Monday, August 15, 2011

देशील का?

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?



Thursday, August 11, 2011

गंध फुलांचा


"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात
नेमकं काय दाटायचं
कुणास ठाऊक मला तेव्हा
नेमकं काय वाटायचं
आतून येणारी हाक
त्या हाकेतली आर्त स्पंदनं
याचा ठावच घेतला नव्हता
मनातल्या वादळाचा तेव्हा
अर्थच उमगला नव्हता
येणारी हाक कुणाची होती
की होते ते फक्त मनाचे खेळ?
ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली
एक अगम्य, वेडी आशा.....?
की अव्यक्त भावनांची
हळुवार अमूर्त भाषा?

मग जळमटं बाजूला सारून
जुन्या कपाटातून काढलीच बाहेर
माझ्या आयुष्याची वही
तिची पानं थोडी कोरी
थोडी भरलेली
तुझ्यासमोर ठेवली
तेव्हा सारं काही उमगलं
बांध फोडून मनात दाटलेलं
त्या वहीवर अलगद उमटलं

भरलेल्या पानांना
तुझ्या अक्षराची सोबत झाली
कोरी पानं वाट बघत होतीच
तुझंच अक्षर उमटण्याची
मला न समजलेलं गणित
तुझ्याच अक्षरात सोडवण्याची

जास्त काही लिहीत नाही
एवढंच तुला सांगायचं होतं, यापुढे.....
उघडलेल्या वहीवर अक्षर तुझंच असेल,
एवढंच वचन द्यायचं होतं.





Wednesday, June 15, 2011

रमण लांबा आणि हेल्मेट


क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेता राजा गोसावी यांना आलेला मृत्यू हा एका वेगळ्या अर्थाने सगळ्यात सुदैवी मृत्यू म्हणता येईल. राजा गोसावी यांना तर मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला. पण ही झाली वयोवृद्ध लोकांची गोष्ट.

पण वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी मृत्यू आला तर, आणि ते ही मैदानावरच्या घटनेमुळे? ते मात्र दुर्दैवीच. अशीच गोष्ट आहे भारताचा फलंदाज रमण लांबा याची.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रमण लांबाचे आगमन झाले ते दणक्यातच. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९८६-८७ सालच्या मालिकेत धडाकेबाज कामगिरी करून तो सगळ्यांच्या नजरेत भरला. पण पुढच्या काही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला. बी.सी.सी.आय. च्या निवड समितीने रमण लांबाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी नंतर अनेक सामन्यांत खेळण्याची संधी दिली, पण त्याचं तो सोनं करु शकला नाही. भारतातील स्थानिक स्पर्धात धो धो धावा करुनही तो पुन्हा संघात स्थान काही मिळवू शकला नाही. त्याची पुन्हा राष्ट्रीय संघात कधीच निवड झाली नाही.
राष्ट्रीय संघातून बाहेर फेकले गेल्यावर आजकाल कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या वृत्तवाहिन्यांवर 'क्रिकेट तज्ञ' म्हणून चमकोगिरी करण्याची सोय त्याकाळी नसल्याने त्याने मग अनेक स्थानिक पातळ्यांवर क्रिकेट खेळायला सुरवात केली. रमण लांबा काही काळ आर्यलंडच्या क्लब क्रिकेटमध्ये काही काळ चमकला. तिथल्याच एका तरुणीशी (किम) त्याचे प्रेमाचे सूर जुळले आणि दोघे लवकरच विवाहबद्ध झाले.



काही काळाने त्याने बांगलादेशातून क्लब क्रिकेट खेळायला सुरवात केली. वंगबंधू स्टेडियम मध्ये अशाच एका क्लब पातळीवरच्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग या संघाविरुद्ध ढाका येथील अबहानी क्रिडा चक्र या संघातर्फे खेळत असताना सैफुल्ला खान या गोलंदाजाच्या एका षटकादरम्यान रमण लांबाला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण करण्यात आलं. खालीद मसूद या त्याच्या यष्टीरक्षक-कर्णधाराने त्याला हेल्मेटबाबत विचारलं, पण त्या षटकात फक्त तीन चेंडू बाकी असल्याने रमणने हेल्मेट घालायचा कंटाळा केला. आणि त्याच्या ह्याच निर्णयाने घात केला. सैफुल्लाने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला. त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाज मेहराब हुसेनने पुलचा एक सणसणीत फटका हाणला. चेंडू फार उंचावर उडून झेल पकडला जाऊ नये म्हणून त्याने चेंडू जमीनीवर पडेल अशा बेताने मारला पण तो सरळ रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. फटका इतका जोराचा होता की चेंडू लांबाच्या डोक्यावर आदळून उंच उडाला, इतका की खालीद मसूदला तो काही अंतर मागे जाऊन झेलावा लागला. फलंदाज बाद झाल्याने सगळे क्षेत्ररक्षक जल्लोष करत खालीदकडे धावले.

