Thursday, January 28, 2016

महाबोअर 'नटसम्राट'

मी: "मला 'नटसम्राट' आवडला नाही"

एक दर्दी: "तुम्हाला तो कळला नसेल"

कळला नसेल?

एक सर्कीट, शिवराळ, आणि दारूडा नाटकवाला थेरडा निवृत्त झाल्यावर आपली सगळी प्रॉपर्टी मुलांत वाटून टाकतो आणि मग स्वतःच्याच कर्माने लागोपाठ दोघांनीही घराबाहेर पडायला भाग पाडल्याने रस्त्यावर येतो, मधेच त्याची बायको खपते, आणि मग शेवटी तो मरतो. वगैरे वगैरे.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

साध्वी प्राची किंवा आदित्यनाथ का कोण यांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केल्यावर बरखा दत्त जसा थयथयाट सुरू करते आणि अर्णब गोस्वामी कानठळ्या बसवणार्‍या आवाजात त्याचं ते जगप्रसिद्ध "नेशन वॉन्ट्स टू नो" नामक तांडव सुरु करतो तशीच चिडचिड मला "नटसम्राट हा चित्रपट माझ्या मते टुकार सिनेमा आहे" हे सडेतोड आणि निर्भीड वक्तव्य केल्यानंतर अनेकांकडून अनुभवायला मिळाली.

शाहरुख खान ने देवदासची भूमिका केलेल्या चित्रपटाबद्दल जुन्या देवदासमधे पारोची भूमिका केलेल्या वैजयंतीमालाचं मत विचारल्यावर तिने "Dilip Saab played the role of Devdas, Shahrukh was Shahrukh as usual" असं  मत व्यक्त केलं होतं. अर्थात ती जुन्या आणि नव्या दोन्ही चित्रपटांचीच तूलना होती. इथे जुनं नाटक आणि त्यावर आधारित सिनेमा आहेत हे लक्षात घेतलं तरी त्यामागचा अर्थ बदलत नाही. म्हणून जुनी मंडळी कदाचित त्याच सडेतोडपणे 'श्रीराम लागू प्लेड द रोल ऑफ अप्पासाहेब बेलवलकर अ‍ॅन्ड नाना पाटेकर प्लेड नाना पाटेकर अ‍ॅज युज्वल' असं म्हणाली, तर त्यांचं हे मत किमान या सिनेमापुरतं सत्यापासून फार दूर नसेल. चित्रपटात कुठेही अप्पासाहेब बेलवलकर न दिसता प्रत्येक दृश्याच्या प्रत्येक फ्रेममधे नाना पाटेकरच दिसत राहतो.

इथे मी 'नटसम्राट' हे नाटक आणि सिनेमा यांची तूलना करत नाही. ती मी कट्यारच्या वेळीही केली नव्हती आणि इथेही करणार नाही. कारण दोन्ही नाटकं न पाहिलेल्या भाग्यवान लोकांत मी मोडतो. भाग्यवान अशासाठी की कट्यार काळजात का घुसली नाही या विषयी नाटकाचे दर्दी असलेल्या लोकांकडून टीकात्मक लेख वाचलेले आहेत. नाटक पाहिल्यामुळे अपरिहार्यपणे होणारी ती तूलना इथे आपसूक टाळली गेली. त्यामुळे म्हणा किंवा तरीही म्हणा, एक स्वतंत्र सिनेमा म्हणून मला तो आवडला. नटसम्राटच्या बाबतीत मात्र तसं इथे झालेलं नाही. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. बर्‍याच वर्षांनी काहीतरी जबरदस्त गंभीर अनुभवायला मिळेल असं वाटलं होतं. या आणि इतर अनेक अपेक्षा पूर्ण तर झाल्या नाहीतच पण घोर निराशा पदरी पडली.

एक तर आईवडिलांनी म्हातारपणीचं आर्थिक नियोजन करताना मुलांना स्वतःच्या मृत्यूआधीच सगळी संपत्ती देऊन टाकणे आणि मग मुलांनी त्यांना देशोधडीला लावणे ही संकल्पना असलेले निव्वळ मराठीतलीच असंख्य नाटकं, चित्रपट, आणि मालिका किंवा त्यातली उपकथानके हे आजच्या प्रेक्षकांनी पाहीले आहेत. त्यामुळे तो विषय सादर करुन 'अरेरे गरीब बिच्चारे आई-वडील' दाखवून प्रेक्षकांकडून अश्रू वसूल करणे हे म्हणजे मराठी चित्रपटाला किमान २५ वर्ष मागे नेऊन ठेवण्यातला प्रकार आहे. आता हे मागे नेऊन ठेवणे म्हणजे काय आणि तुमच्या मते पुढे येणं म्हणजे काय ते विचारु नका. लेख लिहीताना एक छान वाक्य म्हणून लिहीलं ते. अगदी या चित्रपटात असलेल्या अनेक गोष्टींसारखंच.

