वामपंथी लोकांसाठी हे मोठं चराऊ कुरण होतं. कायम ताजातवाना दिसणार्‍या माणसाला "तुला बरं नाहीये का?" असं तीन-चार लोकांनी विचारलं की जसं खरंच "आपल्याला थकल्यासारखं वाटतंय" असं वाटू लागतं तसंच एकच काम सातत्याने करणं हे फार कंटाळ्याचं काम आहे बुवा, सतत बदल हवा असं लोकांवर, विशेषतः कॉर्पोरेट मनावर ठसवण्यात येऊ लागलं. एकाग्र होऊन प्रत्येक काम वेगाने हातावेगळं करण्याऐवजी एकाच वेळी अनेक कामांना हात घालणं हा मोठा गुण मानला जाऊ लागला. अर्थात आपल्याकडे चतुरावधानी, अष्टावधानी, आणि अगदी शतावधानी असणं हे पूर्वी शिकवलं जायचंच. मात्र त्यातही पहिला भर एकाग्रतेवर असायचा. हाच भर विसरल्याने आता मल्टीटास्किंगमधे एक ना धड भाराभर चिंध्या हा प्रकार बघायला मिळतो. आपण एकाग्रतेच्या पारंपारिक पद्धती वतंत्र सोडून दिल्या आणि मल्टीटास्किंग हे कौशल्य शिकवायला कन्सल्टन्ट नामक तज्ञ लोकांना भरमसाठ पैसे देऊन आपल्या उरावर बसवलं. एकाग्रतेची नकारात्मक बाजूच आपल्याला शिकवली गेल्याने आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरलो आणि ती म्हणजे चित्त एकाग्र केल्याने आपण आपल्या आवडीच्या विषयाच्या किंवा कामाच्या बाबतीत प्राविण्य (mastery) मिळवू शकतो ही. 

पिठाच्या गिरणीत कधी गेला असाल तर तिथल्या भैय्याचं निरीक्षण करा. हातात एक लोखंडी उपकरणाचा भाग घेऊन तो एका विशिष्ट लयीत गिरणीच्या यंत्राला ठोकत फिरवताना तुम्हाला आढळेल. एकसुरीपणाची मजा घेत एकसुरीपणावर त्याने त्याच्याही नकळत केलेली ही मात असते. हे एक अत्यंत लहान उदाहरण झालं. कौशल्य लागणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्यात एकच काम हजारदाही करावं लागतं. पण तेच काम पुन्हा पुन्हा आवडीने, त्या कामाची मजा घेत केलं तरच हे काम आपल्याकडून होऊ शकतं. यातून लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी की enjoying monotony is the key to acquiring mastery. एखाद्या कामात प्राविण्य मिळवण्याचा मार्ग हा त्या कामाचाएकसुरीपणाचा आनंद घेत करण्यातूनच जातो. ते करण्याच्या आधीच मल्टीटास्किंगच्या जंगलातून जाण्याचा प्रयत्न केलात तर मात्र चित्त विचलित होऊन प्राविण्य मिळवणं ही फार लांबची गोष्ट ठरते. एकच काम न कंटाळता, त्यातल्या एकसुरीपणाचा आनंद घेत केलं तरच प्राविण्य मिळवता येतं आणि त्यानंतरच चतुरावधानी, अष्टावधानी, आणि अगदीशतावधानी होण्याचाही विचार करता येतो. 

एकसुरीपणाची मजा कशी घ्यावी? एकाग्रता कशी कमवावी? याचे अनेक मार्ग आहेत. यातले दोन मार्ग आपण पाहूया. आता हा व्हिडिओ पहा. 




