Monday, May 9, 2016

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)
Conducted By: Dr. Uday .S. Kulkarni (सादरकर्ते: डॉ. उदय एस. कुलकर्णी)

पार्श्वभूमी व वृत्तांत.

नुकताच येऊन गेलेला बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट ऐतिहासिक दृष्ट्या तद्दन चुकीचा व अनेक बाबतीत अपमानकारक असल्याचे अनेकांचे मत होते. सुरवातीला दिग्दर्शक पाजीराव भंसाळीने साळसूदपणे चित्रपट हा  संपूर्णपणे खरा नसल्याचा डिस्क्लेमर दिलेला असला तरीही दृकश्राव्य माध्यमांचा जनमानसावर होणारा परिणाम बघता हा चित्रपट अत्यंत जबाबदारीने काढणे आवश्यक होते, तसे ते अर्थातच झाले नाही. असे जरी असले, तरी वाईटातून चांगले म्हणतात तसे या सिनेमामुळे श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली हे खरेच.

काही मित्रांनी व कार्यालयीन सहकार्यांनी माझ्याकडुन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातली पुस्तके व कादंबर्‍या मागितल्या. एका मराठी समजणार्या पण दाक्षिणात्य मित्राने तर "कादंबरी नको, संशोधनात्मक वगैरे पुस्तक असेल तर सांग" असं सांगून आश्चर्याचा धक्काही दिला.

डॉ उदय कुलकर्णी यांच्याशी या कारणमिमांसेबाबत थेट चर्चा झाली नसली, तरी हा कार्यक्रम होण्यामागची ही पार्श्वभूमी सहज समजण्यासारखी आहे. कार्यक्रमात त्याची थोडी झलकही पहावयास मिळाली.

हा कार्यक्रम प्रामुख्याने श्रीमंत राऊस्वामींविषयी फारशी माहिती नसलेल्या अमराठी लोकांसाठी असला तरी बाजीराव म्हणजे फक्त मस्तानीचा असा समज असलेल्या मराठीजनांनाही खुला होता, किंबहुना तो सर्वांनाच खुला होता. त्यामुळे या विषयातली बरीच माहिती असून देखील जाणकारांकडून थोडे ज्ञानकण वेचावेत या हेतूने मी ही तिथे हजेरी लावली.

कार्यक्रम रास्ते वाड्यात ठरल्याप्रमाणे काल दिनांक ८ मे रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळात पार पडला. इतिहास संशोधक व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकाचे लेखक व व्यवसायाने सर्जन असलेले डॉ. उदय कुलकर्णी यांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर उत्तम भाषण करुन नंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.


डॉ. कुलकर्णी यांनी राऊस्वामींचे वडील बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू हे मुघलांच्या कैदेतून मुक्त झाल्यापासून त्यांची इमानेइतबारे कशी सेवा केली, बाजीरावांचे सैनिकी व राज्यकारभाराविषयीचे प्रशिक्षण, त्यांच्या निजाम-उल-मुल्क, बंगश, इत्यादी विविध सरदारांशी झालेल्या विजयी लढाया, मस्तानीची प्राप्ती, सेनापती चंद्रसेन दाभाडे यांच्याशी झालेला दुर्दैवी संघर्ष, दिल्लीला धडक, व अखेर आजारपणात आलेला मृत्यू अशा श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील अनेक विषयांना स्पर्श केला. तसेच त्या काळात नाविक दल अधिक मजबूत करण्याकडे झालेले दुर्लक्ष व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या डोकेदुखीचे प्रमुख कारण असलेला कर्जाचा बोजा या बाबींचेही डॉ. कुलकर्णी यांनी थोडक्यात पण सम्यक विवेचन केले.तदनंतर ठरल्याप्रमाणे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. प्रश्नकर्त्यांपैकी बहुतेक जण गृहपाठ करुन आल्याचे प्रश्नांवरुन समजून येत होते व हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.

