Tuesday, October 2, 2012

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.


एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.



प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

Thursday, September 13, 2012

आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता जपण्याबाबतचे काही उपाय व माहिती

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे.

(१) शक्य असल्यास घरामधे कुत्रा अवश्य पाळावा. खूप फायदा होतो. कुत्रा नुस्ता वासानी देखील भुंकायला लागतो.

(२) शक्यतोवर बाहेरील दरवाज्यांचे कुलुप digitized असावे. म्हणजे फक्त आपल्यालाच नंबर माहिती असतो. चोराला देखील अशी कुलुपे उघडण्यात लवकर यश येत नाही.
(२) 
(अ)  Digitized कुलपे परवडतातच असे नाही. त्यामुळे गोदरेजचे नवीन computerized पद्धतीने बनवलेले कुलूप आणि चावी (म्हणजे  दुसरी कुठलीही चावी लागत नाही त्याला) असे घ्यावे. (ब)  घराला/ फ्लॅटला ' युरोपा'ची कुलुपे व लॅच अत्यन्त सुरक्षित. या कुलपांचा जो स्टील बार आहे तो अलॉयचा असल्याने कापता येत नाही. (हा कापला गेल्यास युरोपा ५०००० रु. ची भरपाई देइल असा प्रवाद आहे शहानिशा नाही) पण कुलुप खुप मजबूत पण स्लीक आहे ४०० रु. पर्यन्त मिळते (मी युरोपाचा एजन्ट नाही. एक संतुष्ट ग्राहक आहे).

(३) शक्यतो एक जास्तीचे आणि लोखंडाचे दार (ग्रील) असावे घराला, म्हणजे नविन माणसाला दरवाजा उघडल्या उघडल्या घरात प्रवेश मिळणार नाही.

(४) दरवाज्यात येणार्‍यांना अवास्तव माहिती देऊ नये. गरजेपुरते बोलून कटवून टाकावे.

(५) घरी एकटे असताना शक्यतो शेजार्‍यांना मोठ्याने आपण एकटे असल्याचे सांगू नये. कोणजाणे कोणी नजर ठेवुन असेल तर?

(६) कामवाली, माळी, वाहनचालक यांना कामावर ठेवण्यापुर्वी त्यांची पुर्ण माहिती घेऊन त्याची नोंद आपल्याकडे करून ठेवावी, त्या माहितीची शहानिशा सुद्धा करून घ्यावी. वेळात वेळ काढुन एखाद्या दिवशी ती व्यक्ती नक्की तिथेच राहते ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय त्यांच्या योग्यतेची खात्री पटेपर्यंत त्यांच्यावर घराची जबाबदारी सोपवू नये.

(७) शक्यतो ओळखीतून आलेल्या बायकांनाच कामावर ठेवावे. अचानक काम द्या म्हणून समोर येणार्‍या व्यक्तीला काम देऊ नये.

(८) ड्रायव्हर, माळी, झाडुवाला अशा पुरूष कामगारांशी स्त्रियांनी कामापुरते बोलावे; जास्ती बोलणे आणि माहितीची देवाण-घेवाण हानिकारक ठरू शकेल.

(९) केबलवाला, पेपरवाला बिल मागायला आला की फक्त दरवाजा उघडून ग्रिलमधूनच पैसे आणि रिसिट घेणे.

(१०) कुरीयरवाले, पत्ता विचारायला येणारे, सेल्समन ई. पासुन पण सावध रहावे... शकयतो जाळीचा / लोखंडी दरवाजा उघडु नये.

(११) लहान मुलांना शिकवून ठेवावे: अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये.

(१२) ४-५ दिवसांसाठी गावाला जात असल्यास फार गाजावाजा करु नये. अशा बातम्या लवकर पसरतात. अगदी जवळच्या शेजार्‍याला सांगून ठेवावे. शक्यतो पेपरवाल्याला सांगून ठेवावे. बाहेर पेपर पडलेले पाहून संशय येतो.