संपूर्ण चित्रपटभर नाना पाटेकर एका अत्यंत विचित्र सुरात संवादफेक करतो. त्यामुळे त्याचे संवाद ऐकताना रॉबिन विल्यम्सच्या Cricket is basically baseball on valium या वक्तव्याची आठवण येते. नटसम्राट इज नाना पाटेकर ऑन ड्रग्स. तुम्हाला आठवत असेल तर राजेश खन्नाने 'अमर प्रेम' या चित्रपटात अशीच कंटाळवाणी संवादफेक केली होती. माणूस दारुडा किंवा म्हातारा दाखवायचा असेल तर अशा प्रकारे ड्रग्सच्या अंमलाखाली असल्या सारखा सूर लावायलाच हवा का?

चित्रपटाचं कथानक हे नेहमी वाहतं असायला हवं. तो फ्लो इथे कुठेही आढळत नाही. चित्रपटातलं प्रत्येक महत्वाचं दृश्य (किंवा कोणतंही दृश्य घ्या हो, शेणच खायचं असेल तर त्याला प्रेफरन्स असतो का? की बुवा गायीचं चांगलं आणि बकरीचं वाईट?) हे दिग्दर्शकाने नानाला "हां, तर बरं का नाना, आता पुढचा सीन असा असा आहे' हे सांगितल्यामुळे नानाने होज्जाओ शुरू म्हणत केल्यासारखा वाटतो. अगदी "कुणी घर देता का घर" हा संवाद असलेलं दृश्य सुद्धा अपेक्षित परिणाम साधत नाही. त्या जागी नानाने यशवंत मधला "एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजडा बना देता है...." हा लांबलचक संवाद म्हटला असता तरी मला कळलं नसतं इतका मी हे दृश्य येईपर्यंत बधीर झालो होतो. त्यामुळे जिथे हा चित्रपट भिडायला हवा, तिथे तो मला जाम बोअर वाटायला लागला. चित्रपट 'नटसम्राट' हे नाव देऊन न काढता 'नानाची ठिगळं' या नावाखाली एखादी डॉक्युमेंटरी म्हणून काढला असता तरी चाललं असतं असा एक विचार चमकून गेला.

आता जरा पुन्हा कथानकाकडे वळूया. म्हणजे मी वळतो. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला चित्रपट बघताना तो पर्याय नव्हता, तुम्हाला हे वाचताना आहे. तर, जाणार्‍यांना अच्छा टाटा.

पण थांबा. चित्रपट तिकीट विकत घेऊन बघितला असेल, हा लेख फुकट आहे. तेव्हा वाचाच.

तर, नाटकात काम करणारा अत्यंत उत्तम नट, ज्याला त्याच्या अभिनयामुळे नटसम्राट ही पदवी देण्यात आलेली आहे, तो एके दिवशी 'कुठेतरी थांबायचं' म्हणून निवृत्त होतो. (पचतंय का? अभिनय म्हणजे क्रिकेट आहे का सुनिल गावसकर सारखं जमतंय तो पर्यंत रिटायर व्हायला? तो सत्तरीचा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला अँग्री यंग मॅन स्वतःचा मुलगा ओल्ड मॅन व्हायला टेकला तरी अजून चित्रपट, जाहीरात, टिव्ही कार्यक्रम एक ना दोन अनेक प्रकारात काम करतो आहे, अशा जमान्यात वावरणार्‍या प्रेक्षकांनी हा आउटडेटेड अप्पासाहेब बेलवलकर का चालवून घ्यायचा? पण ते असो.).

अशा प्रत्येक दृश्याचं पोस्ट मॉर्टम करत बसलो तर दिवस जाईल हे लिहीण्यात. ठीकाय ब्वॉ, व्हायचं असेल कुणाला रिटायर, आहे ब्वॉ तसं कथानक, आपल्याला काय.

