Monday, August 9, 2010

पापभीरू

एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर एका कोपर्‍यातल्या चौकटीत हीच मंडळी अत्यंत मख्ख चेहर्‍याने गोल गोल उत्तरे देऊन वेळ मारून नेत होती आणि देशातील कुठल्याही बाजारात जास्तीतजास्त तीनशे ते पाचशे रुपयांना उपलब्ध असणारी छत्री शंभरपट किंमतीला विकत घेऊनही आंतरराष्ट्रीय बाजारात तीच किंमत कशी वाजवी आहे असं केविलवाणं समर्थन देत चीड आणत होती. त्यात ते राजकारणी सदगृहस्थ "अहो तुम्ही आत्ता काही बोलू नका हो, माझ्यावर ह्या खेळांच्या आयोजनाची किती मोठी जबाबदारी आहे तुम्हाला कल्पना नाही, गेम्स होऊन जाउदेत मग चौकशी झाली आणि मी दोषी आढळलो तर राजीनामा देण्याचा विचार करू," असे तारे तोडत होते. हवापाणी आणि काही खेळांचे निकाल किंवा सामन्यांची स्थिती याव्यतिरिक्त मी बातम्यांच्या नादाला याच कारणाने लागत नाही, तेव्हा झक् मारली आणि बातम्या लावल्या असं मला झालं.

उद्विग्न होऊन आधी "काय हलकट लोक आहेत," आणि मग "सगळे राजकारणी असेच," आणि शेवटी "हे असंच चालायचं" असे हताश उद्गार काढून टि.व्ही. बंद केला. डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं, तेवढ्यात आईची हाक ऐकू आली, "अरे मंदार, दादरला नऊ वाजता गाडी लागते, साडेआठ इथेच झालेत, हे खाली गाडीत जाऊन बसले सुद्धा, चल पळ लवकर." तंद्रीतून जागा होऊन मी लगबगीने खाली पळालो. माझा धाकटा भाऊ झारखंड मधल्या जमशेदपूर येथील त्याचं प्रशि़क्षण संपवून परतत होता त्याला, त्याच्याबरोबर भरपूर सामान असल्याने, आणायला जायचं होतं. दादरला पोहोचेपर्यंत जुजबी गप्पांमध्ये वेळ गेला. दादरला पोहोचलो तेव्हा सव्वानऊ झाले होते पण भावाने फोन करून गाडीने नुकतंच कल्याण सोडल्याचं सांगितलं. रेल्वे स्थानकाजवळच्या एका गल्लीत आम्ही गाडी लावली. "तू प्लॅट्फॉर्म तिकीट घेऊन तिथे जाऊन उभा रहा आणि गाडी आली की फोन कर मग मी गाडी घेऊन प्रवेशद्वारापाशी येतो," बाबा म्हणाले.

मी प्लॅट्फॉर्म तिकीट काढलं आणि माझा भाऊ ज्या डब्यात बसला होता तो डबा 'इंजिन पासून चौथा' असल्याने ती जागा शोधून तिथे जाऊन उभा राहिलो. मी अनेक महिन्यांनी मुंबईत येत होतो, तेव्हा गाडी येईपर्यंत बाकी काही करण्यासारखं नसल्याने रेल्वेगाड्यांचे बदललेले डबे आणि बरचसं न बदललेलं दादर स्थानक यांचं निरिक्षण करू लागलो. पण का कोण जाणे मनात पुन्हा ते भ्रष्टाचारी राजकारणी आणि त्यांची निलाजरी वृत्ती यांचे विचार येऊ लागले. एक लोकल गाडी त्याच फलाटाला लागली. शनिवार रात्र असल्याने फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मी जिथे उभा होतो तिथे लोकल मधला महिलांसाठीचा डबा येत होता ही गोष्ट आत्तापर्यंत लक्षात आली नव्हती. ते समजल्यावर मी थोडा बाजूला होणार तेवढ्यात मागून एका मुलीची हाक आली "मंदारदादा, हाय." मी विद्यार्थीदशेत, नक्की सांगायचं तर शाळेत असताना माझ्याबरोबर सतीश आणि सुनेत्रा साठे हे भाऊ-बहीण बसने प्रवास करत त्यातली सुनेत्रा मला हाक मारत होती. मला तोंडातून एक चकार शब्द काढू न देता "मंदारदादा, तू मुंबईत कसा? तू पुण्यात असतोस ना? किती दिवस आहेस इथे? अरे थोडी घाईत आहे, तू असलास मुंबईत तर बोलू नंतर किंवा मग असं कर...ऑनलाईन शोध मला, फेसबूक आणि ऑर्कुट दोन्ही वर आहोत मी आणि सतीशदादा. मला शोध आणि माझ्या लिस्ट मधून शोधून सतीशदादाला पण अ‍ॅड कर." हे सगळं एका दमात बोलून पटकन त्या सुटणार्‍या गाडीत धावत धावत चढली आणि मला टाटा करत दिसेनाशी झाली.

