Monday, August 17, 2020

बॉलिवुडचे तरुण(!) 'तुर्क', काँग्रेस, आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे

आज आमिर खान सबंधातली एक बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली एक बातमी आठवली.

काँग्रेस पक्ष अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तुर्कस्थानात इस्तंबुल इथं आपलं एक कार्यालय उघडल्याची ती बातमी होती. ही माहिती 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' नावाच्या गटातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुर्कीश माध्यमांना देण्यात आली. 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' हा भारताबाहेर राहणाऱ्या काँग्रेस समर्थकांचा एक गट आहे आणि पूर्वी स्व. राजीव गांधींचे खास असलेले आणि आताच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय 'हुआ तो हुआ' फेम सॅम पित्रोदा ह्या गटाचे अध्यक्ष आहेत. या कार्यालयाची धुरा मोहोम्मद युसूफ खान नामक एक इसम सांभाळेल. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या या मोहोम्मद युसूफ खान या व्यक्तीबद्दल मात्र आंतरजालावर फारशी माहिती मिळत नाही.


हे कार्यालय उघडण्यामागे काँग्रेस पक्षाचा हेतू सांगताना प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की भारत व तुर्कस्थान यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत या करता काँग्रेस पक्षाने हा पुढाकार घेतला आहे. यातली गोम अशी की असं करण्याचा राजमार्ग अर्थात भारतीय सरकारची अधिकृत वकीलात तिथे असताना काँग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय पिल्लू असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या या कार्यालयाचं औचित्य काय?

काही तथ्ये लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षाची ही कृती किती धोकादायक आहे हे लक्षात येईल. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांना इस्लामी जगताचा खलिफा बनण्याची सुरवातीपासूनक्सह स्वप्न पडत आली आहेत आणि त्यांनी तुर्कस्थानला मजहबी कट्टरतेच्या दिशेने नेण्यात एकही कसर बाकी ठेवलेली नाही. तुर्कस्थानचे पहिले राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांनी केलेल्या सुधारणांच्या बरोबर उलट दिशेला तुर्कस्थानला नेण्याचा त्यांनी चंगच बांधलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरातून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने बहुसंख्येने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत योग्य विधाने केली. मात्र राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्या नेतृत्वाखालील तुर्कस्थानने मात्र भारताला या मुद्द्यावर विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची ही पहिलीच खोडी नव्हती. या आधी २०१७ साली एप्रिल ३० ते १ मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर बहुपक्षीय चर्चा व्हावी असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यात लक्षणीय बाब अशी की २००२ साली राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळताना मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न शिमला कराराअनुसार द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा अशी भूमिका घेतली होती. अर्थात पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे तुर्कस्थानच्या ग्रीसशी असलेल्या वादात ग्रीस सायप्रस बाबत तेच करत असतो ही पार्श्वभूमी त्या भूमिकेमागे होती. पण हा यु टर्न भारतासाठी आश्चर्यकारक असल्याने त्यावेळी भारताकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता व काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मामला असल्याचे भारताने ठामपणे पुन्हा सांगितले होते.

अवांतर: याच दौऱ्यात एर्डोगन महाशयांना जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हा त्यांनी तुर्कीश भाषेत भाषण केले होते.

इतर इस्लामिक देश - जरा सुधारणा करतो - अनेक अरब देश राष्ट्रहिताकडे डोळा ठेऊन भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असताना इस्लामी जगताचे नेतृव करण्याची स्वप्ने बघणारा तुर्कस्थान आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने शब्द टाकला म्हणून इस्लामी जिहादी विचार पसरवणाऱ्या झाकीर नाईकला आश्रय देणारा मलेशिया हे मजहबी कट्टरतेकडे झुकलेले देश मात्र काश्मीर प्रश्नावर सातत्याने इस्लामी दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतात.  हाच झाकीर नाईक राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची उघडपणे इस्लामची तळी उचलल्या बद्दल तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो.आता तुर्कस्थान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या महाआघाडीत आता ओमानही आपली सुन्नी कट्टरता पोसायला सामील झाला आहे. राजकीय पाठिंबा इथवर ही गोष्ट थांबत नाही. भारताने एर्डोगन पाठिंबा सेट असलेल्या टर्किश संघटनांकडून काश्मीर व केरळमधल्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना पुरवला जाणारा पैसा या बाबतीत अनेकदा निषेध नोंदवलेला आहे.

