कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा आणि मालिका बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्यांनी ही खरी गोष्ट वाचा.
माझ्या परिचयाच्या एक काउन्सिलर आहेत. फेसबुक फ्रेंड आहेत व नंतर त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट झालेली आहे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे ही माझा नेहमीचा त्रागा किंवा बाजारगप नाही. अजूनही असे किस्से ऐकले आहेत, पण हा एका समुदेशकाकडून प्रत्यक्ष ऐकल्याने मांडतो.
अग्गंबाई सासूबाई इफेक्ट -
सप्टेंबर २०२० मधली गोष्ट आहे. एका वयस्कर बाईंशी त्यांचं फोनवर बोलणं होत असे. आपण त्यांना मिसेस क्ष म्हणूया. तर मिसेस क्ष यांना दोन मुली, दोन्ही लग्न होऊन अमेरिकेत. २ वर्षांपूर्वी मिसेस क्ष यांच्या नवर्याला देवाज्ञा झाली. अमेरिकेत सुद्धा मराठी वाहिन्या दिसतात, त्या बघून मुलींचा यांना सल्ला की आई तू लग्न कर. आम्ही इथे लांब आहोत, आमचा काहीच प्रश्न नाही. घर, संपत्ती वगैरेंचं तू काहीही कर, आम्हाला काहीही नही दिलंस तरी चालेल.
हे सतत ऐकून मिसेस क्ष हैराण आहेत. त्यांचं म्हणणं असं की त्यांचा संसार खूप चांगला झाला. मान्य आहे की या वयात सोबत हवीशी वाटते, एकटेपणा जाणवतो. त्यासाठी नोकरीकरणार्या मुली पेइंग गेस्ट म्हणून ठेवू शकते. पण सतत लग्न कर लग्न कर हा लकडा कशाला लावायचा. अरे मला नाही करायचं लग्न. म्हातारपणातला एकटेपणा घालवायला लग्न किंवा त्याच अर्थाची सोबत हवी हे सतत ऐकून वैताग आला आहे! पुन्हा लग्न न करणं हा माझा वैयक्त्तिक निर्णय आहे, तुम्हाला माझी काळजी घ्यायचा कंटाळा आला असेल तर थकल्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहीन.
खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईंनी सांगितलं की त्या खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईं म्हणाल्या ते ही पटण्यासारखं आहे, की आईच्या एकटेपणाची इतकी काळजी वाटते तर एका मुलीने यावं भारतात परत, घ्यावी आईची काळजी. मुलगी, नातेवंडे सोबत असली की एकटेपणा कुठल्याकुठे पळून जाईल.
अग्गंबाई सासूबाई मध्ये विषय काय, मांडतात काय! प्रेक्षकांत कुणी अशी एकटी माणसे असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही. उतारवयात लग्न करुच नये असं नाही, पण ते इतक्या जोरकसपणे ठसवलं जात आहे की उपरोक्त मिसेस क्ष यांच्या मुलींसारखे लोक मालिका पाहून आईवडिलांना पिडत बसतात.
आता कोलगेटच्या जाहिरातीकडे वळू. याबद्दल बोलावं असं वाटत होतं पण पुन्हा भावनेच्या भरात वाहून जाणारे लोक विषय आणि वस्तुस्थिती समजून न घेता, "उतारवयात सोबत असली तर गैर काय" अशी तलवार घेऊन येतील म्हणून बोललो नव्हतो. पण पुन्हा त्याच समुपदेशक बाईंची पोस्ट मदतीला धावून आली. म्हटलं आपलेच विचार एक अनुभवी समुपदेशक मांडत असेल तर त्याला अर्थातच वैधता प्राप्त होते. गेले कित्येक दिवस हॅमर केल्या जाणार्या त्या कोलगेट टूथपेस्टच्या जाहीरातीत एक वयस्कर बाई आपल्या मुला-बाळांसह एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. तिथे एक वयस्कर माणूस येतो आणि तिच्या खांद्याभोवती हात वेढून उभा राहतो. मुलं चमकतात. ती हातातली अंगठी दाखवून सूचित करते की लग्न/साखरपुडा उरकला आहे. त्यावर मुलांना आश्चर्य वाटण्याऐवजी ती एकदम खूष होतात.
म्हणजे कुणी कोणत्या वयात लग्न करावं हा माझ्या चर्चेचा विषय नाहीच. पण वाढत्या वयात सोबत म्हणून लग्न हा एकमेव पर्याय असल्याचं वेगवेगळ्या माध्यमांतून ठसवलं जातंय आणि जनता त्यातल्या 'उदात्त' वगैरे भावनांनी उचंबळून येत आहे.
ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे.
पण हे असं फसवं उदात्तीकरण आणि प्रचार कशाला? इतकी आपल्या आई-वडिलांची किंवा इतर वयस्कर नातेवाईकांची काळजी असेल तर काढा थोडा वेळ त्यांच्यासाठी, न्या त्यांना आपल्याबरोबर बाहेर फिरायला, जेवायला, ललित कार्यक्रमांना. एखादा रविवार घरी घालवा त्यांच्या संगतीत, त्यांना आवडतात त्या गोष्टींत वेळ घालवा त्यांच्याबरोबर. लग्न-लग्न काय लावलंय? तरूण माणसांना सांगायचं 'लग्न हे आयुष्याचं अंतिम ध्येय नसतं' वगैरे आणि वयस्कर माणसांना सांगायचं 'हाच पर्याय आहे.'
पूर्वी कसं मुलगी उजवली की आपण सुटलो असं वाटायचं काही पालकांना, तसं आता 'जोडीदार मिळाला की आपली जबाबदारी संपली' असं सांगतायत का? एक संसार करताना भरपूर तडजोडी केलेल्या असतात दोघांनीही. आता वाढत्या वयात पुन्हा तेच - असं वाटू शकतं ना कुणाला? जेष्ठ नागरिकांच्या समस्या कमी नाहीत. त्यात आता या मालिका पाहून प्रत्यक्ष आयुष्यातले सल्ले देत सुटणार्या आणि मनस्तापात भर घालणार्या लोकांची भर पडली आहे.
बाकी, कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्यांच्या विचारांना माझी श्रद्धांजली.
© मंदार दिलीप जोशी
तळटीपः
(१) पूर्ण पोस्ट वाचून मग(च) मत व्यक्त करावे.
(२) पोस्टमधलं एक वाक्य नीट वाचा "ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे." आणि मग तलवार काढा.