साधारण चौदा मिनीटांच्या या व्हिडिओत या जपानी आजी फक्त तीन बाण सोडतात. नाद्वि, मणिबंधम, बहिर्मुखम असं म्हणत एकाच वेळी तीन बाण सोडून काही वेळातच शत्रूसैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडणार्‍या बाहुबलीच्या आभासी का होईना पण वेगवान युगात चौदा मिनीटात फक्त तीन बाण सोडणार्‍या या आजी खुळ्या वाटण्याचीच शक्यता आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला आपल्या शैलीत बांधण्याचं, त्याचं सांस्कृतिक मार्केटिंग करण्याचं, आणि सरतेशेवटी लोकांच्या गळ्यात मारण्याचं चीनी आणि जपानी लोकांचं कसब वाखाणण्याजोगे आहे. हा व्हिडीओ बघणार्‍यांपैकी कुणाच्या डोक्यात किडा वळवळला तर कदाचित ज्या प्रमाणे अनेक पारंपारिक गोष्टींचा त्याग करुन आपण चिनी आणि जपानी गोष्टी लादून घेतल्या त्या प्रमाणे पारिंपारिक धनुर्विद्या सोडून हे फॅड सुद्धा येईल. पण तो विषय वेगळा आहे. असं जरी असलं तरी आपण त्यांच्या चांगल्या गोष्टी बघून आणि जमल्यास त्यातून शिकायला घ्यायला हरकत नाही. व्हिडिओत एकाग्रतेसाठी या जपानी आजी जे काही करतात ते बघण्यासारखं आहे. आजींकडे बघताच त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो असं व्यक्तिमत्व आहे. आधीच सांगतो, महाप्रचंड बोअरिंग व्हिडिओ आहे. आणि पुन्हा सांगतो, चौदा मिनीटांच्या या व्हिडिओत या जपानी आजी फक्त तीन बाण सोडतात. पण काही शिकायला मिळेल या भावनेतून हा व्हिडिओ बघायला गेलात तर तुम्हाला अर्थातच धनुर्विद्या येणार नाही पण बाकी बरंच काही शिकायला मिळेल. मनोनिग्रह कसा केला जातो, स्वतःला शांत आणि संयमित कसं केलं जातं, कशा त्या आजी धनुष्य उचलायच्या आधी व्यवस्थित एकाग्रचित्त होतात, मग धनुष्य उचलणं आणि बाण सोडणं हे एकाच लयीत (single fluid motion) कसं होतं, आणि शेवटी बाण सोडल्यानंतरही पुढच्या क्रिया कशा केल्या जातात आणि लक्ष्यावर तेव्हाही कसं चित्त एकाग्र कसं केलं जातं या गोष्टींचं निरीक्षण केल्याने जे शिकायला मिळतं ते इतर अनेक बाबतीत कामी येईल.

हे इतर काही व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओत काही जपानी लोकांबरोबरच परदेशी व्यक्ती सराव करत आहेत. ज्या प्रकारे जपानी धनुर्विद्या शिकवली जाते आहे, त्यातून जपानी लोकांचं मार्केटिंग आणि विक्रीकौशल्य लक्षात येतं. आपल्याकडेही हे सगळं होतं पण...असो.
https://www.youtube.com/watch?v=7bopGfiO4K0

https://www.youtube.com/watch?v=3Z4aa5gdMUc

https://www.youtube.com/watch?v=6r_V0SXiwLo

माणसाच्या गुणसूत्रात काही गोष्टी मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीकाळापासून आजपर्यंत हजर आहेत, त्यांना काळही नष्ट करु शकलेला नाही. तद्वत, राम आणि अर्जुन ही व्यक्तिमत्वे हिंदूच्या सांस्कृतिक गुणसूत्रांत अशीच कोरली गेलेली आहेत. म्हणूनच कदाचित धनुष्यबाण चालवणं हा एक पूजा करण्यासारखाच दिव्य अनुभव असतो. खुंटीवर टांगलेलं किंवा एखाद्या स्टँडवर ठेवलेलं धनुष्य उचलणं, त्यावर प्रत्यंचा चढवणं, त्या प्रत्यंचेचा टणत्कार, भात्यातला बाण उचलून तो प्रत्यंचेवर ताणणं, श्वास घेऊन स्वतःला स्थिर करणं आणि सरते शेवटी लक्ष्यभेद या क्रिया म्हणजे एक दिव्य अनुभव असतो. या क्रिया करताना मनात येणार्‍या भावनांची तूलना केवळ गणेशमूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यापासून उत्तरपूजा करुन पार्थिव गणेशाचं विसर्जन करेपर्यंत भाविकांच्या मनात जे भाव येताच त्याच्याशीच होऊ शकेल.

पण केवळ धनुर्विद्याच शिकावी असं काही नाही. धनुर्विद्येला पर्याय म्हणून एअर रायफल शूटिंग शिकता येईल. घरच्या घरी करण्याजोगा पर्याय हवा असेल तर डार्टबोर्डचा उपयोग करता येईल. या तिन्ही प्रकारांचा उपयोग केवळ एकाग्रता वाढवणे इतकाच नव्हे तर ताणतणाव कमी करण्यात मुलांना आणि मोठ्यांना सारखाच होऊ होतो. 