(१३) (खास करुन घरातील कर्ता पुरुष माणुस असाल तर) आपले बाहेर जायचे-यायचे वेळापत्रक अगदी दुसर्‍याने घड्याळ लावुन घ्यावे इतके अचूक ठेवू नये, अधे मधे दान्डी मारुन अचानक घरी परतणे, वा थोडे उशिराच जाणे हे केव्हाही चांगले!

(१४) दिवाळीत जास्तीचे अ‍ॅटमबॉम्ब्/बाण/भुईनळे आणून ठेवावेत, पुढील वर्षी ते वाजवुन पुन्हा नविन स्टॉक भरुन ठेवावा! काड्यापेटी/धूम्रकांडी प्रज्वलक (सिगारेट लायटर) इत्यादी सहज सापडेल असेच दोन चार ठिकाणी ठेवावे.

(१५) धुणी वाळत घालायची काठी, नारळ फोडायचा कोयता, भाजी चिरायची विळी/सुरी, मिसळणावळातील तिखटाची भुकटी ही नित्य कामाव्यतिरिक्त, केव्हाही गरज लागल्यास सहज सापडेल असे पण झाकुन ठेवावे, व मुले मोठी असल्यास त्यान्ना कार्यकारणभाव समजावुन सांगावा!

(१६) मी म्हणजे राजा, बायको म्हणजे राणी, पोरे म्हणजे राजकुमार/राजकन्या, अन माझे घर म्हणजे माझे राज्य, हे असे वागताना, तुमच्या राज्यात, तुमच्या माहितीच्या पाहुण्यांची वेळीअवेळीची वर्दळ जरुर असु द्यावी, टेहेळणी करणार्‍यांस याचा वचक बसु शकतो.

(१७) रात्री झोपताना, उशाखाली संरक्षणास आवश्यक असे वाटतील व सहज हाताळता येतील अशा सर्व वस्तू बाळगाव्यात.

(१८) जमल्यास, शेजारच्या दोनचार घरांचे मिळून एक असे "रॅकेट" करावे की एखाद्याच्या घरातील विशिष्ट बटण दाबताच शेजार्‍यांच्या घरात घंटा/धोक्याचा यांत्रिक आवाज (अलार्म) किंवा तत्सम आवाज ऐकू जाईल; याकरता हल्ली बहुतेक ठिकाणी इन्व्हर्टर असतातच, तेव्हा वीज खंडित होण्याचा प्रश्न पडू नये, तसे असल्यास चार्जेबल ब्याटर्‍यांवर ही योजना करावी.

(१९) ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत असे अनेक लोक टेडी बेअर व तत्सम सॉफ्ट टॉइज गाडीच्या मागे डिकीत काचेतून आरामात दिसू शकतील अशा प्रकारे ठेवलेले असतात. खेळण्यासाठी जरुर बरोबर बाळगावीत, पण सहज दिसू शकतील अशा प्रकारे अशी खेळणी ठेऊ नयेत. तसेच मुलांची नावे गाडीच्या काचेवर लिहू नये, कारण या दोन्हीमुळे घरात लहान मुले आहेत ह्या गोष्टीची व त्यांच्या नावांची रस्त्यावरून येता जाता व अनोळखी ठिकाणी आपसूक जाहिरात होते. शिवाय असे वाहन महागडे असेल तर "पार्टी मालदार आहे" असा (बरोबर अथवा गैर) समज करून गुन्हेगार अपहरणाची योजना बनवू शकतात.
ही गोष्ट अतीशयोक्तीपूर्ण खचितच नाही, कारण गुन्हेगार कसा विचार करू शकतात ह्याचा आपण विचार केला तर अशा अनेक गोष्टी सुचू शकतात.

(२०) सदनिकेत राहणार्‍या सर्वांनी... बाहेरून कुणालाही कडी लावता येणार नाही याची व्यवस्था करावी. काही इमारतींमधे घडलेल्या भीषण गुन्ह्यामधे आजूबाजूंच्या सर्व शेजारांच्या घरांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या. जेणेकरून मदतीला कुणी पटकन धाउन येउ शकणार नाही.

(२१) आपण कधी कधी डुप्लिकेट चाव्या शेजारी अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवतो. चावी हरवल्यास विसरल्यास कामी यावे म्हणून. दुर्दैवाने चोरी झालीच तर पोलीस हा प्रश्न विचारतात्. याच्या चाव्या कोणाकोणाकडे आहेत? पोलीसाना चुकूनही चाव्या कोणाकडे आहेत ते सांगू नये. त्या लोकाना पोलीसांचा खूप त्रास होतो. एक लक्षात घ्या अत्यन्त श्रीमन्त घरातल्या मुलानीही चोर्‍या केल्याची उदाहरणे पोलीसाना माहीत असतात त्यामुळे ते सगळ्या शक्यता लक्षात घेऊन तपास करतात . त्याना दोष देण्यात अर्थ नाही. त्यामुळे ' ती फार चांगली माणसे आहेत , ते कशी चोरी करतील' अशा आर्ग्युमेन्टला काही अर्थ नाही. पोलीस त्याना 'ग्रिल' करतात्च. चोरीच्या वेळी आपल्या कडे नेहमी येणार्‍या लोकांची नावे पोलीस विचारतात. कधी कधी त्यांच्याकडे देखील पोलीस तपासाला जातात....
शिवाय आपण ठेवायला दिलेल्या चाव्या त्यांच्या कडे येणार्या नोकरमाणसांच्या लक्षात आल्या तर ते ही काही 'उद्योग' करू शकतात. आपल्या स्नेह्यांच्या नकळत. कारण ह्या चाव्या रोजच्या रोज हाताळल्या जात नाहीत. शेजार्‍यांच्या ही पटकन लक्षात येत नाही चावी कुठे कशी आहे ते. आपल्याला कधी लागली तरच शोधून देतात ते....

(२२) ७० टक्के दुचाक्या सोसायटीच्या पार्किंगम्मधून रात्री जातात. बहुसंख्य दुचाक्याना फक्त हॅन्डल लॉक असते. व ते तोडणे म्हणजे केळे सोलण्याइतके सोपे. त्यामुळे साखळी व कुलूप पण लावावे. म्हणजे ते तोडायला आण्खी वेळ आणि आवाज लागू शकतो.
  
(२३) आमच्या आधीच्या कंपनीत फायर-ड्रिल झालं आणि नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही माहिती दिली त्यातली एक अत्यंत महत्वाची सूचना:
  
रात्री झोपण्याआधी जर आपण आधी गॅस शेगडीचा रेग्युलेटर बंद करत असू आणि मग सिलेंडरचा नॉब बंद करत असू तर असे करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण सिलेंडर ते शेगडी या दरम्यान ट्युब मध्ये गॅस साठलेला असतो. त्यामुळे ट्युब तर हळू हळू खराब होतेच, पण झुरळं, उंदीर अशा अनेक कारणांनी ट्युब जर का कधी फाटली, तर त्या साठलेल्या गॅस मुळे आग लागण्याची शक्यता असते. रात्री शेवटचा वापर झाल्यावर सर्वप्रथम सिलेंडरचा नॉब बंद करावा आणि ज्योत विझली की मग शेगडीचा रेग्युलेटर.
  
(२४) मुंबईतल्या घरफोड्यांच्या बातम्या वाचल्या तर बहुतेक ठिकाणी रंगकाम, सुतारकाम, किंवा गवंडीकाम करून घेतले होते. असे काम करून घेताना विशेषतः आणि तसे नेहमीच घरातल्या किमती वस्तू जसे दागिने बँक लॉकर मधे ठेवावेत. कामगारांना आपली भाषा समजत नाही असे मानून त्यांच्यासमोर अशा गोष्टींची किंवा आपले घरे कसे केव्हा रिकामे (माणूस रहित) असेल याची चर्चा टाळावी.

(२५) आपल्या घराच्या सुरक्षेबरोबरच शेजारीही लक्ष ठेवावे. आजकाल बर्‍याच घरात दिवसा किंवा अगदी २४ तास वृद्ध जोडपी वा एकटी व्यक्ती घरात असतात, तर त्यांच्याकडे कोण येते जाते यावर ही लक्ष असू द्यावे. नेबरहूड वॉच सारखे.