कॉमन मॅनचे कोट्यावधीचे 'वेल्थ' लुटणार्‍यांच्या बातम्या बघून मनाला आलेल्या उदासीनतेमध्ये सुनेत्राच्या झालेल्या ओझरत्या भेटीने आणखी भर घातली. नाही, ही काही माझ्या एका – ज्याला इंग्रजीत 'ब्लास्ट फ्रॉम द पास्ट' का काय म्हणतात – त्याची गोष्ट नाही. माझ्या ह्या मनस्थितीचं कारण वेगळंच होतं. सुनेत्राला पाहून अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या आठवणी मनात पिंगा घालू लागल्या.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

एके दिवशी दुपारी फोन वाजला. आईच्या एका मैत्रीणीचा असल्याने मी आईला बोलावलं. मैत्रीणीने कदाचित दु:खद बातमी दिली असावी कारण "काSSSSय? कधी? कसं? हो मग...बाप रे," असं बोलून आईने फोन ठेवला.

"काय झालं आई?" मी अधीर होऊन विचारलं.

आईच्या तोंडातून शब्द फुटेना. शेवटी कसा बसा धीर एकटवून आई म्हणाली "साठे गेले".

"साठे म्हणजे..."

"हो, सतीश-सुनेत्राचे बाबा. सकाळीच हृदयविकाराचा झटका आला आणि गेले. त्यांना इस्पितळातून परस्पर स्मशानभूमीत नेणारेत, तेव्हा आपण आत्ता न जाणंच योग्य. आपण एक-दोन दिवसांनी जाऊ भेटायला साठे वहिनींना."

साठेकाका आणि काकू कधीतरी आमच्या बरोबर बस मध्ये असत, त्यामुळे त्यांचाही चांगलाच परिचय झाला होता. शाळेत जाणारी मुलं हा आमच्या आयांना जोडणारा दुवा असल्याने त्या दोघींचा परिचय विशेष वाढला होता.

पण माझं त्यांच्याकडे जाणं झालंच नाही. आई-बाबांनीही आग्रह केला नाही, पण ते दोघे एके दिवशी जाऊन साठे कुटुंबीयांची भेट घेऊन आले. ते आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव काहीतरी वेगळंच घडल्याचे संकेत देत होते. आधी आई-बाबा दोघेही मला काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण फारच खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं त्याने प्रचंड धक्का बसला. साठेकाकांना आलेला हृदयविकाराचा झटका हे लोकांना सांगायचं कारण होतं. त्यांनी आत्महत्या केली होती. माझा पुढचा "पण का" हा प्रश्न अपेक्षित असल्याने आईने पुढचं सांगायला सुरुवात केली.

साठेकाका एका विमान कंपनी मध्ये नोकरीला होते. जोडधंदा म्हणून पोस्टाची गुंतवणूक एजन्सी घेऊन कमीशन बेसिसवर व्यवसाय करीत. लोकांकडून पैसे घ्यायचे आणि पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवायचे आणि मॅचुअर झालेल्या योजनांमधले पैसे पुन्हा परत आणून द्यायचे वगैरे. एके दिवशी अशाच एका मॅचुअर झालेल्या योजनेचे दहा हजार त्यानी त्यांच्या कार्यालयातल्या एका बाईंना आणून दिले. इतकी मोठी रक्कम बाईंनी आपल्याबरोबर पर्समध्ये ठेवायच्या ऐवजी त्यांच्या मेजाचा एक भाग असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवली. संध्याकाळी घरी जाताना पैसे घ्यायला ड्रॉवर उघडल्यावर लक्षात आलं की पैसे त्यात नाहीत.

त्या बाईने आख्खं कार्यालय डोक्यावर घेतलं. जवळजवळ प्रत्येकावर संशय घेऊन झाला. "अहो असा त्रागा करण्यापेक्षा आपण सगळ्यांची झडती घेऊ," व्यवस्थापक साहेबांनी सुचवून पाहिलं. अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बाई काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी सगळ्यांचे सल्ले धुडकावून लावत सरळ पोलीस चौकी गाठली. साडेपाच वाजले होते. प्रकरण पोलीसांपर्यंत पोहोचल्याने आता कार्यालयात मिटवता येणे शक्य नव्हते. सगळे थांबले तर उलट-सुलट चर्चा करून आपलं डोकं उठवतील आणि त्या बाईही तिथेच असल्या तर परिस्थिती स्फोटक होऊन अनवस्था प्रसंग ओढवेल म्हणून साहेबांनी सगळ्यांना घरी जायला सांगितलं आणि स्वत: एकटेच कार्यालयात थांबून राहिले. काही वेळाने पोलीस तिथे पोहोचले आणि सुमारे तासभर साहेबांचं डोकं खाल्लं. पोलीसांच्या वैतागाचं कारण साहेबांनी कुणालाही थांबवून ठेवलं नव्हतं हे होतं. त्यांचे 'कष्ट' वाढणार होते ना पुन्हा दुसर्‍या दिवशी येण्याचे! "उद्या सकाळी येतो, प्रत्येकाची चौकशी करू, कोणीही गैरहजर राहता कामा नये" असा दम देऊन ते निघून गेले.