तर, नाटकात काम करणारा एक सर्किट आणि अट्टल बेवडा थेरडा दारूच्या नशेतच मूर्खासारखं स्वतःची प्रॉपर्टी मुलगा आणि मुलीत वाटून टाकतो. मुलाला घर आणि मुलीला पैसे वगैरे.

बरं मुलाबरोबर सून आणि नात यांच्या बरोबर गपगुमान रहावं तर ते ही नाही. लहान वयाच्या मुलीला कविता शिकवता शिकवता अर्वाच्य शिव्या शिकवतो आणि तोंड वर करुन त्याचं समर्थनही करतो. कोणते आजोबा आपल्या नातवंडांना अशा घाणेरड्या शिव्या शिकवतात? अगदी गॅरेजवालेही आपल्या घरात नातवंडांशी बोलताना खूप जपून बोलत असतील. नाटकवाला ही पार्श्वभूमी दाखवली की त्याच्या नावावर काय वाट्टेल ते खपवता येतं अशी संबंधितांची समजूत आहे का?

या वरुन त्याच्यात आणि सुनेत झालेल्या वादाचं पर्यवसान त्याने घर सोडण्यात आणि मग मुलीकडे जाण्यात होतं. तिथे तो दारूच्या नशेत पार्टीत तमाशा करतो आणि जावयाच्या बॉसच्या मुलाच्या नाटकावर गरळ ओकतो. अरे शोन्या, सुखानं जगायचंय ना? पण ते नाही. आम्ही नाना पाटेकर आहोत किनै? मग थयथयाट करायलाच हवा!

समाजातला खोटेपणा सहन होत नाही, मग मुखवटे घालून घालून वावरायचं नाही म्हणत सगळे शिष्टाचार सोडून स्वतःच्याच घरच्यांशी मन मानेल तसं वागायचं स्वातंत्र्य घेणं हे कितपत बरोबर? किंबहुना या चित्रपटातल्या अप्पासाहेबाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच समजत नाही आणि मग त्याच्याबरोबर चित्रपटही वाहवत जातो.

मग बहुतकरुन वेळ जात नाही म्हणून एकाकीपणाला कंटाळलेल्या स्वतःच्याच मित्राचा त्यानेच सांगितलं म्हणून झोपेच्या गोळ्या देऊन खून करतो (आपण नसता केला, मित्राने सांगितलं तरी) आणि वर त्याचंही समर्थन करतो.  मग चोरीचा आळ घेतला म्हणून मुलीच्या घरातूनही बाहेर पडतो आणि त्याची बायको रस्त्यातच कुठेतरी मरते आणि हा पुलाखाली वन-पूल-किचन ची खोली असल्यागत, हक्काची (आणि सेक्युलर) स्वयंपाकीणबाई असलेल्या जागेत राहू लागतो. आणि मग एक दोन दॄश्यांनंतर मरतो. सिनेमा खतम, पैसा (थेटरवालेको) हजम. जा घरी.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

एकंदरीत चित्रपटात ठायी ठायी दिग्दर्शक आपल्याला "वि.वा.शिरवाडकरांच्या अजरामर (हॉss हॉss हॉss हॉssहॉss)*** नाटकावर आधारित आहे आणि त्यात नाना पाटेकर आहे म्हणून चालवून घ्या" असा दम भरत असल्याचा भास होत राहतो. नाना आहे म्हणून आवडून घ्यायचा असेल तर मग 'यशवंत' काय वाईट होता? अमिताभ बच्चन आहे म्हणून 'लाल बादशाह' आवडून घ्यायचा का? आँ? अरे बैल समजता का प्रेक्षकांना तुम्ही? कुणी उत्तर देता का उत्तर?

वास्तविक, आवडलेल्या सिनेमावर लिहीणे आणि न आवडलेल्यावर वेळ व शक्ती वाया न घालवणे हा माझा मी स्वतःवरच घालून घेतलेला नियम. त्याला मी का मुरड घातली? तर चित्रपट आवडला नाही कारण तो "तुम्हाला समजला नसेल" या अतार्किक आरोपामुळे.

पुन्हा सांगतो, नटसम्राट हा एक अत्यंत, प्रचंड, महाभयानक बोअर सिनेमा आहे. कुणी फुकट दाखवला तरी बघू नका. नाना पाटेकरच बघायचा असेल तर क्रांतीवीर बघा.

--------------------------------------------------
*** इथे मी पाताळविजयम या मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉss हॉss हॉss हॉssहॉss असं का हसलो ते कृपया विचारू नका. उत्तर आवडणार नाही.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ४, शके १९३७
--------------------------------------------------



36 comments:

  1. मस्त पोस्टमार्टेम केलंय, आवडला बुवा आपल्याला तुमचा लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनिकेत. बर्‍याच लोकांना असंच वाटत आहे हे पाहून आनंद झाला. मला वाटलं मी अल्पमतात आहे की काय!

      Delete
  2. नमस्कार, तुमचा लेख आवडला . हल्ली असे स्पष्ट विचारांचे ब्लॉग दुर्मिळच आहेत . keep writting !

    ReplyDelete
  3. भयंकर आवडण्यात आलेला आहे हां लेख!! प्रसिद्ध केल्याबद्दल शतश: आभार. चित्रपट पहायचा विचार नव्हताच. तो निर्णय दृढ़ झाला आहे

    ReplyDelete
  4. सडेतोड... चित्रपट अजून पाहीला नाहीये, पण सुरुवातीपासूनच फार उत्सुकता नव्हती

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद धनू, नियमित कमेन्ट्स करतेस त्याबद्दल विशेष धन्यवाद

      Delete
  5. लेख खूप आवडला
    खरच महाबोर सिनेमा आहे ,बघून पश्चाताप झाला
    लोकांना का आवडला कळत नाहीये ?

    ReplyDelete
    Replies
    1. एकच उत्तर आहे. नाना पाटेकर.

      Delete
  6. मी श्रीराम लागू आणि दत्ता भट या दोघांनीही अभिनय केलेले नाटक पाहिले आहे. नाना पाटेकर कशी भूमिका साकारतात ते पहायचे असा विचार होता. पण कथानकच जर विकृत स्वरुपाचे केले असेल तर बघण्यात रस नक्कीच वाटणार नाही. कारण नाटकात काही अप्पा बेलवलकर दारूडे दाखविलेले मला आठवत नाहीत. सध्याच्या काळापेक्षा ते ज्या काळातले नाटक आहे त्या काळात आपली संपत्ती मुलाबाळांत वाटून टाकणे सहज प्रवृत्तीचे होते. कारण मुले आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढण्याइतकी निर्ढावलेली नव्हती. त्यामुळे असे होणार ही घटना त्यावेळी प्रेक्षकांना हादरवणारी वाटत असे.

    कट्यार काळजात हा सिनेमा मी आधी पाहिला. आणि राहुल देशपांडेने भूमिका केलेले नाटक नंतर पाहिले. सिनेमा आणि नाटक दोन्ही मिळून कथानक समर्थपणे पुढे येते. नाटकातल्या फिलिंग द ब्लॅंक्स चित्रपटात आहेत. गायकी नाटकात ऐकावी आणि सकारात्मकता चित्रपटातून घ्यावी असे मला दोन्ही गोष्टीतून वाटले.

    ReplyDelete
  7. Mandar are me natak nahi pahil... pn movie khup lokana aavdlihe... ani khup lokan madhe tshi janiv janvtana distiye... tujha lekh uttam ch ahe tyat kahi vad nahiye... great

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Nitin for the comment. He subjective goshta aahe, kahinna awadnar kahinna nahi.

      Thanks again! :)

      Delete
  8. छान लेख आहे ,आणि बाकी ब्लॉग देखील

    ReplyDelete
  9. very true..kathanak vikrut kelay aani movie pahtana aapasaheb chya mulanvishai soft corner nirman hoto..

    ReplyDelete
  10. खुप छान! खरेच ऐका उत्तम नटाचा फक्त 'बेवडा'च केलाय सिनेमात.Very loud and melodrmatic.

