Tuesday, March 29, 2011

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्‍या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.

सुदैवाने हा प्रकार समाजमान्य नसल्याने आजपावेतो आपल्याकडे ह्या विषयावर चित्रपट निघालेले नाहीत. पण ज्या पद्धतीने आणि वेगाने वैयत्तिक स्वातंत्र्याचा अर्थ हा अनिर्बंध स्वैराचार असा लावण्यात येऊन नैतिक, संस्कृतिक अध:पतन होत आहे, त्याच प्रकारे हे सगळं सुरू राहिल्यास चित्रपट काढण्याइतका हा प्रकार भारतात बोकाळेलच यात संशय नाही.


जूनो (Juno) हा नितांतसुंदर चित्रपट नुकताच सोनी पिक्स वर बघितला. आधी विषय लक्षात आल्यावर दुसरी वाहिनी लावायला रिमोटकडे हात गेलाच होता, पण जे. के. सिमन्स (बर्न आफ्टर रिडींग मधला सी.आय.ए. अधिकारी) या अभिनेत्याला बघून उत्सुकता निर्माण झाली आणि चित्रपट पूर्ण बघायचा निर्णय घेतला. सुदैवाने तो योग्य ठरला.

नर्मविनोदी अंगाने जाणार्‍या या चित्रपटाची सुरवातच शोडषवर्षीय नायिका जूनो (एलन पेज) हिला आपण गरोदर असल्याचा साक्षात्कार होण्यात होते. तिचा नुकताच दुरावलेला बॉयफ्रेंड पॉली ब्लीकर (मायकल सेरा) हाच त्या होणार्‍या मुलाचा बाप असल्याचंही तिच्या लक्षात येतं. वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत हा प्रकार सर्रास असल्याने फारशी बावचळून न जाता जूनो घडल्या प्रकाराला 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने सामोरी जाण्याचं ठरवते. आपण आई व्हायला अजून तयार नसल्याची तिला सुदैवाने जाणीव असल्याने आणि तिच्या दृष्टीने होणारं मूल ही एक नसती ब्याद असल्याने जूनोच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे गर्भपात करुन या कटकटीपासून सुटका करुन घेण्याचा. पण लवकरच तो विचार जूनो बाजूला सारते आणि ह्या मुलाला जन्म देऊन एका मूल नसलेल्या जोडप्याला दत्तक देऊन सुखी करण्याचा निर्णय घेते.

आपण केलेला प्रकार आणि आपला मूल दत्तक देण्याचा निर्णय आधी आपली मैत्रिण लिया (ऑलिव्हिया थर्लबी) हिला सांगते आणि मग आपल्या आई-वडीलांच्या कानावर घालते. जूनो लियाच्या साक्षीने तिच्या वडिलांना आणि सावत्र आईला कबुली देते तो प्रसंग फारच गंमतीदार आहे. आपल्या अवघ्या सोळा वर्षाच्या पोरीने चक्क गरोदर रहाण्याचा पराक्रम केलेला आहे या धक्क्यापेक्षा चक्क "चला, मला वाटलं ही ड्रग्स वगैरे मधे अडकली की काय" असं म्हणून तिचे वडील मॅक (जे. के. सिमन्स) सुटकेचा नि:श्वास टाकतात.
आता जूनोने निर्णय घेतल्यावर तिच्या घरातले सगळेच तिला मदत करायला मनात अजिबात किंतु न ठेवता पुढे येतात. अगदी तिच्या सावत्र आई सकट. मात्र तिला आधार देत असतानाच तिने केलेल्या घोडचुकीची आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव तिला करुन द्यायला ते विसरत नाहीत. जुनो तिच्या वडिलांबरोबर त्या मूल दत्तक घेऊ इच्छिणार्‍या जोडप्याला म्हणजेच मार्क (जेसन बेटमन) आणि व्हेनेसा (जेनिफर गार्नर) या दोघांना भेटते आणि पहिल्याच भेटीत क्लोज्ड अ‍ॅडोप्शन (closed adoption) चा प्रस्ताव मांडते. क्लोज्ड अ‍ॅडोप्शन म्हणजे बाळ एकदा दत्तक गेल्यावर त्याच्या पुढच्या प्रगतीबद्दल कुठलीही माहिती खर्‍या आईला मिळणार नाही असा करार.

यानंतर जूनोचं त्या घरी जाणं-येणं वाढतं आणि ती लवकरच व्हेनेसा आणि मार्कचा विश्वास संपादन करते. जुनो व्हेनेसाला तिच्या बाळाशी बोलायला प्रोत्साहन देऊन आपलीशी करते आणि रॉक संगीताच्या मुख्य समान आवडीमुळे मार्कचीही मैत्री संपादन करते.



बाळाचा पिता(!) असलेला पॉली ब्लीकर याच्या विषयी मनात असणार्‍या भावनांबाबत मात्र तिच्या मनात बर्‍यापैकी गोंधळ असतो. त्याने प्रॉमला दुसर्‍या मुलीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजल्यावर मात्र तोपर्यंत त्याच्याशी फटकून असणारी आणि अंतर ठेऊनच वागणारी जूनो त्याच्यावर भडकते. पॉली मात्र कमालीचा संयम बाळगत लांब रहाण्याचं तिनेच सुचवल्याचं तिला शांतपणे सांगतो आणि वर तिचा मानसिक गोंधळही अधोरेखित करतो. याची परिणिती जूनो अंतर्मुख होण्यात होते.


ब्रेनने दिलेला सल्ला न मानता जूनो मार्कला तो घरी एकटा असतानाही भेटतच रहाते आणि या भानगडीत मार्क तिच्यात कधी गुंतत जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. अशाच एका भेटी दरम्यान तो व्हेनेसाला सोडणार असल्याचं जुनोला सांगतो आणि जुनोवरचं प्रेम अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतो. त्याच सुमारास तिथे आलेल्या व्हेनेसाला तो त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात बाप होणे हा एक अडथळा आहे आणि अजून पितृत्व स्वीकारायला तयार नसल्याचं सांगून दु:खी करतो.

आपलं मूल एका गरजू पण समजूतदार आणि सुखी कुटुंबाला देऊन निश्चिंत होण्याची स्वप्नं बघत असलेल्या जूनोला या प्रकाराने प्रचंड धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. काही वेळाने मात्र परत येऊन ती फक्त व्हेनेसासाठी एक चिठ्ठी दारात ठेवते, ज्यात ती लिहीते, "व्हेनेसा, तू अजूनही (दत्तक घायला) तयार असलीस तर मी ही (मूल द्यायला) तयार आहे — जूनो" (Vanessa: If you're still in, I'm still in. — Juno).

पुढे काय होतं? मार्कपासून विभक्त झाल्यावर सिंगल मदरच्या रुपात बाळाचं संगोपन करायला सज्ज होऊन जूनोचं मूल व्हेनेसा खरंच दत्तक घेते की ती जबाबदारी शेवटी जूनोलाच उचलावी लागते? पॉली आणि जूनो पुन्हा एकत्र येतात, की जूनो बाळंत झाल्यावर ते ही विभक्त होतात? या प्रश्नांची उत्तरं इथे सांगण्यात काहीच हशील नाही. ती मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.


हा चित्रपट मला आवडण्याची कारणे अनेक आहेत. सामान्यत: पाश्चात्य भयपटात जजमेंट डे, गॉड, एंजल, सेटन, डीमन्स, टेस्टामेंट, जुडास, जीवन हे ईश्वराने दिले आहे त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार मानवाला नाही (संदर्भ: गर्भपात, देहदंड) वैगरे अनेक ख्रिस्ती धार्मिक संदर्भ उघडपणे येतात, तर काही चित्रपटांत हेच संदेश छुप्या रीतीने दिले जातात. मला तरी ह्या चित्रपटात उघड काय किंवा छुपा काय, असले कसलेही संदर्भ जाणवले नाहीत आणि हीच बाब माझ्या दृष्टीने ह्या चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. २००७ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा काही छिद्रान्वेषी समीक्षकांनी जूनोने गर्भपाताचा निर्णय रद्ध करणे या एका गोष्टीमुळे हा चित्रपट चक्क छुपा धर्मिक संदेश देत असल्याचे आरोप केले होते म्हणे. मुळात या चित्रपटात नायिका जुनोच्या मनात गर्भपात करण्याचा विचार येणे आणि तो ती ज्या कारणामुळे टाळते ते कारण लक्षात घेता ही टीका अनाठायी असल्याचं सहज लक्षात येतं.

त्यातलं मुख्य म्हणजे असा संवेदनशील विषय उत्तमरित्या आणि अत्यंत नि:पक्षपातीपणे हाताळण्यात निर्माता जॉन माल्कोविच आणि दिग्दर्शक जेसन राईट्मन आणि त्यातले अतिशय गुणी कलाकार यशस्वी झाले आहेत. यात लेखिका डायाब्लो कोडी हिच्या सशक्त पटकथेचा सिंहाचा वाटा आहे.

विषय हाताळला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल, कारण गर्भपात आणि टीनएज प्रेग्नंसी या दोन्हीबद्दल चित्रपटात कुठल्याही प्रकारचं - विरुद्ध किंवा समर्थनार्थ - भाष्य करण्याचं संपूर्णपणे टाळलेलं आहे. एलन पेज, जे. के. सिमन्स, मायकल सेरा, अ‍ॅलिसन जॅनी, जेनिफर गार्नर इत्यादी कलाकारांनी कमालीच्या पोक्त आणि संयत अभिनयाने पात्रांची मानसिक आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत ताकदीने पार पाडलं आहे.

इथे थोडं जूनोची सावत्र आई या व्यक्तिरेखेवर बोलण्याचा मोह आवरत नाहीये. ब्रेन ही जूनोला नेहमी आधारच देताना दिसते. अगदी इस्पितळात सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरणीला झापण्यापासून ते मार्कला - म्हणजेच एका लग्न झालेल्या पुरुषाला - वारंवार न भेटण्याचा पोक्त सल्ला जुनोला देण्यापर्यंत तिचं जूनोवरचं प्रेम दिसतं (ब्रेन म्हणते: "You don't understand the dynamics of marriage"). या चित्रपटाचा कधी हिंदी किंवा मराठी अवतार निघाला तर सावत्र आई खूप म्हणजे खूपच फुटेज खाणार हे निश्चित!


पॉली आणि जूनो ह्यांच्यातलं नातं कसं फुलत जातं ते बघणं हा एक प्रसन्न अनुभव आहे. किंबहुना त्यांचा पोक्तपणा आपल्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जातो. आपल्या पोरीला तिच्या चुकीची जाणीव करुन देतानाच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जूनोचे आई-वडील ब्रेन आणि मॅक, व्हेनेसाला सुरवातीला जूनोबद्दल वाटणारा स्वाभाविक अविश्वास आणि त्याचं दाट मैत्रीत झालेलं रूपांतर, तसंच मार्क पासून विभक्त झाल्यावरही जूनोचा निश्चय बघून मूल दत्तक घेण्याच्या आपला निर्णयावर ठाम असणारी व्हेनेसा ह्या गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

हा चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांच्या यादीत केव्हाच जमा झाला आहे. जूनो तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री देतो. बघा आणि ठरवा.....आणि आवडला तर सांगायला नक्की विसरू नका.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


संदर्भ: कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?) 

4 comments:

  1. मंदार किती नेटकं परीक्षण लिहितोस रे ..... अगदी मस्त.
    हा तुझा गुण, नवीन आलेल्या चित्रपटांचं वर्तमानपत्रात परीक्षण लिहिण्याच्या कामी
    कोणीतरी उपयोगात आणावा अशी इच्छा.

    ReplyDelete
  2. Khup sundar lihila ahe.. :) Thanks for sharing.. mi nakki baghen ha cinema..

    ReplyDelete
  3. मंदार..परीक्षण तर आवडलं आणि हा चित्रपट पहाताना मी कोणकोणत्या मानसिक अवस्थेतून गेले होते ते पण स्मरलं...छान...आणि असेच आम्हाला उत्तमोत्तम वाचायला मिळेल अशी आशा!

    ReplyDelete
  4. मंदार, सुंदर चित्रपटाचं अतिशय सुंदर परीक्षण !! मस्त झालंय.. असाच लिहीत रहा !

    ReplyDelete