हे थोडेफार शारिरिक श्रम आणि थोडाफार खर्च आवश्यक असणारे पर्याय झाले. आता बसल्या बसल्या आणि चक्क फुकट करु शकतो असे प्रकार पाहूया. मनाची चंचलता ही वातामुळे उद्भवते असं आयुर्वेद सांगतो. वात हा सतत संचारी असल्याने चुळचुळमुंगळ्याला शांत करायचं असेल तर शरीर व मनाला स्थैर्य दिलं पाहिजे. मनाला स्थिर करायचं असेल तर ध्यान, जप यांच्यासारख्या शांतपणे बसून करण्याच्या क्रियांचा लाभ उत्तम होतो. तुमचा देवावर विश्वास असो वा नसो; तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता. याशिवाय भ्रामरी, ओंकार ध्यान किंवा आयुर्वेदातील शिरोधारा यांचाही उपयोग केला जाऊ शकतो. 

आपण त्यातल्या त्यात सोपा पर्याय म्हणून जपाचा विचार करूया. जपासाठी आसन स्थिर आणि बसताना ताठ बसणं आवश्यक आहे. म्हणून जमीनीवर एखादी चटई किंवा योगा मॅट टाकून बसा. जमीन सपाट असावी. जिथे बसाल ती जागा हवेशीर हवी पण तुमचं चित्त विचलित होण्याइतकी नको. आता हातात एक जपमाळ घ्या. एकदा नाम उच्चारलंत की एक माळेतला एक मणी पुढे सरकवा. एका श्वासात दोन वेळा नाम घेता आलं पाहीजे. असं दोन ते तीन दिवस करा. मग हळू हळू वाढवत एका श्वासात तीन आणि चार पर्यंत गेलात तरी चालेल. मोठा श्वास घेण्याचा हा सराव एखादं बासरीसारखं वाद्य वाजवताना होऊ शकेल. कंपनीत प्रेझेन्टेशन देताना किंवा कुणाशी बोलतानाही हा दमसास उपयोगी पडेल. अगदी चालण्याच्या किंवा धावण्याचा क्रियांतही याचा उपयोग होऊ शकतो. 

आता जप कसला करायचा हे तुमच्या श्रद्धेवर आहे. "जय राम श्रीराम जय जय राम", "गण गण गणात बोते", "रघुपती राघव राजा राम" किंवा तुमच्या आवडीनुसार काहीही निवडा. एक किंवा दोन माळा पूर्ण केल्या तरी पुरेसे आहे. तेव्हा जप करताना घाई करु नका. आपलं ध्येय चित्त एकाग्र करणे हे आहे, जास्तीत जास्त माळा पूर्ण करणे हे नव्हे. दोन माळा पूर्ण करायला तुम्हाला साधारण १५ मिनीटे लागू शकतात. 

सर्वप्रथम उच्चारांवर भर द्या, म्हणजे तुमच्या स्वतःच्या आवाजावर. मग श्वासाच्या वेगाकडे लक्ष द्या. सगळ्यात शेवटी मणी सरकवण्याकडे. सवय नसेल तर व्यवस्थित जप करता येणे या स्थितीपर्यंत यायला बराच काळ लागू शकतो. हा इन्स्टंट प्रकार अजिबात नाही. पण याच पंधरा मिनीटांचा तुम्हाला दैनंदिन व्यवहारात उपयोग होताना दिसेल. जप करताना तुम्ही तुमचाच आवाज ऐकू शकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की लोकांशी बोलताना त्यांचं म्हणणं ऐकून ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ लागलं आहे. तुमचा वाचनाचा वेग वाढेल आणि वाचलेलं समजेल आणि लक्षातही राहील.

आपला जप कसा चालला आहे याची चाचणी घ्यायची असेल तर दोन तीन महिन्यांनी जवळ मोबाईल ठेवायला सुरवात करा. लघुसंदेश आणि व्हॉट्सॅपच्या संदेशांचे टण् टण् टण् ध्वनी तुम्हाला विचलित करु शकत नसतील तर तुम्ही योग्य प्रगती करत आहात असे समजा. 