सगळी प्रश्नोत्तरे इथे देणे शक्य नाही, पण मी विचारलेला प्रश्न व त्याचे डॉ. कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर देतो. शब्द जसेच्या तसे नाहीत पणअर्थ साधारणपणे तोच आहे.मी: शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला इंग्रज हा प्रकार कायम राजकीय घडामोडींच्या एक प्रकारे पार्श्वभूमीवर असलेला दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या काळात काही घटनाही माहित आहेत. इंग्रजांनी त्यांच्या कारवाया वाढवत नेऊन पुढे देशावरच राज्य केलं हे लक्षात घेता श्रीमंत बाजीरावांच्या काळात मराठा आणि इंग्रज यांच्यात काही संघर्षाचे प्रसंग आले का, व एकंदर इंग्रजांविषयी काय धोरण होते?

डॉ. कुलकर्णी: इंग्रजांपेक्षा त्या काळी पोर्तुगीज अधिक ताकदवान व प्रभावी होता व अर्थातच त्यांच्यापासून असलेला धोका जास्त होता. रयतेवर अत्याचार करणे, जबरदस्ती धर्मांतर करणे, इत्यादी कारणांमुळे मराठ्यांच्या पोर्तुगीजांशीच लढाया झाल्या. मुघल, सिद्धी वगैरे मराठ्यांच्या शत्रूंना शस्त्र पुरवणे, पोर्तुगीजांनाही गरज पडल्यास मदत करणे इत्यादी इंग्रजांचा खोडसाळपणा चालूच असला तरी संभाजी महाराजांच्या काळापासून ते बाजीरावांच्या काळात त्यांचे धाकटे  बंधू चिमाजीअप्पांच्या मोहीमापर्यंत बघितलं तर मराठ्यांचा प्रमुख संघर्ष हा पोर्तुगीजांशीच झालेला दिसून येतो. त्यामुळे श्रीमंत बाजिरावांच्या कार्यकाळात इंग्रज इतके प्रबळनसल्याने त्यांच्याशी लढण्याचा प्रसंग असा आला नाही.

कार्यक्रमाला सरदार रास्ते, बिनिवाले, पंतसचिव या सरदारांचे काही वंशज उपस्थित होते. तसेच पेशव्यांच्या वंशजांपैकी महेन्द्र पेशवा व मोहिनी करकरे ही मंडळी उपस्थित होती. आधीच भव्य असा रास्ते वाडा मी पहिल्यांदाच बघत असल्याने वाटत असलेले भारावलेपण ही मंडळी प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने अधिकच वाढले. वेळे अभावी या मंडळींना भेटता आलं नाही. कार्यक्रम संपल्यावर मी चक्क लहान मुलासारखं खांब, पायर्‍या, व एक-दोन दरवाजांना हात लावून बघितला! हो, येतो, अंगावर शहारा येतो. त्या काळात पोहोचल्यासारखंही वाटतं!!

तर, खूप ज्ञानवर्धक असलेला असा हा कार्यक्रम शेवटी आभारप्रदर्शन होऊन संपला. ज्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जाणून घेण्यात खरंच रस आहे, त्यांना अधिक वाचन व अभ्यास करायला या कार्यक्रमाने प्रवृत्त केले असे नक्कीच म्हणता येईल.  

कार्यक्रम संपल्यावर डॉ. उदय कुलकर्णी यांच्याशी परिचय करुन घेतला व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. अधिक औत्सुक्याची बाब म्हणजे  डॉ. उदय कुलकर्णी हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर एक पुस्तक लिहीत आहेत. तेव्हा आता त्याची वाट बघण्याचे अवघड काम आलेच!

कार्यक्रमस्थळी वारसा या शनिवारवाड्यात असलेल्या दुकानातर्फे काही वस्तू व राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या सौजन्याने काही वस्तू स्मृतिचिन्हांच्या (मेमोराबिलिया) स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातले राऊस्वामींचे चित्र असलेले मग, चुंबक, व टी-शर्ट विकत घेता आले. सोबत चित्रे जोडलेली आहेत.
  कार्यक्रमाची काही छायाचित्रे - सौजन्य: डॉ उदय कुलकर्णी

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ३, अक्षय्य तृतिया, शके १९३८

1 comment: