शुक्रवारी २६ तारखेला सकाळी दापोलीला गाडीने चाललो होतो. मुर्डीचा चढ चढत असताना एके ठिकाणी गाडी डावीकडे घेऊन त्या निमुळत्या आणि खड्डेयुक्त रस्त्यावर एका गाडीला जायला जागा करून देताना अचानक त्या गाडीवाल्याने माझं लक्ष वेधून घ्यायला जोरात हॉर्न वाजवला. मी काच खाली केली तर त्याने विचारलं, "मंदार जोशी ना?"
मी दचकून म्हटलं हो.
"हांsssss मला वाटलंच, फेसबुक फोटो वरून ओळखलं मी!"
हे कमाल आहे, आता लोक चालत्या गाडीतून पण ओळखू लागले 😁
पण कसं आहे, की आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन सेलिब्रिटी आहोत, आपल्याला चार लोकं ओळखतात, अशा समजुतीत राहून डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नये.
फार पूर्वी धर्मेंद्रची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्याने एक किस्सा सांगितला होता तो जसा आठवेल तसा सांगतो. तो एकदा एकटाच गाडी चालवत आपल्या गावाकडे चालला होता. वाटेत त्याला एक खेडूत रस्त्याने चालत असलेला दिसला. आपण त्याला लिफ्ट देऊ, मग तो आपल्याला धर्मेंद्रने कशी लिफ्ट दिली हे सगळ्यांना सांगेल वगैरे मनात मांडे खाऊ लागला. धर्मेंद्रने गाडीत बसायला सांगितल्यावर तो बसला, पण गाडीत तो काहीच बोलेना. धर्मेंद्रने बळंच विचारलंन तेवढ्या प्रश्नांची त्याने थोडक्यात उत्तरे दिली इतकंच. त्याचं ठिकाण आल्यावर त्या खेडुताने मला इथे उतरवा असं सांगितलं.
धर्मेंद्रने गाडी थांबवल्यावर त्या खेडुताने खिशातून दोन रुपयाची नोट काढली आणि धर्मेंद्रच्या हातात ठेऊन शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेला.
माझ्याही बाबतीत असंच एकदा झालं होतं. एकदा केळशीच्या उत्सवाला बाहेरगावाहून आलेल्या एक बाई मला शोधत असल्याचं समजलं, ब्लॉग लिहिणारे मंदार जोशी आलेत का असं विचारत होत्या. एका काकांनी आमची भेट घालून दिली. पुढचा काही वेळ मी हवेत होतो.
उत्सवात जो गोंधळ असतो त्यात एकाचा आवाज आणि उच्चार मला फार आवडतात म्हणून मी नेहमी पहिल्या रांगेत समोर बसत असे. त्यामुळे तो गाववाला मला ओळखतो असा माझा समज होता. एकदा प्रसादाचं जेवण आटपल्यावर तो जरा टेकला होता तिथे जाऊन मी ओळखीचं हास्य केल्यावर त्या व्यक्तीने मला विचारलं,
"कुणाकडे उतरलात?" 😁
तस्मात, फार हवेत उडू नये. ब्रह्मांडात जिथे आपली सूर्यमाला एवढूशी आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण?
🖋️ मंदार दिलीप जोशी