अनेक राजकारण्यांना चर्चेत राहण्यासाठी काही ना काही सनसनाटी, विचित्र वक्तव्य करावीच लागतात. त्याचप्रमाणे ते तोंडावाटे जी नकारात्मकता पसरवतात ती आत्यंतिक निष्ठेने घणाघात, टोला, चिमटा, इत्यादी लेबले बातम्या म्हणून पसरवण्याचं काम पत्रकार करत असतात. अशा राजकारण्यांना आपल्या तोंडावाटे काय बाहेर पडतं आहे याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नसते (आणि अनेकदा फारसा विचार करण्याची त्यांची तितकी कुवतही नसते) कारण ती वक्तव्ये मुळातच लोकांना वैताग आणायला आणि उचकवायला केली गेलेली असतात.
कलाकारांचं मात्र तसं नसतं; यात नटनट्या, दिग्दर्शक, लेखक, आणि कवी आणि सगळेच सादरकर्ते अर्थात 'परफॉर्मर' आले. त्यांना काहीही मांडायला सर्जनशीलता वापरावी लागते. त्यातच विशिष्ट राजकीय अजेंडा आणि आणि कला या गोष्टी एकत्र आल्या की एक आकर्षक आणि प्रभावी, पण तितकंच फसवं आणि घातक मिश्रण तयार होतं. ज्याप्रमाणे आयुर्वेदात दूध उत्तम, फळे उत्तम पण मिल्क शेकचे दूरगामी घातक परिणाम होतात त्याचप्रमाणे कलाकारांची सर्जनशीलता आणि धर्मद्वेषी राजकीय अजेंडा यांचं मिश्रण झाल्याने होतात.
एक कविता गेले अनेक दिवस समाजमाध्यमांवर फिरते आहे. विशेष म्हणजे ही कविता फिरवणाऱ्यांमध्ये काही हिंदुत्ववादी रामभक्त ही सामील आहेत. यात त्यांचा दोष नाही; डाव्यांना एका गोष्टीचं श्रेय दिलंच पाहिजे की त्यांनी अनेक हुशार कलावंत आपल्याकडे ओढून घेतलेले आहेत किंवा ते असेट्स व्यवस्थित पोसले आहेत. कविता वापरून दिशाभूल करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे.
तर, या तथाकथित कवितेतली नकारात्मकता इतक्या खुबीने झाकली आहे की अनेकांना प्रथमदर्शनी "बरोबरच बोललाय की तो!" किंवा "त्यात काय वाईट आहे?" असं नक्कीच वाटू शकतं. आधी ही कविता दिसली तेव्हा की फारसं लक्ष दिलं नव्हतं, मात्र मला दोन जणांनी, म्हणजे दोन हिंदुत्ववादी मित्रपरिवारातल्या दोन जणांनी ही कविता आवडली म्हणून पाठवली तेव्हा माझे कान टवकारले गेले. कविता त्या व्हिडिओत ऐकता येईल किंवा गुगलून मिळवता येईल. आधी ऐकली नसेल तर ती आधी पूर्ण ऐका, आणि बघा सुद्धा.
पण कविता ऐकण्याच्या आधी संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांची वक्तव्य वाचा आणि कविता आणि त्यांच्यातील साम्य पहा.
"...तर तो राम तुम्हाला पावणार नाही."
― संजय राऊत
"राम मंदिराचं उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे..."
― अमोल कोल्हे
या दोघांची वक्तव्ये ही आपण नेहमीच पाल झटकल्याच्या घृणेने झटकून टाकत असतो, पण त्यांच्या बोलण्यातला जो आशय आहे तोच कवितेच्या वेष्टनात गुंडाळला की भल्याभल्यांना योग्य वाटू शकतं. तेच या कलाकाराने साध्य केलं आहे.
अर्थात, या व्यक्तीला कलावंत म्हणावं का हा वेगळाच विषय, पण साहेबांनी ऐतिहासिक विषयांवर पुस्तकं पण लिहिली आहेत हे एके ठिकाणी वाचून पोटात गोळा आला. असो, तर या कवितेच्या यशात, म्हणजे व्हायरल होण्यात, कवितेचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलं गेलं आहे आणि जे नेपथ्य वापरलं गेलं आहे त्याचा मोठा सहभाग आहे. काळा पडदा, एक खुर्ची, उगाचच आपण प्रगल्भ आणि वैचारिक काहीतरी बोलतोय असं भासवण्यासाठी वाढलेली दाढी घेऊन आणि हातातला पांढरा रुमाल मध्येच समेवर येऊन उद्वेगाने फडकवणारा त्या खुर्चीभोवती वावरणारा पांढऱ्या कपड्यातला एक इसम ― असं नेपथ्य हे खरं तर हाऊ टिपिकल ऑफ लेफ्टिस्ट्स, अर्थात डाव्यांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवं. पण ते अजूनही हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत नाही यात डाव्यांची हुशारी म्हणावी की आपला भोळसटपणा (naivety) याचा निर्णय मला करता येत नाही.
आता जरा इतर मुद्द्यांकडे वळूया. राम मंदिर खुलं होण्याच्या काहीच आठवडे आधी ही कविता यावी या 'टायमिंग'मध्ये काहीही आश्चर्य नाही, कारण या विषयावरून चित्त विचलित झालेले आणि पिसाळलेले अनेक राक्षस आपण बघत आहोत आणि मंदिर झाल्यावरही बघणार आहोत.
कवितेच्या सुरवातीलाच हा इसम वाल्मिकी ऋषींचा पट्टशिष्य असल्यागत आपण त्रेता युगातून आलेली व्यक्तिरेखा असल्यासारखं, "हाथ काट के रख दूंगा, ये नाम समझ आ जाये तो" अशी गर्जना करतो. कापाकापी हे सुद्धा डाव्यांचं महत्वाचं लक्षण आहेच, पण इथे जास्त लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे कवितेतून केलं गेलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि जनमानस हतोत्साहित करण्याचा प्रयास. राम मंदिर खुलं होण्याची घटिका तोंडावर आलेली असताना हा कवितेच्या सुरवातीपासूनच हा रामभक्तांना अटी घालत सुटलाय की अमुक केलंत तरच तुम्हाला राम समजेल आणि तमुक केलंत तरच रामाचं नाव घेता येईल. तोंडी लावायला ढमूक त्रास आणि दुःख सहन केलंच पाहिजे तरच...अशी भावनिक धमकी आहेच. आत्ता या क्षणी, आणि तसं बघायला गेलं तर कधीही, तुम्ही राम नाही आहात किंवा होऊ शकणार नाही हे सांगायची गरजच काय? हे एक प्रकारे असं सांगणं आहे की तुम्ही राम होऊ शकत नाही आणि चालले राम मंदिर उभारायला.
राम नावाचं परफेक्शन कुणी कधीच साध्य करू शकलेलं नाही आणि शकणारही नाही. त्या अवस्थेकडे निरंतर होणारा प्रवास म्हणजे रामभक्ती, राम उपासना. मग ते करायला अटी आणि शर्ती लागू करणारे हे महाशय कोण?
दुसरं म्हणजे "इस जबरदस्ती के जय श्रीराम में सब कुछ है बस राम नहीं" असं म्हणताना तो हजारो कारसेवकांचा धडधडीत अपमान करतोय. मान्य, जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावलं की राम भेटणार नाही. पण संपूर्ण कवितेत स्वतःच विधाने करायची आणि स्वतःच ती खोडायची ही नाटकं आहेत. वर या काल्पनिक कृत्याचा दोष सगळ्यांना द्यायचा हा शुद्ध विकृतपणा आहे. शिवाय, स्वेच्छेने जय श्रीराम म्हणणाऱ्या सामान्य बंगालीजनांवर तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केले तेव्हा हीच काव्यप्रतिभा कुठे पेंड खायला गेली होती, किंवा तथाकथित प्रेम म्हणून लग्न केल्यावर बायकोला धर्म बदलण्यासाठी, हिंदू धर्म त्यागण्यासाठी जबरदस्ती केली जाते, प्रसंगी जीवही घेतला जातो तेव्हा त्याची निर्भत्सना करणारी कविता का 'होत' नाही असा जाब कविवर्यांना विचारायला हवा.
सुमारे पाचशे वर्षांनंतर अगणित जनांच्या हौतात्म्यानंतर आणि सातत्याने कायदेशीर पाठपुराव्यानंतर राम मंदिर होणार आणि तिथेच होणार आणि तारीखही ठरली हे जेव्हापासून नक्की झालं, तेव्हापासून हिंदुद्वेष्ट्यांच्या कळपांतले राक्षस भयंकर पिसाळले आहेत. मग काहींना राम सगळ्यांचा आहे असा साक्षात्कार झालेला आहे, तर काहींना आमचा राम वेगळा आहे असा वेडाचा झटका येतोय. हॉस्पिटल आणि शाळा बांधा अशी किरकिर आताशा ऐकू येत नाही पण आहे. २०१४ मध्ये डाव्यांचं लाडकं सरकार जाऊन नवीन आणि नावडता पक्ष पूर्ण बहुमताने आल्यापासून सुरू झालेला त्रास हा २०१९ नंतर आणखी वाढला आहे. अजून बरंच काम बाकी असलं तरी ठिकठिकाणी म्हणजे शिक्षणसंस्था, बँका इत्यादी ठिकाणांहून डाव्यांची पिल्ले जाऊन राष्ट्रीय विचारांच्या व्यक्तींची नेमणूक व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवाय, सरकारचे निर्णय घोषित होण्याआधीच समजून ते बदलण्यापर्यंत किंवा रद्द होण्यापर्यंत असलेला डाव्यांचा दबदबा आज तितकासा उरलेला नाही. आता पंतप्रधान त्यांच्या मनातली बात कुणाच्याही आधी स्वतःच येऊन जनतेला सांगतात. दौऱ्यावर जाताना फुकटचे पुख्खे झोडणारे दारुबाज पत्रकारांचा तांडा न नेता सरकारी खात्याचे संबंधित निवडक लोकच सोबत असतात. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटात जो "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है" यातलं सरकार बदलून झालं, आता सिस्टमला बदलण्याचं काम हळूहळू सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापाठोपाठ २०२४च्या निवडणुकाही तोंडावर आहेत. विरोधी पक्षांना अजूनही आपली एक घट्ट मूठ म्हणावी तशी वळता आलेली दिसत नाही, त्यांना पंतप्रधानपदासाठी एक चेहराही देता आलेला नाही. अशा निर्नायकी विरोधकांसमोर आव्हान गोळीबंद आहे, तेव्हा निकाल काय लागणार ते उघड आहेच!
जर आपल्याला अपेक्षित असाच २०२४चा निकाल आला तर सिस्टीम बदलण्यासाठी १५ वर्ष खूप होतात. अधिकाऱ्यांची जवळजवळ संपूर्ण नवी फळी भरती होऊन वरिष्ठ पदांवर पोहोचते. म्हणजे सिस्टीम अधिक वेगाने बदलली जाऊ शकते आणि ही भीती विरोधकांना नक्की आहे!
डावे असुर पिसाटण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे.
सातत्याने मुळातच शांतताप्रिय आणि सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाला वर्षानुवर्षे तुम्ही शांतता पाळा, तुम्ही सहिष्णू व्हा असे डोस पाजले गेलेत त्याला आता हिंदू समाज कंटाळला आहे. आता दुय्यम नागरिक म्हणून न जगता आमचा देश म्हणून ताठ मानेने हिंदूंनी जगायला सुरवात केली आहे, हा डाव्यांच्या पार्श्वभागात घुसलेला मोठा काटा आहे. त्यांना आजही हिंदू समाजमन समजू शकलेलं नाही. मग राम मंदिरासमोर बाईट घेताना भावुक होणारे पत्रकार आणि विविध उपक्रम करणाऱ्या व्यक्ती, आणि कोट्यवधी भारतीय घरांतून ओसंडून वाहणारा उत्साह हे सगळं पाहून डाव्यांना असे काव्यमय वेडाचे झटके येणं साहजिकच आहे.
एकदा जमीन हिसकावून घेतल्यावर ती हिंदू परत घेतात आणि ती देखील हिंसा आणि अहिंसा अशा दोन्ही मार्गांनी, हा मानसिक धक्का आपल्या शत्रूंसाठी फार मोठा आहे. कारण 'झांकी' नंतर 'बाकी' गोष्टींकडे वळलेलं हिंदूंचं लक्ष हे डाव्यांना आणि एकंदर हिंदूंच्या शत्रूंना अत्यंत अस्वस्थ करणार हे उघडच आहे.
जाता जाता कवी महाशयांना माझं चार ओळीत उत्तर असं आहे की:
रामभक्त कैसे बनना है ये उनसे हम क्यूं सीखें
दुर्गा को जिन्होने वेश्या और रावण को महात्मा बताया है
तुम जैसों को अब हम रखते है जूते की नोंक पर
सैकडों वर्षों का वसूलना अब पुराना बकाया है
जय श्रीराम 🙏🏻
🖊️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ३ संकष्ट चतुर्थी, शके १९४५
विक्रम संवत २०८०