Saturday, February 15, 2025

मर्यादा/लिमिट - भाग २

एखाद्या गोष्टींचं अती जेव्हा होतं तेव्हा ते सुरूच होऊ नये यासाठी काय केलं जातं किंवा जात नाही ते महत्वाचं ठरतं. 

कुणीतरी तथाकथित विनोदवीर काही अश्लील विधान करतो तेव्हा तो जितका दोषी असतो त्यापेक्षा अधिक दोषी तो समाज किंवा ती व्यवस्था असते जी अशा प्रकारांना सुरवातीलाच मुळापासून उपटून फेकत नाही. एका बोधकथेतील आईचे कान चावणारा खूनी मुलगा तसं करण्याचं कारण हेच देतो की आई तू मला पहिला गुन्हा केलास तेव्हाच कानफटात का ठेऊन दिली नाहीस? एखादा मुलगा जेव्हा शिवराळ होतो तेव्हा त्यामागे त्याच्या पहिल्या भेंचोदला बापाने किंवा आईने त्याच्या न ठेऊन दिलेली थोतरीत असते. 

म्हणूनच आपण लिहिलेले चार शब्द जेव्हा चारशे किंवा चार हजार लोक वाचतात आणि ते विचार स्वीकारतात, आपल्याला इथला सेलिब्रिटी ताई किंवा दादा मानतात, आणि आपल्याला या किंवा इतर काही कारणांनी मान देतात, मग आपली लायकी असो किंवा नसो, काहीही लिहिण्या किंवा बोलण्याआधी किमान हजारदा विचार करून मगच लिहावं हे योग्य. 

(अर्थात, तसं लिहिण्याबोलण्यामागे तुमचा वेगळा अजेंडा असेल तर गोष्ट वेगळी. म्हणजेच, आपण समतावादी, समरसतावादी हिंदुत्ववादी असल्याचा मुखवटा पांघरून काही उजव्या/हिंदुत्ववादी गटात घुसून हळूहळू आपले विषारी विचार पसरवण्याची आणि या योगे समाज नासवण्याची तुमची मनीषा असल्यास वरच्या प्रवचनाला काहीही अर्थ नाही.)

करून करून भागल्यावर, तारुण्य ओसरू लागल्यावर मागणी कमी झाल्याचं लक्षात येताच देव देव करणाऱ्या एखाद्या चामडीविकू बॉलिवूड कलाकार किंवा अर्धवेश्या पॉर्नस्टारची तुलना चिखलात कमळ उगवावं तसं आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या एखाद्या थोर संताशी केली जाते, तेव्हा भावविभोर होऊन माना डोलावण्यापेक्षा तिथल्यातिथे तसे विचार मांडणाऱ्या व्यक्तीला रोखणे गरजेचे ठरते. असो, तर, जेव्हा एखाद्या चामडीविकू बॉलिवूड कलाकार किंवा अर्धवेश्या पॉर्नस्टारची तुलना एखाद्या थोर संताशी केली जाते, तेव्हा भावविभोर होऊन माना डोलावण्यापेक्षा तिथल्यातिथे तसे विचार मांडणाऱ्या व्यक्तीला रोखणे गरजेचे ठरते. पण गंमत अशी आहे की सॉफ्ट टार्गेट असलेल्या अशा विनोदवीरांना हाणायला आपले शूरवीर पुढे असतात, पण आपल्या आवडत्या सोशल मिडिया सेलिब्रिटींना बोलायला अनेकांची जीभ कचरते. 

समाजमनाला प्रभावित करू शकणाऱ्या लोकांनाही नीट पारखून घ्यायचं सोडून, आणि सातत्याने पारख करत राहण्याचं सोडून, नको त्या लोकांना त्यांनी वाट्टेल ते विचार ओकल्यावरही "ते म्हणतायत म्हणजे बरोबरच असेल" असे अडाणी विचार करून डोक्यावर चढवून संस्कृती नासवण्याचं पाप ज्यांच्या माथी आहे, त्यांनीच मराठी काय किंवा हिंदी काय किंवा कुठल्याही भाषेतल्या विनोदवीरांनी मर्यादा ओलांडल्यावर झालेल्या क्लेशाचं अपश्रेय घ्यावं.