अवांतर: हे लिहीत असतानाच अरब देश भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहेत हे दर्शवणारी एक आश्वासक बातमी आली. बहारीनमध्ये गणपतीच्या मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपावरुन एका बुरखाधारी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एर्डोगन मजहबी कट्टरतेची खुर्ची आपल्याकडे खेचून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न का करत आहे हे देखील अशा घटनांतून मिळणार्‍या संकेतांमधून  कळते. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने तुर्कस्थानात आपलं कार्यालय उघडणं हे निव्वळ संशयास्पदच ठरत नाही तर सरळ सरळ देशविरोधी भूमिका ठरते. पण मनमोहन सिंग पंतप्रधान आणि प्रत्यक्षात घटनाबाह्य सत्ताकेंद्र सोनिया गांधी अशी व्यवस्था राबवणाऱ्या काँग्रेसने अधिकृत भारतीय वकीलात असताना त्याला वळसा घालून वेगळं कार्यालय उघडण्यात खरं तर काहीच आश्चर्य नव्हे. कायम भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशी विधाने व कृती करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून ऑटोमन साम्राज्याच्या दिशेने जायची इच्छा बाळगणाऱ्या मजहबी कट्टर एर्डोगन यांच्या देशात वेगळे कार्यालय उघडणे हे काँग्रेसच्या बाबतीत नैसर्गिकच म्हणायला हवे.

अवांतर: २०१९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४व्या सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यू यॉर्क पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि आपले उत्सवमूर्ती एर्डोगन हे भेटले आणि या भेटीत त्यांच्यात 'इस्लामोफोबिया' शी लढायला एक टीव्ही चॅनल सुरू करण्यावर एकमत झालं.

आता आमिर खानच्या बातमीकडे वळूया.

बॉलिवूड आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी अंडरवर्ल्डचे संबंध आता काही गुपित राहिलेले नाहीत. तथापि इतर कट्टर मजहबी देश आणि बॉलिवूड यांच्यातल्या संबंधांबाबत फारशी माहिती उजेडात येत नाही. गेलाबाजार पीके सिनेमात भगवान शंकरांच्या बाबतीत खोडसाळपणा करणाऱ्या, हिंदू देवळांच्या बाबतीत डोस पाजणारा, आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल यथेच्छ गरळ ओकणारा आमिर खान हज यात्रेला जाऊन तिथे विविध देशातील मौलवींची गळाभेट घेताना फोटो चमकवतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ते तेवढंच. न्यू इअर पार्टी करून साजरे करण्याचे खूळ भारतात पुरेपुर असताना एकेकाळी उदारमतवादी व प्रगत होऊ बघणारा तुर्कस्थान हा बॉलिवुडमधल्या मंडळींच्या आवडत्या देशांपैकी एक देश आहे. आजही तिथे अनेक नाईटक्लब आहेत. अशाच एका नाईटक्लबात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या गोळीबारात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अबिस रिझवी आणि त्यांची मैत्रीण खुशी शहा हे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडच्या टर्किश कनेक्शनकडे लक्ष गेलं.

तर आमिर खान सबंधातली ती बातमी कोणती? तर फॉरेस्ट गम्प या टॉम हँक्स अभिनित हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाची नक्कल असलेल्या लालसिंग चढ्ढा या आपल्या सिनेमाचे शेवटचे काही चित्रीकरण आटपण्यासाठी आमिर खान तुर्कस्थानात होता. ही संधी साधत आमिरने १५ ऑगस्ट रोजी आपली द्वितीय हिंदू पत्नी किरण राव हिच्यासह राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची पत्नी इमिन एर्डोगन यांची हुबेर मॅन्शन या त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात भेट घेतली. आपल्या पानी फाउंडेशन या आपल्या एनजीओच्या दुष्काळ निवारण व पाणी संवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असे समजते. श्रीमती एर्डोगन यांनी आमिर खानची तो आपल्या चित्रपटांमधून 'सामाजिक प्रश्नांची' धाडसी मांडणी [courageous handling of social problems] (!) केल्याबद्दल स्तुती केली.

ही भेट इथली साधी सरळ असणार असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या नव-ऑटोमन धोरणानुसार चालणाऱ्या तुर्कस्थानने दक्षिण आशियातल्या मुसलमानांत आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे स्वतःला गैर-अरब इस्लामी जगताचा खलिफा किंवा सम्राट म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मलेशिया आणि पाकिस्तानशी संधान बांधलं असून या देशांच्या मदतीने दक्षिण आशिया व प्रामुख्याने भारतीय मुसलमानांना लक्ष्य करून तिथं आपलं कट्टर इस्लामी प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान व एर्डोगन पत्नीची भेट ही या परिप्रेक्ष्यात बघितली पाहिजे.

एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच परिस्थिती या खानावळीची असली तरी पाकिस्तानला गुड नेबर अर्थात चांगला शेजारी म्हणणारा शाहरुख खान आणि उघड गुंडासारखी वागणूक ठेऊन ती झाकायला बिइंग ह्युमन काढणारा हरणमाऱ्या सलमान खान यांच्यापेक्षा भारतीयांच्याच जीवावर कोट्यवधी कमावून मग २०१५ साली बायकोला भारतात असुरक्षित वाटतं असं साळसूद विधान करणारा आणि दक्षिण आशियाई देशांत इस्लामी कट्टरतेचा प्रभाव वाढवू बघणाऱ्या एर्डोगन यांच्या पत्नीची भेट घेणारा आमिर खान हा जास्त धोकादायक वाटतो.

ही सगळी माहिती आणि बातम्या अर्थातच उघड आहेत, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तरी राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांपेक्षा बॉलिवूडच्या चाळ्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या जनतेला त्याचं महत्व आणि धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही. आज एका नटाच्या संशयास्पद मृत्यूने पेटून उठणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी आणि तो कोण होता याची अचानक जाणीव झालेल्या इतरांनी बॉलिवूडमधली घराणेशाही, नेपोटीझम, वगैरेंत यथेच्छ डुंबून झाल्यावर त्याच्याकडे कसलेसे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट होते आणि ते चोरले गेले वगैरे जागृती आली. हे प्रकरण आणि जे या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत किंवा यात गुंतले आहेत असे जे आरोप होत आहेत ते बघता एक-दोन संशयास्पद मृत्यू आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांचा पाकिस्तानी अंडरवर्ल्डशी संबंध इतका आपल्या माहितीचा परीघ मर्यादित न ठेवता देशविरोधी शक्तींशी बॉलिवूडचे आंतरराष्ट्रीय संबंध या विरोधात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

या परिप्रेक्ष्यात बघितल्यास काँग्रेस पक्षाचे तुर्कस्थानात वेगळे कार्यालय उघडणे आणि तुर्कस्थानच्या मजहबी कट्टर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी आमिर खानच्या अहो रुपम अहो ध्वनी थाटाच्या गप्पा या एकटीदुकटी घटना उरत नाही, तर एका मोठ्या सुनियोजित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भारत आणि हिंदूद्वेषी राजकारणाचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं.

मात्र काँग्रेसच्या वळचणीला जाणाऱ्या नवनिधर्मांध पक्षांच्या लक्षात हे दुवे आलेले तरी दिसत नाहीत किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं जातं आहे. ही बाब अशा पक्षांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे हे नक्की. पण तो विषय वेगळा. 

चीनी व्हायरसमुळे उद्भवलेल्या नव्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक लोक अनावश्यक गोष्टींचा त्याग करत असताना आपणही अशी यादी तयार करून अशा अनावश्यकच नव्हे तर राष्ट्रविघातक गोष्टींना अंगावर बसलेल्या माशीप्रमाणे झटकून टाकणे आणि शक्य झाल्यास ठेचणे आवश्यक आहे.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ १३, शके १९४२


Monday, August 3, 2020

सहज सुचलं म्हणून - अखंड सावधान रहावे

प्रतिभाहीन महत्वाकांक्षा हिंसक असते, आपल्या जीवनप्रवासात जिथे जिथे जाते तिथल्या वातावरणालाही दूषित करत जाते. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले लोक तिचे नेहमी लक्ष्य ठरत राहणार.

तुम्ही सेलिब्रिटी झालात, किंवा कोट्यावधी संपत्तीचे धनी झालात तरी आर्थिक व्यवहार स्वतःकडेच ठेवा. नेट बँकिंग, एटीएम/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन शॉपिंग यातलं मला काहीही कळत नाही किंवा त्यामार्गे व्यवहार करायचा कंटाळा येतो या सबबी चालणार नाहीत. शेअर्स वगैरेंचे व्यवहार ब्रोकरच्या डोक्यावर टाकून निश्चित राहू नका, स्वतः शिकून घ्या आणि मगच इतरांना जबाबदारी द्या आणि त्यावर लक्ष ठेवा; नपेक्षा करू नका. अगदी प्रेम आणि लग्न करतानाही विचार करण्याचा अवयव हा कमरेखाली नसून मानेच्यावर आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या हुशारीवर भुलल्याचे दाखवणारी प्रत्येक व्यक्ती आणखी बरंच काही मनात ठेवून असू शकते. ओरबडणारी आणि कुरतडणारी माणसं अवतीभोवती जमतील असे वागू नका.