ताणतणाव कमी करणं आणि चित्त एकाग्र करणं या करता काही एक प्रयत्न करावे लागतात. हातात चेंडू दाबून किंवा हल्ली ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारात धुमाकूळ घालणारा fidget spinner यांचा काही एक उपयोग होत नाही. लेखात वर उल्लेख असलेल्या भंपक गोष्टींसारखीच fidget spinner ही वस्तू आहे. चिंता, ताणतणाव इतकंच नाही तर स्वमग्नता (autism), ADHD यांसारख्या मानसिक समस्यांवरही हे स्पिनर्स उपचार म्हणून काम करतात असं सर्रास कानावर पडत असलं तरी हा फक्त आणि फक्त मार्केटिंग फ़ंडा आहे. प्रत्यक्षात तसं काही होतं हे सिद्ध करणारं एकही संशोधन झालेलं नाही. किंबहुना या स्पिनर्समुळेच विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासात लागत नसल्याचं लक्षात आल्याने अमेरिका व इंग्लंडमधील अनेक शाळांनी या स्पिनर्सवर चक्क बंदी घातली आहे. अशी बंदी आमच्याकडे घातली असती तर ‘विद्यार्थ्यांनी काय खेळावं हेही आता शाळा ठरवणार का?' इथ पासून 'हे संघी षडयंत्र आहे' इतपर्यंत काय वाट्टेल  त्या चर्चा आमच्या वृत्तवाहिन्यांनी रंगवल्या असत्या. रस्त्यातून चालताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात होणे ही गोष्ट आपल्याकडे तरी नवीन नाही. त्यात आता या स्पिनर्सचीही भर पडणार आहे इतकंच. मुळातच गतिमान असलेल्या स्पिनर्स मुळे हे मनाला स्थैर्य मिळणं अशक्यच, मग ताणतणाव (स्ट्रेस) कमी होणं ही त्याहून अशक्य गोष्ट. किंबहुना ते फिरवत राहण्याचं त्याचंच व्यसन लागण्याची शक्यता अधिक. जगभरातल्या अनेक नामवंत मानसोपचार तज्ज्ञांनी हेच मत नोंदवलं आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी म्हणून हे स्पिनर्स वापरायचे असतील तर आगीतून फुफाट्यात अशीच स्थिती होईल. त्यातून या खेळण्याच्या खोक्यांवर बहुतेक वेळा Made in China हे शब्द दिसतील. आपल्याकडचा माल खपवण्यासाठी त्याला आरोग्याची जोड देण्याची ही चीनी मार्केटिंग ड्रॅगनची नवी खेळी आहे; तिला बळी पडू नका. अगदीच टाईमपास हवा म्हणून क्वचित कधीतरी खेळणं म्हणून fidget spinner चा वापर करायला हरकत नाही. मात्र ते खरेदी करत असताना Made in China नाहीत ना याची आवर्जून खात्री करा.

शरीरातली रग जिरवायला पूर्वी मैदानी खेळ, घरातली कामे, आणि चालण्यावर असणारा भर ही व अशी अनेक औषधे होती. नंतर त्याची जागा इडीयट बॉक्सने आणि आता मोबाइलने घेतली आहे. आता कार्टून व मोबाईल गेम हे घराघरात रुळल्याने याने मुलांच्या अंगातली रग जिरण्याऐवजी सडून जाते हे अनेकांच्या वेळेत लक्षात आलं नाही. यातले धोके हळू हळू समजायला लागल्याने आई-वडिलांनी पुन्हा मुलांना शारिरिक हालचालींकडे वळवताना या असल्या थेरांत गुंतू नये हे उत्तम.

पारंपारिक वास्तूशास्त्राची अंधश्रद्धा अशी संभावना करुन अमुक कोपर्‍यात कासव आणि तमुक कोपर्‍यात हिडीस हसणारा कुरूप जाडा म्हातारा ठेवला तर घरात समृद्धी येईल अशा भूलथापांना बळी पडून आपण फेंगशुई जवळ केली, तसंच आता हे छद्मवैज्ञानिक (pseudo-scientific) फॅड रुजू पाहत आहे. त्याला थारा देता कामा नये.

या चायनीज उत्पादनापेक्षा आपली देशी १०८ मणी/ रुद्राक्षांची माळ कधीही स्वस्त आणि मस्त. फारच ताणतणाव जाणवत असेल तर माळ घेऊन रामनाम जपा! जप कसा करावा याबद्दल लेखात वर लिहीलंच आहे.
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। 
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥

जय जय रघुवीर समर्थ ॥

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १३, शके १९३९

संदर्भः 
(१) आनंद राजाध्यक्ष
(२) वैद्य परीक्षित शेवडे

No comments:

Post a Comment