Saturday, May 22, 2010

पी.एम.टी. उर्फ पुण्याची ऐश्वर्या राय

ह्या विनोदी लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.




बर्‍याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त मला पुण्याला यावं लागलं. मंगेश तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं तर जिला 'पुण्याची ऐश्वर्या राय' म्हणतात ती पी.एम.टी. ची बस हिच्याबद्दल मी काही-बाही ऐकून असल्याने मामाकडे औंधला जाण्यासाठी कॉर्पोरेशन पर्यंत साधी रिक्षा करून मग शेअर रिक्षाने औंध गाठावे असा विचार करत होतो. पण स्वारगेटला उतरल्या उतरल्या समोरच औंधची बस दिसली आणि मोह आवरता आला नाही. "चला सुटलो, आता मेंढरासारखे कोंबून शेअर रिक्षात बसायला नको," मला पटकन वाटून गेलं. त्याच आनंदात मी झटकन बसमध्ये शिरलो आणि मला चालकाशेजारची जी सिंगल सीट असते ती मिळाली. एक तर पुण्यात लगेच बस मिळणे आणि चक्क बसायला जागा आणि तीही आवडती जागा मिळणे हा एक दुग्धशर्करा (च्यामारी दोन्ही महागलंय हल्ली. त्या शरद पवाराच्या फुल्या फुल्या फुल्या) योग का काय म्हणतात तोच होता की!

मला फक्त हर्षवायूच व्हायचा शिल्लक होता."याSSहु" असं जवळ जवळ ओरडतच मी बसलो. पण पुढे काय वाढून ठेवलंय ते मला तेव्हा कसे बरं कळणार? लवकरच हाय रे रामा, जळ्ळं मेलं नशीब ते, नशीब XX तर काय करील पांडू, अशा असंख्य म्हणी, वाकप्रचार आणि अनेक हताश विचार मनात येऊन गेले. कारण बस सुरु होताच मला लक्षात आलं की बस मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी जे इंजिन असतं त्याचं झाकण गायब होतं आणि त्यातून एक गरम वाफेचा झोत थेट माझ्या चेहेर्‍यावर येत होता. माझा त्या बसमधला पुढचा अर्धा-पाउण तास कसा गेला असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. औंधला उतरेपर्यंत चेहेर्‍याची उजवी बाजू आकाराने एखाद्या भरल्या वांग्यासारखी (बी.टी. नै हो, साध्या) आणि रंगाने टोमॅटोसारखी लालेलाल अशी दिसत होती. मामा-मामी दोघेही माझ्या या अशा चमत्कारिक अवताराकडे पाहून हसत होते. मामीने तर विचारलंच, "काय रे, पुण्यात आल्या आल्या मारामारी वगैरे केलीस की काय?" तिचं बरोबरच होतं, कारण माझा उजवा गाल कुठल्यातरी कोल्हापुरी पैलवानाने थोबाडीत ठेऊन दिल्यावर सुजावा तसा दिसत होता. त्यानंतर मी "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर घोर प्रतिज्ञा केली.

......पण ती फारशी टिकली नाही. पैसे वाचवण्याच्या नादात मी काही महिन्यांनी मी पुन्हा तीच चूक केली. यावेळी मला धायरी परिसरात जायचं होतं. पुणे एस.टी. स्थानकावर उतरताच मित्राला फोन केला. "समोरच पी.एम.टी चा स्टँड आहे, तिथे अशा अशा नंबरच्या बस धायरीला जातात. आत्ता आठ वाजले आहेत. टाईमटेबलप्रमाणे आत्ता आठ वीसची एक बस आहे, ती तुला मिळेल," तो म्हणाला. त्याने नक्की कुठले नंबर सांगितले ते आत्ता आठवत नाहीत, तसे तेव्हाही आठवून उपयोग नव्हताच. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात, ती तुमच्या इच्छित स्थळी जाते आहे ना, मग झालं तर, असं असतं.

प्रचंड उत्साहात मी स्टँडच्या दिशेने मोर्चा वळवला. बाहेरून प्रथमदर्शनी तो स्टँड रामसे बंधूंच्या चित्रपटातल्या भूतबंगल्यासारखा दिसत होता. म्हणजे एकदम काळोखी वगैरे, आतून चित्रविचित्र आवाज येतायत पण आत जिवंत माणसांची वर्दळ आहे की नाही याची शंका यावी असे असा. अचानक एखादी हडळ यावी तशी एक बस रोरावत बाहेर पडली. तिला चुकवून मी आत शिरलो. आत समोर दोन व त्यामागे दोन अशा चार बस उभ्या असलेल्या दिसल्या. चारही बसचे क्रमांक नीट दिसत नव्हते.

"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत.

असो. त्यांनी सांगितलेली बस नक्की धायरी फाट्याच्याच दिशेने जाईल ह्याची बसवरची अस्पष्ट पाटी वाचून खात्री करून घेतल्यावर मला पुन्हा एकदा ह.वा. झाला. पण ती सुद्धा रा.ब. च्या भू.बं. मधल्या अंधार्‍या खोली सारखी दिसत होती. सव्वा आठ वाजलेले असूनही आतले दिवे लागलेले दिसत नव्हते, पण इच्छुक प्रवासी मात्र होते.

"ती धायरीची बस कधी सुटेल हो?" बसमागे असलेल्या हापिसवजा खोपटासमोर खुर्ची टाकून आणखी एक मामा बसले होते त्यांना मी प्रश्न टाकला.

"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".

मी निमुटपणे बशीत जाऊन बसलो. आठ वीसचे साडेआठ केव्हाच होऊन गेले होते. तसं म्हणाल तर मुंबईतल्या सगळ्या बस अगदी वेळेवर सुटतात असा आपला दावा नाही बुवा. पण निदान बसमधले दिवे लागले आहेत, चालक बाहेरची पाटी फिरवतोय, कंडक्टर जवळच्याच पानपट्टीवर स्वतःच्या मुख-वंगणाची सोय करतोय, अशी सूचक दृश्य तरी दिसतात. इथे तर आत बसलेल्या इच्छुक प्रवाशांच्या चेहेर्‍यावर देखील तशी काही लक्षणे दिसेनात!

साडेआठ, आठ पस्तीस, आठ चाळीस, असं करता करता पावणेनऊला शेवटी ड्रायव्हरसाहेब येऊन स्थानापन्न झाले आणि त्यांनी बसमधले दिवे लावले. माझ्याइतक्याच कावलेल्या एका आजींनी शेवटी, "काय हो किती वाजले, किती हा उशीर?" असं विचारलं. मला वाटलं लोकलाजेस्तव किंवा स्त्रीदाक्षीण्यापोटी तरी काहीही न बोलता ते बस सुरु करतील. पण बोलण्यात हार जातील तर ते पुणेकर कसले! त्यांनी तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्‍यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली आणि "ए आज्जे, थोडी बी कळ सोसंना का तुला" अशी मुक्ताफळं उधळली. पु.लं.च्याच भाषेत सांगायचं तर असा 'एक अकारण हिणकस शेरा' मारला. त्यानंतर त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली, तेव्हा मला आपण आज काही धायरीला पोहोचत नाही असं वाटू लागलं. कंडक्टरसाहेब जास्त समजूतदार असावेत. त्यांच्या हस्तक्षेपाने आणि आमच्या सुदैवाने ही विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांवर घसरली नाही आणि ड्रायव्हरसाहेबांनी बस सुरु केली.

बस सुरु करेपर्यंत आळशीपणाचा महामेरू असलेल्या ड्रायव्हर साहेबांनी मग जेव्हा "च्यामारी, फॉर्म्युला वन मध्ये मायकल शुमाकरला टफ देणारी नोकरी सोडून पी.एम.टी. सारख्या तुच्छ ठिकाणी आपल्याला नाईलाजाने बस चालवावी लागत आहे" अशा आविर्भावात बस चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छातीत परत धडधड सुरु झाली.

पण जिलब्या, खुन्या, वगैरे मारुतीच्या आणि गणपतीच्या कृपेने मी सुखरूप धायरीला उतरलो आणि पुन्हा एकदा "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी घोर वगैरे प्रतिज्ञा केली.

हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? द्याट रिमाईंड्स मी. आता तिला पुण्याची कतरिना म्हणावं काय?