आदल्या दिवशी निव्वळ त्रागा केल्याने बाईंच्या अंगात जबाब वगैरे देण्याची ताकद उरली नव्हती. त्यामुळे पोलीस सकाळी आले तेव्हा त्यांनी आधी बाईंचा जबाब घेतला. "तुमच्याकडे पैसे होते ही गोष्ट कुणाकुणाला माहित होती?" या प्रश्नावर त्यांनी काही सहकार्‍यांची नावे घेतली. अर्थातच साठ्यांनीच त्यांना पैसे आणून दिल्यामुळे त्यांचं नाव त्या जबाबात होतंच. त्यादिवशी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असणार्‍या साठ्यांना ही गोष्ट कुणीतरी दूरध्वनी करून सांगितली. साठे दुसर्‍या दिवशी कामावर आलेच नाहीत.

आली ती त्यांच्या 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या आकस्मिक मृत्यू' ची बातमी. अर्थात हे कारण लोकांना सांगितलं गेलं. पण खरी गोष्ट अशी होती की "आपल्या घरी पोलीस येणार, आपली पोलीस चौकशी होणार, आणि त्यामुळे आपली नाचक्की होणार," या विचारांनी साठ्यांना इतकं अस्वस्थ केलं की पहाटे पाणी प्यायच्या निमित्ताने उठून त्यांनी एक सगळीच्या सगळी कीटकनाशकाची बाटली पिऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली. साठे काकूंच्या विनंती वरून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण आत्महत्या असं न नोंदवता 'हृदयविकाराचा तीव्र झटका' असं नोंदवलं त्यामुळे साठे कुटुंबियांची पुढची परवड थांबली. केवळ दहा हजार रुपयांनी एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावून घेतला होता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"...एस-सी फोर इंजिनपासून चौथा, एस-सी फाईव्ह इंजिनपासून पाचवा..." माझ्या बरोब्बर डोक्यावर असलेल्या लाऊडस्पीकर मधून ही उद्घोषणा झाली आणि मी दचकून भानावर आलो. भाऊ डब्याच्या दारातच उभा होता. त्याचं सामान घेतलं आणि बाबांना फोन केला. गाडीत सामान ठेवलं आणि घरी आलो. रूमवर टि.व्ही. नसल्याने 'दूरदर्शना'साठी हपापलेल्या भावाने टि.व्ही. लावला. पुन्हा तेच पुराण सुरु झालं. एव्हाना प्रत्येक वृत्तवाहिनीचे स्वयंघोषित शोधपत्रकार बेंबीच्या देठापासून बोंबलत तीच बातमी आणि तेच निर्लज्ज चेहरे दाखवत होते.

"किती तो निलाजरेपणा!" मी बाबांना म्हणालो.

"यालाच कलीयुग म्हणतात रे" ते म्हणाले.

"तुम्हाला साठेकाका आठवतात का हो? कुठे नुसत्या पोलीस चौकशीने होणारी नामुष्की टाळायला आत्महत्येचा मार्ग पत्करणारे ते आणि कुठे कोट्यावधीचा गैरव्यवहार सिद्ध करणारे ढळढळीत पुरावे असतानाही काहीच घडलं नसल्याच्या थाटात मुलाखती देत सुटणारे हे घटिंगण" मी त्यांना म्हणालो.

माझ्याकडे एक खिन्न कटाक्ष टाकून ते म्हणाले "हे असंच चालायचं." त्यांनी वैतागून भावाकडून रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलून शेअर बाजाराच्या बातम्या बघू लागले, आणि मी संगणक चालू करून सतीश आणि सुनेत्राला फेसबूक आणि ऑर्कुटवर शोधू लागलो.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

यातली साठे यांची गोष्ट सत्यकथेवर आधारित असली तरी त्यातल्या व्यक्तींची नावे अर्थातच बदलण्यात आली आहेत.

अवांतर: सुदैवाने साठे काकूंना श्री. साठे यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली आणि आज सतीश आणि सुनेत्रा दोघेही आपआपल्या नोकरीत आणि संसारातही प्रगती करत स्थिरावले आहेत.

4 comments:

  1. खूप छान झाली आहे कथा.. आवडली.. दोन्ही प्रसंगांची एकमेकांशी खूप छान सांगड घातली आहेस ..

    ReplyDelete
  2. मंदार, खरंच सुन्न करून गेली ही कथा...
    सर्वसामान्य पापभिरू माणूस चटका लावून गेला...
    बेईमान राजकारणी आणि सर्वसामान्य इमानदार पापभिरू माणूस चांगली गुंफण घातली आहे...

    हे राजकारणी आहेत म्हणून आज देश मरतोय रे...

    ReplyDelete
  3. मनाला चटका लावून गेली कथा! :(
    लिहिण्याची शैली आवडली

    ReplyDelete
  4. सर्वांना धन्यवाद :)

    ReplyDelete