A chain is as strong as it's weakest link and a democracy is as firm as it's corruptest leaders. त्यामळे अखंड सावधान असावे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण पौर्णिमा, शके १९४२

Thursday, July 23, 2020

"तुम्ही बघता कशाला?" आणि "जीवावर उदार होणारे कलाकार"

[काही लोकांना #त्रागा / मालिकांवरच्या पोस्ट दिसल्या की लगेच "तुम्ही बघता कशाला?" असले अतार्किक प्रश्न घेऊन लोक परत परत हजर होतात. आमच्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा ते आम्हाला उत्तम समजतं, आणि टीव्ही समोर बसून सगळ्या मालिका बघू लागलो तर नोकरी/व्यवसाय सोडून घरी बसायला लागेल. घरी किंवा शेजारी नुसतं इकडून तिकडे गेलं टीव्ही असलेल्या खोलीतून तरी सगळ्या मालिकेचा फील येतो. एकाच घरात राहताना कान आणि डोळे बंद करुन बसता येत नाही, अगदी दुसरी खोली असेल तरीही. शिवाय, एका मिनीटाची जाहीरात जरी बघितली तरी मालिकेत काय चाललं आहे ते स्पष्ट कळतं. तेव्हा "तुम्ही बघता कशाला?" याला उत्तर एकच, "तुम्ही त्रागा दिसला की त्याच पोस्ट का वाचता? दुर्लक्ष करा!"]



अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्‍या कला क्षेत्रातल्या लोकांनी हे समजून घ्यावं की आम्हाला हे माहीत आहे की आर्थिक गरजा कुणाला चुकल्या नाहीत, शेवटी पोटासाठी करावं लागतं, त्यामुळे तुम्ही फालतू मालिकेत टुकार भूमिका करत असाल तर त्यात गैर काही नाही...पण मग टीका सहन करायला तयार राहावं माणसाने. दुर्लक्ष करता येत नसेल तर काही लोक सरळ ब्लॉक करुन मोकळ्या होतात, तसंही करायला हरकत नाही. अग्गंबाई सासूबाई वगैरे सारख्या भंगार मालिकेत काम केल्यावर काय स्तुतीसुमने उधळायची का लोकांनी तुमच्यावर? एकदा तुम्ही कॅमेर्‍यासमोर आलात की दिसणार्‍या आणि ऐकू येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा प्रेक्षक म्हणून आम्हाला अधिकार आहे. आम्ही नाटकाची व सिनेमाची तिकिटे, केबलचे पैसे, आणि वीज खर्च करतो.

कलाकार किंवा तत्सम लोक म्हणजे काही सैनिक, वैद्यकीय व्यावसयिक व कर्मचारी, पोलीस बँक कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारे वाहतुक व्यवसायिक वगैरे नाहीत जीवावर उदार व्हायला. कुणीतरी जीव धोक्यात घालून केलेलं काम आम्ही मनोरंजन म्हणून बघू इतक्या कोत्या आणि असंवेदनशील मानसिकतेचे आम्ही वाटलो का? रसिकांवर कसले उपकार करत आहात तुम्ही? तुम्ही ज्या व्यवसायात राहून पैसा कमावत आहात तोच मुळात लोकाश्रित आहे. लोकांचे उपकार आहेत तुमच्यावर. पैसा फेको तमाशा देखो. तुमच्या मालिका बंद झाल्या तर रसिक दुसरे मार्ग शोधतील (किंबहुना शोधतातच). तुम्ही काहीही तुमचं आयुष्य धोक्यात घालून करत नाही आहात हे, पैसे घेताय त्याचे निर्मात्याकडून. तेव्हा आमच्यासाठी जीवावर उदार होत आहात या गैरसमजातून कलाकारांनी लवकरात लवकर बाहेर आलं तर बरं. या असल्या मालिकांपेक्षा खाली डोंबारी आला तर त्याचा खेळ बघेन मी. तो खरं तर जीव धोक्यात घालतो दोरीवर चालून.

आणखी एक, "तुमच्या कामाचा असा जाहीर पंचनामा केला तर चालेल का?" असा बावळट प्रश्न एके ठिकाणी वाचला. आमचं काम जितक्या लोकांसमोर आम्ही करतो तितक्या लोकांसमोर आमच्या कामाचं नियमित मूल्यमापन होत असतं. आम्ही ऑफिसात काय काम करतो, कसं करतो म्हणजे पद्धत काय, आमच्या कामाचा इतरांवर काय परिणाम होतो याचा दर तीन, सहा, किंवा बारा महिन्यांनी आमच्या ठराविक बॉस समोर मूल्यमापन उर्फ पंचनामा होत असतो. अधुनमधून टोचायला मॅनेजर लोक असतातच. शिवाय कॉलवर क्लायंट आमची जी शाळा घेतो ती वेगळीच. तेव्हा असा बावळट प्रश्न पुन्हा विचारू नका. तेव्हा चूक झाली की किंवा अपेक्षित काम नाही झालं की लोक आम्हाला नावं ठेवतातच. कलाकार म्हणजे कुणीतरी परग्रहावरचे आहात हा समज दूर करा.

बाकी तुमच्या इतर मतांबद्दल निकोलस टालेब यांनी लिहीलेली वाक्ये जशीच्या तशी द्धृत करतो आहे, ती हॉलीवुडच्या कलाकारांबद्दल लिहीली असली तरी ती सगळ्याच कलाकारांना लागू पडतात:

1) To understand why what happens in Hollywood is irrelevant to the rest of humans: 1) How many ACTORs do you have among your friends? 2) How many ACTOR friends do your friends have? Actors rarely mix with real people.

2) Romans banned actors from marrying, even mixing with citizens. Same dynamics in modern times, but self-inflicted: engineers can mix w/gynecologists... actors stay with actors. Look at the funerals of "gens du spectacle".

3) I do not know many industries where people are hired either
a) on looks, or
b) ability to impersonate what one is not.

4) Actors should not be the ones lektchuring the rest of us on ethics & morality. They also have a tendency to conflate virtue and its external manifestation, given that everything in their world is appearance. 

5) And for the slow thinkers on the thread, you don't see gynecologists or train engineers lektchuring the rest of the world on virtue. Actors do. Gabish?

6) Remember: actors are trained to not seem stupid.

7) Now a harder questchon: what is the proportion of actors who voted for Hilary Monsanto-Malmaison?

8) OK, let me be blunt. How many professions do you know, other than the ones where physical attributes are essential, where the modus "sleep your way up" prevails?

© मंदार दिलीप जोशी
- एक अत्यंत संतापलेला प्रेक्षक

तळटीपः यातली काही वाक्ये काही मित्रांच्या पोस्ट व टिप्पण्यांतून घेतली आहेत, टंकायचा कंटाळा म्हणून. श्रेय न दिल्यास रागवू नये. 

Tuesday, July 14, 2020

केप फियर: तिटकाऱ्याची परिसीमा

Cape Fear नावाचा इंग्रजी सिनेमा आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्याखाली १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला मॅक्स हा त्याच्या वकीलाच्या मागे लागतो. खटल्या दरम्यान वकिलाने काही पुरावे दडवल्याने त्याची शिक्षा कमी होऊ शकणार असते ती झालेली नसते. कदाचित मॅक्स निर्दोष सुटू शकला असता ते ही अर्थातच होऊ शकलेलं नसतं.  

तुरुंगात वकिली शिकलेल्या मॅक्सच्या मनात यामुळे त्याच्या सॅम बावडेन या वकिलाबद्दल इतका द्वेष भरलेला असतो की तो त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मागे अत्यंत भयानकपणे लागतो. 

मॅक्स म्हणजे रॉबर्ट डी निरोची संवादफेक इतकी प्रभावी आहे की आपण अनेकदा डोकं धरून बसतो. आपल्या छातीतली धडधड शेवटपर्यंत थांबत नाही. सॅम इतका बोलतो, इतका बोलतो की अगदी चित्रपटाच्या शेवटी मॅक्स केडी बोटीबरोबर जखडला गेल्याने नदीत ओढला जातो त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सतत बोलत, गरळ ओकत असतो. 

हा कधी एकदाचा मरतो आणि याची कारस्थाने थांबतात आणि याचं बोलणं बंद होतं असं आपल्याला वाटत राहतं. 


Robert De Niro in White Shirt and Cap With Nick Nolte in Cape Fear ...

रॉबर्ट डी निरोच्या अफलातून अभिनयासाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा.


🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसास्वादक, 📗 पुणे ग्रीनकार्ड होल्डर 


Monday, July 13, 2020

देवाचिये द्वारी गुदमरे जीव

खूप पूर्वी 'दी ओमेन' नावाचा एक इंग्रजी हॉरर सिनेमा बघितला होता. त्यात जन्माला आल्यावर थोड्याच वेळात बाळ मृत झाल्याने हॉस्पिटलचा फादर त्या बाळाच्या वडिलांना म्हणजे रोबर्टला गुप्तपणे दुसरंच बाळ त्याचंच आहे असं त्याच्या बायकोला म्हणजे कॅथरीनला भासवत दत्तक घ्यायला लावतो. ते बाळ म्हणजे डेमियन (संपूर्ण कथा नेटवर उपलब्ध आहे म्हणून इतकंच सांगतो की डेमियन हा अँटीख्राईस्ट/माणूस नसलेला/सैतान/वगैरे असतो). 

डेमियनला एकदा रॉबर्ट आणि कॅथरीन त्याला चर्चमध्ये घेऊन जायला म्हणून निघतात. जसेजसे ते चर्चच्या जवळ येतात तसतसा डेमियन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतो आणि शेवटी तो इतका हिंसक होतो की त्याला परत घरी घेऊन जावं लागतं.

आज ग्रेगरी पेकचा एक दुसरा सिनेमा बघताना हा सिनेमा सहज आठवला. अगदी सहज.

https://youtu.be/LO3KlIShoHo

देवाचिये द्वारी गुदमरे जीव
दिशा चुकलेल्या मनुष्याचा

🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसस्वादक, 📗 पुणे ग्रीन कार्ड होल्डर

Friday, July 10, 2020

विकास दुबेच्या निमित्ताने

विकास दुबे अमुक पक्षाचा समर्थक आणि अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मारणार नाहीत असा दावा करणारे आता त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठोकल्यावर म्हणत आहेत की त्याने तोंड उघडू नये म्हणून मारलं. अशी डबल ढोलकी सगळीकडे आहेत.

मला सांगा, असं आजवर किती वेळा झालंय की कुख्यात गुंड किंवा गुन्हेगार कोर्टात उभा राहिला आणि त्याच्या साक्षीने नेते मंडळी तुरुंगात गेली आहेत? शून्य!

तेलगीला विसरलात का? नार्को टेस्टमध्ये ज्या कुणाचं नाव घेतलं होतं त्याने तो गेला का आत? अबू सालेम ने नावे तरी घेतली का? हे तर गुन्हेगारी आणि खंडणीखोरीचा दैदिप्यमान इतिहास असलेलं उत्तर प्रदेश आहे जे आता कुठे योगीजींच्या ताब्यात आलंय.

हिंदू डॉन वगैरे ठीक आहे पण यातून दोन प्रश्न उद्भवतात: (१) आजवर त्याने हिंदुत्वासाठी काय केलं?
(२) पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी? असं करणाऱ्या कुणाचीही अशीच अवस्था व्हायला हवी. (गंमत अशी की हिंदू डॉन नेहमी आपल्याच लोकांचे शोषण करतो तर म्लेंच्छ डॉन आपल्या लोकांचा जास्तीत जास्त फायदा आणि काफिरांचे शोषण होईल असे बघतो. त्यामुळे हा मुद्दाही निकालात निघतो. पण तो विषय जरासा वेगळा आणि मोठा आहे, पुन्हा केव्हातरी.)

सर्वांना सारखा न्याय हवा हे मान्य. पण तो हिंदू होता म्हणून मारला, ब्राह्मण होता म्हणून मारला अशी बकवास करायची हौस असेल तर त्यांनी लवकर मानसोपचार घ्यावेत.

गुन्हेगारांच्या मागच्या खऱ्या चेहऱ्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे किंवा ते पकडले गेले पाहिजेत वगैरे बरोबर आहे पण आधी हे लक्षात घ्या की या खऱ्या चेहऱ्यांना आपणच निवडून देतो आणि योग्यतेपेक्षा कितीतरी मोठं करतो. मूल्यांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्व देतो. मग यांच्या नावावर साधी एक चारचाकी गाडी नसते पण संपूर्ण राज्याला वेठीला धरण्याइतके उपद्रवमूल्य ते नक्कीच बाळगून असतात आणि खरोखर प्रामाणिक व काम करणाऱ्या माणसांना जातीवरून, शरीरयष्टीवरून, घरातल्या महिलांवरून टोमणे मारून आणि इतर सर्व मार्गांनी टोचून टोचून हैराण करतात. याला लोकच जबाबदार आहेत.

🖋️ मंदार दिलीप जोशी
📃 रोखठोक
आषाढ कृ ५, शके १९४२