    ReplyDelete
  11. Wah sahi mi ajun donihi movies baghitle nahiet...ata baghnarhi nahi...asach ekhada lekh AR rehmaan var pan liha...Shivmaniche pot bharave mhanun kad mungi chavlya sarkha 500 drum badhvat ....kuthlyatari bursat masbiditlya chali det va gaat asto..tumchya sarkha lihinara hawa spashta..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद, नक्की प्रयत्न करतो

      Delete
  12. �������� आपल्याला आवडलं बुवा हे postmortem.. खरंच ह्या चित्रपटाविषयी माझं सुद्धा.अगदी हेच्च मत आहे. फुकटात काय पण कुणी पैसे देतो म्हटलं तरी मी हा महापकावू सिनेमा बघू शकणार नाही.मला मुळात ह्या चित्रपटाच्या थीमशीच प्रॉब्लेम आहे. एकतर स्वत:च चुका करायच्या ,आपल्याबरोबर बायकोचीही फरफट करायची ,सगळं खापर मुलांच्या माथी मारायचं आणि वर हे बेवडे आजोबा सगळी सिंपथी घ्यायला मोकळे..का? तर म्हातारे आहेत म्हणून?? आपल्याला नाही पटत बुवा! ������

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. झकास लेख! एकदम सडेतोड! 👍👌
    सिनेमा / नाटक यापैकी काहीच मी पाहिलेले नाही, पण सध्या झी मराठीवर एकसारखा मारा सुरु आहे नटसम्राटच्या जाहिरातींचा.. ते पाहून सिनेमा पहायची उरलीसुरली इच्छाही मेली :-D
    लेख लिहून वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद! :-)

    ReplyDelete
  15. मी सिनेमा पहिला नाही पण नाना हा एक चांगला कलाकार व चांगला व्यक्ती म्हणून मला भावतो त्यामुळे लेख वाचताना थोडं वेगळच वाटलं

    ReplyDelete
    Replies
    1. Nana is definitely a good actor, but his talent has been wasted in this movie and he himself has not done justice to himself.

      Delete
  16. अत्यंत समपर्क....मी 56 वर्षाचा असल्यामुळे लागू भट व दुभाषी ह्रया तिन्ही महानटांच्या नटसम्राट मधील भूमिका पाहिल्या आहेत व तिन्ही मला भावल्या कारण प्रत्येकाचा वेगळेपणा....नानांचा नटसम्राट नक्कीच मोनोटोनस एकसूरी झाला आहे....मच्छरसम्राट...डाॅ वि एस् रेगे

    ReplyDelete
  17. पण लेख prejudiced वाटला . . ते अस आहे ना माइंडसेट works .. पहिला तोचि श्रेष्ठ , मग दुसरा सावत्र च रहातो . डाॅक्टरांची शब्द फेक व उच्चाराअंती लांबलेली हेल सूर युक्त वाणी ही वि.वां च्या समर्थ लेखणी मुळे लपली असावी . असो ती त्यांची धाटणी . भटांची व दुभाषींंची हि वेगळी मग नाना नी काय घोडं मारलंय . त्यामुळे नाना वरील टिका तितकी पटली नाही . रहाता राहिला संपत्ती हाता वेगळी करून मुलांवर विश्वासून पुढचा नाट्यमय प्रवास त्यात काय तूम्हाला वावगे वाटतय ? हे म्हणजे लहान मुलाने सिनेमा बघताना नायकाच्या पाठून वार करायला आलेल्या खलनायकाला बघून थेटरात ओरडून पडद्यावर च्या नायकाला ओरडून सांगणे आहो बघा सांभाळून मारा त्याला . खर सांगायच तर अजून हे प्रकार घडतात . मुलांच्या प्रेमा पोटी . परिस्थिती चा नाईलाज म्हणून . आई वडील त्याग करता पण सरतेशेवटी एकाकी जगणे येतेच त्यक्ताचे . आणि हे सर्व पातळ्यांवर होते .वयानुसार एके काळी सम्राट असलेला नट काळाबाहेर न येता कसा कोंडला गेलाय , व इतर तुम्हाला न पटणारे मुद्दे ही केवळ करायची म्हणून टिका केल्या सारखी वाटते . अर्थात हे मोजमाप आपण असलेल्या परिस्थिती चा impact असलेले असू शकते . नाही पटले .

    ReplyDelete
    Replies
    1. As I said, these things are subjective. Not necessary that everyone should agree or see movies from same point of view.

      Delete
  18. सडेतोड... मलाही नाही आवडला. आम्ही ओथेल्लो शोधत बसलो आणि आमच्या समोर एका उत्तम नाटककाराचा झालेले 'दारू'ण आले. सरळसोट अपेक्षाभंग वगैरे..... असो..... still waiting for good...... tujha lekh aawdla...

    ReplyDelete
  19. मी सिनेमा पाहिलेला नाही. पण, तुमची लेखनशैली आवडली. वाचताना मजा आली.

    ReplyDelete