Wednesday, May 2, 2012

पोलिटिकल करेक्टनेसच्या बैलाला @#($*&( #&

"वायझेड आहेत साले" ऑफिसच्या कॅब मधे माझा सात्त्विक संतापयुक्त आवाज घुमला आणि सगळे दचकले. निमित्त होतं एका एफ.एम. वाहिनीवरच्या कार्यक्रमाचं. "....पेश करते हैं मिस्टर घंटा." नेहमीच्या ऐकण्यातल्या घंटा सिंगचं मिस्टर घंटा हे रुपांतर ऐकलं आणि माझी सटकली. सटकली म्हणजे भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे सटकली. काही मित्रांच्या मते माझी सटकली ही द्विरुक्ती आहे म्हणून मग भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे शब्द जोडावे लागतात.

हे कृत्य पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली केलं गेल्याचं समजलं आणि त्या सटकण्यात आणखी भर पडली. डोंबलाचा पॉलिटिकल करेक्टनेस.

पोलिटिकल करेक्टनेस या शब्दप्रयोगाची तोंडओळख झाली ती मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना. कृष्णवर्णीय लोकांना निग्रो म्हणू नका हे मान्य, पण काळ्या लोकांना काळं (Black) नाही म्हणायचं हे समजल्यावर माझी पहिल्यांदा भ, म, प्र, ल वगैरे स. काळं (Black) या शब्दाला आलेला पर्यायी शब्दप्रयोग इतका हास्यास्पद आहे की त्यापेक्षा विनोदी दुसरा असूच शकत नाही. काळ्यांना काळं न म्हणता म्हणे आफ्रिकन-अमेरिकन (African-American) म्हणा. छान. आनंद आहे. म्हणजे काळी लोकं काय फक्त आफ्रिकेतूनच अमेरिकेत आली? बरं ठीक आहे. पण मग शेकडो वर्ष अमेरिकेत राहून अनेक पिढ्या तिथलं नागरिकत्व उपभोगून पूर्ण अमेरिकन झालेल्या, अमेरिकेशी अगदी रक्ताचं नातं निर्माण झालेल्या काळ्या लोकांचं काय? अरे बाबांनो, जे आहे ते आहे तेच म्हणा की. खरं बघायला गेलं तर 'आफ्रिकन-अमेरिकन' हा शब्दप्रयोग काळं या शब्दापेक्षा जास्त वंशद्वेष्टा आहे. काळे, गोरे म्हटलं की ते कोणत्याही देशाचे असू शकतात, त्यातून त्वचेचा रंग सोडला तर इतर कसलाही बोध होत नाही. पण जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी (वाचा: वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर, रेडिओवर, आणि विपत्र, पत्रकं, जाहीराती, वगैरे औपचारिक संपर्कमाध्यमांतून) 'आफ्रिकन-अमेरिकन' असं संबोधून काळ्यांना "तुम्ही बाहेरचे आहात" असा संदेश सतत जात नाही का? याकडे कुणाचंच कसं लक्ष गेलेलं नाही? मी स्वतः काळा किंवा गव्हाळ आहे, ओबामा काळा आहे, आंद्रे आगासी गोरा आहे, जॅकी चॅन पिवळा (yellow) आहे - बोला काय म्हण्णॉय? अरे कुणाला शिव्या घालतोय का? मग जे आहे ते तसं म्हणा ना!! काय आफ्रिकन-अमेरिकन, ऑरियेंटल वगैरे भंकस लावली आहे!!

आणखी एक बकवासयुक्त शब्दप्रयोग नुकताच वाचनात आला. "...इस्लामधर्मियांचा हा महत्त्वाचा सण आहे". महान वैताग. अरे, अरे इस्लामधर्मीय काय? सरळ मुसलमान म्हणा ना! गंमत बघा, मुसलमान स्वतःला मुसलमान म्हणवतात. काळे स्वतःला काळे म्हणवतात. ज्यु स्वतःला अभिमानाने ज्यु म्हणवतात. मग काय फरक पडतो ज्याला जे आहे ते म्हणण्यात?

भाषा, जात, वगैरे तर विनोदनिर्मितीची राखीव कुरणे आहेत. द्वेषमूलक विनोद होऊ नयेत हे अगदी मान्य, पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली यांच्यावर आधारित विनोदांवर संपूर्ण बंदी घातली तर विनोदाचे एक मोठे दालन बंद होईल. लहानपणापासून सरदारजीचे विनोद ऐकलेले आहेत. आणि साधे विनोद सरदारजीच्या नावावर खपवलेलेही आहेत (आपल्याकडे कसं सर्वसाधारण विनोदावर फारशा हशा होत नाही पण तोच विनोद पु.लं.चा आहे हे जोडून सांगितला की ठो ठो ठॉ सगळे असतात तसं). दोन्ही बाबतीत अगदी सातमजली हसलो आहे, इतरांना हसवलं आहे. मग आत्ताच का या रिकाम्या न्हाव्यांना भींतीवर तुंबड्या लावण्याची बुद्धी झाली आणि बाकी सगळं सोडून सरदारजीचे विनोद खुपू लागले? अरे घंटा सिंग चा मिस्टर घंटा करणार्‍यांनो, ही कसली 'घंट्याची' विनोदबुद्धी?

अरे कोकणस्थ ब्राह्मणांवर विनोद हवेत? लेले, नेने, गोडबोले हे आपापल्या नावांचे रबरी शिक्के कसे बनवून घेतात ते विनोद तर चावून चावून चोथा झालेले आहेत. भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, रिकामा सुतार कुल्ले ताशी, चांभार चौकशा या म्हणींचं लहानपणी काही वाटत नसे आणि आजच्या पोलिटिकल करेक्टनेसच्या नामक भंपकपणाच्या मागे लागलेल्या जगात तर त्याहून काही वाटत नाही. पण मग अचानक सगळ्यांच्या भाषिक आणि प्रांतिक आणि जातीय अस्मिता अचानक का बरं जाग्या झाल्या? अरे जरा बुद्ध्यांक वाढवा स्वतःचा.

आजकाल तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टीसुद्धा पोलिटिकल करेक्टनेसच्या भीतीपोटी "ढोबळमानाने असं म्हणता येईल की" किंवा "असं म्हणायला थोडाफार आधार आहे की..." अशा भंपक आवरणांखाली लपवल्या जातात तेव्हा भयानक चिडचिड येते. वंश (race) याची व्याख्या "मानवाचे जनुकीय आणि भौगोलिक वारशाने मिळालेल्या दिसण्यावर आधारित गटात वर्गीकरण" (Race is classification of humans into large and distinct populations or groups often based on factors such as appearance based on heritable phenotypical characteristics or geographic ancestry. म्हणजेच, काही रंग, उंची आणि इतर काही शारिरीक वैशिष्ठ्ये ही वंशाशी संबंधीत असतातच. मग त्याबद्दल शब्दांच्या उपयोगाला आक्षेप का?

पोलिटिकल करेक्टनेसचा उद्देश समाजाच्या सर्व स्थरावर समानता आणणे आहे असं म्हणतात. पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नको तितकं मागे लागल्याने अनेक हास्यास्पद शब्दप्रयोग वापरात घुसले आहेत. वेडा म्हणू नये हो, मनोरुग्ण म्हणा (इंग्रजीतला शब्द अतीगोड आहे. वेड्याला तिकडे mentally challenged म्हणतात) —एका वर्तमानपत्राने कहर केला होता 'मानसिक अस्वास्थ्याने बराच काळ त्रस्त असलेल्या श्री. अमुकतमुक यांनी परवा आत्महत्या केली.....' मला आत्महत्या सोडून बाकीच्या वाक्याचा अर्थ लागायला मोजून एक मिनीट लागलं. अरे हे काsssय्ये? वेडा म्हणा ना वेडा. वेडाच होता ना तो? मग? मग काय, अर्थातच माझी भ, म, प्र, ल वगैरे स. वेडा! वेडा!! वेडा!!!

कालचक्र उलटं फिरवावं असं कुणाचचं म्हणणं असणार नाही. काळ्यांना पूर्वीसारखं 'नैसर्गिक गुन्हेगारी वृत्तीचे लोक' अशा दृष्टीने बघा असं कुणीच म्हणणार नाही. किंवा नाभिक जातीने इतर कुठला व्यवसाय करु नये असंही कुणाही सुसंस्कृत माणसाचं मत नसेल. पण मग काळ्यांना आफ्रिकन-अमेरिकन म्हटल्याने त्यांच्याकडे नैसर्गिक गुन्हेगार म्हणून बघण्याची वृत्ती नष्ट झाली आहे का? अजिबात नाही. उलट ती वृत्ती वाढीला लागली आहे हे कटू सत्य आहे. इंग्लंड मधे नुकत्याच गाजत असलेल्या वांशिक भेदाभेदाच्या आरोपांनी हे सत्य अधिकच उघडं नागडं करुन समोर आणलं आहे. अशुतोष गोवारीकरचा स्वदेस बघितला तर आपला विणकराचा पारंपारिक व्यवसाय सोडून शेती व्यवसायात पडू पाहणार्‍या हरिदासची कथा ही निव्वळ कथा नाही, तर आजही आपल्या ग्रामीण भारतातलं वास्तव आहे. मग, काय डोंबलाची क्रांती केली आहे तुमच्या पॉलिटिकल करेक्टनेसने? 'त्याने' असं लिहीण्याऐवजी आता 'त्याने/तिने' (he/she) असं लिहीण्याची पद्धत अनेक आस्थापनात रुढ झाली आहे. बिझनेसमनच्या ऐवजी बिझनेसपर्सन (businessperson) असा शब्दप्रयोग रुढ झाल्याला काही कमी काळ लोटलेला नाही. पण त्याने भेदभाव आपोआप थांबला आहे? स्त्रीमुक्ती संघटनांची आंदोलनं थांबली आहेत?

दुरावा हा अबोल्याने सुटत नाही. तसंच एखादं खदखदणारं शल्य किंवा अवघड प्रश्न, एखादा कठीण भासणारा मुद्दा हा त्याला बगल दिल्याने, त्याला गोड गोड भंपक शब्दांमागे आणि खोट्या कल्पनांमागे लपवल्याने सुटत नाही. त्याला सर्व शक्तीनिशी भिडलं तरच त्याचा निकाल लागतो. मला तरी म्हणूनच वाटतं की पोलिटिकल करेक्टनेस हा एक पलायनवादी दृष्टीकोन आहे, समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे. समानतेचा खरा अर्थ हा की आपण आपल्यातले मतभेद उघडपणे बोलून चर्चा करुन सोडवणे.

म्हणूनच म्हणतो, पोलिटिकल करेक्टनेसच्या बैलाला @#($*&( #&@)*#$(@#*$

अरे बाप रे! काय सांगताय? मी वर एके ठिकाणी "रिकामा न्हावी" म्हणालो? बरं म्हणालो, काय म्हण्णॉय?

--------------------------------------------------------------------------------------

थोडसं अवांतरः आपली मराठी लोकं जगभर पसरलेली आहेत. त्यामुळे नेहमीच्या वापरातले काही शब्द आता तिथली-तिथली लोकं ओळखू लागली आहेत म्हणे. "काळे" म्हटलं की म्हणे तिथल्या लोकांना हल्ली व्यवस्थित समजतं कुणाबद्दल बोलणं सुरू आहे ते. म्हणून आता आपली लोकं काळ्यांबद्दल बोलायचं झालं तर "व.पू." म्हणतात असं ऐकिवात आहे. आहे की नाही आपला मराठी माणूस डोकेबाज!

--------------------------------------------------------------------------------------



Friday, April 13, 2012

श्री महालक्ष्मी उत्सव, केळशी, २०१२: सचित्र वृत्तांत

लहानपणापासून कोकणात जातो आहे—चिपळूण, दापोली, आडे, पाडले, आंजर्ले, आणि आमचं केळशी. शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपली की जे पळायचं कोकणात ते थेट जूनच्या पहिल्या आठवड्यात परतायचं हा आमचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम. त्यात मुक्काम आणि म्हणूनच जास्त वेळ घालवला आहे तो अर्थातच केळशीला. कालांतराने फार राहणं जमत नसलं तरी कोकणाबद्दल आणि विशेषत: केळशीबद्दल प्रचंड प्रेम, आकर्षण, आणि जिव्हाळा आहे तो तसूभरही कमी झालेला नाही.

केळशीला घर आणि थोडीफार आंब्याची कलमे, वाडी वगैरे असल्याने अधुनमधून जाणं हे होतंच. पण गेली पाच-सहा वर्ष चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं ते महालक्ष्मीच्या यात्रेला जायला जमलं नव्हतं म्हणून. मी तसा फार देव-देव करणार्‍यातला नाही, पण धार्मिक म्हणता येईल इतपत नक्की आहे. त्यामुळे वर्षातून दोन उत्सव जवळ आले की साधारणपणे महिनाभर आधी मनात थोडं अस्वस्थ वाटू लागतं. दर गणेशोत्सवाच्या आधी आणि केळशीच्या महालक्ष्मीच्या यात्रे आधी साधारण महिनाभर मनात विचारांची गर्दी सुरू होते. काय करता येईल, कसं करता येईल, सगळं व्यवस्थित होईल ना, एक ना दोन! अनेक अडचणींमुळे अनेक वर्ष जाणं होत नव्हतं. या वर्षी मात्र निर्धार केला आणि कालनिर्णय मधे उत्सवाची तारीख बघून फेब्रुवारीमधेच ऑफिसात रजेचा अर्ज टाकून मागे लागून लागून मंजूर करुन घेतला.

इकडे फेसबुकवरच्या आमच्या केळशीच्या ग्रूपमधे केळशीतल्याच वैभव वर्तकने तयारीचे, रामनवमीचे फोटो टाकून टाकून आम्हा शहरी केळशीकरांच्या मनातली "कधी एकदा केळशीला पोहोचतो" ही भावना करता येईल तितकी तीव्र करण्यात आपला हातभार लावला होताच.
त्यामुळे केळशीला पोहोचल्या पोहोचल्या जेवण आणि वामकुक्षी उरकून आधी धाव घेतली ती देवळात. देवळाकडे जाताना प्रथम दृष्टीस पडला तो दिमाखात फडफडणारा भगवा.



आत महिला मंडळाचं भजन इत्यादी कार्यक्रम चालू होते. जोडीलाच सजावट, हनुमान जयंतीच्या दिवशीच्या स्वयंपाकाची, आणि मांडवाची इतर कामे सुरू असलेली दिसली.




काही वेळ परिचितांशी गप्पा आणि काही विषयांवर चर्चा करुन घरी परतलो. रात्री कीर्तन असते ते साधारण दोन ते पाच या वेळात.

एरवी कुणाचं "प्रवचन" ऐकलं की दिवसाढवळ्या झोप येते, पण महालक्ष्मीच्या देवळात कीर्तन म्हटलं की मी टक्क जागा! अगदी लहानपणापासून कीर्तन सुरू असताना मला कधीही झोप आल्याचं आठवत नाही!!

कीर्तनाला जायचं म्हणजे नुसतंच जाऊन बसायचं असं कधीही होत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः गेल्याशिवाय "तुला अमुक काम करायचे आहे" असं कुणीही सांगत नाही. आपण कधीही गेलो तरी दिसेल त्या कामात हातभार लावायला सुरवात करायची - मग पुढे काय अपेक्षित आहे ते आई अंबाबाईच्या कृपेने कळतंच. मांडवात दिवे लावायला मदत करणे आणि इतर पडेल ती कामं करायला मदत करणे हे असतंच. यावर्षी एका हातात/कडेवर चिरंजीव होते तरी दुसर्‍या हाताने मी एकाला स्टूल(घोडा) हलवायला मदत करत होतोच. देवीच्या सेवेत आपोआप हात रुजू होतात.

कीर्तनाला जमलेला महिलावर्ग:

सजवलेली रथपुतळी:

कीर्तनापूर्वी सुरू असलेली तयारी:







गोंधळींचे आगमन:

गोंधळ:


 कीर्तनकार: रत्नागिरीचे श्री. नाना जोशी

देवळाबाहेरचे दृश्य:

त्या दिवशी घरी परत आल्यावर देवळात वाहायला निवडलेले एक पुष्प:

चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी साधारण अकरा वाजता रिकामा रथ रथागारातून देवळात नेण्याचा कार्यक्रम असतो. अर्थात हे म्हणजे फक्त उचलून नेऊन ठेवणे हे नाही. गावातल्या विविध आळ्या यांच्यात गट पडतात आणि मग खेचाखेची करत प्रचंड धमाल करत कुठल्याही बाजूने रथ खाली टेकू न देता देवळापर्यंत नेणे हा एक खडतर पण त्याच वेळी अत्यंत मजेशीर कार्यक्रम पार पडतो. बर्‍याच वर्षांनी जातो आहे यात्रेला, त्यामुळे रथाखाली लगेच जायचं नाही असं ठरवलं होतं, पण "सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss" अशा लांबूनच सामूहिक आरोळ्या ऐकू आल्या आणि मला एकदम चेव आला. आमच्या साठीच्या पलिकडे पोहोचलेल्या तीर्थरूपांच्या चेहर्‍यावरील आवेशयुक्त भाव वेळीच ओळखून "तुम्ही माझे पाकीट आणि मोबाईल सांभाळा, मी जातो पुढे" असं सांगून रथाला खांदा लावायला धावलो. रथाला खांदा लावण्यामागे काय झिंग असते ती नुसतं सांगून कळणार नाही. त्यासाठी जन्माने केळशीकर असायला हवं. तरच ती झिंग अनुभवता येते आणि दुसर्‍या कुठल्याही गोष्टीशी, अनुभवाची त्याची तूलना होऊ शकत नाही.



(वरील तीन छायाचित्र - सौजन्य: प्रणोती अमोल केळकर)

यात केलेले विनोद, थट्टा, आणि टिप्पण्या ऐकण्यासारख्या असतात.

"अरे टेकू देऊ नका, उचल रे ए ए"

"अरे सिस्टिम एरर देती रे"

कुणाला बाजूच्या घरात पाणी पिताना आणी उसासे टाकताना पाहून कुणी ओरडतो "अरे बायको आलीये बघायला म्हणुन उगाच हा हू करु नको दोन मिनिटं रथाला लागल्यावर, चल पळ लाव खांदा लवकर". हास्याच्या धबधब्यात न्हाऊन निघालेला तो मग पुन्हा ताजातवाना होऊन खेचाखेचीला सज्ज होतो.

खेचाखेची ज्या पद्धतीने चाललेली असते त्याबद्दल कुणी नाराज होतो, मधेच तावातावाने भांडणाचा पवित्रा घेतो, डेसिबल प्रचंड वाढवत ओरडतो. अननुभवी असलेले चमकून बघतात पण मग अचानक मधेच त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटतं आणि "सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss" असा गजर होतो आणि रागावलेला आणि रागवून घेतलेले दोन्ही मंडळी नव्या जोमाने रथ उचलतात.

नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरुन खेचाखेची करताना प्रचंड हाल होतात. नुसता मातीचा कच्चा रस्ता फार तापत नाही. त्यामुळे पाय भयानक भाजून निघाले. मंडळी दमली ती यामुळे. नाही तर देवी आईच्या रथाच्या वजनाचे कष्ट ते काय?

अशा रीतीने खेचाखेची करत रथ देवळासमोर ठेवला की असा जल्लोष व्यक्त केला जातो.

रथ ठेवल्याठेवल्या मंडळी पळतात ती गावजेवणाची तयारी पूर्ण करुन वाढायच्या तयारीला लागायला:


जेवण सुरू असताना:


गावजेवण संपलं की मंडळी दुपारी उशीरा घरी परततात आणि दुसर्‍या दिवशीच्या पहाटे कीर्तन आटपल्यावर मग गावातून रथ फिरायला सुरवात होते. आधी वर्णन केल्याप्रमाणे रथ हा उचलून न्यायचा असतो. वेगवेळ्या ज्ञातींना हा मान मिळतो.

रथ उचलल्यावर:


ही आमची उभागर आळी:

कागदोपत्री हे नाव असलं तरी ह्या आळीला टिळक आळी असेही म्हणतात, कारण या आळीतल्या आमच्या या घराला लोकमान्य कधीकाळी भेट देऊन गेले होते.


रथाच्या प्रतीक्षेत:





रथावर पूजेसाठी चढताना अस्मादिकः
रथपुतळीची पूजा करताना:
रथावरुन उतरताना:

यावर्षीचे भालदार चोपदार:
रथावरील सजावट, इत्यादी:

गावातून रथ फिरवून झाल्यावर अर्थातच तो आणला जातो पुन्हा देवळात:







पण त्या आधी देवी (रथपुतळी) "सोडवून" ती देवळात पुन्हा नेली जाते:




मग रथावर चढतो तो उठबर्‍या. इतका वेळ देवीचा वास असल्याने 'हलका' असलेला रथ, देवी जाताच 'जड' होतो. कारण देवी जाताच रथावर असंख्य भुतंखेतं आणि दुष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होतो असे म्हणतात.



देवीच्या सेवेत रुजू असलेली सुरक्षाव्यवस्था:
काही मिनिटांच्या अंतराने होत असलेले सूर्यास्त आणि चंद्रोदय:
रथाच्या प्रतीक्षेत देवळाभोवताली जमलेली मंडळी:


रथ आला:

रथ ठेवताना:

रथावरची सजावट काढली जात असताना:
सगळ्या दिवशी कीर्तनात सहभाग असलेले तबलजी आणि पेटीवाले:


अशा रीतीने या वर्षीचा श्री महालक्ष्मीचा उत्सव अत्यंत उत्तमरित्या पार पडला!

दरवेळी यात्रेला जाऊन आलं की सुरवातीचे दोन-तीन दिवस ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करणं जरा कठीण जातं. आता उत्सव संपून जवळजवळ आठवडा होत आला आहे आणि ऑफिस आणि घर हा रोजच्या रामरगाडा एव्हाना पुन्हा सवयीचा झालाय. खेचाखेची करुन झाल्यावर दिवसभर "आम्ही दुखतो आहोत" असं वारंवार जाणीव करुन देणारे खांदे आता दुखत नाहीत, पाठ उत्तम आहे, कंबरेनेही तक्रार केलेली नाही. मात्र खेचाखेची करताना पायाला पडलेले वितळलेल्या डांबराचे आता थोडे विरळ झालेले डाग पाहून आजही बाहू फुरफुरतात, आणि सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss असं मनातल्या मनात म्हणत कामाच्या रथाला मी स्वत:ला जुंपतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक केळशीकर श्री. सतीश वर्तक यांनी काढलेले देवळाचे रेखाचित्रः
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गावाकडची काही इतर प्रकाशचित्रे:

कोकणचा मेवा:
आम्ही जायच्या आदल्या दिवशी आमच्या तिथल्या काळजीवाहू कर्मचार्‍याने (caretaker) पाळलेल्या गुरांपैकी एक गाय व्यायली. तिचे हे गोजिरवाणे वासरू:
एरवी आपल्याला फोटो काढायचा असला की प्राणी लहरीपणा हमखास करतात.....पण गुरे कोकणातली असल्यामुळे......


........त्यांनी ही अशी सुंदर 'पोझ' दिली!!

माळ्याचा मळ्यामंदी, पाटाचं पाणी जातं.....:


संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा: