Wednesday, November 3, 2010

चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव

सहावीत असताना माझी शाळा बदलली आणि त्याचबरोबर पंधरा मिनिटात नाचत, बागडत दंगा करत शाळेत जाण्याची सवय सुटली. अर्थात, चालत केलेल्या प्रवासात जरी घर ते विक्रोळी रेल्वे स्थानक आणि दादरला उतरल्यावर शाळेपर्यंत, आणि मग पुन्हा संध्याकाळी शाळा ते दादर स्थानक आणि विक्रोळी स्थानक ते घर अशी भरीव वाढ झाली असली, तरी त्यातली मजा निघून गेली होती. कारण मज्जा करण्याची जागा आता "कधी एकदा स्टेशन/शाळा/घर गाठतोय" या जगप्रसिद्ध मुंबईछाप घाईने घेतली होती. लवकरच नवखेपण जाऊन अस्मादिकांचे रूपांतर चतुर मुंबईकर रेल्वे प्रवासी (ही द्विरुक्ती आहे) असं झालं, आणि मी दादर लोकल मध्ये खिडकीतली जागा किंवा निदान बसायला जागा पटकावण्यासाठी माटुंगा स्टेशन गाठायला सुरवात केली.

आता तुम्ही विचाराल की मी हे सगळं का सांगतोय? याचा आणि चित्रपटांचा काय संबंध? पण आहे संबंध, ऐका तर खरं! एके दिवशी शाळा सुटल्यावर काही काम होतं म्हणून मित्राबरोबर सहज दादर स्टेशनपर्यंत गेलो आणि फलाट क्रमांक एक/दोन वर दादर लोकलची वाट पाहू लागलो. वेळ घालवायला वरती लावलेल्या टिव्ही संचावर लागलेल्या जाहीराती पाहू लागलो. जाहीराती संपल्यावर अचानक एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क माझे आवडतं कार्टून टॉम अ‍ॅण्ड जेरी दाखवत होते!! मग काय, रोज धावत धावत दादर स्टेशन गाठणे आणि गाडीची वाट बघता बघता टॉम अ‍ॅण्ड जेरी बघणे हा रोजचा उद्योग झाला. आधीच वॉल्ट डिझ्नेच्या कार्टून्सनी वेड लावलंच होतं, त्यात आता ह्याची भर पडली. मग काही वर्षांनी उपग्रह वाहिन्यांचा जमाना आला आणि कार्टून नेटवर्कच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशनचा खजिनाच मिळाला आणि इतर काही अ‍ॅनिमेटेड मंडळींशी ओळख झाली.

मात्र त्याच बरोबर घरी आणि दारी ऐकाव्या लागणार्‍या टोमण्यांमुळे एक गैरसमज झाला तो म्हणजे कार्टून्स किंवा अ‍ॅनिमेशन हा फक्त लहान मुलांनी बघण्याचा चित्रप्रकार आहे. अर्थातच हे खोटं आहे ही गोष्ट लवकरच लक्षात आली, पण अजूनही भारतात सर्वत्र तोच समज आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखादा धमाल अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होतो, तेव्हा तेव्हा चित्रपटगृहात जे मोठे आपल्याला दिसतात त्यातले जवळ जवळ सगळे सिनेमा चांगला आहे म्हणून नव्हे तर फक्त लहान मुलांबरोबर कुणीतरी हवं म्हणून आलेले असतात. एकेकटे आले तरी कबूल करत नाहीत. असेच अनेक जण तर "अरे मुलीला आणणार होतो, पण तिचा एक्स्ट्रा क्लास होता, मग तिकीट वाया गेलं असतं म्हणून मित्राला घेऊन आलो," असं सांगून वेळ मारून नेतात. काही विशिष्ठ हाणामारी आणि विनोदपट वगळता आपल्या वेगळेपणामुळे जसे काही सिनेमे जसे आपल्याकडे लागत नाहीत, तसेच अनेक चांगले अ‍ॅनिमेशनपटही आपल्याकडे लागत नाहीत. असाच एक वेगळा असलेला, पण बहुतेक आपल्याकडे प्रदर्शित झालेला, अ‍ॅनिमेशनपट म्हणजे "हॉर्टन हिअर्स अ हू" हा नितांतसुंदर सिनेमा.