त्याच वेळी सगळ्यांचं रमण लांबाकडे लक्ष गेलं तेव्हा तो डोकं धरुन खाली पडलेला दिसला, आणि सगळे त्याच्याकडे धावले, पण लांबा एव्हाना त्या धक्क्यातून सावरला असावा. तो आरामात उठून उभा राहिला आणि "मी बरा आहे" असं क्षेत्ररक्षकांना सांगून ड्रेसिंग रूमकडे आरामात चालत गेला. संघाच्या डॉक्टरने त्याला पाणी पाजले, पण काही वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला इस्पितळात हलवण्यात आलं. तिथे नेलं जात असताना वाटेतच त्याची शुद्ध हरपली. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूतली गाठ काढून टाकण्यात आली. प्रकृती खालावल्याने दिल्लीहून एका तज्ञाला पाचारण करण्यात आलं पण तो "आता रुग्ण बरा होण्याची काहीही आशा नाही" असं सांगून जवळ जवळ आल्यापावलीच परत गेला. अखेर उपरोल्लेखित घटनेच्या तीन दिवसांनंतर त्याच्या कुटुंबाच्या परवानगीने त्याचा लाईफ सपोर्ट काढून टाकण्यात आला. बायको किम आणि पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी त्यावेळी लांबाच्या अखेरीचे साक्षीदार होते.

ब्रॅडमनच्या काळात हेल्मेट कसं नव्हतं आणि आज सचिन तेंडुलकर कसं हेल्मेट, आर्म गार्ड, चेस्ट गार्ड पासून कसं सगळं घालून खेळतो याबद्दल उहापोह करणारा (आणि आजकालच्या फ्याशनीप्रमाणे सचिनला नावं ठेवणारा) एका इंग्रजाचा लेख नुकताच वाचनात आला. अनेक कारणांनी त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली, पण त्याला लांबाचा मृत्यू कसा झाला ते अर्थातच ठावूक नसावं. किकेटमधे हेल्मेट हा प्रकार प्रचलित झाल्याला साधारण तीसेक वर्ष झाली असतील. या शिरस्त्राणाने असंख्य फलंदाज आणि क्षेत्ररक्षक जायबंदी होण्यापासून वाचलेले आहेत. जवळजवळ सगळे फलंदाज हल्ली हेल्मेट वापरताना दिसत असले, तरी फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करणारे अनेक खेळाडू आजही एकनाथ सोलकरी थाटात हेल्मेट घालायचा कंटाळा करतात. अशांनी रमण लांबाची दुर्दैवी गोष्ट आठवावी आणि हेल्मेट घालायला सुरवात करावी.

शेवटी 'शीर सलामत तो कॅच पचास' हेच खरं, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः विविध वृत्तपत्र कात्रणे, क्रिकइन्फो डॉटकॉम, स्पोर्टस्टार.
रमण लांबाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वर्षा विशेषांक ’ऋतू हिरवा २०११’ इथे पूर्वप्रकाशित.

Thursday, May 19, 2011

संस्कृत भाषेचे अनोख्या पद्धतीने संवर्धन: हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर

नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.



आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.



ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.



Friday, May 6, 2011

व्यसन

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो." ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाच्या नावासंदर्भात वरचा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही). हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण, म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे अनेक मुलं शालेय गणवेशात बसलेली दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं" मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.


ई-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं जातं. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल बोललं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.


ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणारी ही सगळी शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात. उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.


मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

तर मग, करताय ना आजच निश्चय?