जर एखादा पोलीस अधिकारी कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शूर असेल, आणि तो देशद्रोही आणि समाजकंटकांशी लढत आणि जिंकत असेल तर – त्याचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही - धक्का बसला? आणि शीर्षकाचा याच्याशी काय संबंध? थांबा थांबा, सांगतो.
किमान हॉलिवूड आणि तिथून चोर्यामार्या करणारे बॉलिवूडचे आणि वेब सिरीजचे निर्माते हेच असत्य (नॅरेटिव्ह) प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. माझ्या आठवणीत नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला आलेल्या Bruce Willis नायक असलेल्या 'Diehard' या चित्रपट मालिकेनेपासून याची सुरवात झाली. नंतर २००८ च्या आसपास आलेल्या Liam Neeson च्या 'Taken' या सिनेमा सिरीजने या छद्मसिद्धांताला पुढे रेटण्याचं काम केलं. आणखीही चित्रपट मालिका असतीलच, पण मला ठळकपणे या दोन आठवतात इतकंच. अरे हो, हे लिहीता लिहीताच बाटला हाऊस एनकाउंटरवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातही नायकाचं वैवाहिक आयुष्य फारसं बरं चाललेलं नसतं असं दाखवलं आहे. [त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे डाय हार्ड मालिकेच्या चौथ्या भागात ऑफिसर मक्लेन (ब्रूस विलीस) ची मुलगी जी आधी स्वतःची ओळख ल्युसी जेनेरो (Gennero - तिच्या आईचं म्हणजे हॉली हिचं आडनाव) अशी करुन देत असते तीच वडिलांनी व्हिलन आणि मंडळींचे बारा वाजवल्यावर आपलं नाव ल्युसी मक्लेन अशी करुन देते. पण तरी नॅरेटिव्ह तोच राहतो.]
नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर आलेली वेब सिरीज 'फर्जी' याच विकृतीने ग्रासलेली दिसते. बुद्धीमत्ता आणि शौर्याच्या जोरावर अत्यंत ताकदवान असलेल्या माफियावर मात करणार्या पोलीसांचा एक गट अशी साधारण कथावस्तू आहे. यात नायक असलेल्या पोलीस अधिकार्याच्या र्हास होत चाललेल्या वैवाहिक आयुष्याबाबत एक संपूर्ण असंबद्ध अशी एक समांतर चालणारी गोष्ट आहे. या घटस्फोटाच्या प्रकरणाला मालिकेच्या कथेतून रजा दिली असती तरी तरी कथेवर काहीही परिणाम झाला नसता.
हे सातत्याने का केलं जातं? कलात्मक स्वातंत्र्य अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी अंतर्गत कथेत मसाला घालणे हा एक तर्क होऊ शकतो, पण खरंच फक्त तेच कारण आहे का?
यावर चर्चा करत असताना दोन कारणे समोर आली. कुटूंबसंस्थेला विविध मार्गांनी नष्ट करायला डावे टपलेलेच आहेत. तसंच, डाव्यांनी व्यापलेल्या मनोरंजन क्षेत्रात त्यांचं लाडकं लक्ष्य अर्थात टार्गेट असलेली patriarchy अर्थात पितृसत्ताक पद्धती नेहमीच रडावर असते. समाजमाध्यमांत #SmashPatriarchy आणि थेट बोलता येत नाही म्हणून त्याला #SmashBrahminPatriarchy अशी दिलेली फोडणी आपण बघत असतो. आता #Patriarchyनष्ट करायची तर समाजातलं पौरुष नष्ट करणे भाग आहे.
संगीत मानापमान नाटकातलं "शूरा मी वंदिले" या पदाकडे आपण येऊया. प्राचीन काळापासून स्त्री ही शूर पुरुषाकडे आकर्षित होते हा आपला पारंपारिक दृष्टीकोन (traditional view)आहे. काळानुसार समाजात अनेक बदल होत गेले असले तरी मूळ गाभा तोच राहिला आहे. आजही गणवेषातल्या अधिकारी व्यक्तीची पत्नी म्हणवून घेण्यात अनेकींना अभिमान वाटतो. माझ्या अनुभवांतही आपला नवरा पोलीसांत, सैन्यात, नौदलात किंवा तत्सम क्षेत्रात आहे हे सांगताना स्त्रियांच्या चेहर्यावर एक निराळीच चमक दिसते.
चित्रपटांत आणि वेब सिरीजमधे अशा प्रकारची कथानके घालण्याचं हेच कारण दिसतं की प्रामाणिक, शूर, आणि यशस्वी पुरुष अधिकार्यांचं एक तर करियर उत्तम असू शकतं किंवा वैवाहिक आयुष्य तरी. पूर्वी चित्रपटांत प्रामाणिक पोलीस अधिकार्यांच्या कुटुंबावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या दाखवल्या जायच्या. आता त्यांचा चांगला संसारच होऊ नये म्हणून हे कर्तृत्ववान शूर पुरुषांच्या अयशस्वी संसाराचा नॅरेटिव्ह रुजवण्याचे प्रयत्न होत आहेत. यात मेख अशी आहे की डाय हार्ड, टेकन, बाटला हाऊस इत्यादी सिनेमांत नायिकेला नवर्याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, प्रेमही आहे, पण तरी तिला त्याबरोबर करावी लागणारी तडजोड आणि त्याग मात्र मान्य नाही. थोडक्यात ज्याप्रमाणे शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारी अशी समाजाची मानसिकता आहे तसंच "शूरा मी वंदिले" हा पारंपारिक दृष्टीकोन बदलून "शूरा मी लांबूनच वंदिले" असा दृष्टीकोन रुजवण्याचे जोरदार प्रयत्न गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमार्फत सुरु आहेत.
वाचकांनी सहमत व्हावंच असं अजिबात नाही, पण यावर विचार करावा अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे.
मूळ हिंदी: © श्री जनार्दन पेंढारकर
मराठी भावानुवाद, संपादन, आणि वाढीव लेखनः © श्री मंदार दिलीप जोशी
No comments:
Post a Comment