माणूस सुधारू शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, अशा अर्थाचीही विधाने बघितली. याला भोळसटपणा म्हणायचं की बावळटपणा याचा निर्णय होत नाहीये. बरं तसं झालेलं आहे, पण ते दिवस आता राहिलेत का? मुळात तसं व्हायला आधी पाटी कोरी असावी लागते, घरच्यांनी सांगावं लागतं की हे चूक आहे करु नको. त्याच ठिकाणी अंधार असेल तर?

नुकताच सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ बघितला. इथे क्रिकेट हा विषय आवडीचा नसला तरी तो त्यात काय म्हणतो ते वाचा. सचिन म्हणाला की एका सामन्यात तो आणि व्हि व्हि एस लक्ष्मण फलंदाजी करत असताना धाव घेताना झालेल्या गैरसमजामुळे, किंबहुना लक्ष्मणच्या चुकीमुळे सचिन धावचित झाला. सहकार्‍यांकडून सर्वोच्च खेळाची अपेक्षा ठेवणार्‍या सचिनला त्यावेळी लक्ष्मणच्या कृतीबद्द्लची आपली नाराजी लपवता आली नाही. नंतर घरी आल्यावर त्याच्या भावाने म्हणजे अजितने त्याला समोर बसवून सांगितलं, की "अरे बाबा ही काय प्रतिक्रिया होती? तू बाद झालेलाच होतास, पण लक्ष्मण अजूनही फलंदाजी करायची होती तेव्हा तू त्याला अपसेट करुन गेलास." नंतर सचिनने लक्ष्मणशी बोलून दिलगिरी व्यक्त केली. 

वाल्याच्या घरच्यांनी त्याच्या पापांत सहभागी व्हायला नकार दिला, तेव्हा त्याला शहाणपण आलं आणि त्याचा वाल्मिकी झाला. असे कुटुंबीय, असे अजितदादा तेंडुलकर, आता उरलेत का? मग उगाच मॉरल हाय ग्राऊंड घेऊन हा सुधारेल ती सुधारेल अशी प्रवचने देण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपली मुलं असं काही करत नाहीत ना याकडे लक्ष द्या. मुलं अनुकरणप्रिय असतात असं म्हणतात, त्यामुळे "If a thousand people do a foolish thing, it's still a foolish thing." यातल्या थाऊझंडपेक्षा आपले आईवडील वेगळे आहेत हे मुलांना आपल्या वागण्याबोलण्यातून जाणवू द्या. अशा गोष्टी बघण्यात आल्या तर त्याला अनवधानाने का होईना आपण हसून आणि टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत नाही ना हे पहा. कारण एखादा सेलिब्रिटी जेव्हा शिव्या खातो तेव्हा त्यापेक्षा अधिक दोषी तो समाज किंवा ती व्यवस्था असते जी अशा प्रकारांना सुरवातीलाच मुळापासून उपटून फेकत नाही.

(इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाईल्ड अशी एक आफ्रिकन म्हण आहे. त्या अनुषंगाने "कुटुंबीय" या शब्दाकडे पहावे.)

मर्यादा/लिमिट - भाग १

© मंदार दिलीप जोशी





Monday, May 20, 2024

एक खविता

Ironyच्या देवा तुला चेक चेक वाहू दे
लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं मजबूरीचं, प्रिंट होईना त्या पासबुकचं
जीणं होऊ अकाउंटचं, साहेब मातुर माझ्या देवा जागेवरी

असू दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे
म्याडमच्या हातातली स्लिप व्हावी वर खाली

एफडी आरडी जाईल आली किरपा तुझी टोकनच्या पुकार्‍यासंगं
गाऊ दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे 

काम थोडं, चेंगट भारी, ब्रांच ही भली बुरी
स्टँप बसेल अर्जावरी, काउंटर काउंटर पळायाला, अंगी बळ
येऊ दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे

- मंदार दिलीप जोशी (एक खातेदार)

तळटीपा:

(१) स्टेट बँक ऑफ इंडीया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना समर्पित.
(२) *खविता = (खातेदाराची कविता, किंवा खवट कविता असंही म्हणू शकता, गिव्हन द फॅक्ट द्याट इट इज रिटन बाय पुणेकर)
(३) काऊंटर नंबर १३ आणि ६ यात माझं बॅडमिंटनचं शटलकॉक झालं होतं तेव्हा स्फुरलेलं विडंबन.




Friday, May 3, 2024

नॉस्टेल्जिया: खुंटी, पगडी, भाषा, आणि संस्कृती

हल्ली जुन्या पद्धतीची घरे आणि अशा खुंट्या दुर्मीळच झाल्या आहेत. विशेषतः आमच्या भागात निसर्ग वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाल्यावर अनेकांनी नवीन पद्धतीने घरे बांधून घेतली आहेत. 

केळशीला एका जुन्या दुरुस्त केलेल्या घरात मात्र खुंटीवर टांगलेली ही पगडी पाहून मागे एकदा इथेच एक गोष्ट वाचली होती त्यात "खुंटीवर पगडी दिसत नाही" म्हणजे व्यक्ती घरी नसणे हा अर्थ अभिप्रेत असतो असं दिलेलं होतं ते आठवलं. 

ती पूर्ण गोष्ट अशी: एकदा एक इंग्रज लोकमान्य टिळकांना म्हणाला," मला उत्तम मराठी येते तर मला मराठी माणूस का म्हणत नाही?" टिळक म्हणाले,"वेळ आली की सांगेन." एकदा टिळकांनी त्या इंग्रजाला आगरकरांच्या घरी जाऊन बोलावून आणण्यास सांगीतले. तो घरी गेला तेव्हा आगरकरांची पत्नी म्हणाली, "खुंटीवर पगडी दिसत नाही." तो म्हणाला,"पगडी नको, आगरकर घरी आहेत का?" त्या म्हणाल्या, "दरवाजात चपला दिसत नाहीत." परत त्याने विचारले, "मॅडम, आगरकरांचा भेटायचे आहे" त्या जरा चिडून म्हणाल्या, "कोपर्‍यात काठीही नाही." काठी ऐकल्यावर तो इंग्रज सुसाट धावत टिळकांकडे येऊन म्हणाला," आगरकरांची बायको वेडी आहे का?" आणि त्याने काय घडले ते सांगीतले. टिळक हसत म्हणाले," म्हणून तुला मराठी माणूस म्हणता येणार नाही. मराठी स्वच्छ समजण्यासाठी मराठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो."

© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ १०, शके १९४६

Sunday, March 17, 2024

खर्रा इतिहास: हकीकत-ए-शिरा

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

त्यामुळे एक बातमी ऐकल्यावर बिरबल वैतागला. बातमी अशी होती की जिल्लेइलाहीहीही बादशहा जलालूद्दीन म. अकबर सरांच्या सतराव्या पत्नी बेगम साहिबा बेगम शोधाबाई जलालूद्दीन अकबर यांना दिवस गेले. म्हणजे त्या गरोदर राहिल्या. म्हणजे त्यांना मूल होणार असे समजले. हल्ली सगळं सांगावं लागतं. 'अम्मी कुठे कडमडते' या मालिकेतल्या अम्मीचा दुसरा शोहर मेला आणि मालिकेची वेळ बदलली यामुळे त्या अंमळ मूड-ए-नासाज होत्या. त्यामुळे ही बातमी शाही हकीम यांनी त्यांना दिल्याने त्यांना बहुत खुशी झाली. म्हणून बिरबल मात्र एक्सेल शीट पुन्हा अपडेट करावी लागणार म्हणून वैतागला. तर ते असो.

बिरबलावर वैतागण्याचे आणखी प्रसंग येणार होते. जसा काळ सरकू लागला तसं शोधाबाई साहेबांना डोहाळे लागायला सुरवात झाली. एक दिवस त्यांनी जि. ज.म.अकबर सरांकडे सांस्कृतिक खात्याचे मंत्री बिरबल यांना बोलावणं पाठवा असा हट्ट केला. 

बिरबल येताच शोधाबाई साहिबांनी त्याच्याकडे प्रश्न केला की तुमच्याकडे तो गोड पदार्थ करतात तो कोणता? उस दिन पूजा के बाद तुम लाय थे?!" बिरबलाच्या बायकोलाही त्याच सुमारास दिवस गेले होते त्यामुळे डोहाळेही तसेच लागल्याचे ऐकून तो हबकला.  

