Saturday, December 20, 2014

माणुसकीचा येता गहिवर

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार

चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार

मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?

लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार

डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार

त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार

येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार

आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार

Thursday, October 30, 2014

सार्वजनिक स्वच्छता: आधी स्वतःकडे पहा

आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले.

पंतप्रधान झाल्यापासून अनेक बाबतीत जनता मोदीजींचा आदर्श ठेवत आहे आणि मोदी कुर्त्यापासून अनेक गोष्टींचे अनुकरणही होत आहे. मग या बाबतीत ते न झाल्यासच आश्चर्य होते. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजींनी हातात झाडू घेतल्यामुळे आलेल्या देशात एक प्रकारची झाडलाट आली आणि त्यात इतर राजकीय नेत्यांपासून ते सरकारी व खाजगी आस्थापनांतले अधिकारी, सिनेनट, नट्या आणि नटव्या, आणि अगदी ऑफिसातले शिपाई इथपर्यंत सगळे अक्षरशः झाडून सामील झाले आणि रस्त्यांवरचा आणि परिसरातला कचरा साफ करु लागले.

इथे एक घटना आठवली. नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी एका चीनी संकेतस्थळांवर भारतातल्या अनेक धार्मिक स्थळांवर कसा उकिरडा माजला आहे त्याची अनेक निवडक छायाचित्रे झळकली. चीनी संकेतस्थळ आहे म्हटल्यावर अनेकांनी देशभक्ती आणि चीनद्वेषातून 'चीन भारतावर कसे कसे हल्ले करत आहे आणि हे सुद्धा भारताचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न बुडवायचे कारस्थान कसे आहे' यावर तावातावाने त्यावर चर्चा करायला सुरवात केली. हे खरं आहे, मात्र अशी चर्चा करत असताना एक देश म्हणून गेली काही वर्षे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे वावडेच निर्माण झालेले आहे हे मात्र सोयिस्कररित्या विसरले गेले.

भेळ खाल्ली, टाक कागद तिथेच. चणे-दाणे खाल्ले, टाक कागद तिथेच. प्लॅस्टीकच्या कपातून चहा प्यायला, टाक तो कप खाली तिथेच. पान, गुटखा, पानमसाला खाऊन यत्र तत्र सर्वत्र घातलेले ते मंगलाचे सडे हे तर प्रत्येक कोपर्याचे व्यवच्छेदक लक्षणच झालेले आहे. चालत्या गाडीतून विविध प्रकारचा कचरा बाहेर टाकणे याचा एक सुशिक्षित नमूना नुकताच बघितला. गाडीतून शहाळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर शहाळे सरळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. हे असंच सुरू राहिलं तर सगळा देश जरी झाडू घेऊन उभा ठाकला तरी कमी पडेल.

तेव्हा या अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा पण मुळात आपण वरील मार्गांनी कचरा करण्यास कारणीभूत ठरत नाही ना, याचा विचार करुन आधी अशा प्रकारच्या कचरानिर्मितीला पायबंद घाला. सुधारणा करायची असेल तर समोरच्याकडे बोट न दाखवता आणि यंत्रणांना दोष न देता स्वतःपासून सुरवात करा. तरच आपला देश स्वच्छ होऊ आणि राहू शकेल.

चला तर, आपला भारत स्वच्छ राखूया!

Thursday, September 18, 2014

टाटा लोकसत्ता

आदरणीय(!) संपादक साहेब गिरीश कुबेर साहेबांस,

[लोकसत्तात मराठीची काय वाट लागलेली आहे याचा मी उल्लेखही करत नाही याची कृपया नोंद घ्या (किंवा घेऊ नका....आम्हाला काय त्याचे?)[]

मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. माझ्या सुरवातीच्या मराठी वाचनात लोकसत्ताचा मोठा वाटा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. आम्ही उभयतां नोकरी करत असल्याने छापील अंक वाचायला दोघांनाही वेळ नव्हता. आता मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. 

माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हा वाचनीय होता. नंतर उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍या त्यांचे प्रश्न मांडणार्‍या कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता. आता तर या गरळओकीत मोदी सरकार आल्याने नवा जोम आला आहे. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्‍या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही.

थोडासा ट्रॅक बदलतो. अनिसच्या भूमिकेनुसार "समाजामध्ये काम करताना थेट देवावर विश्वास/श्रद्धा ठेवू नका असे सांगत काम करता येत नाही, त्यामुळे बहुसंख्य समाज दूर जातो. त्यापेक्षा थेट अंधश्रद्धांवर (बुवाबाजी, ज्योतिष इत्यादी) हल्ला चढवत, त्यांचे दुष्परिणाम सांगत लोकांपर्यंत अधिक चांगले पोचता येते, प्रबोधन करता येते." याचाच अर्थ असा की आधी उघड दिसणार्‍या अंधश्रद्धांवर हल्ला चढवायचा. मग हळू हळू एक एक श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे हे पटवत पटवत लोकांना देव आणी श्रद्धा वगैर सब झूठ या पातळीवर यायला प्रवृत्त करायचं. उदाहरणतः नारळ फोडणे ही अंधश्रद्धा आहे, कोंबडी कापू नका, इत्यादी. मग हे भंपक आणि भेकड लोक बकरे कापणार्‍यांना जाऊन सांगणार नाहीत. कारण ते सेक्युलर आहेत. हा हलकटपणा लोक खपवून घेत नाहीत हे चांगलंच आहे. इथे कोणीही 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी'  हे पाळत नाही आणि स्वतः कष्ट करतोच. ते करत असताना आम्ही काही सण साजरे करत असलो आणि काही प्रथा पाळत असलो तर त्या आम्ही पाळणारच.

दाभोलकर हत्येनंतर ज्याप्रमाणे हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला त्यामुळे तर आधीच हास्यास्पद असलेली अनिसची विश्वासार्हता खड्ड्यात जात चाललेलीच आहे. त्यांच्याबरोबर लोकसत्तानेही बहुतेक आपली निष्ठा विकून स्वतःच्या अब्रूला चितेवर चढवून अनिसबरोबर सती जायची तयारी केलेली दिसते.

तेव्हा हिरवी हवा डोक्यात गेलेले संपादक महाशय गिरीश कुबेर, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली ऊठसूठ हिंदूना(च) अक्कल शिकवण्याचा आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि या उचापत्यांनी हेही स्पष्ट आहे की तुमची नियतही साफ नाही. 

कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता टिकवून ठेवू शकत नाही. माझ्यासारखे अनेक जण केवळ इतक्या वर्षांची सवय मोडता येत नाही म्हणून लोकसत्ता घेत होते. त्यातल्या मी फक्त माझ्यापुरता एक निर्णय घेतला आहे. तुमचा पेपर मी माझ्यापुरता या महिन्यापासून बंद करतो आहे. सकाळी सकाळी डोक्याला शॉट लाऊन घेण्याची माझी इच्छा नाही. आत्तापर्यंत चालू होता कारण काही लेख वाचायला आवडत असे. आता आवडणारे लेख ऑनलाईन वाचत जाईन आणि वाटलंच तर आवडणार्‍या लेखांचे प्रिन्टाआउट काढत जाईन.

आपला,
लोकसत्तावरची श्रद्धा उडालेला,

मंदार दि. जोशी