बघायला गेलं तर धमाल मनोरंजन, पण नीट पाहिला तर या चित्रपटातून आपल्याला चक्क अध्यात्मावर, सुजाण पालकत्वावर आणि काही सामाजिक वैगुण्यांवरही भाष्यही केल्याचं जाणवेल. आता कथेकडे वळू (हुश्श! असे काही आवाज ऐकू येताहेत मला ;) ).

नूल नावाच्या जंगलात काही नैसर्गिक घडामोडींमुळे धुळीचा एक कण एका फुलावरुन उडून हवेत तरंगत तरंगत जात असताना एका छोट्या तळ्यात आंघोळ करत असलेल्या हॉर्टन (Jim Carrey) या अत्यंत लाघवी आणि जंगलातील निसर्ग शिक्षक असलेल्या हत्तीची नजर वेधून घेतं, ते त्याला त्यातून एक अत्यंत छोटासा चित्कार ऐकू आल्यामुळे. हॉर्टन मग त्या धुळीच्या कणाची 'स्थापना' त्याच्या हातातल्या एका गुलाबी फुलावर करतो. कल्पनाशक्ती जोरात असलेल्या हॉर्टनला त्या धुळीच्या कणात अतीसूक्ष्म लोक राहत असलेलं 'हू-विल" (Who-ville) नामक एक अख्खंच्या अख्खं शहर असल्याचा साक्षात्कार होतो. या शहराचा महापौर असतो नेड मॅक्डॉड (Steve Carell). त्याच्या बरोबर राहत असतं त्याचं अवाढव्य कुटुंब - त्याची बायको सॅली (Amy Poehler) आणि "ह" (H) या अक्षराने नाव सुरू होणार्‍या शहाण्णव मुली - हो, ९६ मुली (Selena Gomez), आणि त्यांच्या पाठीवर झालेलं सत्याण्णवावं अपत्य आणि प्रथेनुसार वारसाहक्काने महापौरपदासाठीचा पुढचा दावेदार असलेला जोजो नामक मुलगा (Jesse McCartney). जोजोला मात्र पुढचा महापौर होण्यात काहीच रस नाहीये, त्याला व्हायचंय संशोधक, शास्त्रज्ञ.

ह्या महापौर साहेबांना डॉक्टर ला-रू Dr. LaRue (Isla Fisher) यांच्या सांगण्यानुसार असं लक्षात येतं की हॉर्टनने हू-विल् शहरासाठी जर लवकरच एक सुरक्षित स्थान शोधलं नाही तर हू-विल नष्ट होईल. मग ते तत्परतेने हॉर्टनला तसं सांगतात. मग सुरु होतो हॉर्टनचा माऊंट नूल या डोंगरावर तो धुळीचा कण पोहोचवण्याचा आटापिटा. अर्थातच इतर कुणाचाही एका धुळीच्या कणात एक शहर वसलंय यावर विश्वास बसत नाही, त्यामुळे हॉर्टनला जंगलातल्या जवळ जवळ सगळ्या प्राण्यांकडून कुचेष्टा आणि मानहानीला सामोरं जावं लागतं. यात आघाडीवर असते ती एक खडूस कांगारू (Carol Burnett), आणि उपद्व्यापी माकडांची जोडी असलेले विकरशॅम बंधू (Frank Welker and Dan Castellaneta).

हू-विल शहरात (हॉर्टनच्या धांदरटपणामुळे) अनेक गूढ घटना घडू लागल्याने शेवटी महापौर महाशयांना आपल्या नागरिकांना खरं खरं सांगावं लागतं. पण जसा जंगलवासी प्राण्यांचा जसा हॉर्टनवर विश्वास बसत नाही तसाच हू-विलकरांचा आपल्याच महापौरांवर विश्वास बसत नाही. दरम्यान, कांगारूबाई धुळीचा कण असलेलं ते गुलाबी फूल हॉर्टनकडून पळवण्यासाठी व्लाड व्लाडिकॉफ (Will Arnett) नामक एका खलप्रवृत्त गिधाडाला सुपारी देते. याचे उच्चार रशियन दाखवले आहेत हा उल्लेखनीय भाग. पण त्याबद्दल पुढे. व्लाडने हॉर्टनकडून ते पळवण्याच्या भानगडीत ते फूल तशाच दिसणार्‍या फुलांच्या ताटव्यात पडल्यामुळे हू-विल शहरात प्रचंड भूकंप होतो. हॉर्टनला ते फूल सापडते आणि सुदैवाने तो भूकंप आणि एका पाईपमधून येणारा हॉर्टनचा आवाज यामुळे निदान हू-विल करांना आपण एका धुळीच्या कणावर राहत असल्याची खात्री पटते. ते हॉर्टनवर त्यांचा विश्वास असल्याचे त्याला सांगतात.

शेवटी कांगारू इतर जंगलवासीयांना एकत्र करून हॉर्टनला पकडून पिंजर्‍यात टाकू पाहते आणि त्या फुलाला बिझलनटच्या उकळत्या तेलात टाकायचा आदेश देते. आता शेवटचा पर्याय म्हणून महापौर मॅक्डॉड सर्व हू-विलवासीयांना "आम्ही इथे आहोत" असं ओरडायला फर्मावतात. या प्रयत्नांत जोजो सामील होतो आणि आणि एका भोंग्यातून तोही आरोळी ठोकतो. अगदी शेवटच्या क्षणी कांगारूने तिच्या पिशवीतून अनेक वर्ष बाहेर पडू न दिलेला मुलगा रूडी (Josh Flitter) याला त्या धुळीच्या कणातून हू-विलकरांचा आवाज ऐकू येतो. आईच्या विरोधाला न जुमानता तो पिशवीच्या बाहेर झेप घेऊन ते फूल वरच्यावर उचलतो. जंगलातल्या प्राण्यांनाही आपण काय करायला जात होतो ह्याची जाणीव होते आणि ते हॉर्टनला शाबासकी देतात. हॉर्टन कांगारूकडे मैत्रीचा हात पुढे करतो आणि ती तो स्वीकारते. अशा रीतीने शेवट गोड होऊन सगळे जंगलवासी आणि हू-विल् वासी गाणं म्हणत म्हणत माऊंट नूल कडे जाऊ लागतात. याच वेळी कॅमेरा झूम-आऊट होतो आणि आपल्याला सांगतो की फक्त हू-विल् नव्हे, तर नूलचे जंगल आणि आपली पृथ्वी तसेच आपली सूर्यमालिका हे या विश्वात एका धुळीच्या कणाप्रमाणेच अतीसूक्ष्म आहे.



आता हा सिनेमा मला का आवडला ते सांगतो. वरच्या शेवटच्या दृश्याने आपणच नव्हे तर आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमालिका या अफाट विश्वाच्या पसार्‍यात किती नगण्य आकाराची आहे याची जाणीव होते आणि "मी म्हणजे कोण" कसा गर्व करणे कसे फोल आहे हे समजतं. म्हणूनच मी सुरवातीला....खरं तर सुरवातीला म्हणजे मुद्द्याला हात घालण्याआधी बरंच पाल्हाळ लावल्यानंतर....जे म्हणालो होतो ना की यात थोडं अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान दिसतं म्हणून, ते हेच.

हॉर्टन आकाराने मोठा असला तरी तो आपल्या आकाराचा उपयोग 'सद् रक्षणाय' यासाठीच करतो. तो एक खरा मित्र आहे आणि कल्पक शिक्षकही. आपण जर ताकदवान असलो तर आपल्या ताकदीचा उपयोग दुर्बळांचे रक्षण करण्यासाठी केला पाहीजे, आणि आपलं वय कितीही असलं तरी आपल्या आत दडलेलं लहान मूल, आपला आतला आवाज, कल्पनाशक्ती, नव्या कल्पना यांच्यासाठी आपल्या मनाची कवाडे सदैव उघडी ठेवली पाहीजेत हे ही यातून ध्वनित होतं.
वर उल्लेख न झालेलं एक पात्र आहे चित्रपटात आणि ते म्हणजे हॉर्टनचा खास मित्र असलेला मॉर्टन (Seth Rogen) हा उंदीर. याच्या बोलण्याकडे हॉर्टन नेहमीच लक्ष देऊन ऐकतो. मुख्य म्हणजे हॉर्टन जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा तो त्याला झापतो. सल्लागार कसा असावा याचं मॉर्टन हे उत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला लक्षात येतं.

महापौर मॅक्डॉड यांचा मुलगा जोजो हा शहाण्णव मुलींच्या पाठीवर जन्माला आला आहे असं हू-विल् शहराच्या प्राथमिक ओळखीत आपल्याला समजतं. चित्रपट बघताना लहान मुलांना यातली मेख समजणार नाही, पण बहुतेक मोठ्यांना नक्की समजेल. सिनेमा ज्या देशात बनतो त्यातले संस्कृतिक-सामाजिक संदर्भ हे त्यात येतातच. त्यामुळे मॅक्डॉड यांच कुटुंब हे एका अ‍ॅनिमेशनपटातलं असलं तरी हे संदर्भ आपल्याला दुर्लक्षित करता येत नाहीत. आपल्या ओळखीत किंवा नात्यात एक-दोन तरी कुटुंब अशी असतात की ज्यात एकतरी मुलगा हवाच या अट्टाहासापायी दोन किंवा तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा असं बघायला मिळतं. आपल्याच देशात बुरसटलेले विचार असल्याचा आपला गैरसमज यातून दूर होतो. घरोघरी या ऐवजी देशोदेशी मातीच्याच चुली हेच खरं याची जाणीव हा भाग आपल्याला करुन देतो.

जोजोचं आपल्यावर लादण्यात आलेल्या 'भावी महापौर' या लेबलामुळे नाराज असणं आणि संशोधक व्हायची इच्छा बाळगणं हेही अत्यंत सूचक आहे. आपल्याकडे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, आणि दुकानदाराचा मुलगा दुकानदार, तसंच सिनेनटाचा मुलगा अभिनेताच व्हावा, किंवा मग राजकारण्याचा मुलगा राजकारणातच पडावा, पुढारीच व्हावा अशी आई-बापाची इच्छा असते. अर्थात, कधी कधी त्यांना दुसरा पर्यायही नसतो म्हणा, पण आपल्या मुलावर आपल्या आवडी लादू नयेत, त्याला ज्यात गती आहे ते करु द्यावं हा फार महत्त्वाचा संदेश हा चित्रपट अत्यंत तरलतेने देतो. ही गोष्ट एकदा आपल्या लक्षात आली, की मग सिनेमाभर जोजोचं दु:खी चेहरा घेऊन घुम्यासारखं वावरणं आपल्या काळजाला भिडून जातं. मॅक्डॉड आणि जोजो या बाप-लेकाचं नातंही ताणावपूर्ण असलं तरी जोजोचं आपल्या बापावर प्रेमही आहे, कारण गुप्तपणे उभारलेली आपली प्रयोगशाळा तो बापाला वाईट वाटेल म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बापापासून लपवूनच ठेवतो.

चित्रपटातील कांगारू ही सामान्यांना कस्पटासमान लेखणार्‍या राज्यकर्त्यांचे प्रतीकच म्हणायला हवी. जंगलातील जनता आपल्याऐवजी हॉर्टनचं ऐकू लागली तर तिच्या सत्तास्थानाला धोका पोहोचेल अशी तिला सतत भीती असते. याच भयापोटी ती विकरशॅम बंधू या माकडांच्या जोडीला आणि व्लाड व्लाडिकॉफ या गिधाडाला हॉर्टनवर सोडते. कांगारू आणखी काही गोष्टीचं प्रतीक आहे. ते म्हणजे अतीसंरक्षित आयुष्य देऊन आपल्या मुलांतील कल्पनाशक्ती मारणारे, आपल्या गृहतिकांना धक्का देणार्‍या बाहेरच्या गोष्टींची सतत भीती बाळगून असणारे पालक यांच. म्हणूनच ती रूडीला - आपल्या मुलाला - योग्य वेळ निघून गेल्यावरही आपल्या (पाऊच) पिशवीमध्येच ठेवते.

व्लाड व्लाडिकॉफ हे गिधाड चित्रपटातला एक खलप्रवृत्त पात्र आहे आणि त्याला रशियन उच्चारात बोलताना दाखवलं आहे. इथे थोडे राजकीय संदर्भ आहेत. अमेरिकेचं ज्या ज्या देशांशी प्रत्यक्ष युद्ध किंवा शीतयुद्ध झालं आहे त्या त्या देशांचे नागरिक दाखवलेले लोक अनेक वेळा अमेरिकन आणि ब्रिटिश सिनेमातून खलनायक म्हणून आपल्या समोर येतात. मग ते डाय हार्ड भाग २ आणि ३ मधले जर्मन अतिरेकी असोत किंवा इतर अनेक चित्रपटातले रशियन माथेफिरू.

विशेष गोष्ट अशी की हा चित्रपट हे सगळं सांगतो ते कसलाही आव न आणता, सहज कथेच्या ओघात.

तात्पर्य, कार्टूनपटांची संभावना 'मुलांचे मनोरंजन' म्हणून करणार्‍यांना हा आणि कदाचित असे अनेक चित्रपट हे झणझणीत अंजन ठरावेत. चला, मी आता थांबतोच. वाचून दमले असाल तर आणि हा चित्रपट बघणार असाल तर पुढच्या वेळेपर्यंत टाटा :)



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

मोगरा फुलला दिवाळी अंक येथे पूर्वप्रकाशित.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

संदर्भ:

(१) स्टार मुव्हीज, एच.बी.ओ. वरील चित्रपट बघणे.
(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया. (कंसातली नावे पात्रांना ज्यांचा आवाज वापरण्यात आला त्यांची आहेत.)

(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

3 comments:

  1. शेवटी कांगारू इतर जंगलवासीयांना एकत्र करून हॉर्टनला पकडून पिंजर्‍यात टाकू पाहते आणि त्या फुलाला बिझलनटच्या उकळत्या तेलात टाकायचा आदेश देते. आता शेवटचा पर्याय म्हणून महापौर मॅक्डॉड सर्व हू-विलवासीयांना "आम्ही इथे आहोत" असं ओरडायला फर्मावतात. या प्रयत्नांत जोजो सामील होतो आणि आणि एका भोंग्यातून तोही आरोळी ठोकतो. अगदी शेवटच्या क्षणी कांगारूने तिच्या पिशवीतून अनेक वर्ष बाहेर पडू न दिलेला मुलगा रूडी (Josh Flitter) याला त्या धुळीच्या कणातून हू-विलकरांचा आवाज ऐकू येतो. आईच्या विरोधाला न जुमानता तो पिशवीच्या बाहेर झेप घेऊन ते फूल वरच्यावर उचलतो. जंगलातल्या प्राण्यांनाही आपण काय करायला जात होतो ह्याची जाणीव होते आणि ते हॉर्टनला शाबासकी देतात. हॉर्टन कांगारूकडे मैत्रीचा हात पुढे करतो आणि ती तो स्वीकारते. अशा रीतीने शेवट गोड होऊन सगळे जंगलवासी आणि हू-विल् वासी गाणं म्हणत म्हणत माऊंट नूल कडे जाऊ लागतात. याच वेळी कॅमेरा झूम-आऊट होतो आणि आपल्याला सांगतो की फक्त हू-विल् नव्हे, तर नूलचे जंगल आणि आपली पृथ्वी तसेच आपली सूर्यमालिका हे या विश्वात एका धुळीच्या कणाप्रमाणेच अतीसूक्ष्म आहे. ya vishayavr lihane tar kahare far kathin kam aahe. pan tu kharach kiti barkai bhaghto picture he varil likhanavarun samajle. khup chaan

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय समीक्षण... आवडलं आपल्याला.

    ReplyDelete
  3. excellent!
    माझाही आवडता चित्रपट.

    ReplyDelete