"मेरी माँ करती है, और उसकू संयावक कहते हैं बेगम साहिबा और वो करने में बहुत कष्ट होते हैं. खाने में भी जड होता हय, आपको झेपेगा नहीं."

"ऐसा कैसा झेपेगा नहीं, ये अकबर सर की होनेवाली औलाद हय उसकू सब झेपेगा, माझ्यात पण लढवैय्या रक्त है, मेरेकू शिरा चाहीये म्हणजे चाहीयेच. साक्षात बेगम साहिबांचा हुकूम आहे." बेगम शोधाबाई कडाडल्या.

बिरबलाने जिल्लेईलाही अकबर सरांकडे एक कटाक्ष टाकला. ते आपला कशाशी संबंध नसल्यागत किताब-ए-चेहरावर सर्फिंग करण्यात मशगुल होते. त्यांना बिरबलाने किताब-ए-संदेश वर मेसेज पाठवल्यावर त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी उत्तरादाखल शांतपणे एका वाळवंटी ग्रुपची लिंक बिरबलाला पाठवली. आपल्या आईची संयावंक रेसिपी  या वाळवंटी लोकांनी चोरल्याचं आणि नावही बदलल्याचं पाहून त्याला अंमळ मौज वाटली. पण बेगम साहिबांचा हट्ट आहे तो पुरवावाच लागणार हे त्याला उमगलं.

शेवटी बिरबलाने आपल्या आईला बेगम साहिबांची मागणी सांगितली. आईला बरंच वाटलं, ती म्हणाली "अरे पंडित तुम चिंता मत करो. किताब-ए-चेहरावर एक ग्रुप आहे थुईथुई स्वयंपाकघर तिथे साथ आली आहे संयावक खायची, तिथे कुणाला पोस्ट टाकायची उबळ आली की माझ्याकडेच ऑर्डर येते". बिरबलाची चिंताच मिटल्याने तो आनंदित झाला. 

त्याच्या आईने पटकन यंत्र-ए-भागमभाग अर्थात मोबाईल हातात घेतला आणि ग्रुपवर "बाजारात रवा संपला आहे, ब्लॅक मार्केटमधून घ्यावा लागेल. तेव्हा, ऑर्डर देताना वाढीव दरांची नोंद घ्यावी." अशी पोस्ट टाकली. लगोलग ग्रुप अडमीन मोहतरमा यांनी "थीम बंद करत आहोत" म्हणून पोस्ट टाकली. तर ते असो.

बिरबलाच्या आईने चांगला वीस-पंचवीस किलो संयावक करून बिरबलाच्या हस्ते बेगम साहिबा शोधाबाईंकडे पाठवला. इतका संयावक पाहून बेगम साहिबा आश्चर्यचकित झाल्या. त्या बिरबलाला म्हणाल्या, "बिरबल आम्ही तुमच्यावर और तुमच्या वालिदा साहिबा यांच्यावर बहुत खुश आहोत. त्यामुळे आम्ही या पदार्थाला त्यांचं नाव देणार."

"वो यंव त्यंव नाम हमकू मालूम नहीं. तुम्हारी 'माँ' ने हा पदार्थ 'खंडी'भर पाठवून आमच्या मनात 'शिर'ल्या, त्यामुळे आजपासून या पदार्थाचे नाव शिरा, मा-खंडी-शिरा."

तेव्हापासून याला माखंडी शिरा म्हणतात. पुढे उरलेल्या शिऱ्यात बेगम साहिबांच्या कारट्याने शू केल्याने त्या भागाला मुतांजन असेही म्हणू लागले. पण हा इतिहास तुम्हाला ट्रोलिस्थान सरकारचे हस्तक आणि विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
सहाय्यक विषवमन ओकरी आणि टिमटिम बकरीपांडे
पान ७८६, ओळ ८

#खाखा_ए_हावरटी #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी



Thursday, February 1, 2024

सेलिब्रिटी

रात्रीचे बारा वाजले होते.

केस विस्कटलेले, कपडे अस्ताव्यस्त झालेले, तरीही एक प्रकारचा आनंद चेहर्‍यावर घेऊन अत्यंत उत्तेजित झालेला मित्या कुल्डारोव्ह आपल्या आईवडीलांच्या फ्लॅटमधे घुसला आणि सगळ्या खोल्यांत तरंगत फिरला. त्याचे आईबाबा झोपायच्या तयारीत होते. थोरली बहीण एका कादंबरीचं शेवटचं पान वाचत होती. आणि त्याचे शाळकरी भाऊ गाढ झोपी गेले होते.

"अरे हा काय अवतार करुन घेतला आहेस, आणि कुठून येतो आहेस? काय चालवलं आहेस हे!" आईबाबा उद्गारले.

"नका विचारू, अजिबात नका विचारू. माझाही विश्वास नसता बसला प्रत्यक्ष अनुभव घेतला नसता तर. खूपच अविश्वसनीय गोष्ट घडली आहे आईबाबा!" असं म्हणून कसलासा अत्यानंद झालेल्या मित्याला धड उभंही राहता येईना, आणि त्याच अवस्थेत त्याने  खिदळत आरामखुर्चीत आपला देह टाकला. 

"अशक्य प्रकार घडलाय, तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही असा. बघा!"

अंगाभोवती शाल लपेटून त्याची बहीण खाटेवरुन उठून मित्याचं म्हणणं ऐकायला आत गेली. त्याचे भाऊही जागे झाले. 

"काय झालं रे, असा काय दिसतोयस?" त्याच्या आईने काळजीने विचारलं.

"आई, आई तुला काय सांगू मला किती आनंद झालाय. आई, तुला माहित्ये का, आता आख्ख्या रशियाला माझं नाव ठावूक झालं आहे. आख्ख्या रशियाला! डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून अस्तित्वात आहे हे आजवर फक्त तुम्हाला माहित होतं, आता पूर्ण रशिया मला ओळखतो आई, पूर्ण रशिया! परमेश्वरा!!!"

मित्या म्हणजे डिमित्री इतका उत्तेजित झाला होता की तो खुर्चीतून टुणकन् उडी मारून उठला आणि पुन्हा सगळ्या खोल्यांत तरंगत फिरून आला. 

"अरे पण आम्हाला धड सांगशील का नेमकं काय झालंय?"

"तुम्ही सगळे शहामृगासारखे राहता, पेपर वाचत नाही, काय छापून आलंय याचा गंध नसतो. किती रोचक गोष्टी असतात वर्तमानपत्रांत! पेपरांत छापून आलं की लगेच सगळ्यांना सगळं समजतं, काहीच लपून राहत नाही. मला किती आनंद झालाय तुम्हाला सांगू! तुम्हाला माहित्ये का, पेपरात फक्त सेलिब्रिटी लोकांची नावं छापून येतात. आणि आता त्यांनी चक्क माझं नाव छापलंय!!!"

"काय सांगतोस काय, कुठे?"

मित्याच्या वडिलांचा चेहरा फिका पडला. आईने भिंतीवरच्या क्रूसाकडे एकदा नजर टाकली आणि पटकन आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. त्याचे शाळकरी बंधू अंथरूणातून उठून लगेच त्यांच्या दादाकडे म्हणजे मित्याकडे गेले. 

"होय, होय. माझं नाव वर्तमानपत्रात छापून आलेलं आहे. आता आख्ख्या रशियाला माझं नाव कळलेलं आहे. आई, ही प्रत जपून ठेवा त्या पेपरची, या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण म्हणून आपण अधुनमधून ते वाचत जाऊया. थांब, मी दाखवतो."

असं म्हणून मित्याने खिशातून त्या दिवशीचं वर्तमानपत्र काढून दाखवलं. बाबा, हे बघा, असं म्हणून त्याने निळ्या पेन्सिलीने खूण केलेल्या एका परिच्छेदाकडे लक्ष वेधून घेतलं.

"वाचा!"

मित्याच्या बाबांनी खिशातून आपला चष्मा काढून डोळ्यांवर चढवला. 

"मोठ्याने वाचा बाबा" मित्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. आईने पुन्हा एकदा भिंतीवरच्या क्रूसाकडे नजर टाकली आणि आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. बाबांनी घसा खाकरला आणि पेपर वाचायला सुरवात केली. 

"२९ डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून..."

"बघितलंत?! पुढे वाचा बाबा..."

"...डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून, लिटिल ब्रोनायाह भागातील कोझिहिन इमारतीत असलेल्या बिअरच्या दुकानातून आपल्या मित्राबरोबर मद्यधुंद अवस्थेत परतत असताना..."

"मी आणि सायमन पेट्रोविच येत होतो बाबा, बरोब्बर वर्णन केलंय... वाचा बाबा पुढे वाचा..."

"...मद्यधुंद अवस्थेत परतत असताना घसरुन एका घोडागाडी खाली पडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे घोड्याने घाबरून कुल्डारोव्हच्या अंगावरुन उडी मारली आणि अर्थातच मागून गाडीही नेली. गाडी थोडी पुढे गेल्यावर काही कामगार गाडीला थांबवण्यात यशस्वी झाले. सदरहू घोडागाडीचा मालक युहनोवस्की जिल्ह्यातील डुरिकिनो गावचा रहिवासी असलेला इव्हान डेट्रोव्ह नामक व्यक्ती असल्याचे समजते, तसेच गाडीत स्तेफान लुकोव्ह नामक एक मॉस्को शहरातील दुय्यम व्यापारी असल्याचेही समजते. अपघात घडल्यावर सुरवातीला बेशुद्धावस्थेत असलेल्या कुल्डारोव्हला पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तिथे त्याला एका डोक्टरांनी तपासले. त्याच्या डोक्यावर बसलेला मार..."

"गाडीच्या खालचा दांडा लागला बाबा, वाचा वाचा पुढे वाचा..."

"...त्याच्या डोक्यावर बसलेला मार फार गंभीर नसल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची पोलीस ठाण्यात योग्य पद्धतीने नोंद करण्यात आली आणि जखमी व्यक्तीवर योग्य औषधोपचार करण्यात आले... "

"थंड पाण्याने शेक घ्यायला सांगितलं मला त्यांनी." "आता पूर्ण रशिया ओळखतो मला. झालं ना वाचून सगळं? द्या तो पेपर इकडे." असं म्हणून मित्याने पेपर खेचून घेतला आणि घडी करुन खिशात ठेवला. 

"आता मला ही गोष्ट माकारोव्ह कुटुंबियांना सांगितली पाहीजे. मग इवानित्स्की मंडळींना सुद्धा. आणि नातास्या इवानोव्हना, आणि अ‍ॅनिसिम वॅसिलिच... किती जणं बाकी आहेत अजून. चला, मी पळतो.

मित्या आपली टोपी आणि मफलर चढवला आणि आनंदाने नाचत विजयी मुद्रेने घराबाहेर पडला.

(रशियन लेखक अ‍ॅन्टोन चेकोव्ह यांच्या "जॉय" या कथेचं मराठी रुपांतर)

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ ६, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

Saturday, January 27, 2024

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्

मुंबईतील एक वृद्ध निवृत्त गृहस्थ. वय ७५च्या आसपास. अगदी सश्रद्ध, अतिशय साधे, सरळ आणि पापभिरू व्यक्ती. राम मंदिराचं उद्घाटन होणार ही बातमी कळल्यावर जबरदस्त आनंदी झाले होते. २२ जानेवारी कधी एकदा उजाडते याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघत असत.

त्यांना साधारण गणपतीच्या थोडं आधीपासून तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. पण पावसाळ्यात अनेकांची पोटं बिघडतात, तसलं काही असेल म्हणून त्यावरचे उपचार घेत राहिले. त्या औषधांनी तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. गणपतीत आठ दिवस कोकणात गावीही जाऊन आले. तेव्हाही त्यांना भूक जास्त लागत नव्हती. गणपती झाल्यावर परत मुंबईत आले तेव्हा एकदा छाती आणि पोटाच्या मधे बोट दाबल्यावर हाताला गोळ्यासारखं काहीतरी लागलं. तेव्हा मुलाने तपासणीसाठी ऑक्टोबर २०२३ च्या सुरवातीला मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना दुर्दैवाने कॅन्सरचं निदान झालं. मोठ्या आतड्याचा कर्करोग, तिसरी स्टेज. 

मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात एका कर्करोगतज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्या वेळी कर्करोगाचं निदान झालं त्याच वेळी लक्षात आलं की तो पोटात सगळीकडे पसरलेला आहे. शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. या डॉक्टरांनी कुटुंबियांना सुरवातीलाच सांगितलं होतं की रोग फार पुढे गेलेला आहे, वाचण्याची किंवा फार काळ जगण्याची काहीही आशा नाही. जेमतेम महिनाभर काढतील. 

त्यांच्यावर उपचार सुरु असताना तब्येतीत सुधारणा काहीही नव्हती, पण तब्येत बिघडतही नव्हती. पण श्रद्धेत ताकद बघा, जो मनुष्य जेमतेम महिना काढेल असं डॉक्टर म्हणालेले असताना फक्त श्रद्धेच्या जोरावर त्या व्यक्तीने २२ जानेवारीचा दिवस बघितला. २२ तारखेला दिवसभर राममंदिर सोहोळा टीव्हीवर लाईव्ह बघत होते. डोळे भरून तो अप्रतीम सोहळा बघितल्यावर रात्री घरात गव्हल्याची खीर करायला सांगितली, बाकी काहीही जेवले नाहीत. फक्त देवाला नैवेद्य दाखवला त्या पानातील खिरीची वाटी होती तेव्हढी खीर फक्त खाल्ली.

दुसऱ्या दिवशी २३ तारखेला सकाळी उठल्यावर मुलाला सांगितलं की पोटात थोडं दुखतंय. म्हणून मग त्याने डॉक्टरांना कॉल करून नऊच्या सुमारास त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी काही इंजेक्शन वगैरे दिली आणि थोड्या वेळाने त्यांचं दुखणं थांबलं. त्यानंतर ते झोपले. दुपारी बाराच्या सुमारास झोपेतच त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला आणि रामरायाच्या भेटीला निघून गेले.

कोहीनूर मिलमध्ये कामाला होते, आर्थिक स्थिती पूर्वी जेमतेम होती. पण मुलं कर्तबगार निघाली. त्यांना पेन्शन वगैरे काही नव्हतं, तरी पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मंदिरासाठी निधी गोळा करणे चालू होते तेव्हा स्वतःच्या सेव्हिंगमधून दहा का पंधरा हजार रुपये दिले होते. अर्थात त्यांच्या मुलाने पण दिलेच होते. पण ह्यांनी स्वतःकडून काहीतरी द्यावं म्हणून राम मंदिरासाठी दिले. फक्त राममंदिर सोहोळा बघायचा म्हणून जवळपास डॉक्टरांनी भाकीत केलेला १ महिना अधिक वरचे अडीच महिने स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्यांनी तग धरला. राम मंदीर उदघाटन होणार ह्याच बळावर ते तगून राहिले. इतकी पराकोटीची श्रद्धा बाळगणे आपल्याला जमेल तो दिवस सोन्याचा. 

इच्छाशक्तीत खूप बळ असतं. किंबहुना श्रद्धेतून इच्छाशक्ती निर्माण होत असावी. जगण्याचं प्रयोजन आपल्याला श्रद्धा देते, आणि ते प्रयोजन साध्य करायला इच्छाशक्तीची मदत होते. म्हणूनच हे डावे आणि लिबरांडू जेव्हा लोकांच्या श्रद्धेची टिंगल करतात तेव्हा फार डोक्यात जातात.

मध्यंतरी एक लेख वाचला, त्यात (पाश्चात्य) सश्रद्ध लोक नास्तिकांंपेक्षा सरासरी ४ वर्ष अधिक जगतात असा निष्कर्ष काढलेला होता. भारतीय परिप्रेक्ष्यात असा काही सर्वे झाला असल्यास माहित नाही, पण अशी उदाहरणे बघितली, की आपल्याकडे ४ पेक्षा कितीतरी अधिक वर्ष आकडा निघेल यात शंका नाही. तसंही सद्ध्या सुरु असलेले एकेक प्रकार बघितले, तर हा देश फक्त सश्रद्ध लोकांच्या परमेश्वरावरच्या श्रद्धेमुळे चालला आहे याची खात्री पटते. पण ते असो. 

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. २, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

टीपः एका मित्राने त्याच्या एका नातेवाईक व्यक्तीबद्दल सांगितलेली सत्यकथा. नामोल्लेख न करता सादर.